कॅन्व्हास पेंटिंग ते भित्तीचित्र
- आभा भागवत
"कला संस्कृती" - दिवाळी २०१६
कॉलेजमध्ये असताना एक खूप मोठं चित्र तयार होताना बघितलं होतं. साधारण ८ X २५ फुटी असेल. तेव्हापासूनच मोठ्ठ्या चित्राचे अंदाज केवढे वेगळे असतात याची कल्पनाही आली आणि ओढही निर्माण झाली. मोठा कॅन्व्हास आणि भरपूर रंग हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतंच. बरेचदा वेळेचं आणि आर्थिक गणित न जमल्यामुळे लहान कॅन्व्हासवर समाधान मानावं लागायचं. छोट्या कागदावर चित्र काढायची मजा वेगळी आणि मोठ्या आकारात विचार करण्याची मजा वेगळी. मोठ्या अवकाशाची अवाढव्यता, मोकळीक हवीहवीशी वाटू लागली. संपूर्ण शरीर जणू त्या द्विमितीय प्रचंड पृष्ठभागाचा अंदाज घेत चित्र काढत असतं, नव्हे नाचतच असतं. कोणे एके काळी शिकलेलं संगीत आणि नृत्यही त्यात डोकावत असावं बहुदा! त्या भव्य आकारापुढे आपण इतके लहान असतो की त्यात माझं 'मी' पण गळून जातं. जादू व्हावी अशी मी स्वतःला विसरून त्या चित्रात विरघळून जाते. चित्र म्हणजेच मी आणि मी म्हणजेच चित्र होते. सगळा दिवस संपतो तरी चित्रातून मी बाहेरच येत नाही इतकी एकरूपता अनुभवाला येते. साऱ्या जगाचा विसर पडतो आणि ध्यान लागावं तशी तल्लीनता जाणवते.
वेगळा असा स्टुडिओ नसल्यामुळे छोट्या चित्रांबरोबर मोठाल्ले कॅन्व्हासेसही घरीच रंगवले. भिंतीवरचं चित्र असेल तेव्हा मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळं सामान नेऊनच चित्र काढायचं असतं. ही मोठी चित्र तयार होताना बघताना घरी मुलांनाही राहववायचं नाही. त्यांनाही मोठ्ठ्या आकारावर चित्र काढावीशी वाटू लागली. मुलांना माझ्या चित्रात शिरकाव नाही हे समजल्यावर घरातल्या भिंतींनाच त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. घराच्या भिंती पार छतापर्यंत मुलांनी रंगवल्या. हळू हळू लक्षात आलं की सगळीच मुलं अशी मोठ्ठी चित्र काढायला फार उत्सुक असतात. माझ्या मुलांच्या मित्रमैत्रिणींनाही आमच्याकडच्या भिंती बघून चित्र स्फुरू लागली. हे मित्र-मंडळींशी बोलत असताना एक दोघांनी त्यांच्या घराच्या भिंती खुल्या करून दिल्या. मुलांनी मोकळेपणानी तरीही माझ्या मार्गदर्शनाखाली चित्र काढावी अशी कल्पना पुढे आली. यातून, प्रत्येक मुलाची वेगळी क्षमता चाचपडत, तिला भिंतीवर मोकळी वाट करून देत मोठं भित्तीचित्र काढण्यासाठी खास शैली निर्माण करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या चित्रांमुळे 'मुलांनी भिंतींवर केलेली चित्र' ही अतिशय अभिनव संकल्पना फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पोहोचली. कॅनडा, यू. एस. ए. आणि सिंगापोर मधील काही गटांनी स्फूर्ती घेऊन मुलांसाठी भित्तीचित्र कार्यशाळा योजण्याची कल्पना उचलून धरली.
