Pages

Friday, June 3, 2016

कल्पकतेचे मूल्यमापन

मागील लेखापासून आपण कल्पकतेचे मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे कि जे. पी. गिल्फ़ोर्ड , त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती हि त्या क्षेत्रातले तज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरच सृजनशीलतेचा नमुना आहे कि नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं.

या सगळ्या संशोधकांनी विशेषत: व्यक्तिगत कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. एखाद्या निर्मितीचा समाजात कसा स्वीकार होतो यावरून त्या कलाकाराची कल्पकता मोजण्याचे पण प्रयत्न केले पण कल्पकता केवळ याच परीघांमध्ये राहून मोजता येईल का? त्यातून सध्याच्या कालानुरूप कल्पकतेची व्याख्या आणि तिचे मोजमाप करत येईल का?

या प्रश्नान वर जर विचार करू या. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात कल्पकतेचं  मूल्य खूपच वाढलं आहे. दर दिवशी नव्या योजना, नवीन उत्पादने बाजारात येत आहेत. सगळी अर्थव्यवस्था कोण किती कमीतकमी वेळात पुढचं  चांगलं  उत्पादन बाजारात आणु शकतय  आणि विकू शकतय यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत फक्त एक माणूस स्वत:पुरता कल्पक असून चालेल का? तर नाही, त्याला इतरांबरोबर काम करतानाही कल्पक राहावं  लागेल आणि एक संघ म्हणून कल्पक असावं लागेल.

याच संकल्पनेला अनुसरून सध्या फिनलंडमध्ये एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. त्या चाचणीचं नाव आहे Know Your Creativity Index (KYCI)! या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमची वैयक्तिक कल्पकता तर मोजली जातेच पण तुम्ही इतरांबरोबर काम करत असतांना ती कल्पकता कशी वापरता हेही समजतं. जरा उदाहरण घेऊन समजावून घेऊ या. अमित नावाचा एक चुणचुणीत मुलगा आहे. तो पटापट गोष्टी करून टाकतो. त्याला फारसं एका जागी बसवत नाही. शाळेत गुण वर खाली होत असतात कारण अभ्यासात सातत्य नाही. मित्र मात्र भरपूर आहेत. आता या सगळ्यावरून सामान्यपणे आपण काय अंदाज बांधू? एक म्हणजे हा मुलगा जरा  उनाड दिसतोय. त्याला नुसतीच मजा करायला आवडते. अभ्यासाची आवड नाहीये मग बहुधा कल्पकता पण फार असेल असं वाटत नाही. हे झालं आपल सर्व सामान्य मत.

आता या मुलाची KYCI चाचणी कशाप्रकारे घेतली जाईल ते बघू या. या चाचणीचे दोन भाग आहेत. एक भाग आहे पेपर सोडवण्याचा. यामध्ये अमितला एक पेपर दिला जाईल कि ज्यामध्ये त्याला काही चित्रं काढायची असतील. त्या साठीच्या सूचना त्याला वेळोवेळी दिल्या जातील. हि सगळी चित्रं काढण्यासाठी त्याला एकूण ४५ मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याच्या सारखाच पेपर सोडवलेल्या इतर चार मुलांबरोबर त्याचा एक संघ बनवला जाईल. या संघाला एकत्रितरीत्या करण्यासाठी काही काम दिलं जाईल. हा संघ हे काम जेव्हा करत असेल त्यावेळी एक निरीक्षक तिथे उपस्थित राहून नोंदी घेत असेल. या मध्ये कोण कशाप्रकारे काम करतय? त्यात नेतृत्व कुणाकडे आहे? कोण निर्णय घेतय असे अनेक पैलू बघितले जातात. हा कालावधी साधारणपणे ९० मिनिटांचा असतो. एकुण या चाचणीचा कालवधी जास्तीत जास्त अडीच तास असतो.

चाचणी झाली कि ३-४ आठवड्यात रिपोर्ट दिला जातो. या ३-४ पानी रिपोर्टमध्ये अमितची कल्पकता कशी आहे ते सांगितलं  जातं. कल्पकता मोजण्याचे जे मापदंड आहेत जसे कि एखादी गोष्ट बघून किती कल्पना सुचतात, त्यात किती कल्पना पूर्णत: नवीन आहेत? एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची क्षमता आहे कि नाही, याबद्दल माहिती दिली जाते. त्यावरून त्याची वैयक्तिक कल्पकता कशी आहे ते कळते. याच रिपोर्ट मध्ये त्याची संघात काम करण्याची क्षमता कशी आहे हेहि सांगितलं जातं. तो इतरांबरोबर काम कसं करतो? त्याला ते आवडतं का? जमतं का? काही सुधारणा करण्याची गरज आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात दिली जातात.
रिपोर्ट तयार होत आला कि एकदा पालकांशी चर्चा करून त्याबद्दलची काही इतर समस्या किंवा पार्श्वभूमी जाणून घेतली जाते जेणेकरुन त्या समस्यांची उत्तरेही रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. यामुळे त्या मुलाची कल्पकता तर समजतेच पण ती कशामुळे तशी आहे हे लक्षात घेतल्याने त्याबद्दलच्या काही उपाय योजनाही सुचवल्या जातात.

आता हि चाचणी नक्की कशी असते हे तर आपल्याला समजलं. अमितची चाचणी घेतली गेली त्याचा रिपोर्ट पुढच्या लेखात वाचू या. निकालाची उत्सुकता थोडी ताणायला नको का?

शिरीन कुलकर्णी
सीसीई फिनलंड
 shirin.kulkarni@ccefinland.org

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...