Pages

Sunday, September 18, 2016

'या' मुलांशी वागायचं कसं?

‘या’ मुलांशी वागायचं कसं?

दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर.

नीलिमा किराणे | September 17, 2016 1:15 AM



‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर मुलांवर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. आणि तुमच्याही त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, पण अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे आणि अपेक्षा मुलांच्याही असतात, हेही तुम्ही समजून घ्यायला हवं ना?’’ टीन एजर्स वा पौगंडावस्थेतील मुलांशी वागताना याचं भान हवंच..

‘‘हाय. कसली जोरदार चर्चा चाललीय?’’ कॉलनीतल्या बागेच्या कट्टय़ाजवळ, जोरजोराने हातवारे करत एकमेकांशी बोलणाऱ्या विशाखा आणि मनोजला पाहून मानसीनं विचारलं. तसा मनोज वैतागलेल्या स्वरात म्हणाला,

‘‘या मुलांशी कसं वागायचं तेच कळत नाहीये मानसी. दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर. आदित्यची पुढच्या वर्षी दहावी, रविवारशिवाय माझ्या मोबाइलला हात लावायचा नाही असा आजच दम भरलाय. त्याच्यात क्षमता आहे, पण अभ्यासाला तासाभराचीही बैठक नाही. सगळं लक्ष खेळात.’’

‘‘अगं, आर्या तर हल्ली पुस्तकंसुद्धा मोबाइलवर वाचते. कशाला डोळे खराब करायचे? स्वयंपाकात मदत शून्य, घरभर पसारा. मुलांच्या अशा वागण्यामुळे सतत वादावादी, शांतता नाहीच. आजही अति झाल्यामुळे बाहेरची थंड हवा खायला आम्ही इथे येऊन बसलो.’’

‘‘पण हवा एवढी गरम होण्याइतकं घडलं काय?’’

‘‘अगं, काल रात्री आर्या उशिरापर्यंत कॉलेजची असाइनमेंट करत होती. मग सकाळी उठायला उशीर. रविवारी घर आवरायचं ठरलेलं, म्हणून हाक मारली, तर ‘रविवारी तरी झोपू दे’ म्हणून माझ्यावर खेकसली. निवांत उठली, गाणी ऐकत, रमतगमत स्वत:चं आवरलं, तेव्हाच माझा पेशन्स संपला होता. मग कपाटातली क्रोकरी पुसायला काढली, तेवढय़ात ‘सरप्राईज पार्टी ठरलीय’ असं सांगत तिची मैत्रीण आली. त्याबरोबर काढलेला पसारा तेवढा फटाफट आवरून बाईसाहेब निघाल्या.’’

‘‘अगं, मुलींनाही रविवारच मिळतो मोकळा. तरी मदतीला आली, काढलेलं फटाफट आवरलं, पुष्कळ झालं की? आणि आदित्य कुठेय?’’

‘‘आदित्य पण थोडासा नाराजीतच खेळायला गेलाय. मागच्या वेळी मित्रांबरोबर हट्टानं जाऊन एक बाही हिरवी, एक पिवळी असले मवाल्यासारखे कपडे आणले, म्हणून आज मी माझ्या पसंतीनं त्याला नवे कपडे घेतले. तो भांडला नाही, पण ‘चम्या’सारखे कपडे म्हणाला. गेलाय ग्राऊंडवर खेळायला..’’ मनोजनं तक्रार मांडली.

‘‘अरे मग छान झालं की. तुम्हाला दोघांना अचानक एक मस्त संध्याकाळ मिळाली भटकायला.’’

‘‘आम्हाला काय पिळतेयस मानसी? तेही एवढे दडपणात असताना?’’

‘‘पिळत नाहीये. मुलं नाराज असूनही या क्षणी मजा करतायत आणि तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींवर चिडून चिडून बोलण्यात तुमचा मोकळा वेळ वाया घालवताय. ‘या मुलांच्या नादात आम्ही कित्येक र्वष एकमेकांसाठीसुद्धा वेळ दिला नाही’ अशी उद्या तुम्हीच तक्रार कराल.’’

‘‘.. आहे खरं तसं, पण तूच सांग, मुलांचं असं वागणं बरोबर आहे का? आम्ही काही चुकीचं थोडंच सांगतो? मुलांच्या भल्यासाठीच सांगतो ना?’’

