Pages

Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday, February 13, 2017

सृजनरंग

#सृजनरंग

लोकसत्ता
11 फेब 2017
- आभा भागवत

स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. ते समजून घेणं गरजेचं आहे.

बालचित्रकलेतील टप्पे हे सर्वाना माहीत असणं आणि पालक व शिक्षकांनी मुलाचं निरीक्षण करताना ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं. एकाच वर्गातील दोन समवयस्क मुलं वेगवेगळी चित्रं का काढतात हे समजून घेण्यात याचा उपयोग होतो. एखादं मूल त्या टप्प्याच्या ढोबळ आराखडय़ापेक्षा खूपच निराळं काही करत असेल तर ते लक्षात येणं आणि त्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळणं हेही यातून घडू शकतं किंवा आपलं मूल कसं सर्वसामान्य आहे हेही समजू शकतं. ‘तारे जमीं पर’मधल्या ईशानच्या पात्राप्रमाणे एखादा जन्मजात चित्रकार असेल तर ते वेळीच लक्षात आलेलं केव्हाही चांगलंच ना? बालकाची नैसर्गिक वाढ – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बोधनिक तसंच सांस्कृतिक पाश्र्वभूमी आणि मिळणारं शिक्षण अथवा प्रशिक्षण या सर्वाचा बालचित्रकलेवर मोठा प्रभाव असतो.

बालचित्रकलेतील तिसरा टप्पा ‘नियोजित चित्र’ या नावाने ओळखला जातो. यामध्ये मूल स्वयं ऊर्मीने काही प्रतीकं चित्रित करू लागतं. ही प्रतीकं म्हणजे मुलाच्या मनात, डोक्यात जे विचार चालू आहेत त्यांचं दृश्य प्रदर्शनच असतं. तुम्ही पाहिलं असेल की सातव्या वर्षांच्या आसपास अनेक मुलं एकाच प्रकारची असंख्य चित्रं पुन:पुन्हा अथकपणे काढतात. बुजगावणं वाटावं असे हातपाय, ताठ असणाऱ्या असंख्य मानवाकृती किंवा मोटारी आवडत असतील तर मोटारीच, विमानं आवडत असतील तर विमानंच, असं नियोजन चित्रात दिसतं. मुलांची निरीक्षणशक्ती या वयात वाढलेली असते, त्यांना प्रश्न पडत असतात, उत्तरं सापडत असतात. हा सर्व सृजनाचा खेळ त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत असतो. माहितीमध्ये एक महत्त्वाची भर पडलेली असते ती म्हणजे आपण आईच्या पोटात होतो. आणि आजूबाजूच्या अनेक गर्भवती आया आणि प्राणी यांचं निरीक्षण मूल करू लागतं. आपल्या डोळ्याला दिसत नाहीत अशा कित्येक गोष्टी या जगात आहेत याची जाण हळूहळू याच वयात येऊ लागते. आणि त्याची विलक्षण चित्र अभिव्यक्ती म्हणून मूल एक्स-रे चित्र काढू लागतं. मोठय़ा माशाने खाल्लेले छोटे मासे, मोठय़ा प्राण्याच्या पोटात छोटा प्राणी, प्राणी आणि आत सांगाडा, झाडाच्या खोडामध्ये किडय़ांचं घर, मातीच्या खाली लपलेली झाडाची मुळं, मुंग्यांच्या वारुळाच्या आतली रचना असे मजेदार विषय मुलं हाताळू लागतात.

अजून एक निरीक्षण असं आहे, की स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. एका मुलाला समुद्राच्या तळाशी काय असतं याची खूप उत्सुकता असे. काही पुस्तकांतून, गोष्टींतून, फिल्म्समधून त्याने ते समजून घेतलं होतं. आणि जवळजवळ तीन र्वष तो फक्त समुद्राखालचे वेगवेगळे मासे काढत होता. मित्रांसोबतही याच गप्पा होत आणि असं लक्षात आलं की त्याच्या मित्रांचा पाच- सहा जणांचा गट चित्रात फक्त मासेच काढत असतो आणि माशांची माहिती गोळा करकरून एकमेकांना सांगत असतो. ही नुसती उत्सुकता किंवा आकर्षण नव्हतं. रागावणाऱ्या मोठय़ा माणसांची भीती, अंधाराची भीती, खोल पाण्याची भीती आणि न समजणारी असंख्य प्रकारची भीती यांवर वर्चस्व मिळवायचा तो चिमुकला प्रयत्न होता. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. या स्वयंउपचाराच्या चित्रपद्धतीत ‘हे काय तेच तेच चित्र काढतोयस’ असं म्हणून आपण त्या मुलाने शोधलेल्या थेरपीला नाकारत असतो. त्यामुळे त्या मुलाला हवी तशी चित्रं काढू देण्याचं स्वातंत्र्य मिळालं तरच आपोआप ते मूल स्वत:ची काळजी स्वत: कशी घ्यायची हे शोधून काढतं आणि स्वतंत्र झाल्यामुळे अर्थातच समाधानी होतं.

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही. तरीही पाठवायचंच असेल तर ज्या क्लासेसमध्ये चित्रं काढायची मोकळीक दिली जाते तिथेच मुलांना पाठवावं. जिथे असं असं चित्र काढ, आकारात नीट रंग भर असा आग्रह धरला जातो त्या चित्रकलावर्गात मुलाचं भरपूर नुकसान होतं. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता यातून मारली जाऊ शकते. मूल कोमेजू लागतं आणि अकाली चित्र काढेनासं देखील होऊ शकतं. शाळांनी देखील ही गरज लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

यापुढचा चौथा टप्पा आहे तो ‘बदलाचा काळ’. दहा ते बारा र्वष वयोगटातील मुलं, मोठय़ांनी काढलेल्या चित्रांच्या प्रभावाखाली असतात आणि मोठय़ांसारखी चित्रं काढायचा प्रयत्न करतात. तरीही नियोजित चित्रटप्प्यातील काही प्रतीकांचा मोह मुलाला आवरत नाही. त्यामुळे एखाद्या फ्रेम केलेल्या सूर्यास्ताच्या निसर्गचित्राची नक्कल करता करता अगदी निरागस, बालिश अशी मानवाकृती मुलांच्या चित्रात डोकावते. चित्रात जवळच्या वस्तू मोठय़ा तर लांबच्या लहान दिसू लागतात. क्षितिजरेषेचा अंतर्भाव होतो आणि तिसरी मिती दिसू लागते, अर्थात चित्र फक्त लांबी आणि रुंदीत द्विमितीय चपटं न वाटता खोली म्हणजेच डेप्थमुळे त्रिमितीय वाटू लागतं. वस्तू या शेजारी शेजारी मांडून ठेवलेल्या न वाटता काही मागे, काही पुढे, एकमेकांमागे झाकल्यामुळे काही भाग दिसतो असे सूक्ष्म बारकावे टिपून मुलं चित्रात उतरवतात. ज्या उत्स्फूर्ततेने, न बिचकता मूल यापूर्वी चित्र काढत असे ती कमी होऊ लागते. चित्र काढायचं तंत्र ज्यांना जमत नाही ती मुलं नाराज होऊन चित्र काढेनाशी होऊ लागतात. सुचतं खूप पण ते चित्रात उतरवता येत नाही, अशी या टप्प्यात अनेक मुलं असतात.

