Pages

Monday, July 11, 2016

पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …

गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq

भाषासाठी - https://goo.gl/SXaWms 

शिक्षण आणि करिअर

*आपली मुलं खरेच मनापासून शिकतातयेत की त्यांनी काहीतरी शिकलंच पाहिजे, असा *'बळस्कार' व्यवस्था त्यांच्यावर करतेय?*

शिक्षण क्षेत्रातील एका संवेदनशील कार्यकर्त्यांनं *तुम्ही आम्ही पालक* मासिकासाठी लिहिलेलं हे दीर्घ टिपण जरुर वाचाल.

*करिअर म्हंजी काय रं भाऊ?*

लेखक: *भाऊसाहेब चासकर*

तुम्ही शिकता कशासाठी? असा प्रश्न मी आजवर शेकडो युवक-युवतींना विचारलाय. शिकल्यावर नोकरी मिळते, पैसे मिळतात, चांगले करिअर होते. बहूतेक मुलांचे असेच उत्तर असते! तात्विक आणि सैद्धांतिक पातळीवर शिक्षणाची थिअरी मांडताना देशातील शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी काहीतरी वेगळीच मांडणी केलेली असते. तसले काही असले तरी आजचे पालक मुलांना शिकवताहेत किंवा मुलंही शिकताहेत, यामागची मूळ प्रेरणा शिकल्यावर नोकरी मिळते, दोन पैसे हातात येतात, पैसे आले की गरजा भागवता येतात, आयुष्य नीट जगता येते, पैशाशिवाय जगणे मुश्किल आहे. वगैरे... शिकण्यामागची अशी पक्की ठोकळेबाज धारणा बनली आहे. विशेषतः ज्या कुटुंबातील पहिली किंवा दुसरी पिढी शिकतेय, तिथे हे जास्त ठळकपणे दिसतेय. अर्थात हे वाटणे अजिबात चुकीचे नाही. शिक्षणातून अनेक कुटुंबांचा उत्कर्ष झालेला त्यांनी बघितलाय.

शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवणे वगैरे असा शिक्षणामागचा महनीय विचार बिचार सांगणारे यच्चयावत दस्ताऐवज असले तरीही ‘शिक्षण = नोकरी’ (करिअर) हे समीकरण कोणालाही नाकारता येणार नाही, हा सांगायचा मुद्दा आहे. किंबहूना तसे केल्यास ती आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखे होईल. करिअरच्या कमानीखालून आत शिरायला पदवीचे भेंडोळे मुलांना, पालकांना हातात लागतेय. या शिकण्याचा ज्ञान मिळवणे, बौद्धिकदृष्ट्या उन्नत होणे, काही विशेष गोष्टी अवगत होणे, जबाबदार नागरिक घडवणे याशी काडीमात्र संबंध उरलेला नाहीये, हे नक्की!

दुसरा मुद्दा म्हणजे बारावीनंतरच्या शिक्षणातील सगळे ‘यश’ आपल्याकडे संपूर्णपणे परीक्षेत मिळालेल्या गुणांशी जोडले गेलेले आहे. ‘गुण आणि गुणवत्तेचा फारसा संबंध नसतो’, अशी वाक्ये फार फार तर सुविचार म्हणून शाळेच्या भिंतीवर लिहायला भाषणात बोलायला ठीक! आज परीक्षेत मिळालेले मार्क्स हेच मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातले अत्यंत क्रूर वास्तव आहे. त्याचा आयुष्यावर भलाबुरा परिणाम होतो, हेच तंतोतंत खरे आहे.
तरुण मित्रांशी बोलताना नेहमी जाणवते की, बहूतेक मुलं जे शिकताहेत, ती स्वतःची आवड म्हणून नव्हे, तर व्यवस्थेने त्यांच्यावर केलेली ती एकप्रकारची बळजबरीच आहे! भारतीय शिक्षणात अत्यंत दुर्दैवाने मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विचार कुठेही होताना दिसत नाहीये. कलचाचण्या कशाशी खातात हे आपल्याकडे माहीत नाही. मोठ्या मोठ्या शाळांत साधी समुपदेशनाची सोय नाही. आज विविध शाखांमध्ये जी काही मुलं शिक्षण घेताहेत, त्यांचा एखादा सर्वे कोणीतरी करायलाच हवा म्हणजे आपल्याला समजेल की, किती मुलं आपल्या आवडीनिवडीनुसार शाखा निवडताहेत ते!