‘‘बरोबर की चूक? मध्ये उत्तर शोधलं तर काहीच हाती लागत नाही गं विशाखा. मुलांचं वागणं चुकतंय हे समजा मला किंवा कुणालाही मान्य असल्यामुळे ते बदलेल? की तुझी चिडचिड थांबेल?’’

‘‘म्हणजे त्यांनी कसंही वागायचं आणि आम्ही चिडायचं पण नाही?’’

‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. तुम्हाला त्रास देण्यासाठी मुलं मुद्दाम अशी वागतात का?’’

‘‘अंऽ, मुद्दाम नसेल, ती त्यांच्याच नादात असतात हे जास्त खरं.’’

‘‘हे माहितीय तरीही ‘एवढा’ राग?’’

‘‘हजारदा सांगूनही आर्यानं दुर्लक्ष केलं की संताप होतो. घरातलं काहीच कसं करावंसं वाटत नाही तिला? या वयात मी आईला किती मदत करायचे. घर नीटनेटकं ठेवायचे. उद्या हिच्या सासरचे माझाच उद्धार करणार.’’

‘‘अगं, किती काळ एकत्र मिसळतेयस तू! ‘आमच्या लहानपणी..’ म्हणजे भूतकाळ आणि ‘आर्याच्या सासरचे’ म्हणजे भविष्यकाळ. असा गोंधळ केल्याने चिडचिड वाढते, मुद्दा सुटतो.’’

‘‘??’’

‘‘असं बघ, तू तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं वागून सगळ्यांचं कौतुक मिळवलंस तसंच आज्ञाधारक, गुणी वागणं तुला बरोबर वाटतं. मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात, बिनधास्त राहतात, म्हणजे काही तरी चुकतंय, त्यांच्यात काही तरी कमी आहे असं वाटतं ना? मुलं बिघडली, आयुष्यात मागे पडली तर? उद्या ‘लोक’ काय म्हणतील? अशा असंख्य भीती छळतात. मग समजुतीनं घेणं सुटून मुलांवर फटकन टीका करणं घडतं.’’

‘‘म्हणजे आमच्या अपेक्षा चुकीच्या..’’

‘‘नाही, अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे विशाखा. अपेक्षा मुलांच्याही असतात. या पिढीच्या स्वातंत्र्य, मोकळेपणा, स्मार्टनेसच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यांचं जगही आपल्यापेक्षा वेगळं असणार आहे. मोबाइल-इंटरनेटमध्ये त्यांचा भविष्यकाळ आहे. स्वयंपाक येणं, नीटनेटकेपणा हे गुण हवेतच, पण त्या कौतुकापेक्षा नवनवी अ‍ॅप्स शोधून वापरणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. पालकांच्या सक्तीमुळे त्यापासून दूर राहावं लागलं तर ग्रुपमध्ये ती मागास ठरतात, मित्र हसतात त्यांना. या वयात ग्रुपमध्ये ‘भारी’ दिसणं फार महत्त्वाचं असतं. तिथे चेष्टा, अपमान चालत नाही. मग अशा ‘नियंत्रक’ पालकांबद्दल मुलांचाही आदर कमी होतो. तीही फटकन उलटून बोलतात.

‘‘हो, आर्याला काही सांगताना, ‘ती नाहीच ऐकणार’ अशी एक खात्री असते मला. त्या वेळी खूप अगतिक, दुर्लक्षित वाटतं.’’

‘‘हो, पण तू तिची आई. वयाने, अधिकाराने मोठी. त्यामुळे लगेच ‘कशी करत नाही तेच पाहते’पर्यंत पोहोचतेस. तुझ्या आवाजातली हुकूमत, अविश्वास, आर्याला जाणवल्यावर, ‘आता नाहीच ऐकणार’ ही तिचीही ताठर प्रतिक्रिया येते आणि तुमचं युद्ध सुरू.’’

‘‘अगदी असंच घडतं. पण हे बदलायचं कसं?’’

‘‘अशा वेळी मुलांना काय वाटत असेल?’’

‘‘आर्या म्हणतेच की, आमचं तुम्हाला काहीच पटत नाही. वाचलं नाही, तरी रागावणार, मोबाइलवर अभ्यासाचं वाचत असले, तरी ऑनलाइन का वाचतेस? रात्री जागून असाइनमेंट पूर्ण केली तर सकाळी लवकर का उठत नाहीस? मित्र-मैत्रिणी उनाड आहेत..’’

