Pages

Saturday, June 4, 2016

भिंतीचा वापर

भिंतींचा वापर...

***********************
मूळ लेख : कृष्णकुमार
मराठी अनुवाद : फारूक एस.काझी.
साभार : दीवार का इस्तमाल  और अन्य लेख, एकलव्य प्रकाशन, भोपाल.
प्रकाशन :2008
***********************

          बिनभिंतींच्या शाळांचा विषय थोडा बाजूला ठेवला तर ब-यांच अंशी आपल्याला असं म्हंमता येईल की बहुंशी शाळा या भिंतींचा वापर मुलांचं रक्षण करण्यासाठी व जगापासून दूर एक वेगळंच वातावरण तयार करण्यासाठी करतात.मुलांचं रक्षण यात ऊन,वारा आणि पाऊस यांच्यापासून रक्षण ह्याबाबत काहीच दुमत असण्याचं कारण नाहीये. पण शंका तेव्हा  येते जेव्हा भिंतीचा आधार घेऊन शाळा मुलांना सामाजिक वास्तवापासून दूर न्यायचा प्रयत्न करतात. शाळाव्यवस्थेच्या दृष्टीने हे मुलांचं एक प्रकारे रक्षणच असतं. आपल्याकडे एक जुनी धारणा आहे की मुलांचं व्यक्तिमत्व वास्तवाची दाहकता सहन करूच शकत नाही. या धारणांचा वापर करून असं गृहित धरलं जातं की सामाजिक वास्तवापासून मुलांचं संरक्षण करणं हा शाळाचां जणू हक्कच आहे. या हक्कापाठोपाठ एक कर्तव्यही जन्म घेतं की मुलांसाठी समाजापासून दूर चार भिंतीत एक वेगळं विश्व निर्माण करावं.
         काही दिवसांपूर्वी भारतभर यात्रा करताना माझं लक्ष शाळांच्या भिंतींवरील सुविचारांवर गेलं. या शाळेत वेळेचा उपयोग अत्यंत विचित्र स्वरूपात होतो,तिथं लिहिलं होतं की "वेळ हीच शिस्त" ! संस्थेच्या आपसातील कलहामुळे व व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे सतत भांडणे ,वाद सुरू असतात .प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर लिहिलेलं होतं "क्रोध जिंकाल तर जग जिंकाल". अशीच काही वाक्ये होती जी शाळेतील वस्तुस्थितीच्या अगदी विपरित होती. या सुविचारांचा वापर करून मुलांच्या अवतीभोवती नैतिक वातावरण विणण्याचा प्रयत्न सुरू होता. हे वातावरण अशी नैतिकता शिकवण्याचा अट्टहास करत होतं ,जिचा आधार  ना  शाळेत पहायला मिळत होती ;ना शाळेबाहेर. यामुळे अशा सुविचारांचा हेतूच असफल झालेला दिसत होता. हे रोज रोज पाहून मुलांनाही सवयीनं माहित झालं असेल की भाषेचा उपयोग कोणत्याही निरर्थक कारणासाठी  होऊ शकतो. याअनुषंगाने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की , शाळेतील भिंती अभ्यसक्रमाबाबत नकारात्मक भूमिका पार पाडत आहेत. कारण भारतीय अभ्यसक्रम हा "भाषेच्या अर्थपूर्ण वापर करता येणे " असं भाषेचं उद्दिष्टं मांडतो. आणि शाळा स्वत: च भाषेचा कसा निरर्थक वापर करते हेच जणू मुलांना शिकवत असते.
       पाश्चात्य देशात भिंतींचा वापर मुलांच्या कृतीशीलतेशी जोडला गेलाय. वर्गात मुलं जी काही चित्रं काढतात, कथा-कविता-पत्र लिहितात त्यांना तात्काळ  भिंतीवरती डकवलं जातं. वर्गातील चारी भिंती अशा मुलांच्या विविध कृतींनी भरलेल्या  असतात.  जेव्हा मूल एखादी नवीन गोष्ट तयार करतं ,तेव्हा जूनी कृती काढून घेतली जाते. मूल जेव्हा आपली कृती पाहतं तेव्हा आपण शाळेचा एक भाग असल्याचा व शाळेत आपलं काहीतरी अस्तित्व आहे यााबाबत त्याला विश्वास वाटायला लागतो. म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाची दखल घेतली गेल्याचा आनंद होतो. हा विश्वास, आनंद केवळ  रजिस्टरला नोंदवलेल्या नावाने मिळत नाही. प्रत्येक मुलाची कृती भिंतीवर लावलेली असल्याने स्पर्धेचा प्रश्नच येत नाही. पाश्चात्य देशात 'व्यक्तीं'ना फार महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शाळाही मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात,मला वाटतं हे फार अनमोल उद्दिष्ट आहे.
       याचा अर्थ असा नव्हे की पाश्चिमात्य शाळा भारतीय शाळांहून अधिक सामाजिक वास्तवाशी जास्त जोडला गेलाय. वस्तुस्थिती ही आहे की दोन्ही प्रकारच्या शाळा समाजिक वस्तुस्थितीशी असलेली फारकत; वेगवेगळ्या पध्दतीने लपवत असतात. भारतीय शाळा आपल्या भिंती सुविचारांनी रंगवून मुलांना खोट्या नैतिकतेचे धडे देत असतात. पाश्चिमात्य शाळा मुलांच्या विविध कृती भिंतींवर डकवून ,मुलांच्या सामाजिकीकरणाची बाबदारी टाळून मोकळ्या होतात. (तुमचं काम लावलं आता आमची जबाबदारी संपली.इथं मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडतच नाही)
         इथं महत्त्व आहे याचं की या चार भिंतींच्या आत बसलेल्या मुलांना शाळा काय देते? भिंतीवर काय होतंय याचं एका मर्यादेपर्यंत महत्त्व जरूर आहे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे ते हे की नेमकं वर्गांच्या आत काय घडतं आहे ?