याच काळात मुलांचा चित्रातला रस टिकून राहावा यासाठी इतर विषयांशी सांगड घालून कलाकृती करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. ज्या मुलांना गोडी असते आणि चित्रकलेचं अंग असतं त्यांना नक्कल करण्यापासून परावृत्त करावं लागतं आणि जास्तीत जास्त ओरिजिनल, स्वत:ची चित्र काढायचा आग्रह धरावा लागतो. पण अनेक ठिकाणी तसं घडताना दिसत नाही. जे चांगलं जमतंय तेच ते काढायला प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे मूल बंदिस्त विचार करू लागतं. स्वत:च्या चित्र काढण्याच्या कक्षा अरुंद करून ठेवतं. या टप्प्यातील मुलांना विशिष्ट चित्रपद्धतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक माध्यमं देणं – जसं कोलाज, दोरा कागदाला शिवून चित्र, नैसर्गिक रंग तयार करून चित्र, मातीने चित्र, मोठे चित्रकार समजून घेऊन विविध शैलींचा अभ्यास करणं इत्यादी तसंच विज्ञान व कलेची सांगड घालणं – जसं रंग कसे तयार होतात, कागद कसे तयार होतात, कला अभ्यासण्यासाठी विज्ञानही कसं महत्त्वाचं आहे आणि कलाकुसरीचा चित्रात वापर करणं – जसं रांगोळीचे प्रकार, अलंकारणाचे विविध प्रकार इत्यादीमधून या विचारकक्षा रुंदावू शकतात.

चित्रांची गोडी टिकून राहिलेल्या मुलांचा बालचित्रकलेतील पाचवा टप्पा असतो ‘वास्तववादी’ चित्रांचा. साधारण तेरा ते सोळा वयोगटातील या मुलांच्या हातात चित्रं चांगली काढण्याचं कसब आलेलं असतं. तंत्र शिकून, सराव करून चित्रकलेतील मूलतत्त्व अभ्यासून या वयातील मुलं चांगली चित्र काढू शकतात. हात स्थिर होणं, साधनांशिवाय उत्तम आकार, रेषा, बिंदू परिणामकारक काढू शकणं, रंगांची समज येणं, काय सुंदर आहे याबद्दल मतं व्यक्त करता येणं, रचनामूल्य समजणं, प्रमाणबद्ध आकृती काढता येणं म्हणजेच सौंदर्यदृष्टी तयार होणं अशी अनेकांगानी चित्रकलेतील समज मुलं दाखवू लागतात. म्हणूनच या सुमारास चित्रकलेच्या परीक्षा मुलांनी द्याव्यात. रंगसंगती, रंगछटा, रेखाकृती, छाया-प्रकाशाचा अभ्यास अशा चित्रकलेतील मूलतत्त्वांवर या टप्प्यात प्रभुत्व मिळवता येते. ज्या मुलांच्या हातात कसब कमी आहे पण चित्रकलेची गोडी आहे त्यांनी चित्रं काढण्यापासून परावृत्त न होता नेटाने जी चित्रं आवडतात ती काढत राहिली पाहिजेत. कारण चित्रकला हे एक सहजसुंदर अभिव्यक्तीचं, आनंद अनुभवण्याचं माध्यम आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना चित्र काढण्याचा आनंद लोप पावू नये म्हणून आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
- आभा भागवत

Monday, November 21, 2016

भित्तीचित्र

कॅन्व्हास पेंटिंग ते भित्तीचित्र
- आभा भागवत
"कला संस्कृती" - दिवाळी २०१६

कॉलेजमध्ये असताना एक खूप मोठं चित्र तयार होताना बघितलं होतं. साधारण ८ X २५ फुटी असेल. तेव्हापासूनच मोठ्ठ्या चित्राचे अंदाज केवढे वेगळे असतात याची कल्पनाही आली आणि ओढही निर्माण झाली. मोठा कॅन्व्हास आणि भरपूर रंग हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतंच. बरेचदा वेळेचं आणि आर्थिक गणित न जमल्यामुळे लहान कॅन्व्हासवर समाधान मानावं लागायचं. छोट्या कागदावर चित्र काढायची मजा वेगळी आणि मोठ्या आकारात विचार करण्याची मजा वेगळी. मोठ्या अवकाशाची अवाढव्यता, मोकळीक हवीहवीशी वाटू लागली. संपूर्ण शरीर जणू त्या द्विमितीय प्रचंड पृष्ठभागाचा अंदाज घेत चित्र काढत असतं, नव्हे नाचतच असतं. कोणे एके काळी शिकलेलं संगीत आणि नृत्यही त्यात डोकावत असावं बहुदा! त्या भव्य आकारापुढे आपण इतके लहान असतो की त्यात माझं 'मी' पण गळून जातं. जादू व्हावी अशी मी स्वतःला विसरून त्या चित्रात विरघळून जाते. चित्र म्हणजेच मी आणि मी म्हणजेच चित्र होते. सगळा दिवस संपतो तरी चित्रातून मी बाहेरच येत नाही इतकी एकरूपता अनुभवाला येते. साऱ्या जगाचा विसर पडतो आणि ध्यान लागावं तशी तल्लीनता जाणवते.

वेगळा असा स्टुडिओ नसल्यामुळे छोट्या चित्रांबरोबर मोठाल्ले कॅन्व्हासेसही घरीच रंगवले. भिंतीवरचं चित्र असेल तेव्हा मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळं सामान नेऊनच चित्र काढायचं असतं. ही मोठी चित्र तयार होताना बघताना घरी मुलांनाही राहववायचं नाही. त्यांनाही मोठ्ठ्या आकारावर चित्र काढावीशी वाटू लागली. मुलांना माझ्या चित्रात शिरकाव नाही हे समजल्यावर घरातल्या भिंतींनाच त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. घराच्या भिंती पार छतापर्यंत मुलांनी रंगवल्या. हळू हळू लक्षात आलं की सगळीच मुलं अशी मोठ्ठी चित्र काढायला फार उत्सुक असतात. माझ्या मुलांच्या मित्रमैत्रिणींनाही आमच्याकडच्या भिंती बघून चित्र स्फुरू लागली. हे मित्र-मंडळींशी बोलत असताना एक दोघांनी त्यांच्या घराच्या भिंती खुल्या करून दिल्या. मुलांनी मोकळेपणानी तरीही माझ्या मार्गदर्शनाखाली चित्र काढावी अशी कल्पना पुढे आली. यातून, प्रत्येक मुलाची वेगळी क्षमता चाचपडत, तिला भिंतीवर मोकळी वाट करून देत मोठं भित्तीचित्र काढण्यासाठी खास शैली निर्माण करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या चित्रांमुळे 'मुलांनी भिंतींवर केलेली चित्र' ही अतिशय अभिनव संकल्पना फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पोहोचली. कॅनडा, यू. एस. ए. आणि सिंगापोर मधील काही गटांनी स्फूर्ती घेऊन मुलांसाठी भित्तीचित्र कार्यशाळा योजण्याची कल्पना उचलून धरली.

मी एकटीने एक भित्तीचित्र करायचं ठरवलं तर आठ - दहा दिवस तर काही वेळा महिना महिना एकाच चित्राचं काम चालतं. त्यात कसबही अर्थात जास्त चांगलं उतरतं. ते चित्र संपूर्ण माझं असतं. त्या चित्राचं आर्थिक मूल्यही त्यामुळे वाढतं. चित्र ही श्रीमंतांची मक्तेदारी त्यामुळेच वाटते. ज्याच्या खिशाला असं महागातलं चित्र परवडतं तोच चित्र विकत घेऊ शकतो अथवा चित्रकाराला कमिशन्ड वर्कची ऑर्डर देऊ शकतो. मग ज्यांना एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही, त्यांना मोठ्या चित्राचा आनंदच मिळू नये का? का चित्रकारानी स्वतःचं मूल्य कमी करून कमी पैशात काम करायचं? याचा सुवर्णमध्य हळू हळू सापडत गेला, तो भित्तीचित्र या माध्यमातून. एक तर यासाठी भिंत हाच पृष्ठभाग वापरायचा असल्यामुळे कॅन्व्हास, कागद यांवर खर्च करण्याचा प्रश्नच मिटला. भिंतीवरचे रंग तुलनेनी स्वस्त असल्यामुळे साधनांचा खर्चही कमी झाला. आणि कमीत कमी एक लिटरचा रंग विकत घेतल्यामुळे भरपूर रंग अनुभवायची संधी, अर्थात मोकळेपणाने हव्या तेवढ्या रंगात खेळण्याची मुभा मिळाली. छोटे, अपुरे, महागडे रंग काटकसरीने वापरण्यातलं दडपण नाहीसं झालं. 'फ्रीडम' अनुभवण्याचा जणू नवा रस्ताच सापडला म्हणूया ना! मुक्त होण्याची ज्याला ओढ असते तो माणूस स्वतःच्या कामात मुक्ती शोधतोच, तसंच काहीसं घडू लागलं.

