Pages

Showing posts with label शिक्षण. Show all posts
Showing posts with label शिक्षण. Show all posts

Monday, September 11, 2017

कर्तव्यनिष्ठ 10 शिक्षक

भारतातील असे १० शिक्षक ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळा घडवली.
मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचं मोठं महत्त्व आहे. हे महत्त्व मुलांना समजावं यासाठी दोघांची भूमिका प्रमुख असते. एक मुलांचे आई-वडिल जे त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देतात आणि दुसरे शिक्षक. जे मुलांमध्ये अभ्यासाबाबत गोडी निर्माण करतात. या दोन्हीपैकी एकानंही सूट दिली तर त्याचा परिणाम हा मुलांवर होतो. मुलांचं भविष्य कमकुवत होऊ शकतं. मुलांना प्रेरणा देणाऱ्या काही शिक्षकाचा हा थक्क करणारा प्रवास आहे.

1)बाबर अली
सध्या त्याचे वय २१ वर्ष आहे त्याने शिक्षकी पेश्याची सुरवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. वयाच्या १५ व्या वर्षी तो शाळेचा मुख्याध्यापक झाला तेव्हा ३०० विद्यार्थी आणि ६ शिक्षक त्याच्या शाळेवर कार्यरत होती. त्याच्या मते जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर पैसा,वय,सुविधा ह्या गोष्टी दुय्यम आहे.

2)आदित्य कुमार
जिथे कोणीही पोहचत नाही तिथे तो शिक्षण गंगा घेऊन जातो.
आदित्य कुमारला लोक सायकल गुरुजी म्हणून ओळखतात. रोज ६० ते ६५ किमी अंतर तो सायकल वर फिरतो. आणि लखनो भागातील झोपडपट्टी मधील मुलांना मोफत शिक्षण द्यायचे काम तो अविरत १९९५ पासून करत आहे.

3)अरविंद गुप्ता
आनंददायी शिक्षण देणारा शिक्षक
टाकाऊ वस्तू पासून खेळणे बनविण्याकरिता अरविंद गुप्ता प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यत वेगवेगळे शैक्षणिक साहित्य टाकाऊ वस्तूपासून बनविले आहे. त्याचे हे विडीओ तुम्ही youtube वरही बघू शकता. प्रत्येक घटनेमागील वैज्ञानिक कारण काय आहे हे तो या कृतीतून दाखवितो.

4)राजेश कुमार शर्मा
शिक्षण देण्याकरिता इमारतीची गरज नाही हे सांगणारा शिक्षक
राजेश कुमारची शाळा दिल्ली येथील उडान पुला खाली भरते. झोपडपट्टीतील मुलांना येथे तो शिक्षण देतो. पुला खालील शाळा म्हणून लोक त्या शाळेस ओळखतात जवळपास २०० विद्यार्थी येथे शिकतात. २००५ पासून त्याचे हे काम अविरत सुरु आहे.

5)अब्दुल मलिक
रोज शाळेत पोहत जाणारा शिक्षक…केरळमधल्या मल्लापूरममधल्या पडिजट्टुमारी अब्दुल मलिक. ४२ वर्षांचे मलिक हे येथील मुस्लिम निम्न प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते शाळेत पोहत जातात. त्यांच्या शाळेत रस्त्यानंही जाता येतं. पण तो मार्ग आहे २४ किलोमीटर. या २४ किलोमीटर लांब खराब रस्त्यावरुन शाळेत जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात अब्दुल घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी पोहत परतही येतात. या सर्व दगदगीमध्ये त्यांनी आजवर शाळेतून एकदाही रजा घेतलेली नाही. हे विशेष.

6)प्राध्यापक संदीप देसाई
भिक मागून विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक
मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये हा रोज लोकांना भिक मागतो. कारण फक्त एक त्याच्या श्लोक या संस्थेमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे.

7)रोशनी मुखर्जी
इंटरनेट च्या माध्यमातून शिक्षण
ExamFear.com या वेबसाईट वर ती विडीओ अपलोड करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देते. नाही का हा इंटरनेटचा प्रभावी वापर.

8)विमल कौर
वय हा केवळ एक अंक आहे.
८० वर्षीय हि शिक्षिका आजही दिल्ली येथी मदनपुर खदर येथील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. तिचे हे काम मागील २० वर्षापासून सुरु आहे. गावतील शिक्षक नसल्यामुळे तिने हा निर्णय घेतला. सरिता विहार जवळील विद्यार्थी घेऊन तिने हे कार्य सुरु केले. तिला शिकवायला कुठलीही इमारत नाही तरी तिचे हे कार्य सुरु आहे.

9)कमलेश झापडीया
शिक्षण हि एक बहुमुल्य देणगी आहे. कमलेश रोज २० किमीचा प्रवास करत त्याच्या विद्यार्थ्या पर्यंत पोहचतो त्याने Edusafar नावाची वेबसाईट सुरु केलेली आहे. कोडे तयार करून तो विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्या वेबसाईट वर वर्ग १ ते १० पर्यंत विषयाचे सर्व कोडे मिळतील. कोण बनेगा करोडपती प्रमाणे हा खेळ असतो.

10)शेवटचा शिक्षक हा थोडा वेगळा आहे कारण इथे विद्यार्थीच शिक्षक आहे. आणि सोबतच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. लदाख भागात हि शाळा चालते.

ह्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Monday, August 7, 2017

एक बिनभिंतीची शाळा

एक बिनभिंतीची शाळा...शिक्षण हे माणूस घडणीचे ..आयुष्याला आकार देणारे

सर्वच विषयांत नापास होणारा तरूण चालवत आहे.