सिंधुदूर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते.

आजही तेथे लोक वस्ती करुन राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करुन टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स.१६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज १८१२ पर्यंत फडकत होता. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

-श्री. प्रमोद मांडे



माझी शाळा कंची?

माझी शाळा कंची ?
---------------------------------------------
लोकमतच्या संपादकीय पानावरील "जन मन" या सदरातील माझा लेख
दिनांक २६ मे १४
http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=767847

*माझी शाळा कंची?*

- अमर हबीब

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठी बोलतो. आम्हाला मुलगी झाली. शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘उर्दूच्या शाळेत घाला.’ मी म्हणालो, ‘तिच्या आईची भाषा मराठी असल्याने मराठीच बरे पडेल.’ आम्ही आमच्या मुलीला प्रवेश घ्यायला शाळेत नेले. मुख्याध्यापकांच्या खोलीत सरस्वतीची प्रतिमा दिसली. मी विचारले, ‘ही प्रतिमा कशासाठी?’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘आम्ही दररोज सरस्वती वंदना घेतो. त्या वेळेस या प्रतिमेची पूजा केली जाते.’ मला माझी मुलगी अशा शाळेत घालायची होती, जेथे कोणत्याच धर्माचे संस्कार केले जाणार नाहीत.

मी उठलो. दुसर्‍या शाळेत गेलो. तेथेही तेच. मुख्याध्यापक म्हणाले, ‘आमच्या शाळेत खूप चांगले संस्कार केले जातात. मुलांकडून ‘मनाचे ोक’ पाठ करून घेतले जातात.’ आणखी एका शाळेत गेलो तेव्हा पाहिले की, मुलं चक्क रामरक्षा म्हणत आहेत. मला हवी असलेली शाळा कोठेच सापडेना. शेवटी माझा नाइलाज झाला. अखेर घरापासून जवळ असलेल्या मराठी शाळेत तिचे नाव घातले. एके दिवशी तिने मला तोंडपाठ केलेला गायत्री मंत्र म्हणून दाखविला. तेव्हा माझ्या मनात चर्र झाले. हे लोक लहान लेकरांना माणसासारखे का जगू  देत नसतील? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करीत राहिला.

दरम्यान खूप मोठा काळ गेला. माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची बायको उर्दू भाषक. मी माझ्या मुलाला सांगितले की, ‘आपण आपल्या घरात मराठी बोलतो; कारण आपल्या घरातील आई मराठी आहे. आता तुझ्या घरात उर्दू भाषा बोलली गेली पाहिजे. कारण तुझ्या घरातील आई उर्दू भाषा बोलणारी आहे. जसा मी मराठी शिकलो तसे तुला उर्दू शिकावे लागेल.’ माझ्या मुलाला माझे म्हणणे पटले. त्यांना मुलगा झाला. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा शोधू लागलो. मुलीच्या वेळेसचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तरी मला वाटले की, मोठा काळ लोटून गेला आहे, परिस्थिती बदलली असेल. त्या काळात कॉम्प्युटर नव्हता, टीव्हीचा एवढा प्रचार झालेला नव्हता, मोबाईलचा पत्ताच नव्हता. आमच्या गावात इंटरनेट आलेले नव्हते. आता जग आधुनिक झालेले आहे. माझ्या मुलीला मिळाली नसली तरी नातवाला ‘माणसांची शाळा’ नक्की मिळेल.

उर्दू माध्यमातून इंग्रजी शिकविणार्‍या शाळेत गेलो. त्यांच्या फलकावरच ‘इस्लामी शाळा’ असे लिहिलेले. दुसर्‍या शाळेचा प्रॉस्पेक्टस पाहिला. त्यात धार्मिक शिक्षणाची खास सोय असल्याचे आवर्जून नमूद केलेले होते. तिसर्‍या एका शाळेत पोचलो तर तेथील मॅडम बुरखा घालून रिक्षातून उतरताना दिसल्या. म्हटलं आपल्याला हवी असलेली ‘माणसांची शाळा’ या माध्यमात देखील मिळणार नाही. ज्या अगतिकतेने मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले होते, सुमारे २५-३0 वर्षांनंतर नेमक्या त्याच अगतिकतेने मला माझ्या नातवाला उर्दू माध्यमाच्या शाळेत दाखल करावे लागले.

