Pages

Showing posts with label हेमलकसा. Show all posts
Showing posts with label हेमलकसा. Show all posts

Monday, May 30, 2016

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे - डॉ. प्रकाश आमटे | आपल्या पद्धतीचं आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बर्‍यावाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते. आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं, हे तत्त्व मला शिकवलं हेमलकशातल्या सुरुवातीच्या मुक्कामाने ... इथल्या निसर्गाने, जंगलाने, नदी-नाल्यांनी, प्राण्यांनी आणि अर्थातच माणसांनी!
••••••
आज आम्ही चाळीसहून अधिक वर्षं महाराष्ट्राच्या एका टोकाला, भामरागडच्या जंगलात- हेमलकशात राहतो आहोत. हा कालखंड कुठल्याही सुधारणेसाठी कमी असला, तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. हेमलकशात स्थिरावण्याचा प्रवास हा फक्त अदिवासींसाठीच नव्हे, तर आम्हा सर्वांना शब्दशः अंधाराकडून उजेडाकडे नेणारा आहे. कारण इथे पहिली सतरा वर्षं वीज नव्हतीच!
भामरागड हा आनंदवनापासून २५० किलोमीटरवर असणारा चंद्रपूरच्या जिल्ह्यातला भाग. नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा जंगलाने व्यापलेला हा प्रदेश. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती आहे, एवढंच आम्हाला ऐकून माहीत होतं. १९७३ साली बाबांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी इथे ‘लोकबिरादरी प्रकल्प’ सुरू केला. तेव्हा इथला परिसर सुंदर होता, पण ते सौंदर्य रौद्र होतं. जंगल एवढं दाट की सूर्यप्रकाशही आत येऊ शकायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. दुथडी भरून वाहणार्‍या नद्या आणि जंगली जनावरं यांच्या आवाजापलीकडे तिसरा आवाज या भागात ऐकू येत नसे. पावलापावलांवर साप आणि विंचू यांचं अस्तित्व होतं. हेमलकशाच्या जंगलात प्राण्यांनी, विशेषतः अस्वलांनी माणसांवर हल्ला करणं ही अगदी वारंवार घडणारी गोष्ट. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. इथे ना वीज होती, ना पाणी, ना राहण्यासाठी सपाट जागा. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि जंगली श्‍वापदं. आनंदवनातल्या सुरुवातीच्या काळात अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असल्याने मला अशा अडचणींची थोडीफार तरी सवय होती; पण माझी पत्नी मंदा आणि इतर कार्यकर्त्यांनी हेमलकशात स्थिरावण्यासाठी ज्या अडचणींना तोंड दिलं त्याला तोड नाही.
•••
हेमलकशातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की थांबायचं नावच घेत नाही. अफाट पावसामुळे आणि नंतर येणार्‍या पुरामुळे हेमलकशापासून पासष्ट किलोमीटरवर असलेला नागेपल्लीचा प्रकल्प हा आमचा ‘बेस कँप’ बनला. या प्रकल्पाची जबाबदारी जगन मचकले या आमच्या कार्यकर्त्याकडे होती. हेमलकसा ते नागेपल्ली हा रस्ता चढाचा होता. रस्ता कसला, जंगलातल्या वाटाच त्या. वाटेत आठ-दहा ओढे-नाले आणि बांदिया नदी. पाऊस सुरू झाला की बदाबदा कोसळायचा. ओढे-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. पूर्णपणे ‘कट-ऑफ’. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद असायचं. वाहतूक अशी नसायचीच. एखाद्याला त्या पावसात कुठे जायची वेळ आलीच तर तो त्या ठिकाणी किती दिवसांनी पोहोचेल याचा काही भरवसा नाही.
आम्ही ज्या भागात आमचं नवं जीवन थाटू पाहत होतो तिथून बाहेर पडण्यासाठी ना रस्ते होते ना वाहनं. इतरांशी संपर्क करण्यासाठी ना फोन होते ना पोस्टाची पेटी. उर्वरित जगाशी आणि तोही प्रामुख्याने आनंदवनाशी जोडणारा एकच दुवा होता, तो म्हणजे जगन मचकले. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचा आणि काही महत्त्वाचा निरोप किंवा सामान पोचवायचं असेल तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. 

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...