Pages

Thursday, July 7, 2016

पंढरपूर वारी


||वारी||

      वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.

      अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.

      वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.

      वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
मुख्य चार यात्रा(वार्‍या)
१) चैत्री यात्रा

     
चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.

२) आषाढी यात्रा

     
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

     
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्‍या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्‍यांना गोपालकाला वाटला जातो.

३) कार्तिकी यात्रा

     
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.

४) माघी यात्रा

     
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...