ही भित्तीचित्र मी एकटीने न करता त्यात सर्वांचा सहभाग असावा याची इतरही कारणं आहेत. सामान्य माणसाला जर सौंदर्य म्हणजे काय याची व्याख्याच करता आली नाही, सुंदर काय असतं याचा अनुभवच आला नाही, तर त्या माणसाचं स्वतःचं काय राहिलं? भित्तीचित्र करताना अनुभवाला येणारा सौंदर्यानुभव हा सहभागी व्यक्तींना अंतर्मुख करतो; इतकंच नव्हे तर सौंदर्य शोधायची, जाणायची गोडी निर्माण करतो. त्यामुळे या कामाला एक नवीन उंची प्राप्त होते. केवळ मी, माझी चित्रकला, माझा कॉपीराईट, माझी सही, माझा मोठेपणा अशा संकुचित दृष्टिकोनाच्या खूप पलीकडे हा अनुभव घेऊन जातो. सहभाग घेणाऱ्यांना थोडंसं चित्रकाम करूनही 'हे चित्र त्यांचं स्वतःचं आहे, तसंच सर्वांचं आहे' अशी जवळीकीची, आपुलकीची, मालकीची भावना चित्राबद्दल वाटते. त्यामुळे त्या चित्राशी, भिंतीशी आणि त्या ठिकाणाशी सर्व सहभागी एका सुंदर जाणिवेने बांधले जातात. जेवढी मोकळीक मी स्वतः अनुभवते, तेवढीच सर्व सहभागी चित्रकारांनाही अनुभवता आली पाहिजे हे सूत्रच ठरवून घेतलं आहे. प्रत्येकाची चित्रातील तयारी, चित्र काढण्याचा आत्मविश्वास, क्षमता, चित्र आवडण्याचा परीघ हा वेगळा असतो. या सर्व वैविध्यपूर्ण बंधनांना संपूर्णपणे स्वीकारूनच समूहचित्र करणं शक्य आहे. त्यासाठी स्वतःच्या स्वीकारकक्षा मला सतत रुंदावत न्याव्या लागतात. समूहगान आणि समूहनृत्य जसं सर्वसामायी आहे, तसंच हे समूहचित्र आहे. एकत्र येऊन निर्मिती करण्यातली ऊर्जा अवर्णनीय आनंद तयार करते. मी जरी त्याची दिशा ठरवत असले तरी सर्वांच्या अभिव्यक्तीला, कौशल्याला न्याय देणं देखिल सातत्यानं त्यात करावं लागतं.

ज्यांना कागदावर चित्र काढायला फार मजा येत नाही त्यांनाही भित्तीचित्रात आनंद मिळू शकतो, हे पाहून मलाही आश्चर्य वाटतं. म्हणजे चित्रकला ही फक्त चित्रकाराचीही मक्तेदारी राहिलीच नाही. सर्वांनी मिळून केलेली ती एक सामायिक कलाकृती बनते. It's a form of Public Art. याला कदाचित कम्युनिस्ट गंध येऊ शकेल, पण हा त्याहून खूप वेगळा विचार आहे. यात सर्वांच्या क्षमतांचं सपाटीकरण नाहीये, उलट सर्वाना जे येतं त्याची भर घालणं आहे. त्याचं कौतुक करणं आहे; मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आहे; चित्रातून कलोपचाराचे फायदे मिळवणं आहे; चित्रात स्वतःला झोकून देणं आहे; स्वतःला हरवणं आहे; मुलांची ऊर्जा सकारात्मकरित्या उपयोगात आणणं आहे. मुलं यातून आयुष्यभरासाठी प्रेरणा घेतील. हा अनुभव इतका वेगळा आणि समृद्ध करणारा असतो की त्याचे चांगले परिणाम चिरकाल दिसतील. खरं तर मोठ्या माणसांनाही अशा समूहचित्रातून खूप आनंद आणि समाधान मिळतं.

लहान मुलांच्या क्षमतांना समाजाने कायमच दुय्यम लेखलं आहे हेही यातून प्रकर्षानं जाणवू लागलं. बालचित्रकलेच्या अभ्यासातून मुलांमधील विविध वयोगटातील चित्र क्षमता ही केवढी विलक्षण देणगी आहे हे समजत होतं. त्याचा अनुभव भित्तिचित्रांतून येऊ लागला. एका चित्रामध्ये सात वर्षाच्या वीस मुलांचा सहभाग होता आणि चित्रातील झाडाला प्रत्येकाने तीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढली. मुलांना अजून जागा दिली असती तर प्रत्येकाने शंभर वेगवेगळे प्रकार नक्की काढले असते. नंतर जेव्हा मुलं दमली आणि पालक फुलं काढू लागले तेव्हा पालकांनी नवीन काही करण्याऐवजी मुलांच्या फुलांची नक्कल केली. नवनिर्मितीसाठी उत्सुक असलेल्या प्रौढांनी हे लक्षात घेण्याजोगं आहे की मुलं हा सृजनशीलतेचा उगम आहे. त्यांना फक्त मोकळी वाट मिळायचा अवकाश आणि ती खळाळून वाहू लागतात.

कर्नाटकातल्या काही दुर्गम भागांत छोट्या गावांमध्ये शेतकरी मुलांबरोबर अशी भित्तीचित्र काढण्याची सुंदर संधी नुकतीच मिळाली. शहरी मुलं एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात. त्यांचं विश्व हे एका आखून दिलेल्या सीमेच्या आतपर्यंत मर्यादित असतं. मी स्वतः शहरी असल्याने गावातली मुलं किती हुशार असतात आणि त्यांचे अंदाज कसे वेगळे असतात याची मला पुरेशी ओळख असण्याचं काहीच कारण नव्हतं. या मुलांना चित्रात सामावून घेणं हे मोठंच आव्हान होतं. कानडी भाषा मला येत नाही आणि त्यांना मराठी येत नाही. मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये संभाषण करताना, चित्र ही एक स्वतंत्र मजबूत भाषा आहे याची प्रचीति आली. रेषा रंगांच्या माध्यमातून त्या मुलांच्या जवळ पोहोचायला फक्त काही मिनिटं लागली. भिंतीवरच्याच चित्राने भाषेची भिंत फोडणारं असं हे विलक्षण माध्यम आहे.

मुलांना वाचनालयात यावंसं वाटावं आणि स्वतः केलेल्या भित्तीचित्रामुळे वाचनालयाविषयी आपुलकी वाटावी हा या चित्रांचा हेतू होता. पहिल्याच चित्राच्या वेळी एक पाच वर्षाची चिंगुली शेमडी पोर आपल्या एक वर्षाच्या भावाला कडेवर घेऊन पुन्हा पुन्हा चित्र बघायला येत होती. धाकट्या भावंडाला सांभाळायची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिला चित्र आणि वाचनालय या दोन्ही गोष्टी फक्त काही अंतरावरून बघायला मिळाल्या. ही मुलगी म्हणजे अनेक भारतीय मुलींच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. त्या मुलीनी माझ्या मनात घर केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या चित्रात ती मुलगी भिंतीवर चितारायची ठरवली. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात पांढऱ्या फुलांच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलेली तीन भावंडं आणि दूरवर उभी, बाळ कडेवर घेतलेली एक छोटी पोर हे चित्र थेट तिथल्या गावातल्या मुलांच्या, गावकऱ्यांच्या हृदयाला भिडलं. नंतर कळलं की ते चित्र बघायला रोज थोडे थोडे गावकरी येऊन जातात. चित्रकाराच्या आयुष्यात याहून आनंदाची गोष्ट ती काय?