या शाळेला भिंती नाहीत, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, परीक्षा नाही आणि पास नापासाचे मापदंडही नाहीत. खेळा आणि फक्त खेळा अस म्हणणारी ही शाळा दर शनिवारी भरते. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलात. तिच नावच आहे 'स्कूल विदाउट वॉल्स' बिनभिंतीची शाळा.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा करणाऱ्या आजच्या व्यवस्थेत साताठ तरुणांनी आपल्या पातळीवर शिकण्याची व्याख्या बदलण्याच ठरवल आणि उभी राहिली एक बिनभिंतीची शाळा. परिस्थितीशी जुळवून हवे ते साध्य करणारा तरुण म्हणजे पंकज गुरव. बारावीमध्ये जवळपास सर्वच विषयांत नापास होणारा हा तरूण आज येऊर मध्ये लहान मुलांमध्ये बिनभिंतीची शाळा चालवत आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करून आलेले सामाजिक भानच त्याच्यासाठी दिशादर्शक ठरले.

चिरागनगर इथल्या वस्तीत राहणारा पंकज गुरव 'समता विचारक संस्थे'च्या विविध उपक्रमांमध्ये २००२ पासून काम करत होता. गावाभेटीच्या उपक्रमातून विविध गावांच्या समस्यांची जाणीव पंकजला झाली. ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगळे काम करण्याचा निश्चय त्याने केला.येऊर गावात पंकजने बिनभिंतीची शाळा सुरू केली. खेळ, नाटक, नृत्य आणि अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम या शाळेत घेतले जातात. मात्र यातून मिळणारे शिक्षण हे माणूस घडणीचे आणि आयुष्याला आकार देणारेच असते.कोणत्याही साहित्याशिवाय स्थानिक खेळांवर भर असतो. मात्र खेळांतून शिक्षण कस देता येइल, भूगोल, गणित वगैरे विषयांशी जोडण्यावर भर असतो.

ठाण्यापासून इतक्या जवळ असूनही या मुलांचा शहरी संस्कृतीशी कोणताही परिचय नाही. शाळेत येण्यापेक्षा आई-वडिलांबरोबर जंगलात जाण, त्यांना कामात मदत कारण, धाकट्या भावंडांना सांभाळण, जंगलात रहात असल्यामुळे जनावरांच्या भीतीने लवकर घरी जाण या त्यांच्या सहाजिक गरजेच्या गोष्टी.शाळा सुरू झाल्यापासून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. पाचवीत शिकणाऱ्या मुलाला स्वत:चे नावही लिहिता येत नाही अशी परिस्थिती होती. अशा मुलांना अक्षर ओळखण्याचे शिक्षण देण्यात आले.

ठाण्यातील अभिनव उपक्रमात  शाळेच्या मुलांचा सहभाग असतो आणि त्यात त्यांनी पारितोषिके मिळवली ज्याचे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांनी खूप कौतूक केले आणि मुलांना प्रोत्साहन दिले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या पंकजने अशाच वर्गातील मुलांसाठी उचललेले हे पाउल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

Thursday, February 2, 2017

नई तालीम

महात्मा गांधींच्या शिक्षण विचारावर व त्या आधारे सुरू असलेल्या शाळेवर आज मी सकाळ च्या  सप्तरंग पुरवणीत लेख लिहिला आहे
नई तालीमः काळाच्या पुढचा शिक्षणविचार (हेरंब कुलकर्णी)

‘नई तालीम’ हा महात्मा गांधी यांचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता; पण सरकारनं हा विचार पाहिजे तितक्‍या प्रभावीपणे अमलात आणला नाही. ‘नई तालीम’ पद्धतीच्या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी-ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज ‘बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ’ आणि ‘कष्ट करणारा कमी दर्जाचा’ असं समीकरण आहे व त्याआधारे पगार दिला जातो. गांधीजींची शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवली गेली असती, तर हा प्रकार कमी झाला असता. आता तरी नव्या शैक्षणिक धोरणात ‘नई तालीम’ स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गांधीजींच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्‍टोबर) विशेष लेख...

‘मी जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी’ असं वर्णन महात्मा गांधी यांनी ‘नई तालीम’ या त्यांच्या शिक्षणपद्धतीचं केलं होतं. आजच्या (२ ऑक्‍टोबर) गांधी जयंतीनिमित्त या शिक्षणपद्धतीवर चर्चा व्हायला हवी. सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी ‘नई तालीम’ हे साधन आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. त्यांची ही शिक्षणपद्धती सरकारनं स्वीकारली नाही, हे दुर्दैव. स्वीकारली असती तर आज भारत हे आगळवेगळं राष्ट्र बनलं असतं. आज बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कौशल्याधारित शिक्षण मिळेनासं झालं आहे. गरिबांविषयीची कणव वेगानं हरवत चालली आहे. अशा वेळी गांधीजींच्या या शिक्षणपद्धतीची तीव्रतेनं आठवण येते.

वर्धा ः सेवाग्राम इथं पुन्हा सुरू झालेल्या ‘आनंदनिकेतन’ या ‘नई तालीम’ धर्तीवरच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाणारे विविध उपक्रम.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी तिथल्या आश्रमात असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचं चिंतन विकसित झालं. १९३७ मध्ये काँग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा इथंल्या शिक्षण संमेलनात गांधीजींनी पायाभूत शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रवींद्रनाथ टागोरांसोबत काम केलेल्या आर्यनायकम दांपत्यानं शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्ध्यात तसंच भारतात बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, काश्‍मीर अशा अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या. १९५६ मध्ये २९ राज्यांत ‘नई तालीम’ पद्धतीच्या ४८ हजार शाळा होत्या आणि त्यांत ५० लाख मुलं शिकत होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गांधीजींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता; परंतु हा शिक्षणविचार आधार मानून शासनानं शिक्षणरचना न केल्यानं या शाळा बंद पडत गेल्या व आज भारतात ‘नई तालीम’ पद्धतीच्या केवळ पाचशेच शाळा सुरू आहेत.

महात्मा गांधी ः ‘नई तालीम’ हा गांधीजींचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता.