एके दिवशी माझा मित्र त्याच्या शाळेत गेला. संस्थाचालकाने म्हणे माझ्या नातवाला बोलवून घेतले. उणे-पुरे चार वर्षांचा नातू. गोड आणि चुणचुणीत आहे. येताच त्याने सगळ्यांना सलाम केला. संस्थाचालक म्हणाला, ‘कलमा याद है?’ ‘जी हां’ म्हणून लगेच त्याने अख्खा कलमा तोंडपाठ म्हणून दाखविला. माझा मित्र त्याचे कौतुक करून हे सांगत होता. पण माझ्या मनात पुन्हा तसेच चर्र झाले. जसे मुलीकडून गायत्री मंत्र ऐकताना काही वर्षांपूर्वी झाले होते. हे लोक लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला पुन्हा अस्वस्थ करू लागला.

मी वेगवेगळ्या धर्ममार्तंडांना विचारले, ‘लहान मूल वारले तर ते स्वर्गात जाते की नरकात?’ सगळ्या धर्माच्या मार्तंडांनीे एका सुरात सांगितले की, ‘ते थेट स्वर्गात जाते; कारण ते निरागस असते.’ मी म्हणालो, ‘असे असेल तर लहान मुलांच्या शाळांत धार्मिक संस्कार का केले जातात?’ शाळेतील धर्मसंस्कार ही बालकांची गरज नसून ती वडीलधार्‍यांची गरज आहे. थोरांच्या गरजेसाठी मुलांवर ओझे लादले जाते.

बागेत उमललेली सुंदर फुले आपल्या टेबलावरील फ्लॉवरपॉटमधे शोभून दिसेल, म्हणून निर्दयीपणे खुडली जातात. प्रत्येक धर्माच्या टेबलांवर अशा निर्जीव फुलांची सजावट मांडली जाते. या फुलांचा वास येत राहावा म्हणून हे लोक त्यावर आपल्या संस्कारांच्या अत्तराच्या बाटल्या ओतीत राहतात. मुलांचे भावविश्‍व कलुषित करणारे धार्मिक संस्कार लहान मुलांच्या शाळांमधून कधी हद्दपार होतील कोणास ठाऊक?

निदा फाजली म्हणतात,
हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में
इन्सान परेशां है, यहां भी और वहां भी..

मला अजूनही ‘माणसांची शाळा’ सापडली नाही.

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते  जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

👍 नियम १० – सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल ........

P.hd धारक प्राध्यापक मजुराची कैफियत

पीएचडीधारक प्राध्यापक मजूराची कैफियत!

शिक्षकांच्या सावकारकीबाबत एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी इथं फेसबूक वॉलवर शेअर केलेला टिपणवजा मजकूर आज अॅग्रोवन दैनिकाने भवताल सदरात प्रसिद्ध केला. लेखक म्हणून अॅग्रोवनने तिकडे माझा मोबाईल नंबर दिला आहे. मजकूर वाचून नेहमीप्रमाणे वाचकांचे फोन आले. लिहिणारा माणूस म्हणून वाचकांकडून आलेला फीडबॅक मला सतत समृद्ध करत आलाय. आज असे काही फोन येत होते. दिवसभर गाडी चालवून लांबवरचा प्रवास करून सायंकाळी घरी आलो. जराशी पाठ टेकवली, इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. थकलेलो असल्याने खरे म्हणजे त्या क्षणी फोन घ्यायची पण इच्छा नव्हती. फोन घेतला. मराठवाड्यातून एक शिक्षक बोलू लागले...
“सर नमस्कार, मी अमूकतमूक... आताच तुमचा लेख वाचला. आवडला, म्हणून फोन लावला. तुम्ही नेमकं लिहिलं आहे. सध्या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर प्रतिमाभंजन सुरू आहे. एकजात सारेच शिक्षक वाईट आहेत, असे समाज आणि माध्यमातून बोलले जात आहे. ज्याचा फार त्रास होतो.”
मी आपलं त्यांच्या हो ला होकार दिला. ते पुढे बोलतच राहिले.
“मी बारा वर्षांपासून इकडे ज्युनिअर कॉलेजात शिकवतोय. माझ्या परीने चांगले शिकवत आहे. आमचे विद्यार्थी घडले. चांगल्या नोकऱ्यांना लागले. त्यांची लग्नकार्ये झाली. त्यांना मुलंबाळं झाली. त्यांचे प्रपंच उभे राहिले. आम्ही मात्र आजही विनावेतन काम करत आहोत. मायबाप सरकारला दयेचा पाझर फुटेल. आज अनुदान मिळेल, उद्या अनुदान मिळेल, या आशेवर आम्ही एकेक दिवस मोजत आहोत. मी एम्. ए. एम्. एड., एम्. फील. केलेय. दोन वर्षांपूर्वी पीएच.डी. पण मिळाली.”
“अच्छा, तुम्ही डॉक्टरेट आहात. व्वा सर! इतक्या प्रतिकूलतेत तुम्ही शिकत राहिलात. सलाम सर तुम्हाला...” मी कौतुकानं म्हणालो.
“पण इतकं शिकून तरी काय करायचं? ही शुद्ध फसवणूक आहे सर. आम्ही आज जगायला मोताद आलोय सर. आजपर्यंत संस्थेने पगार म्हणून रोख एक रुपया पण दिला नाय सर. बाजारात कोथिंबीरीची जुडी घ्यायला गेलं तरी पाच रुपये रोख द्यावे लागतात. रविवारी, सुटीच्या दिवशी, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी आणि माझी बायको मोलमजुरी करतो. त्यातून कसाबसा घरखर्च भागवतो. आम्ही ज्या मुलांना शिकवतो त्यांच्याच शेतात कामाला जातोय. मला कामाची अजिबात लाज वाटत नाही सर. आता सवय झालीय. पण वाट तरी किती बघायची? यंदा तर मराठवाड्यात दुष्काळ आहे. काम पण नाहीये. उमर कलली सर आता आमची. काहीजण तर रिटायर व्हायची वेळ आली. पुढं पोराचं शिक्षण आहे. आजउद्या लेकीबाळी लग्नाला येतील. या सगळ्याला कसं सामोरं जायचं सांगा सर? आम्ही दारिद्र्यरेषेखालचे जगत आहोत. शिक्षक संघटना काहीच करत नाहीत. यावर तुम्ही आवाज उठवार. तुम्ही लेख लिहा, टीव्हीवर बोला. पण कायतरी करा सर...”
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असताना त्यांच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यांनी ‘साप्ताहिक साधना’मध्ये या विषयावर लिहायला सांगितले. ‘राज्यातले ३२ हजार शिक्षक जगताहेत वेठबिगारासारखं जिणं’ असा लेख मी लिहिला होता. डॉ. दाभोलकर यांनी तो लेख आणि त्यासोबत त्यांनी लिहिलेलं एक पत्र असं तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना पाठवलं होतं. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विनानुदानित शाळांना अनुदान द्यायचं कबूल केलं होतं. पुढे काहीच झालं नाही. मानसिक आधारासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी हे त्यांना सांगितलं... मध्येच मी थांबलो. पण पुढे काय बोलावं तेच मला सुचेना. उगीच अपराध्यासारखं वाटलं. दारिद्र्याच्या गर्तेत कोसळलेले शेतकरी, कष्टकरी यांची व्यथा वेदना पाहून मन कळवळतेच. पण पीएचडी मिळालेल्या एका प्राध्यापक मजूराची ही कैफियत ऐकून सुन्न झालो. एकूण शिक्षणाचाच हा पराभव आहे असे मला वाटले...

