📝शिक्षण व्यवहाराशी जोडताना...
प्रसाद मणेरीकर📝
मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. तेव्हा विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की अभ्यासक्रमाची रचना करणे सोपे होईल.
मुले शिकावीत, अधिक चांगल्या पद्धतीने शिकावीत, यासाठी केलेल्या विविध व्यवस्थांपैकी शाळा ही एक व्यवस्था. मुले शाळेत यावीत, तिथे शिक्षकांकरवी शिकती व्हावीत आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावीत, यासाठी सगळी धडपड असते. मात्र तरीही काही मुले मागे पडतात, काही नापास होतात, काही अर्ध्यावरच शाळा सोडतात, हे वास्तव आहे. मुलांना शाळेत शिकायला आवडत नाही, तिथे त्यांना कंटाळा येतो, असा सार्वत्रिक समज आहे आणि तो काहीसा खराही आहे. वर्गातील अमुक मुले काहीच शिकत नाहीत, त्यांना काहीच येत नाही, असे सांगणारे शिक्षक आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे, म्हणून तर सरकार अप्रगत मुलांसाठी स्वतंत्र वेळ देऊन उपक्रम राबवते; पण तरीही मुले मागे पडतात, हे वास्तव उरतेच.
हे असे का होते याचा धांडोळा घेतल्यास अनेक कारणे पुढे येतात. यातले एक कारण, मुले शाळेत जे शिकतात ते व प्रत्यक्ष व्यवहारात जे करतात ते, यांची सांगड घातलेली त्यांना दिसत नाही व त्यांनाही ती घालता येत नाही. त्यामुळे शाळेतले शिकणे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते कंटाळवाणे होते. वास्तविक मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. परिसरातील घटना पाहत, समजून घेत, उपक्रमांत सहभागी होत, विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना ही शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. किंबहुना शाळेत जायच्या कितीतरी आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. परिसरात वावरताना सहजपणे, कुणीही न शिकविता त्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. मुद्दा असा, की परिसरातून अनुभव घेत मूल शिकत असेल, तर ते "शिकत नाही‘ असे आपण का म्हणतो आणि त्याला "ढ‘ का ठरवतो? म्हणजेच इथे आपली शिक्षक म्हणून जबाबदारी सुरू होते आणि ती दुहेरी स्वरूपाची आहे. एक, मूल ज्या वातावरणातून आले आहे, ते वातावरण समजून घेणे आणि दुसरे मुलाचे अनुभवविश्व लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना करणे. मूल परिसरातून ज्या प्रकारचे अनुभव घेते आहे, त्याचे शालेय शिक्षणात पर्यवसान कसे करायचे, असा तो मुद्दा आहे.
वरवर पाहता ही अवघड बाब वाटेल, कारण प्रत्येक मुलाचा विचार करायचा आणि तशी प्रत्येकासाठी अभ्यासक्रमाची आखणी करायची हे सोपे काम नाही. मात्र अगदी तसेच करायची गरज नाही. कारण ज्या परिसरातून शाळेत मुले येतात, तो परिसर बहुतांश मुलांचा समानच असतो किंवा तसा समान परिसर असणाऱ्या मुलांचे गट करता येतात व त्या आधारे अभ्यासक्रम आखता येतो.
उदा. ग्रामीण व निमशहरी भागांतील मुलांसाठी शेती हा रोजचा अनुभव असतो. ती शेतात वावरतात, शेतीशी संबंधित अनेक क्रिया त्यांना माहिती असतात. याचा आधार घेत भाषा, गणित, परिसर अभ्यास यांतील अनेक संकल्पना मुलांना सोप्या करून सांगता येतील. असेच घरातील व्यवहारांचेही असते. मग या मुलांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर शालेय विषयांतील संकल्पना समजणे सोपे जाईल. तो अभ्यासक्रम अवघड वाटणार नाही आणि दुसरे म्हणजे घरचे आणि परिसरातले व्यवहार ती अधिक समजून-उमजून करतील. या दोन्हीतून मुलांचे आकलन वाढेल.
आपली गफलत झालेली आहे, ती पाठ्यपुस्तक केंद्रिभूत मानून सगळे व्यवहार करण्यातून. खरे तर सरकारही आता त्या मानसिकतेतून बाहेर पडू पाहतेय. विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की पुढची रचना करणे सोपे जाईल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे समजत नाहीत व वर्गात चालणाऱ्या गणिती क्रियाही समजत नाहीत, हे त्या त्या भागांतले शिक्षकही मान्य करतात. याचाच परिणाम मुलांना शिकण्यात रस वाटण्यावर होतो. नाहीतर दुकानात जाऊन रोजचे व्यवहार करणाऱ्या मुलांना, किंवा आई-वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करणाऱ्या मुलांना शाळेतील बेरीज-वजाबाकी येणार नाही असे कसे होईल? आणि हे व्यवहाराशी जोडून शिकणे केवळ प्राथमिक इयत्तेच्या टप्प्यावरच नाही, तर माध्यमिक इयत्तांसाठीसुद्धा लागू आहे. कारण न्यूटनचे नियम आपल्याला तोंडपाठ असतात, पण ते रोजच्या जगण्याला लावता येत नाहीत. रस्सीखेच करताना दोरी तुटून पडल्याचा अनुभव अनेक मुलांना असतो. बस सुरू झाल्यावर ढकलले गेल्याचा अनुभवही असतो, पण याच्याशी नियमांचा संबंध ते शिकूनही मुलांना लावता येत नाही. या अशा रोजच्या अनुभवातून नियमांकडे गेलो, तर शब्दश: नियम कदाचित नाही लक्षात राहणार; पण ती संकल्पना समजेल आणि नियम पाठ करण्यापेक्षा ते केव्हाही महत्त्वाचे!
हे मान्य असेल तर यापुढे आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार वेगळा करावा लागेल. शाळेत जाऊन मुलांना काय आले पाहिजे, हे नीट ठरवावे लागेल. म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तक वाचता आले पाहिजे, की मुलांची वाचन क्षमता विकसित व्हायला हवी? आणि वाचन क्षमता विकसित व्हायला हवी असेल, तर वाचनाचे कोणते किती आणि विविधांगी अनुभव मुलांना देता येतील, जे सुरवातीच्या टप्प्यावर परिसराशी जोडलेले असतील, हे पाहावे लागेल. कारण ज्या वयात वाचनाची गोडी लागायची त्या वयात अनाकलनीय वाचावे लागले, तर मुले वाचनापासून दूर जाण्याची शक्यताच जास्त. कारण वाचन ही आपली आपण करण्याची व समजून घेण्याची बाब आहे.
सरकारने शिक्षकांचा पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणाचा भ्रम लवकरात लवकर दूर करायची गरज आहे. प्रत्येक वयोगटासाठीच्या क्षमता निश्चित कराव्यात. या क्षमतांपर्यंत पोचण्यासाठी साह्यभूत होतील, अशा क्रमबद्धपणे घ्यायच्या उपक्रमांची यादी करावी आणि शिक्षकांना अधिकाधिक मोकळीक द्यावी. सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेलही कदाचित, पण तो सरकारचा हातखंडा आहे. मुलांना शालेय शिक्षणाची गोडी लावण्याचा हा एक मार्ग ठरू शकेल.