गांधीजींनी ‘नई तालीम’ची प्रमुख चार तत्त्वं मांडली होती. १) प्राथमिक शिक्षण हे सात ते १४ या वयोगटाचं असेल २) शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातल्या लोकांच्या मुख्य व्यवसायातला असावा ३) सर्व विषयांचं शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिलं जावं ४) असं दिलं जाणारं शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावं; याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते; पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला होता. ‘जीवनाकडं बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ या दृष्टिकोनातून गांधीजी सफाईकडं पाहत असत. सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामं करणाऱ्यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता समान भाव निर्माण होईल, हे अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे आहारशास्त्रामुळंही ‘स्वयंपाक हे केवळ महिलांचं काम’ असं मुलांना वाटू नये, त्यातलं विज्ञान मुलांना नकळत कळावं, तसंच ‘नई तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण’ एवढाच संकुचित अर्थ नसावा, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जावं, असं गांधीजींना अपेक्षित होतं. वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यातली भूमिती, कापसाच्या निर्मितीमधलं विज्ञान, वस्त्रनिर्मितीमधल्या अर्थकारणातलं अर्थशास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणाऱ्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत, असं गांधीजींना अपेक्षित होतं. या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी असा भेदभाव नसलेला, बुद्धीचं काम व श्रमाचं काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधीजींची दृष्टी होती. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तव जगण्याशी संबंध जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात ः ‘भारतीय समाजातल्या दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न गांधीजी करत होते. शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही त्यांचा भर होता. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत, कला, सण-उत्सव यांचा समावेश असावा, असं ते म्हणत.’

वर्धा ः ‘आनंदनिकेतन’ या शाळेतली सूत कातणारी विद्यार्थिनी.

अनुभवातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगीण शिक्षण दिलं जातं, हे आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून सिद्ध होत आहे. हे संशोधन तेव्हा झालेलं नसतानाच्या काळात गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी ही मांडणी केली होती. हे त्यांचं द्रष्टेपणच होतं.

आजही शिक्षणाचं स्वरूप गरीब-श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारं, समान शिक्षण नाकारणारं, शिक्षणाचा व्यापार वाढवणारं असंच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तिकेंद्रितता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्‍न, श्रमाकडं व श्रमकर्त्याकडं बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता ‘नई तालीम शिक्षणपद्धती’ हेच त्यावरचं उत्तर वाटतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत सगळ्यांनीच फेरविचार करणं आवश्‍यक आहे.

या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे, ती या शिक्षणातून कमी झाली असती. नव्या शैक्षणिक धोरणात नई तालीम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

------------------------------------------------------------------
आनंदनिकेतन ः ‘नई तालीम’ची पुन्हा सुरवात
वर्धा इथल्या आश्रमात ‘नई तालीम’ची शाळा १९७० च्या दशकात जिथं बंद पडली होती, तिथंच ती २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या इथल्या संचालक आहेत. या शाळेची विद्यार्थिसंख्या २४० आहे. सर्व सामाजिक गटांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही, हे इथं कटाक्षानं पाहिलं जातं.

‘प्रीती’, ‘मुक्ती’ आणि ‘अभिव्यक्ती’ हा या विद्यालयातल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा आधार आहे. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रं यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह मुलं वस्त्रं विणतात. कला, संगीत यावर विशेष भर असतो. सामाजिक विषयांवर सतत बोललं जातं व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड करायला शिकवलं जातं. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिवाळी भाज्यांची लागवड व देखभाल करायलाही शिकवलं जातं. हे काम करत असताना जमिनीचं मोजमाप व परिमिती काढणं, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणं, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करत बागेची रचना करणे आदी गोष्टीही इथली मुलं शिकली आहेत. विविध ऋतूंमधलं किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतल्या पाण्याची पातळी यांचं मोजमाप, नोंदी ठेवणं, आलेख काढणे हेही इथं सहज शिकता येतं. गांडूळखत, कंपोस्टखत तयार करणं, द्रवरूप झटपट खत करणं, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणं, मित्रकीड, नुकसान करणारी कीड आदींची तोंडओळख, मधमाश्‍या व कीटकांचं निसर्गातलं महत्त्वाचं स्थान समजून घेणं, अहिंसक पद्धतीनं मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय, अळिंबीची शेती करण्याची पद्धत अशा बाबी इथली मुलं शिकतात. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलाला संधी मिळते; ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचं शास्त्र आदींचे धडे इथली मुलं शिकतात. यातून स्वावलंबन व लिंगसमभावाचं महत्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण तयार करणं शक्‍य होतं. आज शिक्षणशास्त्रात ‘ज्ञानरचनावाद’ या पद्धतीत शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानण्यात आलेली आहे. ‘नई तालीम’ ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्यं विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी-पालकांनी ही शाळा बघायला हवी.
------------------------------------------------------------------
अभय बंग ः ‘नई तालीम’ शाळेचे विद्यार्थी
डॉक्‍टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नई तालीम’चे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धत समजून घेतली. ते म्हणाले ः ‘‘शेतकरी-मजूर कसे जगतात, याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी ही पद्धत होती. दिवसभरात तीन तास उत्पादककाम करणं सक्तीचं होतं. सूतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालयसफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणं ही कामं प्रत्येक जण करत असे. आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलं मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन समजून देत. आकाशातले तारे दाखवले जात, तर कधी झाडावर चढून कवितेचं पुस्तक आम्ही वाचत असू. ‘कालच्या पेक्षा तू आज पुढं सरकलास का?’ असा महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन परीक्षेत होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव,’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसं कराल?’ असे प्रश्‍न विचारले जात... स्वयंपाकानंतर भांडी घासण्याचीही कामं करावी लागत असत.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्‍न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचं आकलन तपासत...
टॉलस्टॉयच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक अंध म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत, त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटतं, ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी. ‘नई तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण, शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही, तर शेतकऱ्यांचा सन्मान करायला शिकलो, त्यामुळं ती जीवनदृष्टी आहे.