‘लाईफमध्ये तुम्ही शाळा-कॉलेजात जाऊन काहीतरी शिकायलाच पाहिजे, असं पॅरेंन्टसचं आणि मेन म्हणजे सिस्टीमचं जाम प्रेशर असतं. प्रेशरपेक्षाही ते कम्बल्शनच असतं म्हणा. अनेकदा काय शिकायचं याचाही चॉईस आम्हा मुलांना नसतोच. आमचे अनेक प्रोजेक्टस् म्हणजे निव्वळ डॉन्की वर्क असते! सो मग काय करणार?’ उच्च शिक्षण घेणारी नेहा सांगत होती.

मुलांना आवडेल तसे शिकवायचे. त्यात गरजेइतके पैसे मिळवून आनंदाने जीवन जगता येईल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या मुंबई येथील संस्थेची सद्यस्थिती कशी आहे, तिथले लोकं नेमके काय करत आहेत, याचा जरा कानोसा घेतला म्हणजे आपण आपल्या 'भविष्या'वर किती गांभीर्यपूर्वक काम करतोय हे समजेल.

करिअरच्या हजारो वाटा असतात. पण आम्ही मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांवरच अडून बसलेलो असतो. केवळ यात यशस्वी झालेल्यांवर आम्ही यशाची, गुणवत्तेची मोहर लावतो! मग यातले यशस्वी मुलं आयडॉल बनून राहतात. मग याचेच अनुकरण केले जाते. मागून येणारे पालक आणि शिक्षण व्यवस्था या दलदलीत विद्यार्थ्यांना ढकलत राहतात. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रांत गुणवत्तेवर एकूण संख्येपैकी किती टक्के मुलांना प्रवेश मिळणं शक्य आहे? अधिकारी होऊन होऊन किती होऊ शकतात? म्हणूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या याशी जोडून पाहिल्यावर लोकप्रिय कोर्सेसला मुकलेल्या मुलांना काय झेलावं लागत असेल याचा अंदाज बांधता येतो. मुलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आम्ही भरपूर मार खातो वगैरे आशा चर्चा होत राहतात. यासाठी वातावरण, सुविधा आणि आवश्यक पैसा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार करायला कोणाला सवड आहे कोणाकडे?

करिअरचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरायला तयार नाहीये. शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पिअर्सचे मोठे प्रेशर असते. अभ्यास केलाच पाहिजे, त्या कठोर शिस्तीतल्या परीक्षा दिल्याच पाहिजेत, चांगले मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजेत. मगच नोकरी मिळण्याची शक्यता असते. असे झाले तरच आयुष्याची इतिकर्तव्यता होते! यातून होतंय असं की, आपल्या देशातील आजचं तरुण मनं अभ्यासाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली दिसताहेत. मनातल्या मनात चरफडताहेत. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी त्यांची दारुण मनोवस्था आहे.

मुग्धा म्हणाली “बारावी सायन्सला फक्त केमिस्ट्रीचं पाचशे पेजेसचं पुस्तक आहे. हजारो वर्षांत फिजिक्समध्ये जे काही घडलेय, शोध लागलेत, ते आख्खं कंटेंट कंसेप्टसह आम्ही पोरांनी फक्त दोन वर्षांत कसे काय अभ्यासायचे? शिकवणारे शिक्षकही नीट समजून सांगण्याचे स्किल्स असलेले मिळतीलच असे नाही. अनेक प्राध्यापकांनाच कंसेप्टस क्लिअर आहेत का, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांना पोर्शन कंप्लिट करायचा असतो, बस्स. कधी लॅबमध्ये नीट प्रॅक्टिकल धड होत नाही. शिकवलेले मुलांना समजतेय की नाही? याचा विचार फारसा होत नाही. यात आम्हा मुलांच्या डोक्याचा पार भुगा होतो. पण आमची कोणाला काहीच पडलेली नाहीये. न्यूटन जन्माला आला नसता तर बरे झाले असते असे वाटते कधी कधी..!"