मी एकटीने एक भित्तीचित्र करायचं ठरवलं तर आठ - दहा दिवस तर काही वेळा महिना महिना एकाच चित्राचं काम चालतं. त्यात कसबही अर्थात जास्त चांगलं उतरतं. ते चित्र संपूर्ण माझं असतं. त्या चित्राचं आर्थिक मूल्यही त्यामुळे वाढतं. चित्र ही श्रीमंतांची मक्तेदारी त्यामुळेच वाटते. ज्याच्या खिशाला असं महागातलं चित्र परवडतं तोच चित्र विकत घेऊ शकतो अथवा चित्रकाराला कमिशन्ड वर्कची ऑर्डर देऊ शकतो. मग ज्यांना एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही, त्यांना मोठ्या चित्राचा आनंदच मिळू नये का? का चित्रकारानी स्वतःचं मूल्य कमी करून कमी पैशात काम करायचं? याचा सुवर्णमध्य हळू हळू सापडत गेला, तो भित्तीचित्र या माध्यमातून. एक तर यासाठी भिंत हाच पृष्ठभाग वापरायचा असल्यामुळे कॅन्व्हास, कागद यांवर खर्च करण्याचा प्रश्नच मिटला. भिंतीवरचे रंग तुलनेनी स्वस्त असल्यामुळे साधनांचा खर्चही कमी झाला. आणि कमीत कमी एक लिटरचा रंग विकत घेतल्यामुळे भरपूर रंग अनुभवायची संधी, अर्थात मोकळेपणाने हव्या तेवढ्या रंगात खेळण्याची मुभा मिळाली. छोटे, अपुरे, महागडे रंग काटकसरीने वापरण्यातलं दडपण नाहीसं झालं. 'फ्रीडम' अनुभवण्याचा जणू नवा रस्ताच सापडला म्हणूया ना! मुक्त होण्याची ज्याला ओढ असते तो माणूस स्वतःच्या कामात मुक्ती शोधतोच, तसंच काहीसं घडू लागलं.
ही भित्तीचित्र मी एकटीने न करता त्यात सर्वांचा सहभाग असावा याची इतरही कारणं आहेत. सामान्य माणसाला जर सौंदर्य म्हणजे काय याची व्याख्याच करता आली नाही, सुंदर काय असतं याचा अनुभवच आला नाही, तर त्या माणसाचं स्वतःचं काय राहिलं? भित्तीचित्र करताना अनुभवाला येणारा सौंदर्यानुभव हा सहभागी व्यक्तींना अंतर्मुख करतो; इतकंच नव्हे तर सौंदर्य शोधायची, जाणायची गोडी निर्माण करतो. त्यामुळे या कामाला एक नवीन उंची प्राप्त होते. केवळ मी, माझी चित्रकला, माझा कॉपीराईट, माझी सही, माझा मोठेपणा अशा संकुचित दृष्टिकोनाच्या खूप पलीकडे हा अनुभव घेऊन जातो. सहभाग घेणाऱ्यांना थोडंसं चित्रकाम करूनही 'हे चित्र त्यांचं स्वतःचं आहे, तसंच सर्वांचं आहे' अशी जवळीकीची, आपुलकीची, मालकीची भावना चित्राबद्दल वाटते. त्यामुळे त्या चित्राशी, भिंतीशी आणि त्या ठिकाणाशी सर्व सहभागी एका सुंदर जाणिवेने बांधले जातात. जेवढी मोकळीक मी स्वतः अनुभवते, तेवढीच सर्व सहभागी चित्रकारांनाही अनुभवता आली पाहिजे हे सूत्रच ठरवून घेतलं आहे. प्रत्येकाची चित्रातील तयारी, चित्र काढण्याचा आत्मविश्वास, क्षमता, चित्र आवडण्याचा परीघ हा वेगळा असतो. या सर्व वैविध्यपूर्ण बंधनांना संपूर्णपणे स्वीकारूनच समूहचित्र करणं शक्य आहे. त्यासाठी स्वतःच्या स्वीकारकक्षा मला सतत रुंदावत न्याव्या लागतात. समूहगान आणि समूहनृत्य जसं सर्वसामायी आहे, तसंच हे समूहचित्र आहे. एकत्र येऊन निर्मिती करण्यातली ऊर्जा अवर्णनीय आनंद तयार करते. मी जरी त्याची दिशा ठरवत असले तरी सर्वांच्या अभिव्यक्तीला, कौशल्याला न्याय देणं देखिल सातत्यानं त्यात करावं लागतं.