चित्रांमध्ये जी जी पुस्तकं आम्ही दाखवली, त्या पुस्तकांची नावं कानडी मध्येच लिहायची होती. मग त्याच मुलांना सांगितलं की तुमच्या मनातलं एखादं पुस्तक, जे अजून कोणीच तयार केलं नसेल अशी नावं लिहा. आणि यातून मुलांच्या मनात खोलवर घर केलेल्या पुस्तक कल्पना बाहेर येऊ लागल्या. सुट्टी मजेची, भिंतीवरची पाल, सगळ्या शाळेत मीच हुशार, पुस्तकातला किडा, टकलू, बदक, विविध मासे आणि अशी खूप मोठी यादी होईल अशी नावं मुलांनी शोधली आणि लिहिली. कल्पनेतल्या पुस्तकाला लेखक म्हणून स्वतःची नावंही घातली. भित्तीचित्रांमुळे मुलांची वाचनालयाशी अशी दोस्ती होईल याची मलाही आधी कल्पना नव्हती.

भिंतीवरच्या चित्रांमधल्या मुलांचे त्वचेचे रंग काळे सावळे दाखवले. एक दोन मुलं खूपच जास्त काळी दाखवली, कारण तेवढी काळी भारतीय मुलं असतात. पुस्तकांमधल्या चित्रांमध्ये कधीच एवढी काळी सावळी मुलं दाखवली जात नाहीत. त्यामुळे सहभागींपैकी काही जण म्हणत होते की रंग बदलू, गोरा करू. पण आपली मुलं अशीच असतात हे त्यांना थोड्यावेळाने पटलं. गावातील मुली जशी परकर पोलकी घालतात तशीच काही चित्रांमध्ये दाखवली, काही मुलांना चक्क समोर बसवून त्यांचं स्केच भिंतीवर उतरवलं. मुलं इतकी खूष झाली. जाता जाता मला पुन्हा येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देऊन ठेवलं. अशी ही भित्तीचित्रांनी माणसं जोडण्याची वेगळीच ताकद हळू हळू समोर येऊ लागली आहे. सहभागींना नाविन्यपूर्ण अनुभव देता देता माझा प्रवासही समृद्ध होतो आहे.

चित्र कसं असावं याचे सर्व नियम मुलं तोडू शकतात. नियम तोडण्यामुळे, प्रयोग करण्यामुळे कधीही न सुचलेल्या असंख्य गोष्टी मुलं शोधून काढतात. स्वतःच प्रश्न निर्माण करतात आणि उत्तरही स्वतःच शोधतात. भिंतीवरची भव्य जागा कशी वापरायची याचे नवे अंदाज तयार होतात. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या काळात जगणाऱ्या आपल्या पिढीमध्ये अनेक स्तरांवर अनेक प्रकारची प्रतिभा अस्तित्वात असते, तिला वाट सापडवून देण्यासाठी मार्ग शोधायची गरज आहे. भिंतीवरच्या चित्रांसारखं मुक्त करणारं माध्यम इतकं सहजी उपलब्ध आहे, की त्याचा आस्वाद आणि अनुभव शक्य तेवढ्या सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं.

दलाईलामा यांचं एक अतिशय आशयघन वाक्य कायम आठवत राहतं - The planet does not need more successful people. The planet desperately needs more peacemakers, healers, restorers, storytellers and lovers of all kinds. असे शांतीदूत निर्माण करण्याची ताकद समूह भित्तीचित्रात आहे. याचं महत्व कोणाला न पटलं तरच नवल!
- आभा भागवत
-----------------

Friday, October 7, 2016

जॅक बोनियो

बाबांनी खेळणे दिले नाही, ८ वर्षांच्‍या मुलाने सुरु केले लिंबू पाण्याचे दुकान,
करतो १६ लाखांची उलाढाल
------------------------
दोन वर्षांपूर्वी जॅक बोनियो आठ वर्षांचा होता. त्याने वडिलांना एक खेळणे मागितले होते. ते महागडे असल्याने तू तुझे विकत घे, असे बाबांनी त्याला सांगितले. जॅकने पैसे जमवण्यासाठी बाबांच्याच मदतीने लिंबूपाण्याचे दुकान उघडले. ऐन उन्हाळा असल्याने योगायोगाने दुकान चांगलेच चालू लागले. विक्री वाढवण्यासाठी स्थानिक मंडईतही लिंबूपाणी विकले. पहिल्याच हंगामात जॅकने सव्वा लाखाचे लिंबूपाणी विकले. त्यात सुमारे साठ हजार रुपयांचा नफा झाला.

बोनियो कुटुंबाने या व्यवसायाला ‘जॅक स्टँड्स’ नाव दिले. आता जॅक दुकानांच्या शाखा सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याने ‘यंग अमेरिकन्स बँके’कडून तीन लाखांचे कर्ज उचलले आहे. ही बँक मुलांनाच कर्ज देते. जॅकने वेबसाइट तयार केली आणि तीन मंडयांत दुकाने उघडली. काम वाढल्याने त्याने ७ ते ११ वर्षांपर्यंतची मुले सेल्स टीममध्ये ठेवली. सुट्यांत कमाईची इच्छा असलेली मुले त्याच्याकडे येऊ लागली. जॅक त्यांना स्टँडवर काम करणे, शिफ्ट संपल्यानंतर पैसे मोजणे, नफा-तोटा समजावून सांगू लागला. शिफ्ट संपल्यानंतर मुलांना विक्रीच्या हिशेबाने दोन ते तीन हजार रुपये सुटू लागले. गतवर्षी सुट्यांत ‘जॅक स्टँड्स’मध्ये 200 मुले काम शिकली.
जॅक आता 10 वर्षांचा आहे. त्याने यंग अमेरिकन्स सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला आहे. हे केंद्र 6 ते 21 वर्षे वयाच्या मुलांना अर्थशास्त्राचे बारकावे शिकवते.

जॅकला त्याच्या बाबांनी मदत केली, पण मुलाने मेहनत करावी, यावरही भर दिला. घराजवळ दुकान उघडले तेव्हा जॅक घरातील फ्रिजमधून बर्फ व कप तर नेणार नाही, याकडेही नजर ठेवली. म्हणजेच त्याने मेहनतीविना नफा मिळवला असता तर तो काहीच शिकला नसता. त्याला गणिताच्या मूलभूत बाबी शिकवल्या. शाळेतही त्याला याचा फायदा झाला. तो सध्या पाचवीत शिकतोय, पण सातवीची गणितेही सहजपणे सोडवतो. त्याला वस्तूंचे घाऊक भाव, विक्री कर परवान्याच्या अर्जाची पद्धत, बिझनेस रिलेशन सर्वकाही माहीत आहे. गतवर्षी जॅकने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला. काही दिवसांआधी त्याने ‘जॅक मार्केटप्लेस’ही उघडले. येथे 18 वर्षांपर्यंतच्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातात.

क्षणांचे सोने

(पु.लं.चा अतिसुंदर लेख)

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

Thursday, October 6, 2016

बंद मूठ

*बंद मूठ*
*प्रवीण दवणे*
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, *"मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?"*
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, "कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय - स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!"
भाच्यानं माझा चांगलाच 'मामा' केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, *"अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय - मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!"*
"म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?"
*"परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!"*
"अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!"
"निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!"
*आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा - काका - आई - बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी...*

Saturday, October 1, 2016

मुलांच्या अंगणी शिक्षणाची 'नर्मदा'

मुलांच्या अंगणी शिक्षणाची ‘नर्मदा’
मुलांच्या आयुष्याला सुपीकतेच्या वाटेवर आणून ठेवलं आहे
उष:प्रभा पागे | October 1, 2016 1:57 AM