आपल्याकडे बारावीनंतरच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांवर मुलांचे ‘भविष्य’ ठरते. बारावीनंतरच्या JEE mains आणि advance याशिवाय अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची ‘नीट’ याशिवाय अन्य चांगल्या शैक्षणिक संस्था/महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा वेगळ्या. या निरनिराळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सध्याच्या शिक्षणाला समांतर अशी बाजारू शिक्षण व्यवस्था उभी राहिलीय. यात मुलांचे मानसिक, भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि पालकांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. काही लाख रुपये ओतले. मुलांना एकदा तिकडे घातले की, आपल्या मुलांचे करिअर बनून जाईल, अशी पालकांची अपेक्षा असते. यामुळे झालेय असे की, शहरांतील कनिष्ठ महाविद्यालये जवळजवळ ओस पडलेली दिसताहेत. या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेणारे गल्लाभरू कोचिंग क्लासेस सध्या जोरात सुरू आहेत. त्यातल्या काहींचा वर्षाचा टर्न ओव्हर पाचशे ते हजार कोटींच्या घरात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यापर्यंत यांची मजल गेली आहे! या इथल्या व्यवस्थेने मुलांना आणि पालकांनाही शब्दशः वेठीला धरले आहे.

“एखाद्या विषयात/शाखेत आवड असणं निराळं आणि त्या कोर्सला अॅडमिशन मिळवायला सीईटीसारखी अत्यंत टफ अशी एखादी इंट्रास एक्झाम क्रॅक करावी लागणं वेगळं. खरे तर ते एक टेक्निक असतं. काही मुलांना ते साधतं, स्मरणात ठेवून उत्तर लिहिता येते. काही मुलांची अक्षरशः वाट लागते. विषयातील आवड कोणच विचारत नाही. अशा वेळी खूप चिडचिड होते. त्रास होतो. पण आमचं ऐकतंय कोण." शुभम सांगत होता...

"मला चौथीपर्यंत शाळा शिकायला आवडायचं, पुढे शिकताना मी आनंदानं कधी शाळा/कॉलेजात गेली नाही!"
मनस्वीनी सांगते.

मुलांच्या मौनातला आकांत खरेच शिक्षक-पालकांना ऐकू येईनासा का झालाय ?  आपली कॉलेजेस, विद्यालयं भयालंय तर झालेली नाहीयेत ना? मुलांशी बोलताना प्रश्न पडतो आणि आता याचा गंभीर विचार करायची वेळ आता आलीये.

“आठवीपासून JEEची तयारी करणारा एक मुलगा या सगळ्यातून जाताना अपयश पदरी पडल्याने खूपच डिप्रेशनमध्ये गेला. पुढची दोन वर्षे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता...” धनेश सांगत होता.

राज्यस्थानातील कोट्यामध्ये या प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना अभ्यासाचे दडपण आणि कथित अपयशाने पछाडले आहे. तिकडे आत्महत्या वाढत आहेत. २०१५मध्ये १९ तर २०१६ मध्ये चार महिन्यांत पाच विद्यार्थ्यांनी आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवलीये. या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रविकुमार सुरपूर या कोट्याच्या कलेक्टर महोदयांनी तिथं कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तब्बल दीड लाख पालकांना आणि क्लास चालकांना भावनिक आवाहन करणारे पत्र अलीकडेच लिहिलेय.

