Pages

Friday, June 3, 2016

Online Book Reading

पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download  करु शकता.
लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

१.   http://www.gutenberg.org
आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता.

२.   http://www.freebookspot.in/
या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत.

३. http://www.free-ebooks.net/
येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता.

४.  http://manybooks.net/
फ़ार छान जागा आहे.

५.  http://www.getfreeebooks.com/
येथे एका ( click ) पुस्तके मिळवू शकता.

६  http://freecomputerbooks.com/
संगणकावरील पुस्तके येथे मिळतील.

७. http://www.freetechbooks.com/
तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील.

८.  http://www.scribd.com/
पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता.

९. http://www.globusz.com/
नवीन लेखकांना येथे संधी मिलते.

१०. http://www.onlinefreeebooks.net/
येथे १५ भागात पुस्तके आहेत.

आपण खालील जागांवर पण जावू शकता.

१.  http://en.wikipedia.org/wiki/List_of_digital_library_projects

२. http://www.archive.org

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी
शाळा तुम्हाला आवडेल का ? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल.

शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी मुळात शाळेत विद्यार्थ्यांकरीता पोषक प्रसन्न वातावरण असले पाहिजे. तसेच कल्पकतेने विचार करण्याकरीता विद्यार्थ्यांना वेळोवेळी
उद्युक्त करण्याचे महत्वाचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. मग विद्यार्थ्यांनाकल्पक विचार करण्याची सवय लागावी यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल असे मला येथे सांगावेसे वाटते.

ही विशेष मेहेनत म्हणजे वेळोवेळी स्वतःची कल्पकता वापरणे त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करणे. तसेच उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कल्पक दृष्टीकोन विकसित करता येऊ शकतो. त्यासाठी
भरपूर पैसे, महागडे इन्फ्रास्ट्रक्चर यांची अजिबातच गरज नाही.

प्रत्येक शिक्षकाला काही नवीन उपक्रम राबवायचा म्हणजे वर्गातला गोंधळ वाढणार ही सर्वात मोठी भीती वाटते. यावर महत्वाचा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त रूजवणे हाच होय. किंबहुना हीच कल्पनाशक्तीला चालना देण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. समजा गणित हा विषय मैदानात शिकायचा असं ठरवलं तर मुलांनी रांगेत जावं, शांततेत जावं आणि त्याकरीता जो लीडर असेल त्याचं ऐकणं हे नियम स्वतः मुलांनी बनवले तर त्यांचा सहभाग अधिक वाढतो. यामुळे आपोआपच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढीस लागते. ही जाणीव वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.माझा सहभाग महत्वाचा आहे हे मुलांना वाटल्यानंतरच ही जाणीव रूजते.कल्पकतेकडे नेणारी ही दुसरी पायरी. त्यानंतर शिक्षकांनी विविध साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी सहज उपलब्ध असलेली साधऩे वापरणे अधिक श्रेयस्कर. उदाहरणार्थ पाने, फुले, दगड, माती, पाने, फुले वगैरे.
याखेरीज तक्ते, कोडी अशाप्रकारच्या विविध बाबींचा अवलंब करण्यात येऊ शकतो. तसेच एकाचवेळी अनेक उपक्रम राबवण्यापेक्षा एकच उपक्रम राबवा त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी मुलांना पूर्वतयारी करण्याचा वेळ द्या. उपक्रम
कोणता राबवायचा, साहित्य काय निवडायचं हे विद्यार्थ्यांचा कल ओळखून ठरवा. उदा. गणित विषय शिकवताना विद्यार्थ्यांचे गट करणे, खेळाच्या माध्यमातून सम विषम संख्या शिकवणे ई.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे उदाहरण येथे घेता येईल. ते जेव्हा टस्कगीच्या शाळेत गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ मायक्रोस्कोप हे एकमेव साधन होते. त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती. मग त्यांनी मुलांना घेऊन कच-यातून साधनं गोळा केली. जसे पत्र्याला भोकं पाडून चाळणी तयार केली, काचेला काजळी लावून त्याद्वारे फोकस्ड बीम तयार केला आणि असं करत करत प्रयोगशाळा उभारली.

शिक्षकांनी स्वतःच्या वागण्यात कल्पक दृष्टीकोन बाळगला, स्वतःची कल्पकता वापरून ज्ञानदान केले तर त्यांच्याकडून मुलांना प्रेरणा मिळेल आणि कल्पकतेने विचार करण्याची सवयच लागेल. मात्र त्यासाठी शिक्षकांना थोडसं धैर्य दाखवावं लागेल. इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल.