नाशिकचं शहरी जीवन मागे टाकून मध्य प्रदेशातील नर्मदेच्या किनाऱ्यावरील मुलांच्या आयुष्यात शिक्षणाची ‘नर्मदा’ आणणाऱ्या भारती ठाकूर. यंदाच्या आपल्या पहिल्या दुर्गा.  १४ मुलांपासून सुरू झालेली त्यांची ‘नर्मदालय’ शाळा आता २०५० मुलांना शिक्षण देत असून तिचा विस्तार १५ गावांमध्ये झाला आहे. त्यांची ‘निमाड अभ्युदय मॅनेजमेंट रुरल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ ही संस्था शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षणही देते आहे. संपूर्ण विनामूल्य असणाऱ्या या शाळांनी नर्मदेच्या किनाऱ्यावरील मुलांच्या आयुष्याला सुपीकतेच्या वाटेवर आणून ठेवलं आहे.
भरभक्कम पगाराच्या नोकरीला तिलांजली देत, शहरी सुखासीन आयुष्य मागे ठेवत भारती ठाकूर यांनी मध्य प्रदेशच्या निमाड भागातील गरीब, अशिक्षित मुलांमध्ये शिक्षणाची ‘नर्मदा’ खेचून आणली. या मुलांचं आयुष्य मार्गी लावत त्यांना शैक्षणिक सुपीकतेच्या वाटेवर आणून सोडलं आहे. सहा वर्षांपूर्वी १४ मुलांपासून सुरू झालेली ‘नर्मदालय’ शाळा आज १५ गावांमध्ये विस्तारली असून २०५० मुलं तेथे शिक्षण घेत आहेत. यातील ८० टक्के मुली आहेत. याचबरोबरच ३१अनाथ मुलांसाठी आश्रम, २० मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण असा ‘निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ या त्यांच्या संस्थेचा विस्तार वाढत चालला असून नर्मदेच्या काठावरच्या प्रत्येकाला शिक्षण मिळावं, हे भारती ठाकूर याचं स्वप्न आहे.

आईवडील आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आणि त्याहीपेक्षा स्वत:च्या जिद्दीमुळे भारती यांनी शाळा-महाविद्यालयाचं शिक्षण पार केलं, लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये शासकीय सेवा केली. प्रकृतीची साथ नसणे हे नित्याचंच होतं. पण तरीही नाशिक-दिल्ली सायकल भ्रमण, सह्य़ाद्री आणि हिमालयातील गिरीभ्रमण, पर्वतारोहणाचं प्रशिक्षण यांसारख्या साहसी गोष्टी त्या करत आल्या. २००५, २००६ मध्ये दोन मैत्रिणींसोबत नर्मदा परिक्रमा त्यांनी हाती घेतली आणि साडेपाच महिन्यांत पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करताना नर्मदामाईच्या प्रेमात त्या पडल्याच, पण त्याही पेक्षा नर्मदेच्या सुपीक काठावरची गरिबी, अज्ञान, व्यसनाधीनता त्यांना अस्वस्थ करून गेली आणि २००९ मध्ये त्यांनी नाशिक सोडून कायमचं नर्मदा किनारी मुक्कामाला जायचं ठरवलं.
त्या वेळी तिथलं चित्र अर्थातच नकारात्मकच होतं. त्यांची स्वत:ची राहायची, खायची काही सोय नाही अशा ठिकाणी जायचं होतं. शाळेत जायचं सोडून गावभर टिंगल-टवाळी करणाऱ्या, बिडीकाडी, गुटका यांच्या आहारी गेलेल्या,
दारू पिणाऱ्या आणि पत्ते कुटणाऱ्या (वडिलांच्याबरोबरीने) खेडय़ात जगणाऱ्या मुलांच्या विकासासाठी काम करायचं होतं. हाताशी ना पैशाचं पाठबळ, ना मध्य प्रदेशातील या भागाचा इतिहास-भूगोल माहीत होता. परिक्रमेच्या वाटेत येऊन गेलेल्या ओंकारेश्वर-महेश्वर-मंडलेश्वर या परिसरात त्यांचं कार्यक्षेत्र हळूहळू ठरत गेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी रोज सकाळी  छोटय़ा-मोठय़ा इमारतीत गाणी, नाच, गोष्टी शिकवीत तीन-चार वर्षांच्या  मुला-मुलींसाठी मोफत वर्ग भरवायला सुरुवात केली. एका गावच्या एका सधन शेतकऱ्याने आपला गोठा रिकामा करून दिला. त्यातच शाळा सुरू झाली. १४ मुलांपासून सुरू झालेली ही शाळा, त्याला नाव दिलं, ‘नर्मदालय’. मग एका खेडय़ातून दुसऱ्या खेडय़ात असा पसारा वाढत गेला आणि २०१० मध्ये  ‘निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ ही संस्था नोंदणीकृत झाली आणि त्याच्या छत्राखाली ‘नर्मदालय’ शाळा सुरू झाल्या.
आज पंधरा गावांत पंधरा ठिकाणी नर्मदालय अनौपचारिक शाळा असून मुलांची संख्या झाली आहे १७००, तर भट्टय़ाण, लेपा पुनर्वास आणि छोटी खरगोन या गावात ‘रामकृष्ण शारदा निकेतन’ नावाने पहिली ते आठवीचं शिक्षण देणाऱ्या तीन शाळाही सुरू झाल्या आहेत. यात सुमारे ३५० मुलं नियमित शाळा शिकत आहेत. शिवाय खेडय़ातल्या लोकांना आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र करेल असं सुतारकाम, वेल्डिंग, प्लम्बिंग, होमवायरिंग, शिलाई, जैविक शेती आणि १३ गाईच्या गोशाळेच्या माध्यमातून दुग्धव्यवसायाचंही प्रशिक्षण दिलं जात आहे. आज तेथे  २० मुलं हे शिक्षण घेत आहेत.
या सर्व मुलांना विनामूल्य शिक्षण दिलं जात असून ३१ अनाथ आणि गरीब मुलांचा आश्रमही नि:शुल्कच आहे. या मुलांना शिकवण्यासाठी एकूण ६२ शिक्षक आहेत आणि सहा मदतनीस. या साऱ्यांचा खर्च या संस्थेला करावा लागतो तो आहे दर महिना अडीच लाख रुपये. दर महिन्याच्या २५ तारखेला भारती यांना पैसे कमी पडणार नाहीत ना याचा ताण येत असतोच, परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने आत्तापर्यंत सोय झालीच आहे. तसंच हा खर्च निघावा म्हणून त्यांनी सध्या शिक्षणासाठी आर्थिक पालकत्व समाजातील दानशूरांनी घ्यावं यासाठी एक योजना सुरू केली आहे. वर्षभरासाठी तीन हजार रुपये भरून या मुलाचं पालकत्व घेता येतं. त्यातून एका मुलाच्या शिक्षणाचा सारा खर्च उचलला जातो.
या सर्व उपक्रमांना आर्थिक बळ मिळण्याला सुरुवात कशी झाली याची वेगळीच कहाणी आहे. परिक्रमेवरून परतल्यावर भारती यांनी  ‘नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा’ हे पुस्तक लिहिलं. वाचकांना भावलं. सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ब्रेलमध्येही ते निघालं. ते वाचून अनेकांनी आर्थिक मदत पाठविली. कपडे, अन्नधान्य, अंथरुण, पांघरुण अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत येऊ लागल्या. भारती यांचा मुलांना शिकवण्याचा ध्यास पाहून ‘लेपा पुनर्वास’ या धरणग्रस्तांच्या वसाहतीत तेथल्या साधुबाबांनी आपल्या आश्रमाची जागा आणि इमारत त्यांच्या सुपूर्द केली. दहा-बारा गायी आणि वासरं दिली.
अर्थात जसंजशा शाळा वाढत आहेत, मुलं वाढत आहेत खर्चही वाढतो आहे. तेवढे उत्पन्नाचे स्रोत नाहीत, पण भारतीजवळ दुर्दम्य आशावाद आहे. अडचणींवर मात करणारी दुर्गा अशी तिची ओळख झालेली आहे. नवनव्या आव्हानांना ती समर्थपणे तोंड देईल आणि समाजही तिला साथ देईल, असा विश्वास आहे. भारती यांच्या या आशावादाला सलाम!
निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन
पत्ता- नर्मदालय, प्लॉट नं. १४९, मुक्काम- लेपा पुनर्वास, तहसील- कसरावद, जिल्हा- खरगोन, मध्य प्रदेश.
narmadalaya@gmail.com
bharati1@yahoo.com
भारती ठाकूर संपर्क : ९५७५७५६१४१

Sunday, September 18, 2016

'या' मुलांशी वागायचं कसं?