‘अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रं वगळून इतर क्षेत्रं निवडण्याचा सल्ला त्यांनी मुलांना-पालकांना दिला आहे. जीवन खूप सुंदर आहे, आयुष्यात परीक्षा हेच सर्वस्व नाही!’ असेही त्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला अशाप्रकारची दखल घ्यावी लागणं म्हणजे ही एका अर्थाने ‘शैक्षणिक आणीबाणी’ नाहीतर काय आहे? परीक्षेला बसलेल्यांपैकी किती टक्के मुलांना अशा परीक्षांतून प्रवेश मिळतो, याचा विचार ना पालक करतात. ना त्याचे इथल्या धुरिणांना किंवा व्यवस्थेला काही घेणे देणे आहे.

एक अभ्यास असं सांगतो की भारतातले सुमारे पाच लाख मुलं JEE मेन्स ही प्रवेश परीक्षा देतात. त्यातले दहा हजार मुलं निवडले जातात, तेव्हा चार लाख ९० हजार मुलं ऑलरेडी बाहेर फेकले गेलेले असतात. राज्यातल्या २६ हजार कनिष्ठ महाविद्यालयांतून शिकणारी मुलं संख्येने किती आहेत आणि त्यांच्यासाठी एमबीबीएसच्या राज्यात सर्व मिळून जागा आहेत त्या २५ हजार! या रॅट रेसमध्ये मुलं स्वतःही सहभागी होतात, पण जास्तकरुन पालक ढकलतात! उसाचं टिपरु चरकात घातल्यावर त्याचं जसं चिपाड होतं तसं मुलांचं होताना दिसतं, हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही का?

मुलं ज्या घरातली आहे, तेच लोकं बघून घेतील, असा आपला त्रयस्थ दृष्टीकोन असतो. मुलं म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या देशाचं भविष्य आहे, त्यांना चांगल्या प्रकारे वाढवणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, असं आपल्याकडे मानलंच जात नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा मुलांना काही विचित्र प्रकारच्या निर्णयांमुळे त्रासाला सामोरे जावे लागते तेव्हा, आपली सबंध व्यवस्था याबाबत फारशी संवेदनशील नसल्याचा अनुभव वारंवार येत राहतो. अनेकदा तर केंद्र आणि राज्य सरकारं एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. तेव्हा खूप चीड, अस्वस्थता येते, वाईट वाटते. ‘तरुण आपल्या देशाचे बलस्थान आहेत,’ अशा बाता आपले कारभारी भाषणांतून मारतात. कृतीचा दुष्काळ मुलांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरतो. हे तरुण मन जर असे पोखरले गेलेले असेल, तर त्यांनी भविष्यात देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?

जीवनात सहजासहजी कोणाला काहीही मिळत नाही, हे खरेच आहे. आयुष्य अनपेक्षित घटितांनी भरलेले आहे. आयुष्याला सामोरे जाण्याची, संघर्ष करायची मुलांची तयारी असली पाहिजे. यात अजिबात दुमत नाही. मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्याच पाहिजेत, मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजे. नोकरी, उद्योग, व्यवसाय काहीतरी करुन जगायपुरते पैसे कमावलेच पाहिजेत, हे खरेय. पण त्यासाठी असा जुगार का खेळायला लागावा? इतकी जबर किंमत का मोजायला लागावी? आपले आयुष्य डावाला लावायला लागणे, ही म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्थेला लांच्छन आणणारी शर्मनाक गोष्ट आहे.

ज्या मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते, त्या ‘हुशार’ मुलांनाही परीक्षा नावाच्या कठोर व्यवस्थेची इतकी भीती का वाटावी? कारण अनिश्चितता आणि असुरक्षितता हीच जणू आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेने मुलांसाठी दिलेली ‘देण’ आहे. त्या भोवऱ्यात मुलं गोलगोल फिरत राहतात. अनेक मुलांच्या नाकातोंडात पाणी शिरून ते गटांगळ्या खात राहतात. आम्ही काठावर बसून ‘मला काय त्याचे’, म्हणत शांतपणे बघत असतो.