‘‘आदित्यही कुरकुरतो, की ‘मी कितीही अभ्यास केला तरी बाबा तुम्ही माझ्या फुटबॉल मॅचला येतसुद्धा नाही’ म्हणून.’’

‘‘विशाखा, तुला जिमला जायला आवडत नव्हतं. मी चार-पाचदा विचारल्यावर एकदा वैतागून सांगितलंस, ‘मला बोअर होतं जिम.’ माझा हेतू तुझ्या भल्याचाच होता ना?’’

‘‘माझं वेगळं आणि आता जिमला येतेय ना मी?’’

‘‘रागावू नकोस पण न्याय सर्वाना सारखा हवा. तुला दुखवायचं नव्हतं, पण मुलांना कसं वाटत असेल त्याची ‘जाणीव’ होण्यासाठी आठवण दिली. आपण जिमला जायला पाहिजे हे तुलाही कळत होतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य नव्हतं. वजनकाटय़ानं ‘जाणीव’ जागी केल्यावर तुझं प्राधान्य बदललं, नंतर आवडायलाही लागलं. मुलांचंही तसंच होतं. अभ्यास करायला पाहिजे हे आदित्यला कळतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य खेळ आहे. आर्याला तुला मदत करण्याची इच्छा असते पण तिच्या वयाला तर फारच आकर्षणं असतात. अशा वेळी, मुलांमध्ये जी मूल्यं रुजवायला हवीत, त्याबद्दलची ‘जाणीव’ जागी करण्यावर फोकस हवा. ‘तुम्ही कसे चुकता’वर फोकस जाऊन मुलं ‘टार्गेट’ होतात, दुखावतात. मग बिघडतं सगळं. प्रत्येक गोष्टीवर वारंवार टीकाच झाली की आर्यासारखी बंडखोर मुलं भांडतात, काहीच ऐकेनाशी होतात. आदित्यसारखी साधी सरळ मुलं त्यांच्या फुटबॉलसारख्या कौशल्यालाही कमी लेखलं गेलं की हिरमुसतात, आत्मविश्वास संपतो.’’

‘‘पण म्हणजे वागायचं कसं मानसी?’’

‘‘प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. पण बदल हवा जुन्या अपेक्षा आणि अप्रोचमध्ये. संवाद, सन्मान, स्पेस आणि सोबत या चार गोष्टींकडे नव्याने पाहायला हवं. मुलांना आपली सोबत हवी, आधार हवा, पण मध्येमध्ये करून ‘आमचंच बरोबर’चा अतिरेकी आग्रह टाळायचा. त्यांच्या आवडी, अभ्यासाच्या, जगण्याच्या पद्धती त्यांनी  अनुभवातून, प्रयोगातून ठरवण्यासाठी ‘स्पेस’ द्यायची. ती त्यांचा रस्ता शोधतील, यावर विश्वास ठेवायचा. कारण विश्वासासारखी मूल्यं आणि संस्कार वागण्यातून रुजवावे लागतात. मुलांकडून गंभीर चुका होऊ  नयेत एवढं लक्ष अवश्य ठेवायचं.’’

‘‘तारेवरची कसरतच आहे.’’

‘‘सवयीनं जमतं रे आणि हो, बहुतेक मुलांना अभ्यास आणि बंधनं आवडत नाहीत हे जागतिक सत्य आहे. त्याबाबत काल्पनिक आदर्शवादात पालकांनी अडकायचं नाही. तरच पालकांशी संवाद करायला मुलांना मोकळेपणा वाटतो.’’

‘‘आणि चांगल्या सवयी?’’

‘‘मुलांच्या आवडींचा थोडा जरी स्वीकार झाला तरी मुलं पालकांचं ऐकण्याच्या मानसिकतेत येतात. तेव्हा योग्य वेळी, मुलांचा पसारा, आळशीपणा, शिस्त, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसच्या अतिरेकातले धोके या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत थोडक्यात, नेमका संवाद परिणामकारक होऊ  शकतो.’’

‘‘हं. पचायला अवघड आहे, पण प्रयत्न करून पाहू. नाही तरी असंही आमच्या पद्धतीनं काही बदलत नाहीये. आता तरी मुलांची चिंता सोडून आम्ही सुट्टी एन्जॉय करतो.’’ असं म्हणून हसत विशाखा आणि मनोज भटकायला बाहेर पडले.