भाऊसाहेब चासकर
यांच्या फेसबूक वॉलवरुन.

मुलांचे शिकणे

मुलांचे शिकणे समजून घेऊ या!

चिमणा आणि चिमणी वर्गाच्या खिडकीत येऊन बसले. इकडे तिकडे भिरभिर पाहू लागले. वर्गभर फिरून आणि एकमेकांशी विचारविनिमय करून वर्गाच्या भिंतिवरील एका फोटोमागची जागा त्यांनी निश्चित केली. हे जोडपं खिडकीत येऊन बसल्यापासूनच मुलांचं लक्ष या चिमणाचिमणीवर होतं. त्यांचा प्रणय पाहून मुले मला सांगत , " मँडम, त्याई दोघं प्रेम करताहेत. हो न मँडमजी?"  "

मुले आणि मी इतर अभ्यासासोबत या चिमणा चिमणीचाही अभ्यास करु लागलो. काही दिवसांनी त्यांचं घरटं तयार होऊ लागलं. मुलंही त्या घरट्यात गुंतत होती. वर्गात , वर्गाच्या आसपास मुद्दाम तणीस, कापूस, गवत वगैरे टाकून ठेवू लागली.

मुले म्हणायची,  " त्याइनी बिचारे किती दूर दूर जाऊन काडीकचरा, गवत बीन घेऊन येतंत. त्यांना आपन थोडी मदत करु. मंग त्याइचं घरटं लवकर बनीन. चिमणी  आंडी देईन. मंग आंडे फुटून पिले निंगतीन...." मुले एक्साईट होऊन विचार करत होति. दरम्यान वर्गातील दुसऱ्या फोटोमागे दुसऱ्या जोडप्याचेही घरटे तयार होत होते. वर्गात दोन दोन घरटी ! मुले  खूपच उत्तेजित होती. चिमणा चिमणीसाठी वर्गात आणि शाळा परिसरात मुले दाणा पाणी ठेवू लागली . चिमण्या दाणे खाताना , पाणी पितांना  दिसल्या की मुलं खूश होत.

आमचे आणि चिमणाचिमणीचे मजेत चालले होते. एक दिवस शाळेत गेलो नि वर्गसफाई चालू असतांना मुलांना कोपऱ्यात घरट्यातून खाली पडलेलं पिलू दिसलं.  मुलांचा जीव कळवळला. पिलास पंख फुटले होते पण चालता किंवा उडता येत नव्हते. ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करे आणि कोलमडून पडे. मुले म्हणू लागली , "  मँडम, हे पिलू घाबरल्यावानी दिसते. हो न ? त्याच्या आईबाबापासून ते दूर झालं म्हनून त्याची हालत अशी झाली. याला याच्या आईबाची आठवण येत असीन अन् आईबाबा याले शोधत असतीन आपलं पिलू कोटी गेलं म्हनून "