बरं आपल्याकडे JEE, NEET यासारख्या प्रवेश परीक्षा द्यायला केवळ दोन संधी दिलेल्या आहेत. त्यात दुसरी संधी घेतली की आधीचे मिळालेले मार्क्स पुसून जातात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत SAT, ACT यांसारख्या प्रवेश परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना सहा वेळा संधी दिली जातेच. शिवाय आधीच्या दिलेल्या परीक्षेतले तुलनेनं जे जास्त मार्क्स मिळालेत ते तिकडे ग्राह्य धरले जातात. गणित आणि भाषेची मुलभूत क्षमता तपासण्यासाठी आधी युरोपियन देशांत घेतली जाणारी PISA ही परीक्षा आता जगभरातल्या बऱ्याच देशांत घेतली जाते. जगभर नावाजलेल्या या परीक्षेत फिनलंड हा लहान देश जगभरात आघाडीवर आहे. या परीक्षेची तयारी करून घेताना फिनलंडमध्ये मुलांमागे ‘स्ट्रॉँग सपोर्ट सिस्टीम’ उभी केली जाते. आपल्याकडे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे अवघड नाहीये. पण गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची! मुलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या संवेदनशील मनाला आणि मेंदूला जपण्याचीही...

‘दुःख परीक्षा असण्याचं नाहीये. परीक्षा जरूर असाव्यात. वैताग त्यात नावीन्य नसल्याचा आहे. इतक्या मास स्केलवर मुलांचे मूल्यमापन करायला असे काहीतरी टूल लागणारच. आक्षेप त्याच्या स्वरूपावर आहेत. आपला अभ्यासक्रमही application based असायला हवा. रिसर्चसाठी पोषक वातावरणाची गरज आहे. थिअरीसोबतच प्रॅक्टीकल्सचं, प्रोजेक्ट्सचं महत्त्व वाढायला हवं. पण हा फक्त चर्चेचा विषय म्हणून काही काळ टिकतो, पुढे काय होतं आपल्याला माहितीच आहे!’ मुंबई विद्यापीठात शिकणारी अश्विनी सांगत होती...

अमुक इतके मार्क्स मिळाले म्हणजे अमुक कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल? कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं म्हणजे छानपैकी करिअर होईल? याविषयी मुलं आणि पालक यांच्यात प्रचंड संभ्रम आहे. या संभ्रमाची कडू गोड फळे (इच्छा असो अगर नसो!) मुलांना चाखावीच लागतात. बरं एक गंमत म्हणजे इतके सारे शिकायचेय ते तरी कशासाठी? तर दूर देशात किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय  कंपनीत मोठे पॅकेज देणारी नोकरी मिळावी यासाठी! जे शिकल्यावर नोकरी मिळते तितकेच शिकायचे असते! (कारण हा देश/समाज नोकरदारांचा आहे, हे ब्रिटिशांनी आधीच आपल्या समाजमनावर पक्के बिंबवलेय.) पैसा मोठा झालाय. आपण त्या दुष्टचक्रात फसलोत. फार मार्क्स नसले तरी तुम्ही आयुष्यात छान काही करु शकता, थोडे कमी पैसे मिळाले तरी मस्त आनंदात जगू शकता, हा विश्वास आपण मुलांना द्यायला हवा. पुढच्या काळात ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांचे नव्हे तर ज्यांचे आरोग्य चांगले असेल ते 'श्रीमंत' असतील, हे पण मनावर ठसवावे लागेल. मुख्य म्हणजे पालकांनी हे ठरवायला हवे की, आपल्याला कोणासोबत जगायचेय? मुलांनी आधी कमावलेल्या गुणांबरोबर आणि नंतर कमावलेल्या पैशांबरोबर की मुलांसोबत?