कल्पकता हा एक गुणांचा समूहच आहे. धैर्य, वेगळा विचार करण्याची क्षमता, तो मांडता येण्याची क्षमता, इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास असे अनेक गुण या एका माध्यमातून वाढवता येतात. मात्र त्यासाठी सातत्य व
मेहनतीची जोड देणे अत्यावश्यक आहे.

Shirin Kulkarni
Director
Council for Creative Education - CCE Finland Oy

शिक्षणात कल्पकतेचा वापर

शिक्षणात कल्पकतेचा वापर

आजची शिक्षणपद्धती ही केवळ परीक्षा केंद्रीत आहे हे सर्वमान्य आहे. ही शिक्षणपद्धती बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विचारमंथनदेखील होत आहे.मात्र सद्यस्थितीतील शिक्षणपद्धती अशीच का याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जगाच्या इतिहासात डोकवावे लागेल.
1930 सालच्या जागतिक मंदीनंतर ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची पद्धत कारखान्यांसारखी होती. कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने काम चालते त्याचपद्धतीने शाळांचे कामकाज चालू लागले. कामगारांच्या शिफ्टस्प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या वेळा, परीक्षापद्धतीचे प्रमाणीकरण अशा अनेक बाबींचे उदाहरण याबाबत घेता येईल. शाळांधील उत्पादन म्हणजे विद्यार्थी. मग हे उत्पादन चांगले, दर्जेदार असावे याकरीता शाळांकडून एकाच पद्धतीने विचार
करण्यात आला व त्यासाठी सर्व शाळांमध्ये एकच पद्धती अवलंबण्यात आली.

खरे पहाता विद्यार्थी म्हणजे कोणी उत्पादन नव्हे. त्यामुळे त्यांना जोखण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी त्यांच्या कलाने त्यांना वाढवणे महत्वाचे. परंतु शाळांमधून हा मूळ विचारच नाहीसा झाला. विद्यार्थी परीक्षार्थी बनले. गुण मिळवण्यासाठी शिक्षण असेच समीकरण झाले. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीद्वारे कारखान्यांना उपयुक्त ठरेल असे उत्पादन निर्माण करण्याकडे कल वाढला.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला कारखान्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये शिकवण्याकडेच शिक्षणपद्धतीचा ओघ वाढला. तत्कालिन परिस्थिती पहाता त्यावेळी तशा पद्धतीचे शिक्षण योग्यच होते. मात्र तशी शिक्षणपद्धती आजच्या काळाला अनुरूप मात्र नाही हे तितकेच खरे आहे.

बाजारपेठेत झालेले मूलभूत बदल हे शिक्षणपद्धती घडवण्यास कारणीभूत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजच्या बाजारपेठा बघता नावीन्य आणि कल्पकता या बाबींना अत्यंत महत्व आले आहे. म्हणूनच शिक्षणातील कल्पकतेचा वापर वाढवणे हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक दृष्टीकोन विकसित होण्याकरीता शाळा व शिक्षकांबरोबरच पालक देखील तितकेच जबाबदार ठरतात.

आपल्या पाल्याला वाढवताना पालकांनी विशेषत्वाने त्यास कल्पक दृष्टीकोन दिला पाहिजे. किंबहुना त्यास तशी सवयच लावली पाहिजे. याचे कारण विद्यार्थी हे काही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन नव्हेत. तुमचा पाल्य ही व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यास भावभावना, विचारक्षमतादेखील आहे. वेगळ्या विचारानी जगण्याकरीता, समाजात काही भरीव कामगिरी करण्याकरीता परंपरेपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला कल्पक
दृष्टीकोनाची देणगी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याकडे मात्र अनेक पालक व शाळा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याबाबत काहीसे उदास दिसतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांची जडणघडण नेटकी व्हावी याकरीता ती जबाबदारी पालक
शाळेवर ढकलतात याउलट शाळांवर विशिष्ट शिक्षणपद्धती राबवण्याची सक्ती असल्याने शाळा देखील विद्यार्थ्यांना घडवण्यात अयशस्वी ठरतात. वर्गातील चुणचुणीत मुले कायम सर्व ठिकाणी चमकतात त्यामुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खरंतर शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरीता ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात ज्या बाबीमध्ये अडचण येते त्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते.