‘नई तालीम’चं आकर्षण वाढत आहे ः बरंठ
‘‘देशभरात वेगवेगळ्या राज्यांत आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा ‘नई तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणं, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे,’’ असं ‘नई तालीम’ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘नई तालीम’कडं आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून, सर्वोदयी समाजरचनानिर्मितीचं साधन म्हणून पाहतो बघतो.’’ http:/www.naitalimsamiti.org/ ही समितीची वेबसाइट असून, http://www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या शिक्षणविचारावर प्रभावीपणे काम करत आहे

हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१)

Monday, October 3, 2016

बेअरफुट काॅलेज, तिलोनिया



जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

Saturday, October 1, 2016

इ.१ली ते ८वी विषय प्रकल्प यादी

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*
*संकलन - शरद कोतकर*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.


*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.


*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.


*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.


*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Monday, September 26, 2016

मुलांना काही सांगायचंय

मुलांना काही सांगायचंय...

वैशाली गेडाम

```Maharashtra Times | Sep 25, 2016, 03.00 AM IST```

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत सरकारने प्रसिद्ध केलेल्या टिपणावर सर्व संबंधित घटकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या मुलांसाठी हा सारा खटाटोप आहे, त्यांना काय वाटते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मुदलीयार आयोग १९५२-५३, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८, (कोठारी आयोग) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ यामधून आपण मुलांच्या यशस्वी शिक्षणाची व भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघितली आहेत. कोठारी आयोगाच्या अहवालातील 'भारताचे भवितव्य वर्गाखोल्यांतून घडत आहे' हे वाक्य अंगावर रोमांच आणणारे आहे. खरेच कोणत्याही देशाचे भवितव्य त्या देशाचे शिक्षण कसे आहे, मुले शाळेत काय शिकत आहेत यावर अवलंबून असते. काळानुरूप शैक्षणिक धोरणांचा पुनर्विचार होणे आणि त्यात योग्य ते बदल व नवीन संकल्पनांचा, घटकांचा, विषयांचा समावेश होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण साकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
मुलांबाबत धोरणे आखताना मुलांना नेमके काय हवेय, मुले काय विचार करतात, याचा कधी विचार केला गेलाय का, असा प्रश्न पडतो. मुलांबाबतचे सर्वच निर्णय मोठी माणसे घेऊन मोकळी होतात. आपण जोपर्यंत मुलांना पूर्णपणे समजून घेत नाही, तोपर्यंत मुलांच्या हिताचे निर्णय आपल्या हातून होणे शक्य नाही. प्रत्येक वेळी मुलांच्या मताचा आदर करून, स्वातंत्र्य देऊन व सोयीसुविधा देऊन शिकण्याची संधी दिल्याने मुले किती प्रतिभावान, कल्पक, आत्मविश्वासाने परिपूर्ण होतात, ते मी गेल्या १९ वर्षांत शिक्षिका म्हणून अनुभवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्यांच्या मतांचे, कल्पनांचे, इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे या हेतूने मी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कल्पना माझ्या शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दिली. त्यावर चर्चा केली. मुलांना काही प्रश्न विचारून त्यावर त्यांची मते, विचार मांडायला सांगितले. मुलांनी मांडलेली मते, विचार आपल्याला विचार करायला भाग पडणारी आहेत.
मी मुलांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६ च्या प्रस्तावित आराखड्यामधील प्रकरण ४ मधील मुद्द्यांना अनुसरून पुढील प्रश्न विचारले : शाळा कशी हवी? शिक्षक कसे हवेत? अभ्यास कसा हवा? पाठ्यपुस्तके कशी हवीत? तुम्हाला कोणते विषय महत्त्वाचे वाटतात? शिक्षण कोणत्या भाषेत हवे? मुलांना नापास करावे काय? नापासाबाबत तुमचे मत काय? परीक्षेबाबत तुमचे मत काय?

*यावर मुलांनी मांडलेली मते, विचार असे :*
आम्हाला मुळीच न मारणारे, मुळीच न रागावणारे, आमच्यावर प्रेम करणारे, आमच्यावर विश्वास ठेवणारे, चांगले वागणारे व आम्हाला समजून घेणारे शिक्षक पाहिजेत. शिक्षकांनी रागावल्यावर मुलांची शिकण्याची इच्छा कमी होते. शिक्षा न करण्याचा कायदा झाला, तरी आम्हाला शिक्षा होते. मुलांच्या डोक्यात चांगला विचार यावा म्हणून त्यांना घरी किंवा शाळेत त्रास देऊ नये. घरी आई-बाबा रागावल्यास शाळेत गेल्यावर मुलाचे शिक्षणाकडे मुळीच लक्ष लागत नाही आणि डोक्यात घरचाच विचार सुरू राहतो. त्यामुळे आई-वडिलांना समजावून सांगावे. आई-वडिलांना समजावून सांगण्याचं काम शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आहे आणि शिक्षकांना समजावून सांगण्याचे काम सरकारचे आहे. शाळेत आम्हाला दुपारी दोन वाजता पोषण आहार मिळतो. मात्र, त्यापूर्वी १२ वाजता आम्हाला भूक लागलेली असते. त्यामुळे आम्हाला दोन वेळ खायला पाहिजे. आम्हाला दररोज एक फळ खायला मिळावे असे वाटते.