‘या’ मुलांशी वागायचं कसं?

दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर.

नीलिमा किराणे | September 17, 2016 1:15 AM



‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर मुलांवर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. आणि तुमच्याही त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, पण अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे आणि अपेक्षा मुलांच्याही असतात, हेही तुम्ही समजून घ्यायला हवं ना?’’ टीन एजर्स वा पौगंडावस्थेतील मुलांशी वागताना याचं भान हवंच..

‘‘हाय. कसली जोरदार चर्चा चाललीय?’’ कॉलनीतल्या बागेच्या कट्टय़ाजवळ, जोरजोराने हातवारे करत एकमेकांशी बोलणाऱ्या विशाखा आणि मनोजला पाहून मानसीनं विचारलं. तसा मनोज वैतागलेल्या स्वरात म्हणाला,

‘‘या मुलांशी कसं वागायचं तेच कळत नाहीये मानसी. दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर. आदित्यची पुढच्या वर्षी दहावी, रविवारशिवाय माझ्या मोबाइलला हात लावायचा नाही असा आजच दम भरलाय. त्याच्यात क्षमता आहे, पण अभ्यासाला तासाभराचीही बैठक नाही. सगळं लक्ष खेळात.’’

‘‘अगं, आर्या तर हल्ली पुस्तकंसुद्धा मोबाइलवर वाचते. कशाला डोळे खराब करायचे? स्वयंपाकात मदत शून्य, घरभर पसारा. मुलांच्या अशा वागण्यामुळे सतत वादावादी, शांतता नाहीच. आजही अति झाल्यामुळे बाहेरची थंड हवा खायला आम्ही इथे येऊन बसलो.’’

‘‘पण हवा एवढी गरम होण्याइतकं घडलं काय?’’

‘‘अगं, काल रात्री आर्या उशिरापर्यंत कॉलेजची असाइनमेंट करत होती. मग सकाळी उठायला उशीर. रविवारी घर आवरायचं ठरलेलं, म्हणून हाक मारली, तर ‘रविवारी तरी झोपू दे’ म्हणून माझ्यावर खेकसली. निवांत उठली, गाणी ऐकत, रमतगमत स्वत:चं आवरलं, तेव्हाच माझा पेशन्स संपला होता. मग कपाटातली क्रोकरी पुसायला काढली, तेवढय़ात ‘सरप्राईज पार्टी ठरलीय’ असं सांगत तिची मैत्रीण आली. त्याबरोबर काढलेला पसारा तेवढा फटाफट आवरून बाईसाहेब निघाल्या.’’

‘‘अगं, मुलींनाही रविवारच मिळतो मोकळा. तरी मदतीला आली, काढलेलं फटाफट आवरलं, पुष्कळ झालं की? आणि आदित्य कुठेय?’’

‘‘आदित्य पण थोडासा नाराजीतच खेळायला गेलाय. मागच्या वेळी मित्रांबरोबर हट्टानं जाऊन एक बाही हिरवी, एक पिवळी असले मवाल्यासारखे कपडे आणले, म्हणून आज मी माझ्या पसंतीनं त्याला नवे कपडे घेतले. तो भांडला नाही, पण ‘चम्या’सारखे कपडे म्हणाला. गेलाय ग्राऊंडवर खेळायला..’’ मनोजनं तक्रार मांडली.

‘‘अरे मग छान झालं की. तुम्हाला दोघांना अचानक एक मस्त संध्याकाळ मिळाली भटकायला.’’

‘‘आम्हाला काय पिळतेयस मानसी? तेही एवढे दडपणात असताना?’’

‘‘पिळत नाहीये. मुलं नाराज असूनही या क्षणी मजा करतायत आणि तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींवर चिडून चिडून बोलण्यात तुमचा मोकळा वेळ वाया घालवताय. ‘या मुलांच्या नादात आम्ही कित्येक र्वष एकमेकांसाठीसुद्धा वेळ दिला नाही’ अशी उद्या तुम्हीच तक्रार कराल.’’

‘‘.. आहे खरं तसं, पण तूच सांग, मुलांचं असं वागणं बरोबर आहे का? आम्ही काही चुकीचं थोडंच सांगतो? मुलांच्या भल्यासाठीच सांगतो ना?’’

‘‘बरोबर की चूक? मध्ये उत्तर शोधलं तर काहीच हाती लागत नाही गं विशाखा. मुलांचं वागणं चुकतंय हे समजा मला किंवा कुणालाही मान्य असल्यामुळे ते बदलेल? की तुझी चिडचिड थांबेल?’’

‘‘म्हणजे त्यांनी कसंही वागायचं आणि आम्ही चिडायचं पण नाही?’’

‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. तुम्हाला त्रास देण्यासाठी मुलं मुद्दाम अशी वागतात का?’’

‘‘अंऽ, मुद्दाम नसेल, ती त्यांच्याच नादात असतात हे जास्त खरं.’’

‘‘हे माहितीय तरीही ‘एवढा’ राग?’’

‘‘हजारदा सांगूनही आर्यानं दुर्लक्ष केलं की संताप होतो. घरातलं काहीच कसं करावंसं वाटत नाही तिला? या वयात मी आईला किती मदत करायचे. घर नीटनेटकं ठेवायचे. उद्या हिच्या सासरचे माझाच उद्धार करणार.’’

‘‘अगं, किती काळ एकत्र मिसळतेयस तू! ‘आमच्या लहानपणी..’ म्हणजे भूतकाळ आणि ‘आर्याच्या सासरचे’ म्हणजे भविष्यकाळ. असा गोंधळ केल्याने चिडचिड वाढते, मुद्दा सुटतो.’’

‘‘??’’

‘‘असं बघ, तू तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं वागून सगळ्यांचं कौतुक मिळवलंस तसंच आज्ञाधारक, गुणी वागणं तुला बरोबर वाटतं. मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात, बिनधास्त राहतात, म्हणजे काही तरी चुकतंय, त्यांच्यात काही तरी कमी आहे असं वाटतं ना? मुलं बिघडली, आयुष्यात मागे पडली तर? उद्या ‘लोक’ काय म्हणतील? अशा असंख्य भीती छळतात. मग समजुतीनं घेणं सुटून मुलांवर फटकन टीका करणं घडतं.’’

‘‘म्हणजे आमच्या अपेक्षा चुकीच्या..’’

‘‘नाही, अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे विशाखा. अपेक्षा मुलांच्याही असतात. या पिढीच्या स्वातंत्र्य, मोकळेपणा, स्मार्टनेसच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यांचं जगही आपल्यापेक्षा वेगळं असणार आहे. मोबाइल-इंटरनेटमध्ये त्यांचा भविष्यकाळ आहे. स्वयंपाक येणं, नीटनेटकेपणा हे गुण हवेतच, पण त्या कौतुकापेक्षा नवनवी अ‍ॅप्स शोधून वापरणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. पालकांच्या सक्तीमुळे त्यापासून दूर राहावं लागलं तर ग्रुपमध्ये ती मागास ठरतात, मित्र हसतात त्यांना. या वयात ग्रुपमध्ये ‘भारी’ दिसणं फार महत्त्वाचं असतं. तिथे चेष्टा, अपमान चालत नाही. मग अशा ‘नियंत्रक’ पालकांबद्दल मुलांचाही आदर कमी होतो. तीही फटकन उलटून बोलतात.

‘‘हो, आर्याला काही सांगताना, ‘ती नाहीच ऐकणार’ अशी एक खात्री असते मला. त्या वेळी खूप अगतिक, दुर्लक्षित वाटतं.’’

‘‘हो, पण तू तिची आई. वयाने, अधिकाराने मोठी. त्यामुळे लगेच ‘कशी करत नाही तेच पाहते’पर्यंत पोहोचतेस. तुझ्या आवाजातली हुकूमत, अविश्वास, आर्याला जाणवल्यावर, ‘आता नाहीच ऐकणार’ ही तिचीही ताठर प्रतिक्रिया येते आणि तुमचं युद्ध सुरू.’’