प्रगत शाळा 25 निकष

📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

शैक्षणिक आत्मभान

शैक्षणिक आत्मभान

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत

फरीदा लांबे | September 17, 2016 1:16 AM



‘‘वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक- सामाजिक स्थितीतल्या फरकातूनच मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली आणि शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. ग्रामीण व शहरी भागात मुस्लीम मुलींमध्ये शिक्षणामुळे एक आत्मनिर्भता निर्माण झाली आहे. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले आहे.’’ मुस्लीम समाजातील बदलत्या शैक्षणिक आत्मभानाविषयी.

फरीदा लांबे यांनी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सच्चर समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय मुंबईतील ‘निर्मला निकेतन’ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या, ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरलेल्या संस्थेच्या सहसंस्थापक अशीही त्यांची ओळख आहे. सुमारे २५ वर्षांचा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव त्यांच्याकडे असून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय सल्लागार समिती आदी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत आणि ते बदल प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. त्याचे कारण देशभरातील मुस्लीम समाज हा विविध राज्यांत विखुरलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाज आणि केरळातील मुस्लीम समाज यांच्या स्थितीत नक्कीच फरक आहे. त्या त्या राज्यातल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रियांचे परिणाम तिथल्या मुस्लीम समाजावर झाल्याने प्रत्येक राज्यांतील मुस्लीम समाजाची स्थिती वेगळी आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाकडे पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की इथला मुस्लीम समाज हा तसा मुख्य प्रवाहात आलेला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्रातील मुस्लीम समाज हा पूर्वीपासूनच इथल्या संस्कृतीशी तादात्म्य पावलेला आहे.

मी स्वत: रत्नागिरीतील एका मुस्लीम कुटुंबातील. त्यामुळे मला स्वत:ला जशी उर्दू भाषा बोलता येते तशीच कोंकणी आणि मराठीही येते. माझे वडील महाराष्ट्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. आमच्या घरी सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. वडिलांचा तर आग्रहच होता की आम्ही सर्व भावंडांनी सरकारी शाळांमध्ये शिकावे. साहजिकच आमचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. मला स्वत:ला अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही गती होती. हॉकी वगैरे खेळांत मी हिरिरीने सहभागी होत असे. आमच्या ओळखीतल्या काहींना हे फारसे रुचत नसे. पण घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहन अन् पाठिंब्यामुळे ते चालू ठेवण्यात आडकाठी आलीच नाही. मुख्य म्हणजे घरून पाठिंबा मिळाला म्हणून मी हे करू शकले याचा अर्थ इतरही मुलींना जर घरून पाठिंबा मिळाला तर त्या या गोष्टी करू शकतील. ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे, ‘तू मुस्लिमांसारखी दिसत नाहीस.’ असं अगदी शाळेपासून मी आत्ताही कधी कधी हे वाक्य ऐकते तेव्हा ते खटकतं. मुस्लिमांसारखी म्हणजे काय नेमकं? मुस्लीम म्हणजे जी काही ठरावीक प्रतिमा डोळ्यासमोर येते तीच त्यांना अभिप्रेत असते का? अगदी आजही? पण या काही गोष्टी सोडल्यास मुस्लीम असण्याचे फारसे वेगळे अनुभव वाटय़ाला आले नाहीत किंवा आपण मुस्लीम असल्यामुळे  इतरांचे आपल्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले असेही झाले नाही.

परंतु ही सर्व परिस्थिती थोडी बदललेली दिसली ती मुंबईतील १९९३च्या दंगलींनंतर. या दंगलींनंतर हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजांत आपापल्या अस्मिता जपण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. दोन्ही बाजू  घेटोइझमकडे वळल्या. आपापले गट होत गेले. त्यातच त्यांना सुरक्षितता जाणवू लागली. याच काळात अल्पसंख्याकांकडे देशभक्तीचे पुरावे मागितले जाऊ लागले. अशा गोष्टींचा तर मला फार राग येत असे. मुस्लीम समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला पडतो की काय अशी स्थिती जाणवू लागली. याचे कारण मुस्लिमांकडे स्वत:चे सामाजिक नेते नाहीत. इमाम, मौलवी हे त्यांचे सामाजिक नेते नाही होऊ शकत. ही कमतरता तर त्यांच्यात होतीच, परंतु याबरोबरच वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीतही बराच मोठा फरक होता. (आजही काही प्रमाणात तो आहेच.) या फरकाबद्दलच मुस्लीम समाजात खंत होती. त्याचा सकारात्मक परिणाम मात्र असा झाला की, मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली. मुस्लीम समाजात आपल्या राजकीय- सामाजिक स्थितीबद्दल जागरूकता वाढू लागली. त्यातून शिक्षण घेण्याकडे मुस्लीम समाजाने लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे मागच्या दोनेक दशकांत चित्र निर्माण झाले. पुढे मुस्लीम समाजातील मुलीही शिक्षणाकडे वळल्याचे याच काळात दिसू लागले.

