ऐतिहासिक पंढरपूर
पंढरपूर हे दक्षिण भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे देवस्थान वेरूळचे जगदविख्यात कैलास लेणे निर्माण होणेपूर्वीचे आहे, भागवत धर्माचे आद्यपीठ, संताचे माहेर व दक्षिण काशी असे संबोधले जाते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व स्कंदपुराणात वर्णन केले आहे. मान्यखेटचे राष्ट्रकूट यांचेपैकीच सोलापूरचे राष्ट्रकूट घराणे होते. त्यातील अविधेयक नामक राजाने आपल्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षी जयद्विढ्ढ नावाचा भार्गव गोत्रज ब्राम्हणास शंभु महादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असणारी आणेवारी, चाळ, कंदक, दुग्धपल्ली यासह पांडुरंगपल्ली (पंढरपूर) हे गांव दान दिले. पांडुरंगाचे देवालय पल्लीत होते. म्हणून तिचे नांव पांडुरंगपल्ली पडले आहे, असे हे पांडुरंगपल्ली गांव म्हणजे पंढरपूर होय.
इ.स.83 मध्ये या क्षेत्रास शालिवाहनाने पंढरपूर हे नांव दिल्याचा व इ. स. 516 च्या राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय राजाने दिलेल्या ताम्रपटातही त्याचा उल्लेख आहे. या पुरातन मंदिराचा शके 1225 च्या सुमारास चक्रवर्ती राजा रामचंद्र देवराय यांनी त्यांचे प्रधान हेमाद्री पडित यांचेकडून देवळाचा विस्तार केल्याचे दिसून येते. आदिलशाही राजवटीमध्ये सन 1659 मध्ये खासा अफजलखान शिवरायावर मोहिम काढून वाईकडे जात असताना त्यांने पंढरपूर क्षेत्रास उपसर्ग केल्याची नोंद आहे श्री क्षेत्र पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र पवित्र अशा चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. हिरे आणि माणिक यांनी जडवलेला लफ्फा हा हार दत्ताजी शिंदे, ग्वाल्हेरचे सरदार यांनी देवास दिलेला आहे. रत्ने, मोती, हिरे व सोन्याचे तारेने गुंफलेला शिरपेच हा अलंकार अहल्याबाई होळकर यांनी दिलेला आहे. अतिमौल्यवान रत्ने वापरून बनविलेला मोत्याचा कंठा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी अर्पण केलेला आहे. पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी वेळोवळी कामे करून दिलेली आहेत. रखुमाजी अनंत पिंगळे यांनी कृष्णाजी मुरार यांच्या हस्ते इ.स.1618 मध्ये महाद्वार बांधलेचा उल्लेख आहे. मुख्यमंदिराचा सोळखांबी मंडप दौंडकर यांनी बांधलेला असून या मंडपाच्या दक्षिणेकडील भाग मैनाबाई आनंदराव पवार यांनी बांधलेचा उल्लेख आहे. भोरच्या पंत सचिवांनी देवळाचे शिखर बांधलेचा उल्लेख आहे. पहिल्या बाजीरावापासून सर्वजण पंढरपूरच्या देवदर्शनास येत. पहिला बाजीराव पेशवा यांनी पंढरपूरला अनेकदा मुक्काम केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. दुसर्या बाजीराव पेशव्यांनी सुद्धा पंढरपूरला अनेकदा मुक्काम केलेचा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे. स्वातंत्र्यानंतर साने गुरूजींच्या पुढाकाराने श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर सर्वधर्म व सर्व जातीच्या लोकांना खुले करून देण्यात आले. सन 1973 मध्ये श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर शासनाने ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 चा कायदा केला. सन 1985 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन शासननियुक्त समितीकडून केले जात आहे. सन 2009 मध्ये पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पंढरपूर विकास प्राधिकरण स्थापन केलेले आहे.