फिनलंडमधील शिक्षणपद्धतीचे उदाहरण येथे मला द्यावेसे वाटते. येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.शाळेतील विद्यार्थ्याला येणारी अडचण सोडवणे, जे कौशल्य येत नसेल त्यावर
अधिक भर दिला जातो आणि विशेष म्हणजे याकरीता शिक्षक देखील अधिक वेळ खर्ची घालण्यास तयार असतात. आपल्याकडे देखील असे शिक्षक आहेत मात्र दुर्दैवाने त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कल्पकतेचा शिक्षण पद्धतीत वापर करण्यासाठी पालक व शिक्षकांचा अधिक व नेमका सहभाग अपेक्षित आहे याबाबतचे विवेचन पुढील लेखात ..

शिरीन कुलकर्णी
संचालक,काऊन्सिल फॉर क्रीएटीव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड

कल्पकतेचे मूल्यमापन

मागील लेखापासून आपण कल्पकतेचे मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे कि जे. पी. गिल्फ़ोर्ड , त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती हि त्या क्षेत्रातले तज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरच सृजनशीलतेचा नमुना आहे कि नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं.

या सगळ्या संशोधकांनी विशेषत: व्यक्तिगत कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. एखाद्या निर्मितीचा समाजात कसा स्वीकार होतो यावरून त्या कलाकाराची कल्पकता मोजण्याचे पण प्रयत्न केले पण कल्पकता केवळ याच परीघांमध्ये राहून मोजता येईल का? त्यातून सध्याच्या कालानुरूप कल्पकतेची व्याख्या आणि तिचे मोजमाप करत येईल का?

या प्रश्नान वर जर विचार करू या. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात कल्पकतेचं  मूल्य खूपच वाढलं आहे. दर दिवशी नव्या योजना, नवीन उत्पादने बाजारात येत आहेत. सगळी अर्थव्यवस्था कोण किती कमीतकमी वेळात पुढचं  चांगलं  उत्पादन बाजारात आणु शकतय  आणि विकू शकतय यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत फक्त एक माणूस स्वत:पुरता कल्पक असून चालेल का? तर नाही, त्याला इतरांबरोबर काम करतानाही कल्पक राहावं  लागेल आणि एक संघ म्हणून कल्पक असावं लागेल.

याच संकल्पनेला अनुसरून सध्या फिनलंडमध्ये एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. त्या चाचणीचं नाव आहे Know Your Creativity Index (KYCI)! या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमची वैयक्तिक कल्पकता तर मोजली जातेच पण तुम्ही इतरांबरोबर काम करत असतांना ती कल्पकता कशी वापरता हेही समजतं. जरा उदाहरण घेऊन समजावून घेऊ या. अमित नावाचा एक चुणचुणीत मुलगा आहे. तो पटापट गोष्टी करून टाकतो. त्याला फारसं एका जागी बसवत नाही. शाळेत गुण वर खाली होत असतात कारण अभ्यासात सातत्य नाही. मित्र मात्र भरपूर आहेत. आता या सगळ्यावरून सामान्यपणे आपण काय अंदाज बांधू? एक म्हणजे हा मुलगा जरा  उनाड दिसतोय. त्याला नुसतीच मजा करायला आवडते. अभ्यासाची आवड नाहीये मग बहुधा कल्पकता पण फार असेल असं वाटत नाही. हे झालं आपल सर्व सामान्य मत.

आता या मुलाची KYCI चाचणी कशाप्रकारे घेतली जाईल ते बघू या. या चाचणीचे दोन भाग आहेत. एक भाग आहे पेपर सोडवण्याचा. यामध्ये अमितला एक पेपर दिला जाईल कि ज्यामध्ये त्याला काही चित्रं काढायची असतील. त्या साठीच्या सूचना त्याला वेळोवेळी दिल्या जातील. हि सगळी चित्रं काढण्यासाठी त्याला एकूण ४५ मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याच्या सारखाच पेपर सोडवलेल्या इतर चार मुलांबरोबर त्याचा एक संघ बनवला जाईल. या संघाला एकत्रितरीत्या करण्यासाठी काही काम दिलं जाईल. हा संघ हे काम जेव्हा करत असेल त्यावेळी एक निरीक्षक तिथे उपस्थित राहून नोंदी घेत असेल. या मध्ये कोण कशाप्रकारे काम करतय? त्यात नेतृत्व कुणाकडे आहे? कोण निर्णय घेतय असे अनेक पैलू बघितले जातात. हा कालावधी साधारणपणे ९० मिनिटांचा असतो. एकुण या चाचणीचा कालवधी जास्तीत जास्त अडीच तास असतो.