‘‘अगदी असंच घडतं. पण हे बदलायचं कसं?’’

‘‘अशा वेळी मुलांना काय वाटत असेल?’’

‘‘आर्या म्हणतेच की, आमचं तुम्हाला काहीच पटत नाही. वाचलं नाही, तरी रागावणार, मोबाइलवर अभ्यासाचं वाचत असले, तरी ऑनलाइन का वाचतेस? रात्री जागून असाइनमेंट पूर्ण केली तर सकाळी लवकर का उठत नाहीस? मित्र-मैत्रिणी उनाड आहेत..’’

‘‘आदित्यही कुरकुरतो, की ‘मी कितीही अभ्यास केला तरी बाबा तुम्ही माझ्या फुटबॉल मॅचला येतसुद्धा नाही’ म्हणून.’’

‘‘विशाखा, तुला जिमला जायला आवडत नव्हतं. मी चार-पाचदा विचारल्यावर एकदा वैतागून सांगितलंस, ‘मला बोअर होतं जिम.’ माझा हेतू तुझ्या भल्याचाच होता ना?’’

‘‘माझं वेगळं आणि आता जिमला येतेय ना मी?’’

‘‘रागावू नकोस पण न्याय सर्वाना सारखा हवा. तुला दुखवायचं नव्हतं, पण मुलांना कसं वाटत असेल त्याची ‘जाणीव’ होण्यासाठी आठवण दिली. आपण जिमला जायला पाहिजे हे तुलाही कळत होतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य नव्हतं. वजनकाटय़ानं ‘जाणीव’ जागी केल्यावर तुझं प्राधान्य बदललं, नंतर आवडायलाही लागलं. मुलांचंही तसंच होतं. अभ्यास करायला पाहिजे हे आदित्यला कळतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य खेळ आहे. आर्याला तुला मदत करण्याची इच्छा असते पण तिच्या वयाला तर फारच आकर्षणं असतात. अशा वेळी, मुलांमध्ये जी मूल्यं रुजवायला हवीत, त्याबद्दलची ‘जाणीव’ जागी करण्यावर फोकस हवा. ‘तुम्ही कसे चुकता’वर फोकस जाऊन मुलं ‘टार्गेट’ होतात, दुखावतात. मग बिघडतं सगळं. प्रत्येक गोष्टीवर वारंवार टीकाच झाली की आर्यासारखी बंडखोर मुलं भांडतात, काहीच ऐकेनाशी होतात. आदित्यसारखी साधी सरळ मुलं त्यांच्या फुटबॉलसारख्या कौशल्यालाही कमी लेखलं गेलं की हिरमुसतात, आत्मविश्वास संपतो.’’

‘‘पण म्हणजे वागायचं कसं मानसी?’’

‘‘प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. पण बदल हवा जुन्या अपेक्षा आणि अप्रोचमध्ये. संवाद, सन्मान, स्पेस आणि सोबत या चार गोष्टींकडे नव्याने पाहायला हवं. मुलांना आपली सोबत हवी, आधार हवा, पण मध्येमध्ये करून ‘आमचंच बरोबर’चा अतिरेकी आग्रह टाळायचा. त्यांच्या आवडी, अभ्यासाच्या, जगण्याच्या पद्धती त्यांनी  अनुभवातून, प्रयोगातून ठरवण्यासाठी ‘स्पेस’ द्यायची. ती त्यांचा रस्ता शोधतील, यावर विश्वास ठेवायचा. कारण विश्वासासारखी मूल्यं आणि संस्कार वागण्यातून रुजवावे लागतात. मुलांकडून गंभीर चुका होऊ  नयेत एवढं लक्ष अवश्य ठेवायचं.’’

‘‘तारेवरची कसरतच आहे.’’

‘‘सवयीनं जमतं रे आणि हो, बहुतेक मुलांना अभ्यास आणि बंधनं आवडत नाहीत हे जागतिक सत्य आहे. त्याबाबत काल्पनिक आदर्शवादात पालकांनी अडकायचं नाही. तरच पालकांशी संवाद करायला मुलांना मोकळेपणा वाटतो.’’

‘‘आणि चांगल्या सवयी?’’

‘‘मुलांच्या आवडींचा थोडा जरी स्वीकार झाला तरी मुलं पालकांचं ऐकण्याच्या मानसिकतेत येतात. तेव्हा योग्य वेळी, मुलांचा पसारा, आळशीपणा, शिस्त, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसच्या अतिरेकातले धोके या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत थोडक्यात, नेमका संवाद परिणामकारक होऊ  शकतो.’’

‘‘हं. पचायला अवघड आहे, पण प्रयत्न करून पाहू. नाही तरी असंही आमच्या पद्धतीनं काही बदलत नाहीये. आता तरी मुलांची चिंता सोडून आम्ही सुट्टी एन्जॉय करतो.’’ असं म्हणून हसत विशाखा आणि मनोज भटकायला बाहेर पडले.


द्वेष

द्वेष

‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे

डॉ. केतकी गद्रे | September 18, 2016 1:01 AM



‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे; किंबहुना अनिवार्यच! कल्पनाविलासात रमलो की आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते की, मानवी जीवन हे प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता या व अशा सकारात्मक भावनांनी भरलेलं असावं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास अधिक कचरतो, भितो. भीती हीसुद्धा एक ‘भावना’च आहे, परंतु अशीही एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात. ती म्हणजे ‘द्वेष’. फारसे न रुचणारे- नावडते-  न पटणारे- तिरस्कारास पात्र ठरणारे- दुस्वास  आणि अखेर द्वेष.. हे द्वेषापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता, त्यांना थारा न देता, द्वेषाची ही सौम्य रुपांकडे लक्ष न देता आपण द्वेषयात्रेस निघतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो, तेव्हा द्वेष सकारात्मक रूप धारण करतो. म्हणण्याचा अर्थ असा की, उदाहरणार्थ- ‘I hate a particular person, caste, religion’ (म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो) हे म्हणणे जसे तीक्ष्ण, घातक आणि ऐकण्यास,अनुभवण्यास नकोसे वाटणारेतसेच, ‘I hate unjust, abusive tendencies’ (अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविषयी मला द्वेष वाटतो) याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना इतरांप्रति किंवा स्वत:प्रति प्रदर्शित होऊ शकते. यात इतरांप्रति, स्वत:प्रति, एखाद्या गोष्टीप्रति, कल्पना -संकल्पनेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाविषयी एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली, टोकाची अप्रीती व घृणा असते. ‘द्वेष’ हा बऱ्याचदा ‘राग’, ‘हिंसा’, ‘तिटकारा’, ‘किळस’ अशा भावना- वर्तनांशी संबंधित असतो. ‘द्वेष’ ही भावना अनेकांमध्ये दीर्घकाळ रुजणारी असल्याकारणाने मानसोपचारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ती एका घटकेची भावनिक स्थिती नसून, ती एक प्रकारची वृत्ती आहे. ती एक प्रकारची मनोरचना आहे. कदाचित, साध्या ‘नावडी’पासून सुरू झालेल्या  द्वेषाच्या या प्रवासाला स्वैररीत्या वाढू दिल्याने, त्याला खतपाणी घातल्याने, वेळीच आळा न घातल्यान त्याचे रानटी रोपटे आपले भाव-वर्तनाचे विश्व व्यापून टाकत असावे. इतकंच नव्हे, तर मेंदूच्या चाचण्यांमधून नावडत्या व्यक्तींचे चेहरे पाहून होणारी मेंदूची हालचाल अभ्यासली गेली, तेव्हा मेंदूतील काही विशिष्ट स्थानं कार्यरत असल्याचे लक्षात आले. द्वेष हे ‘गुन्हा’ करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जातं. बऱ्याचदा ‘आपण’ आणि ‘ते’/ ‘इतर’ असे विभाजन झाले की एकमेकांविषयी असहिष्णुता निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणजे ‘आपण’, ‘आपल्यातील लोक’, ‘आपल्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन हे आपल्याला आपलेसे व श्रेष्ठ वाटतात. ज्या क्षणी ‘ते’, ‘त्यांचे’ लोक, ‘त्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन अशी विभागणी झाली की एक अदृश्य भिंत तयार होताना दिसते. विभाजन टिकवून ठेवणारी, भेदभावाचा पुरस्कार करणारी ही विशाल भिंत म्हणजेच आपण आपल्या मानलेल्या लोकांसारखा जो नाही, जो भिन्न आहे, तो द्वेषास पात्र  आहे असे मानणे. याचे मुख्य कारण म्हणजे, ही भिन्नता विविधतेच्या दुर्बिणीतून न पाहता उच्च-नीच या मापदंडातून पाहिली जाते. परिणामी विविधता स्वीकारण्यात आपण असमर्थ ठरतो, हे कटू सत्य आहे. म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तीबद्दल ‘ऐकिवातल्या’ मताप्रमाणे ग्रह करून घेणे, तो ग्रह ग्रा आहे हा ठाम विश्वास असणे; तसेच त्या ग्रहाला बळ देणारी बाजू उचलून धरणे आणि ग्रहाला छेद देणारी बाब दुर्लक्षित करणे- ही प्रक्रिया वारंवार करत राहणे. तसेच काही काळाने आपोआप (सवयीमुळे) घडणे आणि (नकारात्मक) ग्रह पक्का होत जाणे आणि कालांतराने अशीच वर्तनशैली बनणे ही विचारांची साखळी द्वेष वाटण्याच्या, वाटत राहण्याच्या संदर्भात आपला कार्यभाग जबाबदारीने सांभाळते. मग अशा व्यक्तीने केलेली वक्तव्ये, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मतं, धरलेले आग्रह हे किती तीव्र, नकारात्मक असतील, याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येईल. अशी  व्यक्ती जर ही मानसिकता समाजात रुजवू लागली तर  नातेसंबंध, त्यातील विश्वास, त्यातील सहिष्णुता, त्यातील स्वातंत्र्य यांची राखरांगोळी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे, दुफळी निर्माण करून वातावरण धगधगतं ठेवू पाहणारे, थोडक्यात द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. लोक त्यांच्या आहारीही जाताना दिसतात. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, कधी स्वेच्छेने, कधी समविचाराने, तर कधी अजाणतेपणाने, अविवेकामुळे तर कधी निव्वळ मूर्खपणामुळे द्वेष ही भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ही भावना मग मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