ज्यांना कागदावर चित्र काढायला फार मजा येत नाही त्यांनाही भित्तीचित्रात आनंद मिळू शकतो, हे पाहून मलाही आश्चर्य वाटतं. म्हणजे चित्रकला ही फक्त चित्रकाराचीही मक्तेदारी राहिलीच नाही. सर्वांनी मिळून केलेली ती एक सामायिक कलाकृती बनते. It's a form of Public Art. याला कदाचित कम्युनिस्ट गंध येऊ शकेल, पण हा त्याहून खूप वेगळा विचार आहे. यात सर्वांच्या क्षमतांचं सपाटीकरण नाहीये, उलट सर्वाना जे येतं त्याची भर घालणं आहे. त्याचं कौतुक करणं आहे; मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आहे; चित्रातून कलोपचाराचे फायदे मिळवणं आहे; चित्रात स्वतःला झोकून देणं आहे; स्वतःला हरवणं आहे; मुलांची ऊर्जा सकारात्मकरित्या उपयोगात आणणं आहे. मुलं यातून आयुष्यभरासाठी प्रेरणा घेतील. हा अनुभव इतका वेगळा आणि समृद्ध करणारा असतो की त्याचे चांगले परिणाम चिरकाल दिसतील. खरं तर मोठ्या माणसांनाही अशा समूहचित्रातून खूप आनंद आणि समाधान मिळतं.
लहान मुलांच्या क्षमतांना समाजाने कायमच दुय्यम लेखलं आहे हेही यातून प्रकर्षानं जाणवू लागलं. बालचित्रकलेच्या अभ्यासातून मुलांमधील विविध वयोगटातील चित्र क्षमता ही केवढी विलक्षण देणगी आहे हे समजत होतं. त्याचा अनुभव भित्तिचित्रांतून येऊ लागला. एका चित्रामध्ये सात वर्षाच्या वीस मुलांचा सहभाग होता आणि चित्रातील झाडाला प्रत्येकाने तीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढली. मुलांना अजून जागा दिली असती तर प्रत्येकाने शंभर वेगवेगळे प्रकार नक्की काढले असते. नंतर जेव्हा मुलं दमली आणि पालक फुलं काढू लागले तेव्हा पालकांनी नवीन काही करण्याऐवजी मुलांच्या फुलांची नक्कल केली. नवनिर्मितीसाठी उत्सुक असलेल्या प्रौढांनी हे लक्षात घेण्याजोगं आहे की मुलं हा सृजनशीलतेचा उगम आहे. त्यांना फक्त मोकळी वाट मिळायचा अवकाश आणि ती खळाळून वाहू लागतात.
कर्नाटकातल्या काही दुर्गम भागांत छोट्या गावांमध्ये शेतकरी मुलांबरोबर अशी भित्तीचित्र काढण्याची सुंदर संधी नुकतीच मिळाली. शहरी मुलं एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात. त्यांचं विश्व हे एका आखून दिलेल्या सीमेच्या आतपर्यंत मर्यादित असतं. मी स्वतः शहरी असल्याने गावातली मुलं किती हुशार असतात आणि त्यांचे अंदाज कसे वेगळे असतात याची मला पुरेशी ओळख असण्याचं काहीच कारण नव्हतं. या मुलांना चित्रात सामावून घेणं हे मोठंच आव्हान होतं. कानडी भाषा मला येत नाही आणि त्यांना मराठी येत नाही. मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये संभाषण करताना, चित्र ही एक स्वतंत्र मजबूत भाषा आहे याची प्रचीति आली. रेषा रंगांच्या माध्यमातून त्या मुलांच्या जवळ पोहोचायला फक्त काही मिनिटं लागली. भिंतीवरच्याच चित्राने भाषेची भिंत फोडणारं असं हे विलक्षण माध्यम आहे.