चाचणी झाली कि ३-४ आठवड्यात रिपोर्ट दिला जातो. या ३-४ पानी रिपोर्टमध्ये अमितची कल्पकता कशी आहे ते सांगितलं  जातं. कल्पकता मोजण्याचे जे मापदंड आहेत जसे कि एखादी गोष्ट बघून किती कल्पना सुचतात, त्यात किती कल्पना पूर्णत: नवीन आहेत? एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची क्षमता आहे कि नाही, याबद्दल माहिती दिली जाते. त्यावरून त्याची वैयक्तिक कल्पकता कशी आहे ते कळते. याच रिपोर्ट मध्ये त्याची संघात काम करण्याची क्षमता कशी आहे हेहि सांगितलं जातं. तो इतरांबरोबर काम कसं करतो? त्याला ते आवडतं का? जमतं का? काही सुधारणा करण्याची गरज आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात दिली जातात.
रिपोर्ट तयार होत आला कि एकदा पालकांशी चर्चा करून त्याबद्दलची काही इतर समस्या किंवा पार्श्वभूमी जाणून घेतली जाते जेणेकरुन त्या समस्यांची उत्तरेही रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. यामुळे त्या मुलाची कल्पकता तर समजतेच पण ती कशामुळे तशी आहे हे लक्षात घेतल्याने त्याबद्दलच्या काही उपाय योजनाही सुचवल्या जातात.

आता हि चाचणी नक्की कशी असते हे तर आपल्याला समजलं. अमितची चाचणी घेतली गेली त्याचा रिपोर्ट पुढच्या लेखात वाचू या. निकालाची उत्सुकता थोडी ताणायला नको का?

शिरीन कुलकर्णी
सीसीई फिनलंड
 shirin.kulkarni@ccefinland.org

ज्ञानरचनावाद

रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं!
- रमेश पानसे

रविवार, 22 मे 2016

Share Link:
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N769KN
Tags: saptarang, ramesh panse

*जिल्हा परिषदांच्या शाळांमधून रचनावादी शिक्षणपद्धती आता मूळ धरू लागली आहे. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात बदल, मूल्यवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी आदींच्या माध्यमातून ती रुजत आहे. मूल्यवर्धनाचे कार्यक्रम शाळांमधून राबवणं हे या शिक्षणपद्धतीमधलं पुढचं पाऊल म्हणता येईल. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या काही शाळांमधून पुढच्या महिन्यापासून (जून २०१६) मूल्यवर्धनाचे कार्यक्रम पथदर्शी स्वरूपात सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या रचनावादी शिक्षणपद्धतीविषयी...*



मध्यंतरी माझ्याकडं एका शहरातले एका क्‍लबचे प्रमुख भेटायला आले. मागं पडलेल्या शाळांमधल्या काही निवडक शिक्षकांसाठी त्यांना प्रशिक्षण घ्यायचं होतं. तसं ते ठरवून आले होते. ते म्हणाले ः ‘‘मी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावणार आहे’’ नकारार्थी मान हलवली. मी त्यांना सुचवलं ः *‘‘मागं पडलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही तथाकथित मान्यवर मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा निवडा. सध्याच्या परिस्थितीत त्याच ‘मागासलेल्या’ शाळा आहेत, असा माझा कयास आहे.’’*

आज बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांतून, ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्षं जन्माला आलेली, तत्कालीन मानसशास्त्राचा बळकट पाया असलेली वर्तनवादी विचारसरणी अजूनही त्यांच्या व्यवहारात टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही जीवनपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. या पद्धतीची भलामण करणारे लोक आज जगभरातच फारसे उरलेले नाहीत. फक्त, जुना चर्मरोग जसा खूप काळ टिकतो, तशी ही पद्धती काही शाळांतून टिकून आहे. काही लोक ती अट्टहासानं, तर काही लोक, शालेय शिक्षक व व्यवस्थापन यांच्या सोईसाठी, तर अन्य काही लोक आर्थिक स्वार्थापोटी या जुन्या पद्धतीलाच चिकटून आहेत. त्यामुळं साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.