मुलांचे आणखी काही मुद्दे असे : शाळा मजबूत बांधलेल्या असल्या पाहिजेत. आमची शाळा पावसाळ्यात गळते. शिक्षक गावात राहिले पाहिजेत. शाळेत वाचनालय पाहिजे आणि ते पूर्ण दिवसभर सुरू पाहिजे. म्हणजे जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेथे जाता आले पाहिजे. शाळेचे गेट सदैव उघडे पाहिजे. वाटेल तेव्हा शाळेत जाता आले पाहिजे. आम्हाला परिपाठ बिलकुल आवडत नाही. कोणतीच आणि एकच एक प्रतिज्ञा व प्रार्थना आमच्याकडून रोजच्या रोज म्हणवून घेतल्या जाऊ नयेत. आम्हाला खेळायला खूप म्हणजे खूपच आवडते. आमच्या शाळेला आणि आमच्या गावात सुद्धा आम्हाला खेळायला क्रीडांगण नाही. प्रत्येक शाळेत क्रीडांगण असलेच पाहिजे. खेळाचे साहित्य आणि खेळ शिकविणारे शिक्षक असले पाहिजेत. खेळाला खूप महत्त्व दिले पाहिजे. दिवसभर शाळेतच, एकाच वर्गात बसून शिकवू नये. आम्हाला कोंडल्यासारखे वाटते. आठव्या वर्गापासून शाळेत एक, दोन तरी शिक्षिका असल्याच पाहिजेत. काही शिक्षकांची नजर चांगली नसते. ते मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहतात. मुलींना ते कळते. मुलींना हे आवडत नाही. त्यामुळे काही मुली जीव देतात. काही मुलींवर बलात्कार होतात. असे होऊ नये. मुलामुलीत भेदभाव करू नये.
शालेय शिक्षणाच्या फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना मुलांनी दिलेला प्रतिसाद असा होता : शिक्षक खूप हुशार पाहिजेत. आम्हाला विषय समजेपर्यंत त्यांनी तो समजावून दिला पाहिजे. चौथ्या वर्गापासून खूप अभ्यास असतो. तो आम्हाला समजत नाही. लक्षात राहत नाही. गणिताचा अभ्यास खूपच जास्त असतो. जगातले कोणतेही गणित आम्हाला शिकवा; पण एका वर्षात खूप सारे आमच्या डोक्यात भरण्याचा प्रयत्न करू नका.
इंग्रजी भाषा सोपीकडून कठीणकडे शिकवली पाहिजे. इतकी पुस्तके पाठविण्याची काय गरज आहे? भाषा आम्ही परिसरातून व वाचनालयातील पुस्तकातून शिकू शकतो. पुस्तक पाहूनच वाचायची इच्छा होत नाही; कारण पुस्तकात बारीक अक्षरे असतात. दिवसातून दोनच विषय शिकवावेत; पण समजण्यालायक शिकवावे. परीक्षेत पुस्तकातील माहिती विचारू नये.
शिक्षण हक्क कायद्याद्वारे सध्या आठवीपर्यंत नापास केले जात नाही. त्यात आता बदल करण्यात येणार आहे. त्याबाबत मुले म्हणतात : नापास करू नये. आम्हाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून मुले नापास होतात. काही मुले नापास झाल्यावर शाळा सोडून देतात. एकदा नापास झाल्यावर पुढे शिकण्याची इच्छा जागृत होत नाही. काही मुले आत्महत्या करतात. मुलींचे लग्न लवकर केले जाते. नापास मुलांना घरकामाला जुंपले जाते. आई-वडील मारतात, शिव्या देतात. नापास झाल्यावर काही तरी करण्याची इच्छा मरून जाते.
परीक्षेबाबत मुले काय म्हणतात, याचाही वेध घेतला. परीक्षा म्हणजे काय हेच समजले नाही, तर परीक्षा कठीण आहे की सोपी आहे हे आम्हाला कसे कळणार? आणि परीक्षा म्हणजे काय हेच माहीत नसले, तर आम्ही परीक्षा कशी देणार? आपण शिकतो तीच परीक्षा असते. परीक्षा कधीच संपत नाही, अशा प्रकारचे मत विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत मांडले.
याखेरीज मुलांनी मांडलेले इतर मुद्दे : शाळेला शेती पाहिजे. भाजीपाला, फळे यांचे उत्पादन आम्ही शाळेत करू शकलो पाहिजे. गावातील समस्या सोडविण्यात शाळेने पुढाकार घेतला पाहिजे. त्यात मुलांचा सहभाग असला पाहिजे व हे शिक्षणातूनच शिकविले पाहिजे. आम्हाला पुस्तके सुटसुटीत आणि लवकर समजतील अशी व आकर्षक पाहिजेत. वर्षभर एका विषयाचे एकच पुस्तक नकाे. एका विषयासाठी वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळाली पाहिजेत. आम्हाला सहलीला जावे वाटते; पण आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आम्ही सहलीला जाऊ शकत नाही. इतिहास विषय आम्हाला इतक्या लवकर शिकवू नये असे आम्हाला वाटते. गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय महत्त्वाचे आहेत. खेळ, नृत्य, गायन, चित्र, शिल्प, अभिनय वगैरे विषय तर शिकविण्यातच येत नाहीत. आम्हाला हे विषय शिकायला खूपच आवडतात. आणि हे विषय पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष शिकवावेत. हे विषय शिकविण्यासाठी खास शिक्षक असावेत. आठव्या वर्गापासून शरीराबद्दल माहिती असावी.
आपल्याच भाषेतून शिकवले पाहिजे. कारण आपल्या भाषेतून आपल्याला छान समजते. आमच्या गावातील काही छोटी छोटी मुले अंगणवाडीत जाण्याऐवजी इंग्रजी शाळेसाठी बाहेरगावी जाणेयेणे करतात. ते त्यांना लांब होते. असे होऊ नये. मुलांना त्रास होतो, हे मुद्देही मुलांनी आवर्जून मांडले. कितीही चांगले धोरण आखले, तरी मुले म्हणतात त्या मूलभूत गोष्टींचा विचार न केल्यास ते यशस्वी होणार नाही, हे यावरून स्पष्ट होते.

(ले‌खिका चंद्रपूर जिल्ह्यातील मसाळा (तुकूम) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षिका आहेत.)

Sunday, September 18, 2016

शैक्षणिक आत्मभान

शैक्षणिक आत्मभान

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत

फरीदा लांबे | September 17, 2016 1:16 AM