मुलांनी त्याला तांदळाची कणी चारायला घेतली. पिलाने पटकन चोच उघडली. मुले पिलाच्या तोंडात दाणे टाकू लागले पिलू पटपट खाऊ लागले. पोट भरल्यावर पिलाने चोच उघडणे बंद केले नि शांत बसून गेलं. मुले पिलू परत घरट्यात ठेवू म्हणाली. पण माणसाचा हात लागलेलं पिलू चिमण्या स्वीकारत नाहीत असे ऐकले असल्यामुळे आणि त्याचा अनुभव आला असल्यामुळे पिलू घरट्यात ठेवायचे नाही असे ठरवले. वर्गात एक चिमणीचे जूने घरटे संग्रहीत होते त्यात मुलांनी त्या पिलास ठेवले. शाळा सुटल्यावर मुले त्यास घरी घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत आली तेव्हा त्या पिलासह आली. आता मुलांनी त्या पिलासाठी खोक्याचे घर बनविले होते. त्या घरात ते घरटे व त्यात ते पिलू होते. या अभ्यासाच्या जोडीला मुले भाषा गणिताचाही अभ्यास करीत होतीच. तसं पाहिलं तर या पिलाला वाढविण्यातही मुलांची भाषा आणि गणित समृद्धी होत होतीच. परिसर अभ्यास हा मूळ विषय होताच. मात्र मुले थोडीच जाणून होती , आपण या सगळ्यातून परिसर अभ्यास, विज्ञान शिकत आहोत म्हणून आणि यासोबतच आपला भाषिक आणि गणितीय अभ्यास होतोय म्हणून . मात्र शिक्षक म्हणून मला ही जाणीव होती. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग यांचं शैक्षणिक मूल्य मला ध्यानात घ्यावच लागतं नाहीतर नुसते पाठ वाचून दाखविण्याचा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे मुलांकडून सोडवून घेण्याचा आणि परीक्षेत पुस्तकातीलच प्रश्न विचारण्याचा निरर्थक, निःसत्व प्रयोग मी करत बसेन. म्हणून मी मुलांना पुस्तकं ' शिकवण्याचा ' प्रयत्न करीत नाही. त्यामुळे 'कोर्स कम्प्लीट ' व्हायचा आहे असं दडपण , टेन्शन मला येत नाही.  मी आणि मुले मजेत असतो.

चिमणा चिमणी जेंव्हा खिडकीत येऊन बसले होते तेव्हाच त्यांनी चिमणा कोणता आणि चिमणी कोणती हे ओळखले होते. सोबतच ' नर - मादी ' ही ओळखही त्यांनी करून घेतली. आता जेव्हा  घरट्यातून पडलेले पिलू मुलांनी उचलले तेंव्हाही त्यांनी ते बेबी चिमणा आहे , की बेबी चिमणी आहे हे ओळखले. हे पिलू बाळ  चिमणी आहे असे मुलांनी मला सांगितले . चिमणा आणि चिमणीत काय फरक असतो , तो कसा ओळखायचा हे ही मला सांगितले . माझे कर्तव्य एवढेच , की मुलांच्या आनंदात सहभागी होणे, मुलांचे आदराने ऐकणे प्रसंगानुसार उत्सुकता वाढविण्यासाठी किंवा शमविण्यासाठी माझ्याजवळ असलेली माहिती पुरविणे किंवा तसली पुस्तके उपलब्ध करून देणे. मुले अधिकची माहिती मिळविण्यासाठी ही  पुस्तके वाचतात. कधी नवीन माहिती मिळाली म्हणून खूश होतात तर कधी पूर्वानुभवाशी सांगड घातली गेली म्हणून खूश होतात पुस्तक वाचताना. त्यांच्या वर्गाचे पाठ्यपुस्तकही ते एक संदर्भ साहित्य म्हणूनच वापरतात.

मुले पिलाची रोज काळजी घेत होती. दाणापाणी तर करत होतीच शिवाय ते कुणाची शिकार बनू नये याचीही काळजी वाहत होती .

पाचव्या दिवशी मुलांनी पिलाचे बारसे केले एक एक रुपया काढून. पिलाचे नाव ठेवले ' चिकू' आणि पूर्ण शाळेला बिस्कुटे वाटली.

नुकताच ' जागतिक चिमणी दिन ' साजरा झाला. आम्ही तो साजरा नाही केला . कारण आमचा रोजच असतो 'चिमणी दिन ' पर्यायाने 'पर्यावरण दिन'

असले दिन साजरे करुन मुलांमध्ये , मोठ्या माणसांमध्ये कितपत जाणीव विकसीत होते हे मला ठाऊक नाही. मात्र मला हे खात्रीने ठाऊक आहे , की निसर्गाशी , मुलांच्या भावनांशी संलग्न राहून शिकल्याने पर्यावरणाची समृद्ध जाणीव , प्रेम मनात फुलून येते. म्हणून मी मुलांना घेऊन भटकत असते , कधी ओढ्यावर , कधी शेतात तर कधी मुंग्यांची वारुळ शोधीत.

नाहीतर परिसर अभ्यासचा तास घेतांना किंवा  मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चिमणीचा   एदा पाठ किंवा कविता शिकवताना खिडकीच्या गजावर बसलेल्या चिमणीकडे पाहणाऱ्या मुलांवर खेकसून नंतर  'जागतिक चिमणीदिन ' किंवा पावसाच्या टपो- या थेंबात चिंब भिजण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना वर्गात बसवून 'जागतिक जलदिन '   साजरा करण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही शिकतोच निसर्गाच्या संगतीने.