शेवटी असे आहे की, आपली मुलं शिकत असताना ‘मार्क्स मशीन्स’ आणि कमावती होतात तेव्हा ‘मनी मशीन्स’ नसतात.... एकदा पैसे आले की, मग पुढे तेच पाश्चिमात्यांचे आंधळे अनुकरण सुरू होते. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, ते चंगळवादी पर्यटन, त्या लखलखीत्या चंदेरी दुनियेत जगणं. पुढे जाऊन आयुष्याच्या एका टप्प्यावर यातला फोलपणा लक्षात येतो. ताणतणाव, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात. तेव्हा बराच उशीर झालेला असतो, तेव्हा पश्चाताप करणं, दु:खी होणं, माघारी फिरणं...  (म्हणजे याला अपवाद असू शकतील.) मग स्वभाविकच करिअर म्हणजे काय, असा प्रश्न पडतोच. तिकडे दूर अमेरिकेत आर्थिक मंदी येते त्यांचे परिणाम इथल्या मुलांच्या करिअरवर आणि एकूण अर्थकारणावर होत राहतात.

वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा आवडीच्या क्षेत्रात काम करते. तेव्हा ती आपल्यातले जे बेस्ट आहे ते त्यात ओतत असते. पण आपल्याकडे असे आहे की अनेकांचा आवडीचा विषय एक असतो आणि उत्पन्नाचा विषय भलताच! यातून एकूण समाजातल्या बौद्धिक वैभवालाच ग्लानी येण्याची शक्यता असते. यामुळं आपल्या ज्ञान परंपरेचेही मोठे नुकसान झालेय. मान्य आहे की, ज्ञान मिळवण्यासाठी शिकणे, ही वंचित घटकांतील अनेक कुटुंबांतल्या मुलांसाठी 'चंगळ' असू शकेल! जागतिकीकरणासोबत आलेल्या बाजारव्यवस्थेचे आपत्य असलेला हा करिअरवाद सगळीकडे बोकाळलाय. बाजार माणसाला माणूस म्हणून ओळखतच नाही. वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ म्हणून ओळखतो. त्याचे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक परिणामही झाले आहेत.

आपली प्राचीन कोणती ती 'ज्ञान परंपरा' वैभवशाली होती, असे खुपदा सांगितले जाते, हे म्हणणे ठीक. पण हा इतिहास ती किती दिवस उगाळत बसायचा? वर्तमानात तुम्ही काय करत आहात, त्यातून नवा इतिहास रचला जातो, याचे भान ठेवायला नको? आणि आपले वर्तमान अस्वस्थ करणारे आहे, हे निश्चित.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये बहूतेक भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ काम करतात, त्यांना अमुक इतके पॅकेज मिळते वगैरे वगैरे... या गोष्टींचा वृथा अभिमान काय बाळगायचा? कारण त्यांच्या शिक्षणावर इथल्या सरकारने, समाजाने खर्च केलाय. ते तिकडच्या देशात जाऊन कुठल्यातरी कंपनीचा नफा वाढवायला हातभार लावत आहेत! त्यांचे ज्ञान, कौशल्य या देशाला विकासाकडे नेण्यासाठी उपयोगी पडायला हवे. मात्र तसे होत नाहीये.

मुलभूत विज्ञान संशोधनात तर आनंदी आनंद आहे. सरकार याविषयी गंभीर कधी होणार, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. नोबेल पारितोषिके मिळालेल्या शास्रज्ञांमध्ये किती भारतीय संशोधकांची नावं आहेत? जागतिक कीर्तीचे कलावंत, ऑलिंपिकमध्ये पदके जिंकलेले खेळाडू, लेखक-साहित्यिक, उद्योग-व्यापारात नाव कमावलेले लोकं किती आहेत? याचे कारण आमच्याकडे गुणवत्ता असलेली मुलं अल्पसंतुष्ट किंवा स्वार्थी तरी आहेत. नाहीतर त्यांची बौद्धिक झेपच तितकीशी मोठी नाही! म्हणूनच आपल्याकडे ज्याला गुणवत्ता म्हणतात त्याचाच नीट विचार व्हायला हवा. कोणी याला मोघम विधानही म्हणेल. पण जे चित्र दिसते, त्याचे विश्लेषण करू जाता हेच वास्तव समोर उभे ठाकते. याविषयी कधी तरी बोलायला हवे. कारण शोधांनी, संशोधनाने जग बदलते. याकडे डोळेझाक करता कामा नये. ती आपणच आपली केलेली फसवणूक होईल.