मी स्वत: सच्चर समिती, रहमान समिती आदी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या समित्यांची सदस्य होते. या अभ्यासांतून पुढे आलेला महत्त्वाचा निष्कर्ष मुस्लीम समाजातील शिक्षणाच्या स्थितीबद्दलचा होता. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लीम समाजातील मुले-मुली सरकारी नोकरीत फारशी दिसत नाहीत. कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम समाजाचा ओढा असल्याचेही अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. अशा परिस्थितीत मुलींचे शिक्षणातील प्रमाण फारच कमी असले तर आश्चर्य वाटायला नको. आठ -दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही स्थिती प्रकर्षांने जाणवे. समजा, १०० मुली इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतील, तर त्यातील अध्र्याहून कमी मुली माध्यमिक शिक्षणाकडे वळायच्या, अशी आधीची परिस्थिती होती. विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात तर मुस्लीम मुलींचे प्रमाण फारच नगण्य होते. पण मागच्या काही वर्षांत यात अधिक वेगाने बदल होऊ लागला. आता ही स्थिती राहिलेली नाही. मुली शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर उच्च शिक्षण घेण्यापर्यंत मुलींची प्रगती झाली आहे. सरकारच्याच एका अहवालानुसार मुलींपेक्षा मुलांचं उच्चशिक्षणातील गळतीचं प्रमाण अधिक आहे. पालकही मुलींना शाळेत पाठवू लागले आहेत. त्यांनाही आपल्या मुलींनी शिकावे असे वाटू लागले आहे. १०वी, १२ वीनंतर मुलांना नोकरी- व्यवसायासाठी शिक्षण थांबवावे लागते. परंतु पालक मुलींचे शिक्षण सुरूच ठेवतात. शाळा, महाविद्यालये ही मुलींसाठी अधिक सुरक्षित आहेत, अशी या पालकांची भावना आहे. सरकारी पातळीवरही सर्व शिक्षा अभियान, उपस्थिती भत्ता यांसारख्या योजनांमुळे मुलींचे शालेय शिक्षणातील प्रमाण वाढले आहे.

मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणातही काही विशेष लक्षणे दिसतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी घेण्याकडे कल आहे. यातील काही मुली आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही देऊ लागल्या आहेत. परंतु हे प्रमाण तसे कमी आहे. फॅशन, टेक्सटाईलसारख्या क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण अथवा कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम मुलींचा ओघ असल्याचे मात्र प्रकर्षांने दिसून येते. ग्रामीण भागातील मुस्लीम मुलींच्या शिक्षणात एक महत्त्वाची बाब म्हणजे, शिक्षणाचा अधिकार हा कायदा झाल्याने आठवीपर्यंतच्या शिक्षणात मुस्लीम मुलींचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. परंतु आठवीनंतरचे शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नसल्याने आठवीनंतर या मुलींना शिक्षणासाठी लांबच्या गावात जा-ये करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आठवीनंतर पुढील शिक्षणात मुलींची गळती होते. इच्छा असूनही केवळ शाळांच्या अनुपलब्धतेमुळे शिकता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाययोजना झाल्यास ग्रामीण भागातही मुलींचे उच्च शिक्षणापर्यंत जाण्याचे प्रमाण वाढेल. शहरी भागात शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण घेण्याकडेही मुस्लीम मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे झाले आहे.