मुलांना वाचनालयात यावंसं वाटावं आणि स्वतः केलेल्या भित्तीचित्रामुळे वाचनालयाविषयी आपुलकी वाटावी हा या चित्रांचा हेतू होता. पहिल्याच चित्राच्या वेळी एक पाच वर्षाची चिंगुली शेमडी पोर आपल्या एक वर्षाच्या भावाला कडेवर घेऊन पुन्हा पुन्हा चित्र बघायला येत होती. धाकट्या भावंडाला सांभाळायची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिला चित्र आणि वाचनालय या दोन्ही गोष्टी फक्त काही अंतरावरून बघायला मिळाल्या. ही मुलगी म्हणजे अनेक भारतीय मुलींच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. त्या मुलीनी माझ्या मनात घर केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या चित्रात ती मुलगी भिंतीवर चितारायची ठरवली. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात पांढऱ्या फुलांच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलेली तीन भावंडं आणि दूरवर उभी, बाळ कडेवर घेतलेली एक छोटी पोर हे चित्र थेट तिथल्या गावातल्या मुलांच्या, गावकऱ्यांच्या हृदयाला भिडलं. नंतर कळलं की ते चित्र बघायला रोज थोडे थोडे गावकरी येऊन जातात. चित्रकाराच्या आयुष्यात याहून आनंदाची गोष्ट ती काय?
चित्रांमध्ये जी जी पुस्तकं आम्ही दाखवली, त्या पुस्तकांची नावं कानडी मध्येच लिहायची होती. मग त्याच मुलांना सांगितलं की तुमच्या मनातलं एखादं पुस्तक, जे अजून कोणीच तयार केलं नसेल अशी नावं लिहा. आणि यातून मुलांच्या मनात खोलवर घर केलेल्या पुस्तक कल्पना बाहेर येऊ लागल्या. सुट्टी मजेची, भिंतीवरची पाल, सगळ्या शाळेत मीच हुशार, पुस्तकातला किडा, टकलू, बदक, विविध मासे आणि अशी खूप मोठी यादी होईल अशी नावं मुलांनी शोधली आणि लिहिली. कल्पनेतल्या पुस्तकाला लेखक म्हणून स्वतःची नावंही घातली. भित्तीचित्रांमुळे मुलांची वाचनालयाशी अशी दोस्ती होईल याची मलाही आधी कल्पना नव्हती.
भिंतीवरच्या चित्रांमधल्या मुलांचे त्वचेचे रंग काळे सावळे दाखवले. एक दोन मुलं खूपच जास्त काळी दाखवली, कारण तेवढी काळी भारतीय मुलं असतात. पुस्तकांमधल्या चित्रांमध्ये कधीच एवढी काळी सावळी मुलं दाखवली जात नाहीत. त्यामुळे सहभागींपैकी काही जण म्हणत होते की रंग बदलू, गोरा करू. पण आपली मुलं अशीच असतात हे त्यांना थोड्यावेळाने पटलं. गावातील मुली जशी परकर पोलकी घालतात तशीच काही चित्रांमध्ये दाखवली, काही मुलांना चक्क समोर बसवून त्यांचं स्केच भिंतीवर उतरवलं. मुलं इतकी खूष झाली. जाता जाता मला पुन्हा येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देऊन ठेवलं. अशी ही भित्तीचित्रांनी माणसं जोडण्याची वेगळीच ताकद हळू हळू समोर येऊ लागली आहे. सहभागींना नाविन्यपूर्ण अनुभव देता देता माझा प्रवासही समृद्ध होतो आहे.
चित्र कसं असावं याचे सर्व नियम मुलं तोडू शकतात. नियम तोडण्यामुळे, प्रयोग करण्यामुळे कधीही न सुचलेल्या असंख्य गोष्टी मुलं शोधून काढतात. स्वतःच प्रश्न निर्माण करतात आणि उत्तरही स्वतःच शोधतात. भिंतीवरची भव्य जागा कशी वापरायची याचे नवे अंदाज तयार होतात. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या काळात जगणाऱ्या आपल्या पिढीमध्ये अनेक स्तरांवर अनेक प्रकारची प्रतिभा अस्तित्वात असते, तिला वाट सापडवून देण्यासाठी मार्ग शोधायची गरज आहे. भिंतीवरच्या चित्रांसारखं मुक्त करणारं माध्यम इतकं सहजी उपलब्ध आहे, की त्याचा आस्वाद आणि अनुभव शक्य तेवढ्या सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं.
दलाईलामा यांचं एक अतिशय आशयघन वाक्य कायम आठवत राहतं - The planet does not need more successful people. The planet desperately needs more peacemakers, healers, restorers, storytellers and lovers of all kinds. असे शांतीदूत निर्माण करण्याची ताकद समूह भित्तीचित्रात आहे. याचं महत्व कोणाला न पटलं तरच नवल!
- आभा भागवत
-----------------