‘‘वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक- सामाजिक स्थितीतल्या फरकातूनच मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली आणि शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. ग्रामीण व शहरी भागात मुस्लीम मुलींमध्ये शिक्षणामुळे एक आत्मनिर्भता निर्माण झाली आहे. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले आहे.’’ मुस्लीम समाजातील बदलत्या शैक्षणिक आत्मभानाविषयी.

फरीदा लांबे यांनी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सच्चर समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय मुंबईतील ‘निर्मला निकेतन’ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या, ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरलेल्या संस्थेच्या सहसंस्थापक अशीही त्यांची ओळख आहे. सुमारे २५ वर्षांचा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव त्यांच्याकडे असून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय सल्लागार समिती आदी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत आणि ते बदल प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. त्याचे कारण देशभरातील मुस्लीम समाज हा विविध राज्यांत विखुरलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाज आणि केरळातील मुस्लीम समाज यांच्या स्थितीत नक्कीच फरक आहे. त्या त्या राज्यातल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रियांचे परिणाम तिथल्या मुस्लीम समाजावर झाल्याने प्रत्येक राज्यांतील मुस्लीम समाजाची स्थिती वेगळी आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाकडे पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की इथला मुस्लीम समाज हा तसा मुख्य प्रवाहात आलेला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्रातील मुस्लीम समाज हा पूर्वीपासूनच इथल्या संस्कृतीशी तादात्म्य पावलेला आहे.

मी स्वत: रत्नागिरीतील एका मुस्लीम कुटुंबातील. त्यामुळे मला स्वत:ला जशी उर्दू भाषा बोलता येते तशीच कोंकणी आणि मराठीही येते. माझे वडील महाराष्ट्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. आमच्या घरी सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. वडिलांचा तर आग्रहच होता की आम्ही सर्व भावंडांनी सरकारी शाळांमध्ये शिकावे. साहजिकच आमचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. मला स्वत:ला अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही गती होती. हॉकी वगैरे खेळांत मी हिरिरीने सहभागी होत असे. आमच्या ओळखीतल्या काहींना हे फारसे रुचत नसे. पण घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहन अन् पाठिंब्यामुळे ते चालू ठेवण्यात आडकाठी आलीच नाही. मुख्य म्हणजे घरून पाठिंबा मिळाला म्हणून मी हे करू शकले याचा अर्थ इतरही मुलींना जर घरून पाठिंबा मिळाला तर त्या या गोष्टी करू शकतील. ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे, ‘तू मुस्लिमांसारखी दिसत नाहीस.’ असं अगदी शाळेपासून मी आत्ताही कधी कधी हे वाक्य ऐकते तेव्हा ते खटकतं. मुस्लिमांसारखी म्हणजे काय नेमकं? मुस्लीम म्हणजे जी काही ठरावीक प्रतिमा डोळ्यासमोर येते तीच त्यांना अभिप्रेत असते का? अगदी आजही? पण या काही गोष्टी सोडल्यास मुस्लीम असण्याचे फारसे वेगळे अनुभव वाटय़ाला आले नाहीत किंवा आपण मुस्लीम असल्यामुळे  इतरांचे आपल्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले असेही झाले नाही.

परंतु ही सर्व परिस्थिती थोडी बदललेली दिसली ती मुंबईतील १९९३च्या दंगलींनंतर. या दंगलींनंतर हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजांत आपापल्या अस्मिता जपण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. दोन्ही बाजू  घेटोइझमकडे वळल्या. आपापले गट होत गेले. त्यातच त्यांना सुरक्षितता जाणवू लागली. याच काळात अल्पसंख्याकांकडे देशभक्तीचे पुरावे मागितले जाऊ लागले. अशा गोष्टींचा तर मला फार राग येत असे. मुस्लीम समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला पडतो की काय अशी स्थिती जाणवू लागली. याचे कारण मुस्लिमांकडे स्वत:चे सामाजिक नेते नाहीत. इमाम, मौलवी हे त्यांचे सामाजिक नेते नाही होऊ शकत. ही कमतरता तर त्यांच्यात होतीच, परंतु याबरोबरच वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीतही बराच मोठा फरक होता. (आजही काही प्रमाणात तो आहेच.) या फरकाबद्दलच मुस्लीम समाजात खंत होती. त्याचा सकारात्मक परिणाम मात्र असा झाला की, मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली. मुस्लीम समाजात आपल्या राजकीय- सामाजिक स्थितीबद्दल जागरूकता वाढू लागली. त्यातून शिक्षण घेण्याकडे मुस्लीम समाजाने लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे मागच्या दोनेक दशकांत चित्र निर्माण झाले. पुढे मुस्लीम समाजातील मुलीही शिक्षणाकडे वळल्याचे याच काळात दिसू लागले.