चिमणीचं पिलू मोठं होतंय माणसांच्या पिलासोबत.

             वैशाली गेडाम
               8408907701

Friday, June 3, 2016

Online Book Reading

पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download  करु शकता.
लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

१.   http://www.gutenberg.org
आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता.

२.   http://www.freebookspot.in/
या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत.

३. http://www.free-ebooks.net/
येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता.

४.  http://manybooks.net/
फ़ार छान जागा आहे.

५.  http://www.getfreeebooks.com/
येथे एका ( click ) पुस्तके मिळवू शकता.

६  http://freecomputerbooks.com/
संगणकावरील पुस्तके येथे मिळतील.

७. http://www.freetechbooks.com/
तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील.

८.  http://www.scribd.com/
पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता.

९. http://www.globusz.com/
नवीन लेखकांना येथे संधी मिलते.

१०. http://www.onlinefreeebooks.net/
येथे १५ भागात पुस्तके आहेत.

आपण खालील जागांवर पण जावू शकता.

१.  http://en.wikipedia.org/wiki/List_of_digital_library_projects

२. http://www.archive.org

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी
शाळा तुम्हाला आवडेल का ? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल.

शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी मुळात शाळेत विद्यार्थ्यांकरीता पोषक प्रसन्न वातावरण असले पाहिजे. तसेच कल्पकतेने विचार करण्याकरीता विद्यार्थ्यांना वेळोवेळी
उद्युक्त करण्याचे महत्वाचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. मग विद्यार्थ्यांनाकल्पक विचार करण्याची सवय लागावी यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल असे मला येथे सांगावेसे वाटते.

ही विशेष मेहेनत म्हणजे वेळोवेळी स्वतःची कल्पकता वापरणे त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करणे. तसेच उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कल्पक दृष्टीकोन विकसित करता येऊ शकतो. त्यासाठी
भरपूर पैसे, महागडे इन्फ्रास्ट्रक्चर यांची अजिबातच गरज नाही.

प्रत्येक शिक्षकाला काही नवीन उपक्रम राबवायचा म्हणजे वर्गातला गोंधळ वाढणार ही सर्वात मोठी भीती वाटते. यावर महत्वाचा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त रूजवणे हाच होय. किंबहुना हीच कल्पनाशक्तीला चालना देण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. समजा गणित हा विषय मैदानात शिकायचा असं ठरवलं तर मुलांनी रांगेत जावं, शांततेत जावं आणि त्याकरीता जो लीडर असेल त्याचं ऐकणं हे नियम स्वतः मुलांनी बनवले तर त्यांचा सहभाग अधिक वाढतो. यामुळे आपोआपच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढीस लागते. ही जाणीव वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.माझा सहभाग महत्वाचा आहे हे मुलांना वाटल्यानंतरच ही जाणीव रूजते.कल्पकतेकडे नेणारी ही दुसरी पायरी. त्यानंतर शिक्षकांनी विविध साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी सहज उपलब्ध असलेली साधऩे वापरणे अधिक श्रेयस्कर. उदाहरणार्थ पाने, फुले, दगड, माती, पाने, फुले वगैरे.
याखेरीज तक्ते, कोडी अशाप्रकारच्या विविध बाबींचा अवलंब करण्यात येऊ शकतो. तसेच एकाचवेळी अनेक उपक्रम राबवण्यापेक्षा एकच उपक्रम राबवा त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी मुलांना पूर्वतयारी करण्याचा वेळ द्या. उपक्रम
कोणता राबवायचा, साहित्य काय निवडायचं हे विद्यार्थ्यांचा कल ओळखून ठरवा. उदा. गणित विषय शिकवताना विद्यार्थ्यांचे गट करणे, खेळाच्या माध्यमातून सम विषम संख्या शिकवणे ई.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे उदाहरण येथे घेता येईल. ते जेव्हा टस्कगीच्या शाळेत गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ मायक्रोस्कोप हे एकमेव साधन होते. त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती. मग त्यांनी मुलांना घेऊन कच-यातून साधनं गोळा केली. जसे पत्र्याला भोकं पाडून चाळणी तयार केली, काचेला काजळी लावून त्याद्वारे फोकस्ड बीम तयार केला आणि असं करत करत प्रयोगशाळा उभारली.

शिक्षकांनी स्वतःच्या वागण्यात कल्पक दृष्टीकोन बाळगला, स्वतःची कल्पकता वापरून ज्ञानदान केले तर त्यांच्याकडून मुलांना प्रेरणा मिळेल आणि कल्पकतेने विचार करण्याची सवयच लागेल. मात्र त्यासाठी शिक्षकांना थोडसं धैर्य दाखवावं लागेल. इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल.

कल्पकता हा एक गुणांचा समूहच आहे. धैर्य, वेगळा विचार करण्याची क्षमता, तो मांडता येण्याची क्षमता, इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास असे अनेक गुण या एका माध्यमातून वाढवता येतात. मात्र त्यासाठी सातत्य व
मेहनतीची जोड देणे अत्यावश्यक आहे.