फक्त या मुलींना शिक्षणानंतर नोकरीही मिळणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजाच्या मुलींनी नोकरी करण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट धारणा आहेत. मुलींनी नोकरी करण्याकडे कुटुंबीयांचा सहसा कल नसतो. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुस्लीम कुटुंबात मुलीही नोकरी करताना दिसतात. या मुलींनी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास पालकांची सहसा ना नसते. मुलींनी सुरक्षित ठिकाणी नोकरी करावी, अशी पालकांची भूमिका असते. त्यामुळे अनेक मुली शिक्षणाबरोबरच काही कौशल्ये आत्मसात करून त्यावर आधारित घरगुती व्यवसाय करताना दिसतात. आम्ही ‘प्रथम’ संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रांत काम करताना शिक्षण आणि त्यावर आधारित उपजीविका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. यात आमचे काम वस्ती पातळीवर सुरू असल्याने विविध वस्त्यांमधील बालवाडींमध्ये तिथल्या माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुस्लीम मुलींना शिक्षिकेची जबाबदारी किंवा वस्ती पातळीवरील संस्थेच्या कार्यक्रमांसाठी वस्ती समन्वयक म्हणून काम सोपवतो. अनेक मुस्लीम पालक आमच्या कामात आपल्या मुलींना पाठवण्यास अनुकूलता दाखवतात.

शिक्षण घेतलेल्या व नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. संवाद माध्यमांच्या सहज वापरातून जगभरची माहिती त्यांच्या हाती येऊ लागली आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम या मुलींवर होऊ लागले आहेत. आपले चांगले-वाईट त्यांना कळू लागले आहे. स्वत:च्या आयुष्याविषयी निर्णय घेण्यास त्या समर्थ होऊ लागल्या आहेत. शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणी मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या सरासरी वयातही वाढ झाली आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात एक आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता त्या बोलू लागल्या आहेत. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात

आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या

आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले

आहे. कुटुंबीयांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले तर या मुली शिक्षणात चांगली कामगिरी करत आहेत. हे प्रमाण आता वाढू लागले आहे हे निश्चित.

आता गरज आहे ती तसेच वाढते ठेवण्याची व त्याला दिशा देण्याची!