या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात उठून दिसत आहेत.
मी अलीकडं जिल्हा परिषदांच्या शाळांच्या संपर्कात असतो; त्यांच्या शिक्षकांशी बोलतो, त्यांचे वर्ग व विद्यार्थी न्याहाळतो. माझ्या असं लक्षात आलं आहे, की जिल्हा परिषदांचे बरेचसे शिक्षक आणि शिक्षिका, स्वयंप्ररणेनं, प्रत्यक्ष वर्गांमधल्या शिकण्या-शिकवण्याच्या व्यवहारात खूप मोठे, उपयुक्त असे बदल करत आहेत. त्यात त्यांची मानसिक गुंतवणूक मला दिसतं आहे. शिक्षणाच्या वाढत्या गुणवत्तेत त्यांच्याकडून होणारं वर्धितमूल्याचं (व्हॅल्यू ॲडिशन) प्रमाण आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल. ‘महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे,’ असं ठाम विधान आजच्या घडीला मी स्पष्टपणे करू शकतो.

शिक्षण हक्क कायद्याच्या (२००९) पाचव्या प्रकरणातल्या २९ व्या कलमात म्हटलं आहे ः ‘‘जर विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रीतीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’’
इथं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात असे बदल होऊ लागले आहेत असं मला वाटतं.
या बदलांचा थोडासा आढावा घेता येईल.
शालेय शिक्षणात, रचनावाद तीन स्तरांवर दृष्टीस पडतो.
एक ः वर्गाच्या, शाळेच्या रचनेत
दोन ः वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत
तीन ः शिक्षक-शिक्षिकांच्या मनात
वरील तीनपैकी पहिल्या स्तरावरच्या, म्हणजे शालेय वर्गातल्या-शाळेतल्या रचनेत किंवा व्यवस्थेत, रचनावाद बऱ्यापैकी पसरलेला आहे, असं आज आढळून येतं. अनेक शाळांनी जमिनी हा एरवी शिक्षणप्रक्रियेत न वापरलेला घटक वापरायला सुरवात केली आहे. कित्येकांनी जमिनी शैक्षणिक अंगानं रंगवल्या आहेत. काही खेळ, काही उपक्रम या जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना आकर्षित करू पाहत आहेत. जे काही रंगवलेले आहे, ते छान दिसत आहे; त्यामुळं शाळेत काही बदल होत आहे, हे शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना-गावकऱ्यांना सहजपणे कळतं. सुरवात म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे.

शाळांच्या भिंतींवर मात्र वर्तनवादी आणि रचनावादी अशा दोन्ही विचारांना स्थान दिलेलं दिसतं. अनेक तक्ते, सुविचार, माहिती, शासकीय सूचना अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. हा बदलाचा सुरवातीचा काळ म्हणून मानता येईल. भिंतीच्या वापराबद्दल फारसा सयुक्तिक विचार मात्र होत नाही, असं जाणवतं. रचनावादी शिक्षणात जमिनींवर, भिंतींवर कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी असू नयेत, असा संकेत आहे. काही गोष्टी रोज किंवा आठवड्याला बदलतील आणि काही गोष्टी महिना-दोन महिन्यांनी. शाळांच्या भिंतींवर बरेचसे फोटो टांगलेले असतात, त्यातले शक्‍य तेवढे काढून टाकले, तर मुलांना अशा जागा त्यांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध होतील. (शाळेत केवळ शिक्षणतज्ज्ञांचे फोटो - भारतीय आणि पाश्‍चात्य - का लावले जात नाहीत?) इयत्तांनुसार भिंतींवरच्या जागांची वाटणी अर्थातच करता येईल. भिंतींवर काय नसावं, याचबरोबर काय असावं, हे महत्त्वाचं आहे. यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे, भिंती हा वर्गवातावरणाचा भाग आहे. त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं इष्ट ठरतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंत ही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतींवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.

बाकं हटवून जमिनीवर बसण्याची पद्धत
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये आणखी एक होत असलेला बदल ठळकपणे लक्षात येत आहे, तो म्हणजे वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना छोट्या गटांत बसवायला अनेक ठिकाणी सुरवात झाली आहे. कित्येक ठिकाणी, वर्गातून बाकं हलवण्यात काही अडचणी आहेत; पण तिथंसुद्धा बाकं भिंतींशी लावून मध्यभागी मुलांना जमिनीवर बसण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जमिनीवर छोट्या गटांत बसण्याची पद्धत आता रुळायला लागलेली दिसते. तरीसुद्धा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी आहे व ती म्हणजे, गट हे त्या त्या वेळच्या अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात. गट हे अनेक कारणांनी बदलतही जातात आणि मुख्य म्हणजे गट हे सहकारी शिक्षणाला पायाभूत असल्यामुळं सहकारी शिक्षणातल्या तत्त्वांचीही झालर त्यांना असावी लागते. या दिशेनं शिक्षक-शिक्षकांनी अधिक माहिती घेणं उपयोगाचं ठरेल.

शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग
चौथा महत्त्वाचा आणि सगळीकडं सर्रास आढणारा बदल म्हणजे, आता शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही साधनं शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. बऱ्याचदा ही साधनं, अन्य ठिकाणी पाहून तशी तयार करून वापरली जात आहेत, तर काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नव्यानं निर्माण केलेली आहेत. उत्साहानं साधने निर्माण होणं वेगळं आणि त्यांच्या निर्मितीमागं काही शास्त्रीय दृष्टिकोन असणं वेगळं. जे साधन आपण वर्गात मुलांसाठी वापरू इच्छितो, त्याचं स्वरूप मुलांना हाताळण्यास सोईचं, सुरक्षित आणि मुलांना आवडेल असं तर असायलाच हवं; पण तेवढंच पुरेसं नाही. शैक्षणिक साधनांची शास्त्रीयता ही त्यांच्या हेतुपूर्ण वापरात आणि हेतुपूर्ण विद्यार्थि-प्रतिसादात असते. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनांबाबत काळजी घ्यायला हवी ती अशी, की साधन हे केवळ आपल्याला काय वाटतं यावर किंवा इतरांच्या ऐकीव अनुभवांवर बेतलेलं असून चालणार नाही. त्यामागचा दृष्टिकोन अशास्त्रीय तर नाही ना, याची शहानिशा होणं आवश्‍यक आहे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप, तसंच ती विद्यार्थ्यांना आव्हानरूप वाटतील अशी अर्थातच असायला हवीत. साधननिर्मिती आणि साधनांचा वापर याबद्दल शिक्षकांचंही सातत्यपूर्ण प्रशिक्षण व्हायला हवं. राज्यस्तरावर नवनवीन साधनांची सूची सतत तयार होत जाऊन ती सर्वांना उपलब्ध होत गेली पाहिजे.

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतून, शालेय रचनेत होत असलेल्या बदलांचं समाधान देणारं स्वरूप आणि त्याविषयी घ्यायची काही शास्त्रस्वरूपी काळजी इथं व्यक्त केल्यानंतर आजच्या बदलाच्या या पायरीवरून आता अधिक वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे.

शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर आता लक्ष हवं
आता वर्गातल्या शिकविण्या-शिकण्याच्या प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायला हवं. रचनावादातल्या या शिक्षणप्रक्रिया प्रामुख्यानं गेल्या ५०-६०- वर्षांतल्या, विविध शास्त्रांमधल्या सिद्धान्तांमधून उगम पावलेल्या आहेत. नेहमीच शिक्षणपद्धतींचा फार मोठा संबंध त्यामध्ये असणाऱ्या सैद्धान्तिक विश्‍वाशी असतो. १९५० च्या दशकापर्यंत वर्तनवादी सैद्धान्तिक विचारसरणी आणि स्किनर यांच्या स्वेच्छाप्रतिक्रियेच्या (ऑपरंट कंडिशनिंग) तत्त्वाची चलती होती. म्हणजे असं, की तत्कालीन सारा शिक्षणव्यवहार या अशा तत्त्वांना मध्यवर्ती ठेवून बेतला जात असे. तीच विचारसरणी अनेक शाळांतून आजही ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसून येते. ती बदलणं हेच तर खरं आजच्या शिक्षणक्षेत्रासमोरचं आव्हान आहे. पियाजे यांचं १९६० पूर्वीचं संशोधन व बौद्धिक विकासाच्या पायऱ्यांचं सिद्धान्तन (थिअरी), त्यावर व अन्य शास्त्रीय संशोधनावर आधारलेलं १९६० च्या दशकातलं आकलनशास्त्र, वायगोटस्की यांच्या समाजसाह्याचा विचार, त्यानंतरच्या काळातल्या ब्रुनर यांच्या आकलनविषयक विकासाचा सैद्धान्तिक विचार, १९७० च्या दशकापासून वेग आलेली मेंदूविषयक संशोधनाची मांदियाळी, १९८० च्या दशकांतला रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्यापनविषयक सिद्धान्त व त्यांचे शिकण्याविषयीचे निष्कर्ष, मेल लेवाईन यांचा चेताविषयक रचनांचा विचार या आणि अशा अनेकांच्या सैद्धान्तिक विचारांनी अध्यापन आणि अध्ययन या वर्गशिक्षणातला मध्यवर्ती संकल्पनांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. त्यांना नेमकेपणा देऊन शिक्षणव्यवहारांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. गेल्या शतकभरात सारा शिक्षणव्यवहार वर्तनवादाकडून आकलनवादाकडं आणि तिथून तो ज्ञानरचनावादाकडं वळला आहे.