Shirin Kulkarni
Director
Council for Creative Education - CCE Finland Oy

शिक्षणात कल्पकतेचा वापर

शिक्षणात कल्पकतेचा वापर

आजची शिक्षणपद्धती ही केवळ परीक्षा केंद्रीत आहे हे सर्वमान्य आहे. ही शिक्षणपद्धती बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विचारमंथनदेखील होत आहे.मात्र सद्यस्थितीतील शिक्षणपद्धती अशीच का याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जगाच्या इतिहासात डोकवावे लागेल.
1930 सालच्या जागतिक मंदीनंतर ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची पद्धत कारखान्यांसारखी होती. कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने काम चालते त्याचपद्धतीने शाळांचे कामकाज चालू लागले. कामगारांच्या शिफ्टस्प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या वेळा, परीक्षापद्धतीचे प्रमाणीकरण अशा अनेक बाबींचे उदाहरण याबाबत घेता येईल. शाळांधील उत्पादन म्हणजे विद्यार्थी. मग हे उत्पादन चांगले, दर्जेदार असावे याकरीता शाळांकडून एकाच पद्धतीने विचार
करण्यात आला व त्यासाठी सर्व शाळांमध्ये एकच पद्धती अवलंबण्यात आली.

खरे पहाता विद्यार्थी म्हणजे कोणी उत्पादन नव्हे. त्यामुळे त्यांना जोखण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी त्यांच्या कलाने त्यांना वाढवणे महत्वाचे. परंतु शाळांमधून हा मूळ विचारच नाहीसा झाला. विद्यार्थी परीक्षार्थी बनले. गुण मिळवण्यासाठी शिक्षण असेच समीकरण झाले. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीद्वारे कारखान्यांना उपयुक्त ठरेल असे उत्पादन निर्माण करण्याकडे कल वाढला.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला कारखान्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये शिकवण्याकडेच शिक्षणपद्धतीचा ओघ वाढला. तत्कालिन परिस्थिती पहाता त्यावेळी तशा पद्धतीचे शिक्षण योग्यच होते. मात्र तशी शिक्षणपद्धती आजच्या काळाला अनुरूप मात्र नाही हे तितकेच खरे आहे.

बाजारपेठेत झालेले मूलभूत बदल हे शिक्षणपद्धती घडवण्यास कारणीभूत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजच्या बाजारपेठा बघता नावीन्य आणि कल्पकता या बाबींना अत्यंत महत्व आले आहे. म्हणूनच शिक्षणातील कल्पकतेचा वापर वाढवणे हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक दृष्टीकोन विकसित होण्याकरीता शाळा व शिक्षकांबरोबरच पालक देखील तितकेच जबाबदार ठरतात.

आपल्या पाल्याला वाढवताना पालकांनी विशेषत्वाने त्यास कल्पक दृष्टीकोन दिला पाहिजे. किंबहुना त्यास तशी सवयच लावली पाहिजे. याचे कारण विद्यार्थी हे काही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन नव्हेत. तुमचा पाल्य ही व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यास भावभावना, विचारक्षमतादेखील आहे. वेगळ्या विचारानी जगण्याकरीता, समाजात काही भरीव कामगिरी करण्याकरीता परंपरेपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला कल्पक
दृष्टीकोनाची देणगी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याकडे मात्र अनेक पालक व शाळा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याबाबत काहीसे उदास दिसतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांची जडणघडण नेटकी व्हावी याकरीता ती जबाबदारी पालक
शाळेवर ढकलतात याउलट शाळांवर विशिष्ट शिक्षणपद्धती राबवण्याची सक्ती असल्याने शाळा देखील विद्यार्थ्यांना घडवण्यात अयशस्वी ठरतात. वर्गातील चुणचुणीत मुले कायम सर्व ठिकाणी चमकतात त्यामुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खरंतर शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरीता ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात ज्या बाबीमध्ये अडचण येते त्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते.

फिनलंडमधील शिक्षणपद्धतीचे उदाहरण येथे मला द्यावेसे वाटते. येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.शाळेतील विद्यार्थ्याला येणारी अडचण सोडवणे, जे कौशल्य येत नसेल त्यावर
अधिक भर दिला जातो आणि विशेष म्हणजे याकरीता शिक्षक देखील अधिक वेळ खर्ची घालण्यास तयार असतात. आपल्याकडे देखील असे शिक्षक आहेत मात्र दुर्दैवाने त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कल्पकतेचा शिक्षण पद्धतीत वापर करण्यासाठी पालक व शिक्षकांचा अधिक व नेमका सहभाग अपेक्षित आहे याबाबतचे विवेचन पुढील लेखात ..

शिरीन कुलकर्णी
संचालक,काऊन्सिल फॉर क्रीएटीव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड

कल्पकतेचे मूल्यमापन

मागील लेखापासून आपण कल्पकतेचे मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे कि जे. पी. गिल्फ़ोर्ड , त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती हि त्या क्षेत्रातले तज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरच सृजनशीलतेचा नमुना आहे कि नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं.