द्वेष

द्वेष

‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे

डॉ. केतकी गद्रे | September 18, 2016 1:01 AM



‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे; किंबहुना अनिवार्यच! कल्पनाविलासात रमलो की आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते की, मानवी जीवन हे प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता या व अशा सकारात्मक भावनांनी भरलेलं असावं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास अधिक कचरतो, भितो. भीती हीसुद्धा एक ‘भावना’च आहे, परंतु अशीही एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात. ती म्हणजे ‘द्वेष’. फारसे न रुचणारे- नावडते-  न पटणारे- तिरस्कारास पात्र ठरणारे- दुस्वास  आणि अखेर द्वेष.. हे द्वेषापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता, त्यांना थारा न देता, द्वेषाची ही सौम्य रुपांकडे लक्ष न देता आपण द्वेषयात्रेस निघतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो, तेव्हा द्वेष सकारात्मक रूप धारण करतो. म्हणण्याचा अर्थ असा की, उदाहरणार्थ- ‘I hate a particular person, caste, religion’ (म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो) हे म्हणणे जसे तीक्ष्ण, घातक आणि ऐकण्यास,अनुभवण्यास नकोसे वाटणारेतसेच, ‘I hate unjust, abusive tendencies’ (अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविषयी मला द्वेष वाटतो) याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना इतरांप्रति किंवा स्वत:प्रति प्रदर्शित होऊ शकते. यात इतरांप्रति, स्वत:प्रति, एखाद्या गोष्टीप्रति, कल्पना -संकल्पनेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाविषयी एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली, टोकाची अप्रीती व घृणा असते. ‘द्वेष’ हा बऱ्याचदा ‘राग’, ‘हिंसा’, ‘तिटकारा’, ‘किळस’ अशा भावना- वर्तनांशी संबंधित असतो. ‘द्वेष’ ही भावना अनेकांमध्ये दीर्घकाळ रुजणारी असल्याकारणाने मानसोपचारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ती एका घटकेची भावनिक स्थिती नसून, ती एक प्रकारची वृत्ती आहे. ती एक प्रकारची मनोरचना आहे. कदाचित, साध्या ‘नावडी’पासून सुरू झालेल्या  द्वेषाच्या या प्रवासाला स्वैररीत्या वाढू दिल्याने, त्याला खतपाणी घातल्याने, वेळीच आळा न घातल्यान त्याचे रानटी रोपटे आपले भाव-वर्तनाचे विश्व व्यापून टाकत असावे. इतकंच नव्हे, तर मेंदूच्या चाचण्यांमधून नावडत्या व्यक्तींचे चेहरे पाहून होणारी मेंदूची हालचाल अभ्यासली गेली, तेव्हा मेंदूतील काही विशिष्ट स्थानं कार्यरत असल्याचे लक्षात आले. द्वेष हे ‘गुन्हा’ करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जातं. बऱ्याचदा ‘आपण’ आणि ‘ते’/ ‘इतर’ असे विभाजन झाले की एकमेकांविषयी असहिष्णुता निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणजे ‘आपण’, ‘आपल्यातील लोक’, ‘आपल्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन हे आपल्याला आपलेसे व श्रेष्ठ वाटतात. ज्या क्षणी ‘ते’, ‘त्यांचे’ लोक, ‘त्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन अशी विभागणी झाली की एक अदृश्य भिंत तयार होताना दिसते. विभाजन टिकवून ठेवणारी, भेदभावाचा पुरस्कार करणारी ही विशाल भिंत म्हणजेच आपण आपल्या मानलेल्या लोकांसारखा जो नाही, जो भिन्न आहे, तो द्वेषास पात्र  आहे असे मानणे. याचे मुख्य कारण म्हणजे, ही भिन्नता विविधतेच्या दुर्बिणीतून न पाहता उच्च-नीच या मापदंडातून पाहिली जाते. परिणामी विविधता स्वीकारण्यात आपण असमर्थ ठरतो, हे कटू सत्य आहे. म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तीबद्दल ‘ऐकिवातल्या’ मताप्रमाणे ग्रह करून घेणे, तो ग्रह ग्रा आहे हा ठाम विश्वास असणे; तसेच त्या ग्रहाला बळ देणारी बाजू उचलून धरणे आणि ग्रहाला छेद देणारी बाब दुर्लक्षित करणे- ही प्रक्रिया वारंवार करत राहणे. तसेच काही काळाने आपोआप (सवयीमुळे) घडणे आणि (नकारात्मक) ग्रह पक्का होत जाणे आणि कालांतराने अशीच वर्तनशैली बनणे ही विचारांची साखळी द्वेष वाटण्याच्या, वाटत राहण्याच्या संदर्भात आपला कार्यभाग जबाबदारीने सांभाळते. मग अशा व्यक्तीने केलेली वक्तव्ये, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मतं, धरलेले आग्रह हे किती तीव्र, नकारात्मक असतील, याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येईल. अशी  व्यक्ती जर ही मानसिकता समाजात रुजवू लागली तर  नातेसंबंध, त्यातील विश्वास, त्यातील सहिष्णुता, त्यातील स्वातंत्र्य यांची राखरांगोळी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे, दुफळी निर्माण करून वातावरण धगधगतं ठेवू पाहणारे, थोडक्यात द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. लोक त्यांच्या आहारीही जाताना दिसतात. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, कधी स्वेच्छेने, कधी समविचाराने, तर कधी अजाणतेपणाने, अविवेकामुळे तर कधी निव्वळ मूर्खपणामुळे द्वेष ही भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ही भावना मग मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

धर्मग्रंथांनी द्वेष या भावनेला तुच्छ मानलं आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘धर्म’ जाणणाऱ्या, जोपासणाऱ्या तथाकथित व्यक्तींना या बोधाचा नेमका विसर पडताना दिसला की नवल वाटतं. परंतु हेही खरं की, आपल्या मनाशी ठरवून जोपासलेला सहेतुक द्वेष, कोणाच्यातरी चिथावणीमुळे उत्पन्न झालेली द्वेषाची भावना याला आळा घालणे, हे स्वाभाविक उत्पन्न होणाऱ्या द्वेषाच्या भावनेपेक्षा कठीण आहे. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं हे गाढ झोपलेल्यापेक्षा कठीण, तसंच द्वेष या भावनेविषयी आहे. कोणाचाही द्वेष करू नका, हा विचार स्तुत्य आहे, परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे तितकेच कठीण आहे. हे ध्येय गाठणे मोठय़ा धैर्याचे काम आहे. परंतु हे ध्येय  जो गाठतो तो आपले जीवन प्रफुल्लित करण्याची क्षमता स्वत:मध्ये बाळगतो. हे ध्येय गाठण्याची प्रक्रिया वरकरणी कॉमन सेन्सची गोष्ट वाटेल. आहेसुद्धा.  पण ती, ते ध्येय गाठण्याचे टप्पे व्यक्तिमत्त्वावर आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत.