बदलांमागचं तत्त्वज्ञान आत्मसात व्हायला हवं
महाराष्ट्रातल्या शासकीय शिक्षणातल्या बदलांमागचं हे तत्त्वज्ञान, सिद्धान्तन आणि दृष्टिकोन हा शिक्षकवर्ग व अधिकारीवर्ग यांना पुरेसा आत्मसात होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या हातून घडणाऱ्या शिक्षणप्रक्रियांना शास्त्रीय रूप मिळणे दुरापास्त होईल. आणखी एक गोष्ट अशी, की शिक्षकांनी सैद्धान्तिक विचार आत्मसात करून त्यांची दैनंदिन शिक्षणव्यवहारांशी सांगड घालत गेल्याशिवाय सिद्धान्तन (थिअरी) आणि व्यवहार (प्रॅक्‍टिस) यात आज असलेलं फार मोठे अंतर भरून निघणार नाही आणि अर्थातच शिक्षणात अपेक्षित असलेली उच्च प्रतीची गुणवत्ताही साध्य होणार नाही.

आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वात मोठी उणीव होती ती म्हणजे, शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. आजवर शिक्षकांवर केवळ विषय शिकवण्याचीच जबाबदारी होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. वास्तविक, शाळा ही शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते. शिक्षकांची नेमणूक व त्यांना दिले जाणारे पगारही विद्यार्थी शिकावेत म्हणूनच दिले जातात. अशा वेळी त्यांनी करायचं काम हे आपसूकच विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी जोडलं जातं. शालेय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचं शिकणं महत्त्वाचं असतं आणि ते नीटपणे व सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत असं काही घडवून आणतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार-अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची असते. या अंगाने या संबंधित मंडळींचं प्रशिक्षण होत राहिलं पाहिजे. वर्गांतल्या शिक्षणप्रक्रिया शास्त्रीय आहेत की नाही आणि विद्यार्थी शिकत जात आहेत की नाही, याची तपासणी तपासनीसांनी प्रामुख्यानं करायची आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीत हे सोपंही आहे. वर्गात विषयांमधले घटक रचनात्मक पद्धतीनं विद्यार्थ्यांपुढं येत आहेत की नाही आणि सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं त्यात भाग घेत आहेत की नाही, हे तरी सुरवातीला पाहणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ ः कुणी पाहुणे, अधिकारी वर्गात शिरले तर त्यांना मुलं शिकण्यात रमली आहेत, एकाग्र झाली आहेत, परस्परांशी त्यांचा शैक्षणिक विचारविनिमय चालला आहे, असं दृश्‍य दिसलं पाहिजे. आत्ताच्या सारखं कुणीही, केव्हाही वर्गात शिरो, मुलं उठून ‘गुड मॉर्निंग...’ म्हणतात, त्यांच्या स्वतःच्या कामाचा त्यात अनाठायी वेळ जातो आणि एकाग्रताही भंगते. त्यामुळं अशा औपचारिकता पाळल्या जाणार नाहीत, याची दक्षता शिक्षक, अधिकारी यांनी घेतली पाहिजे.