धर्मग्रंथांनी द्वेष या भावनेला तुच्छ मानलं आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘धर्म’ जाणणाऱ्या, जोपासणाऱ्या तथाकथित व्यक्तींना या बोधाचा नेमका विसर पडताना दिसला की नवल वाटतं. परंतु हेही खरं की, आपल्या मनाशी ठरवून जोपासलेला सहेतुक द्वेष, कोणाच्यातरी चिथावणीमुळे उत्पन्न झालेली द्वेषाची भावना याला आळा घालणे, हे स्वाभाविक उत्पन्न होणाऱ्या द्वेषाच्या भावनेपेक्षा कठीण आहे. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं हे गाढ झोपलेल्यापेक्षा कठीण, तसंच द्वेष या भावनेविषयी आहे. कोणाचाही द्वेष करू नका, हा विचार स्तुत्य आहे, परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे तितकेच कठीण आहे. हे ध्येय गाठणे मोठय़ा धैर्याचे काम आहे. परंतु हे ध्येय  जो गाठतो तो आपले जीवन प्रफुल्लित करण्याची क्षमता स्वत:मध्ये बाळगतो. हे ध्येय गाठण्याची प्रक्रिया वरकरणी कॉमन सेन्सची गोष्ट वाटेल. आहेसुद्धा.  पण ती, ते ध्येय गाठण्याचे टप्पे व्यक्तिमत्त्वावर आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत.

सुरुवात द्वेष-केंद्र ओळखण्यापासून करू या. म्हणजे आपली ही भावना कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, काय घडले वा न घडल्यामुळे उत्पन्न होते, याचा अंदाज घेऊ या. यांचे वर्गीकरण करू या. म्हणजे आधी चर्चिल्याप्रमाणे भावनिक तीव्रता लक्षात ठेवून मग वर्गीकरण करू या. उदा. एखादी गोष्ट मला रुचत नाही की आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो.. म्हणजे दुस्वास की द्वेष वाटतो याची वर्गवारी केल्यास (विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे, प्रगल्भतेने केल्यास) द्वेषाची केंद्रे लक्षात येतील. हे वर्गीकरण महत्त्वाचं, कारण त्या तीव्रतेच्या अमलाप्रमाणेच त्याची उपचारपद्धती ठरते. यानंतर द्वेषाची भावना निर्माण होण्यामागचे नेमके कारण शोधावे. हे कारण काही ऐकिवातल्या तर काही प्रत्यक्षातल्या अनुभवांत दडलेले आहे का ते पाहावे. द्वेषभावना अभंग राखल्याने, मला स्वत:ला, आजूबाजूच्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला काय प्रकारच्या आव्हानांना, परिणामांना तोंड द्यावे लागत आहे? ही भावना जोपासून माझा (वरकरणी) फायदा झाला असला, तरी मी त्याला खऱ्याअर्थी फायदा म्हणू शकेन का? लाभ घेण्याच्या अट्टहासात एकीकडे काय गमावलं याचाही आलेख मांडलेला बरा. हा पारदर्शक आलेखच पुढे निर्माण होणाऱ्या (संभाव्य) द्वेषाच्या भावनेला उत्तेजन देण्यापूर्वी आपल्यापुढे, फी िर्रॠल्लं’ च्या  रूपात उभा राहील. या प्रक्रियेत, या प्रक्रियेवर अविश्वास असणाऱ्या व्यक्ती आपले पाय खेचतील, आपल्या पूर्वीच्या वचनांचा.. तथाकथित सिद्धान्तांचा, समूह-निष्ठेचा वगैरे दाखला देतील. याने आपण विचलित होऊ शकू. परंतु हे कायम लक्षात ठेवा की, आपल्या मानसिकतेचे नियंत्रण हे (जवळजवळ) नेहमी / बऱ्याचदा आपल्या अखत्यारीत असू  शकते आणि इतरांचा त्यावर प्रभाव व्हावा की न व्हावा, झालाच तर कितपत व्हावा, हे ठरवणे हेही बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. परंतु आपण वाहवत जातो आणि आपल्या मनाला अंकित ठेवण्याचा हा मोठा अधिकार गमावून बसतो. हे कटाक्षाने टाळू या. या बाबीची सतत उजळणी केल्यास, ही बाब जास्त स्मरणात राहील आणि प्रत्यक्ष वर्तनात उतरेल.

द्वेषाने द्वेषच मिळतो, द्वेष वाढतो, वाढतच जातो, या वणव्याला वेळीच आळा घातला नाही, तर ही आग, आपल्या विचार – आचार – भावनांच्या डोलाऱ्याला राखेचं स्वरूप देण्यास वेळ लागणार नाही. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द – विचार – वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या, प्रगल्भ आचार आणि सूक्ष्म दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वत:ला कोणत्या साच्यात घालायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे, नाही का? द्वेषभावना जोपासून स्वत:पासून, इतरांपासून दूर जायचे की सशक्त आणि स्वीकाराची मानसिकता बहरवण्याच्या प्रयत्नात राहावं हे वेळीच ठरवू. आपण स्वत:ला समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणवत असू, तर तो घटक सहिष्णु आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे- नीतिमत्तेच्या मापदंडांनी आणि सांविधानिकदृष्टय़ासुद्धा! त्यामुळे या सार्थ अपेक्षेस पोषक आणि साजेशा भावनांचा गुच्छ उराशी-दाराशी बाळगलेला बरा!

डॉ. केतकी गद्रे –

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...