मी स्वत: सच्चर समिती, रहमान समिती आदी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या समित्यांची सदस्य होते. या अभ्यासांतून पुढे आलेला महत्त्वाचा निष्कर्ष मुस्लीम समाजातील शिक्षणाच्या स्थितीबद्दलचा होता. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लीम समाजातील मुले-मुली सरकारी नोकरीत फारशी दिसत नाहीत. कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम समाजाचा ओढा असल्याचेही अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. अशा परिस्थितीत मुलींचे शिक्षणातील प्रमाण फारच कमी असले तर आश्चर्य वाटायला नको. आठ -दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही स्थिती प्रकर्षांने जाणवे. समजा, १०० मुली इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतील, तर त्यातील अध्र्याहून कमी मुली माध्यमिक शिक्षणाकडे वळायच्या, अशी आधीची परिस्थिती होती. विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात तर मुस्लीम मुलींचे प्रमाण फारच नगण्य होते. पण मागच्या काही वर्षांत यात अधिक वेगाने बदल होऊ लागला. आता ही स्थिती राहिलेली नाही. मुली शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर उच्च शिक्षण घेण्यापर्यंत मुलींची प्रगती झाली आहे. सरकारच्याच एका अहवालानुसार मुलींपेक्षा मुलांचं उच्चशिक्षणातील गळतीचं प्रमाण अधिक आहे. पालकही मुलींना शाळेत पाठवू लागले आहेत. त्यांनाही आपल्या मुलींनी शिकावे असे वाटू लागले आहे. १०वी, १२ वीनंतर मुलांना नोकरी- व्यवसायासाठी शिक्षण थांबवावे लागते. परंतु पालक मुलींचे शिक्षण सुरूच ठेवतात. शाळा, महाविद्यालये ही मुलींसाठी अधिक सुरक्षित आहेत, अशी या पालकांची भावना आहे. सरकारी पातळीवरही सर्व शिक्षा अभियान, उपस्थिती भत्ता यांसारख्या योजनांमुळे मुलींचे शालेय शिक्षणातील प्रमाण वाढले आहे.

मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणातही काही विशेष लक्षणे दिसतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी घेण्याकडे कल आहे. यातील काही मुली आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही देऊ लागल्या आहेत. परंतु हे प्रमाण तसे कमी आहे. फॅशन, टेक्सटाईलसारख्या क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण अथवा कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम मुलींचा ओघ असल्याचे मात्र प्रकर्षांने दिसून येते. ग्रामीण भागातील मुस्लीम मुलींच्या शिक्षणात एक महत्त्वाची बाब म्हणजे, शिक्षणाचा अधिकार हा कायदा झाल्याने आठवीपर्यंतच्या शिक्षणात मुस्लीम मुलींचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. परंतु आठवीनंतरचे शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नसल्याने आठवीनंतर या मुलींना शिक्षणासाठी लांबच्या गावात जा-ये करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आठवीनंतर पुढील शिक्षणात मुलींची गळती होते. इच्छा असूनही केवळ शाळांच्या अनुपलब्धतेमुळे शिकता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाययोजना झाल्यास ग्रामीण भागातही मुलींचे उच्च शिक्षणापर्यंत जाण्याचे प्रमाण वाढेल. शहरी भागात शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण घेण्याकडेही मुस्लीम मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे झाले आहे.

फक्त या मुलींना शिक्षणानंतर नोकरीही मिळणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजाच्या मुलींनी नोकरी करण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट धारणा आहेत. मुलींनी नोकरी करण्याकडे कुटुंबीयांचा सहसा कल नसतो. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुस्लीम कुटुंबात मुलीही नोकरी करताना दिसतात. या मुलींनी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास पालकांची सहसा ना नसते. मुलींनी सुरक्षित ठिकाणी नोकरी करावी, अशी पालकांची भूमिका असते. त्यामुळे अनेक मुली शिक्षणाबरोबरच काही कौशल्ये आत्मसात करून त्यावर आधारित घरगुती व्यवसाय करताना दिसतात. आम्ही ‘प्रथम’ संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रांत काम करताना शिक्षण आणि त्यावर आधारित उपजीविका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. यात आमचे काम वस्ती पातळीवर सुरू असल्याने विविध वस्त्यांमधील बालवाडींमध्ये तिथल्या माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुस्लीम मुलींना शिक्षिकेची जबाबदारी किंवा वस्ती पातळीवरील संस्थेच्या कार्यक्रमांसाठी वस्ती समन्वयक म्हणून काम सोपवतो. अनेक मुस्लीम पालक आमच्या कामात आपल्या मुलींना पाठवण्यास अनुकूलता दाखवतात.

शिक्षण घेतलेल्या व नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. संवाद माध्यमांच्या सहज वापरातून जगभरची माहिती त्यांच्या हाती येऊ लागली आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम या मुलींवर होऊ लागले आहेत. आपले चांगले-वाईट त्यांना कळू लागले आहे. स्वत:च्या आयुष्याविषयी निर्णय घेण्यास त्या समर्थ होऊ लागल्या आहेत. शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणी मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या सरासरी वयातही वाढ झाली आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात एक आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता त्या बोलू लागल्या आहेत. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात

आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या

आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले

आहे. कुटुंबीयांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले तर या मुली शिक्षणात चांगली कामगिरी करत आहेत. हे प्रमाण आता वाढू लागले आहे हे निश्चित.