सुरुवात द्वेष-केंद्र ओळखण्यापासून करू या. म्हणजे आपली ही भावना कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, काय घडले वा न घडल्यामुळे उत्पन्न होते, याचा अंदाज घेऊ या. यांचे वर्गीकरण करू या. म्हणजे आधी चर्चिल्याप्रमाणे भावनिक तीव्रता लक्षात ठेवून मग वर्गीकरण करू या. उदा. एखादी गोष्ट मला रुचत नाही की आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो.. म्हणजे दुस्वास की द्वेष वाटतो याची वर्गवारी केल्यास (विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे, प्रगल्भतेने केल्यास) द्वेषाची केंद्रे लक्षात येतील. हे वर्गीकरण महत्त्वाचं, कारण त्या तीव्रतेच्या अमलाप्रमाणेच त्याची उपचारपद्धती ठरते. यानंतर द्वेषाची भावना निर्माण होण्यामागचे नेमके कारण शोधावे. हे कारण काही ऐकिवातल्या तर काही प्रत्यक्षातल्या अनुभवांत दडलेले आहे का ते पाहावे. द्वेषभावना अभंग राखल्याने, मला स्वत:ला, आजूबाजूच्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला काय प्रकारच्या आव्हानांना, परिणामांना तोंड द्यावे लागत आहे? ही भावना जोपासून माझा (वरकरणी) फायदा झाला असला, तरी मी त्याला खऱ्याअर्थी फायदा म्हणू शकेन का? लाभ घेण्याच्या अट्टहासात एकीकडे काय गमावलं याचाही आलेख मांडलेला बरा. हा पारदर्शक आलेखच पुढे निर्माण होणाऱ्या (संभाव्य) द्वेषाच्या भावनेला उत्तेजन देण्यापूर्वी आपल्यापुढे, फी िर्रॠल्लं’ च्या  रूपात उभा राहील. या प्रक्रियेत, या प्रक्रियेवर अविश्वास असणाऱ्या व्यक्ती आपले पाय खेचतील, आपल्या पूर्वीच्या वचनांचा.. तथाकथित सिद्धान्तांचा, समूह-निष्ठेचा वगैरे दाखला देतील. याने आपण विचलित होऊ शकू. परंतु हे कायम लक्षात ठेवा की, आपल्या मानसिकतेचे नियंत्रण हे (जवळजवळ) नेहमी / बऱ्याचदा आपल्या अखत्यारीत असू  शकते आणि इतरांचा त्यावर प्रभाव व्हावा की न व्हावा, झालाच तर कितपत व्हावा, हे ठरवणे हेही बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. परंतु आपण वाहवत जातो आणि आपल्या मनाला अंकित ठेवण्याचा हा मोठा अधिकार गमावून बसतो. हे कटाक्षाने टाळू या. या बाबीची सतत उजळणी केल्यास, ही बाब जास्त स्मरणात राहील आणि प्रत्यक्ष वर्तनात उतरेल.

द्वेषाने द्वेषच मिळतो, द्वेष वाढतो, वाढतच जातो, या वणव्याला वेळीच आळा घातला नाही, तर ही आग, आपल्या विचार – आचार – भावनांच्या डोलाऱ्याला राखेचं स्वरूप देण्यास वेळ लागणार नाही. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द – विचार – वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या, प्रगल्भ आचार आणि सूक्ष्म दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वत:ला कोणत्या साच्यात घालायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे, नाही का? द्वेषभावना जोपासून स्वत:पासून, इतरांपासून दूर जायचे की सशक्त आणि स्वीकाराची मानसिकता बहरवण्याच्या प्रयत्नात राहावं हे वेळीच ठरवू. आपण स्वत:ला समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणवत असू, तर तो घटक सहिष्णु आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे- नीतिमत्तेच्या मापदंडांनी आणि सांविधानिकदृष्टय़ासुद्धा! त्यामुळे या सार्थ अपेक्षेस पोषक आणि साजेशा भावनांचा गुच्छ उराशी-दाराशी बाळगलेला बरा!

डॉ. केतकी गद्रे –

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...