क्रमिक पुस्तकांचं बदलतं स्वरूप रचनावादाला पूरक
शालेय वर्गांमधले (आणि अगदी महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्गांमधलेही!) विद्यार्थी आपणहून शिकण्यास प्रवृत्त होणं ही घटना शिक्षणात मूलभूत आहे. रचनावादी पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंदानं कृतीयुक्ततेनं स्वयंशिक्षणाला प्रवृत्त करते ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज असंख्य शाळांमधले रचनावादी वर्ग मुलांच्या चेहऱ्यांवर समाधान, उत्सुकता, शिकण्याची ऊर्मी दर्शवत आहेत. याचा अर्थ मुलांना शिकायला आवडत आहे. शाळांचं बाह्य रूपही आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होतं, हे आता अनेक सरकारी शाळांना आणि त्यांमधल्या शिक्षकांना चांगलं समजलं आहे. शाळा अधिक सौंदर्यसंपन्न व साधनसंपन्न होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पालकवर्ग आणि गावकरी मंडळी शाळा ‘आपली’ मानू लागले आहेत. शाळांच्या आंतर्बाह्य विकासासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत येत आहे हे शालेय शिक्षणाबाबतची समाजाची मानसिकता बदलत असल्याचं द्योतक आहे.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रचनात्मक शिक्षणाकडं नेण्याचा एक खूप मोठा, जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे तो क्रमिक पुस्तकांच्या बदलत्या स्वरूपांतून. धड्यांखालचे प्रश्‍न काही प्रमाणात वर्तनवादी स्वरूपाचे असले तरी, म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरं धड्यांमध्येच आहेत अशी असली, तरीही त्याचबरोबर मुलांना शोध घ्यायला लावणारे आणि कृती करायला लावणारे असेही प्रश्‍न आले आहेत. शिक्षकांनी त्यांचं नीटस पालन केलं तरी मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सघन होईल.

वर्गखोल्यांबरोबरच जीवनव्यवहारातूनही शिक्षण
शासनाने क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली. त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येत आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक रचनावादी शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. नुकतीच आलेली सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांतल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या समाजजीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानं मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता त्यांचं अंगणच विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारांतून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.

विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची जोड
आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं आणि ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. मूल्यशिक्षणाची सामाजिक जाणीवही फारशी व्यक्त होत नव्हती. शासकीय स्तरांवरून याबाबतचे काही विचार व्यक्त होत होते, काही तुटक आणि त्रोटक प्रयत्नही केले जात होते; पण शाळांमधून ते फारसे गंभीरपणे कधी घेतले गेले नाहीत आणि शिक्षकवर्गानंही ते आवर्जून मनावर घेतले नाहीत. त्यामुळं, क्षमताधिष्ठित शिक्षणाचा प्रयत्न झाला; पण मूल्याधिष्ठित शिक्षणाला वर्गाबाहेर समाजावरच सोपवलं गेलं.

आता आलेल्या सहावीच्या क्रमिक पुस्तकांनी एक मोठा प्रयोग हाती घेतला आहे, असा निष्कर्ष मला काढावासा वाटतो. हा प्रयोग म्हणजे, विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची दिलेली जोड होय. भाषांच्या पुस्तकांमधून हे ठळकपणे प्रत्ययाला येत आहे.

मूल्यवर्धन ः रचनावादी शिक्षणपद्धतीचं पुढचं पाऊल
महाराष्ट्र शासनानं याचबरोबर आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि जीवनोपयोगी निर्णय घेतला आहे आणि येत्या जूनपासून, म्हणजे जून २०१६ च्या नव्या शालेय वर्षापासून, मूल्यवर्धनाचा नवा कार्यक्रम शाळांमधून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा कालोचित कार्यक्रम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका केंद्रपातळीवरच्या शाळांमधून पथदर्शी स्वरूपात होणार आहे. बीड जिल्ह्यांतल्या सुमारे ५०० शाळांतून हा मूल्यवर्धनाचा प्रयोग गेल्या सात वर्षांपासून हाताळला जात आहे. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणानं, मुलांच्या मुक्त वातावरणातल्या शिकण्याला एकीकडं उठाव येईल, मुलं स्वयंशिक्षणाला उद्युक्त होतील, ती ‘शिकणं’ या हेतूनंच शिकतील, तर दुसरीकडं अनुभवाधारित मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमांतून ती अधिक विचारपूर्वक वागायला शिकतील. या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेतली पायाभूत नागरी मूल्यं, भावी समाजाच्या दैनंदिन व्यवहारांत उतरतील, अशी आशा आपण करू शकतो.

आजच्या शिक्षणानं नेहमीच उद्याच्या जीवनाची घडी घालून द्यायची असते. मुलांच्या शिकण्या-वागण्याला वळण देऊनच हे साध्य होण्यासारखे असतं. महाराष्ट्रात या दिशेनं पडू लागलेली दमदार पावले, उद्याच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...