या सगळ्या संशोधकांनी विशेषत: व्यक्तिगत कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. एखाद्या निर्मितीचा समाजात कसा स्वीकार होतो यावरून त्या कलाकाराची कल्पकता मोजण्याचे पण प्रयत्न केले पण कल्पकता केवळ याच परीघांमध्ये राहून मोजता येईल का? त्यातून सध्याच्या कालानुरूप कल्पकतेची व्याख्या आणि तिचे मोजमाप करत येईल का?

या प्रश्नान वर जर विचार करू या. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात कल्पकतेचं  मूल्य खूपच वाढलं आहे. दर दिवशी नव्या योजना, नवीन उत्पादने बाजारात येत आहेत. सगळी अर्थव्यवस्था कोण किती कमीतकमी वेळात पुढचं  चांगलं  उत्पादन बाजारात आणु शकतय  आणि विकू शकतय यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत फक्त एक माणूस स्वत:पुरता कल्पक असून चालेल का? तर नाही, त्याला इतरांबरोबर काम करतानाही कल्पक राहावं  लागेल आणि एक संघ म्हणून कल्पक असावं लागेल.

याच संकल्पनेला अनुसरून सध्या फिनलंडमध्ये एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. त्या चाचणीचं नाव आहे Know Your Creativity Index (KYCI)! या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमची वैयक्तिक कल्पकता तर मोजली जातेच पण तुम्ही इतरांबरोबर काम करत असतांना ती कल्पकता कशी वापरता हेही समजतं. जरा उदाहरण घेऊन समजावून घेऊ या. अमित नावाचा एक चुणचुणीत मुलगा आहे. तो पटापट गोष्टी करून टाकतो. त्याला फारसं एका जागी बसवत नाही. शाळेत गुण वर खाली होत असतात कारण अभ्यासात सातत्य नाही. मित्र मात्र भरपूर आहेत. आता या सगळ्यावरून सामान्यपणे आपण काय अंदाज बांधू? एक म्हणजे हा मुलगा जरा  उनाड दिसतोय. त्याला नुसतीच मजा करायला आवडते. अभ्यासाची आवड नाहीये मग बहुधा कल्पकता पण फार असेल असं वाटत नाही. हे झालं आपल सर्व सामान्य मत.

आता या मुलाची KYCI चाचणी कशाप्रकारे घेतली जाईल ते बघू या. या चाचणीचे दोन भाग आहेत. एक भाग आहे पेपर सोडवण्याचा. यामध्ये अमितला एक पेपर दिला जाईल कि ज्यामध्ये त्याला काही चित्रं काढायची असतील. त्या साठीच्या सूचना त्याला वेळोवेळी दिल्या जातील. हि सगळी चित्रं काढण्यासाठी त्याला एकूण ४५ मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याच्या सारखाच पेपर सोडवलेल्या इतर चार मुलांबरोबर त्याचा एक संघ बनवला जाईल. या संघाला एकत्रितरीत्या करण्यासाठी काही काम दिलं जाईल. हा संघ हे काम जेव्हा करत असेल त्यावेळी एक निरीक्षक तिथे उपस्थित राहून नोंदी घेत असेल. या मध्ये कोण कशाप्रकारे काम करतय? त्यात नेतृत्व कुणाकडे आहे? कोण निर्णय घेतय असे अनेक पैलू बघितले जातात. हा कालावधी साधारणपणे ९० मिनिटांचा असतो. एकुण या चाचणीचा कालवधी जास्तीत जास्त अडीच तास असतो.

चाचणी झाली कि ३-४ आठवड्यात रिपोर्ट दिला जातो. या ३-४ पानी रिपोर्टमध्ये अमितची कल्पकता कशी आहे ते सांगितलं  जातं. कल्पकता मोजण्याचे जे मापदंड आहेत जसे कि एखादी गोष्ट बघून किती कल्पना सुचतात, त्यात किती कल्पना पूर्णत: नवीन आहेत? एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची क्षमता आहे कि नाही, याबद्दल माहिती दिली जाते. त्यावरून त्याची वैयक्तिक कल्पकता कशी आहे ते कळते. याच रिपोर्ट मध्ये त्याची संघात काम करण्याची क्षमता कशी आहे हेहि सांगितलं जातं. तो इतरांबरोबर काम कसं करतो? त्याला ते आवडतं का? जमतं का? काही सुधारणा करण्याची गरज आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात दिली जातात.
रिपोर्ट तयार होत आला कि एकदा पालकांशी चर्चा करून त्याबद्दलची काही इतर समस्या किंवा पार्श्वभूमी जाणून घेतली जाते जेणेकरुन त्या समस्यांची उत्तरेही रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. यामुळे त्या मुलाची कल्पकता तर समजतेच पण ती कशामुळे तशी आहे हे लक्षात घेतल्याने त्याबद्दलच्या काही उपाय योजनाही सुचवल्या जातात.

आता हि चाचणी नक्की कशी असते हे तर आपल्याला समजलं. अमितची चाचणी घेतली गेली त्याचा रिपोर्ट पुढच्या लेखात वाचू या. निकालाची उत्सुकता थोडी ताणायला नको का?

शिरीन कुलकर्णी
सीसीई फिनलंड
 shirin.kulkarni@ccefinland.org

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...