करिअर म्हणजे काय तर आधी म्हटल्याप्रमाणे दूर शहरात किंवा परदेशात जाऊन नोकरी करणे आणि पैसे कमावणे, अशी आपली ठाम समजूत आहे. आजही हा देश खेड्यांचा आहे, याचे भानच उरलेले नसल्याने शहरांकडे बेकारांचे लोंढेच्या लोंढे जाताना दिसत आहेत. तिकडं नीट काम मिळत नसल्यानं शहरांवरील भार आणि बकालीकरण वाढत आहे. नागरी सोयी-सुविधांवर भलता ताण येत आहे. या तरुणांच्या हाताला हाताला काम मिळाले असते तर स्थलांतर रोखणे शक्य होऊ शकतं. याशिवाय ग्रामीण विकासाला हातभार लागेल. शेतीतील अन्न धान्य आणि इतर जीवनावश्यक उत्पादनं सर्वांना हवी असतात. ती उत्पादित कोणी करायची? आज शेती करायला तरुण धजावत नाहीत. कारण हातानं काम करणारे लोकं आम्ही हलकट लेखतो. डोक्यानं काम करणारे लोकं सर्वच अर्थानं श्रेष्ठ असल्याचं आपली व्यवस्था मनावर बिंबवत राहाते. आपल्या मूल्य व्यवस्थेच्या मोजपट्ट्याही तसंच अधोरेखित करत असतात. प्रतिष्ठा कोणाला, कशाला द्यायची याचा विचार करताना आपल्या एकूण मूल्यव्यवस्थेला देखील काही प्रश्न विचारावे लागतील.

वास्तविक आपल्या गावाची गरज ओळखून अनेक सेवा, उद्योगांच्या वाढीला, विस्ताराला आज मोठा वाव आहे. बँकांचे कर्ज उपलब्ध आहेत. पण अशा गोष्टी करायला आम्ही मुलांचं मानस घडवलं कुठंय? एकीकडे उद्योगांना, सेवा क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीये आणि दुसरीकडे तरुणांच्या हाताला काम नाहीये, अशा विचित्र कोंडीत आपण सापडलो आहोत. यासाठी करिअरच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे लागेल. करिअर या कंसेप्टकडे व्यापक अर्थाने बघायला मुलांना शिकवावं लागेल.

आज समाजाला उपयोगी पडेल, असे संशोधन करणे किंवा तत्सम काहीतरी सामाजिक स्वरूपाचं काम करणे या गोष्टीला कथित यशस्वी करिअरमध्ये जागाच नाहीये. करिअरीस्टीक मुलं परीक्षार्थी बनून जगतात. अभ्यास एके अभ्यास करताना झापडबंद नजरेने आयुष्याकडे, समाजाकडे बघत असतात. अशा अनेक मुलांचं एकूण व्यक्तिमत्त्व सुमार दर्जाचे असल्याचे दिसते.

शेवटी असे आहे की, भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांतून वैयक्तिक कुटुंबाचा उत्कर्ष जरूर होऊ शकेल. पण ज्या देशाने/समाजाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला असतो त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी गोष्टी करायचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवाये. आज तो होताना दिसत नाहीये, याचा खेद वाटतो. नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थशास्रज्ञ अमर्त्य सेन म्हणतात की, ‘आपल्याकडील ज्ञान, कौशल्य आपल्या अवतीभोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी, उत्थापनासाठी उपयोगी पडत नसेल तर ते कुचकामी ठरेल.”

*भाऊसाहेब चासकर,*
९४२२८५५१५१.
bhauchaskar@gmail.com
(लेखक जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रातील  कार्यकर्ते आहेत.)

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...