आता गरज आहे ती तसेच वाढते ठेवण्याची व त्याला दिशा देण्याची!

Thursday, September 15, 2016

होम स्कूलिंग - शिक्षणाची नवी दिशा

होम स्कूलिंग – शिक्षणाची नवीन दिशा

मुलांचा पहिला वाढदिवस झाला की वेध लागतात शाळेचे ! आजच जग सुद्धा खूप फास्ट आहे, तेव्हा मूल स्मार्ट’च’ असायला हव.अगदी सकाळी सहा ते रात्री दहा – सगळे क्लास लावू आम्ही –त्याला सगळ यायला हव ; अभ्यास,खेळ ,डान्स ,गाण, गेलाबाजार कविता सुद्धा करता यायला हवी – किती विदारक आहे हे ? कधी स्वत:च लहानपण आठवून पाहिलं आहे ?किंवा कधी हा विचार केला आहे का ,की खरोखरच आपण जे शिकलो त्यातलं नक्की किती उपयोगाच आणि किती खर्डेघाशी होती ?
हाच विचार आम्ही केला- आणि ठरवलं मुलीला शाळेतून काढायचं ! शाळा छानच होती ,सगळ्या सुविधा ,लक्ष देणारे शिक्षक , जागतिक दर्जा – पण आम्हाला हवा होता –शिकण्यातला  मोकळेपणा !!
बरेचदा भारताबाहेर फिरताना होम-स्कूलिंग बद्दल ऐकल होत; पण तिथल्यासारखी आपल्याकडे ही पद्धती सर्वमान्य नाही ,तरीही एखाद वर्ष करून तरी बघू म्हणून ,हे शिवधनुष्य उचलल ,इथे ते मोडून चाणार नव्हत- पेलायच होत तोलायचं होत!! त्यातून आम्ही दोघही वर्किंग.तेव्हा पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला.
शाळा नाही म्हटल्यावर सुरुवातीचा सगळा वेळ टीवी बघण्यात घालवला जाऊ लागला ,पण पंधरा दिवसातच त्याचा कंटाळा ही येऊ लागला ,मग भन्नाट खेळून झाल ,मग टिवल्याबावल्या करून झाल्या –दोनेक महिन्यांनी अभ्यासाला सुरुवात झाली .
पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे तरी काय ? मग शुद्धलेखन ,पाढे, पुस्तक वाचन ,वेगवेगळ्या विषयावर घरात गप्पा सुरु झाल्या. कधीतरी मुख्य प्रवाहात यावच लागल तर म्हणून शालेय पुस्तक आणून ठेवलेली SSC /CBSE/ICSE सगळीच पुस्तक घरात असायची ,जे आवडेल त्याचा अभ्यास करायचा.भाषेच कोणताही बंधन नव्हत,दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आणून ठेवली होती .
खरा होम-स्कूलिंगचा धडा सुरु झाला तो – प्रवासात ! आम्ही कामानिमित्त फिरत असतो – मग वेगवेगळे प्रदेश ,तिथली वैशिष्ट्य ,त्याची ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी, तिथल्या भाषा ,मातीचे प्रकार,घरांचे प्रकार ,बोलीभाषा,वेशभूषा आणि मुख्य म्हणजे तिथले प्रसिध्द असे खाण्याचे पदार्थ – भूगोल,इतिहास,भाषा विषय असेच शिकवत आहोत. वेगवेगळी राज्य ,त्यांच्या सीमा ,त्या सीमाभागातील चालीरीतींची देवाण-घेवाण ,सगळचं मनोरंजक होऊ लागलं.
आपण वयाने मोठे असलो तरी ,आईवडील म्हणून आपण मुलांच्याच वयाचे असतो ,तेव्हा आपणही शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत असतो- हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीच्या वयासोबत आमचा पण आईबाबा म्हणून त्याच वयाचा वाढदिवस असायचा. एक म्हटलं जात किंवा तसा एक गोड गैरसमज आहे ,जे आम्हाला मिळाल नाही ते मुलांना मिळायला हवं,आणि यासाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. आम्ही जरा वेगळा विचार केला ,आपण किमान पक्षी एवढतरी नक्की देऊ जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिल; हे खूप उपयोगी पडलं. आईवडील म्हणजे ’देव’ नव्हेत,आपल्यावर खूप प्रेम करणारी दोन माणस ,हा विचार आधी रुजवला.
मुळात एवढ्या चांगल्या शाळा असताना होम्स्कुलिंगच का ?घरातून-बाहेरून खूप विरोध झाला,तुमच्या भलत्या विचारांपायी तुम्ही मुलीच्या भवितव्याशी खेळताय; हे सगळ कानाआड करत आम्ही तिघेही पुढे निघालो. मुळात आपल्या पाल्याने ‘शिकायचं कसं ? ‘ एवढ आधी शिकव हा आमचा अट्टहास होता. अभ्यास आणि अभ्यासक्रम नंतर.
शिकायचं म्हणजे घोकंपट्टी किंवा भरपूर मार्क्स असली कोणतीच स्पर्धा नव्हे.एखादी गोष्ट शिकताना तिच्या मुळापर्यंत जाता यायला हवं. सगळेच विषय हे एकमेकांना धरून असतात हे दाखवून दिल.कशाला पाहिजे मराठी, किंवा इतिहास किंवा गणित ;असा नसत. उद्या मोठे होऊन इंटेरियर डिझाईनर झालात आणि मोगलकालीन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला इतिहासाची जाण हवीच ना !अशा पद्धतीने आमचा अभ्यास पुढे पुढे सरकत गेला.
घरीच अभ्यास असल्यामुळे, ठराविक काम ह्या आठवड्यात झालं पाहिजे,असा दंडक आहे.मग तुला हव तेव्हा कर.उरलेला वेळ तिने तिच्या छंदासाठी वापरावा.कधी रेडीओ जोकी तर कधी कार्यक्रमच निवेदन अशा गोष्टी ती यातून शिकत गेली.
आईवडील म्हणून आम्हा दोघांनी यातील जबाबदा-या चक्क वाटून घेतल्या.काही विषय त्याने तर काही मी घ्यायचे.मग आम्हीच तिला विचारलं तुला कोणत्या विषयासाठी कोण हवंय ते,तू निवड. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा हीच पद्धती वापरली. तिचा बाबा सोफ्टवेर इंजिनियर असल्यामुळे,कॉम्पुटर त्याने शिकवायचा,त्याचा आकाशदर्शनाचा अभ्यास आहे,तो उत्तम गातो ,गाणी कम्पोज करतो ,त्याला पेंटिंग मधल खूप कळत, खेळ कसा बघायचा ,मूवी पाहायचा दृष्टीकोन कसा असू शकतो ;हे सगळ ती बाबाकडून शिकतेय. इतिहास ,भाषा ,कविता, नीटनेटकेपणा ,उत्तम स्वयंपाक ,बिझनेस सुरु करणे म्हणजे काय.चालवताना येणा-या अनेक अडचणी ,त्यावर मात कशी करायची ? हे सगळ आईकडून . अर्थात ह्या गोष्टी काही पुढ्यात बसवून शिकवायच्या नसतातच ;इथे मोकळेपणा उपयोगी पडला. एकत्र बसून जेवताना नानाविध विषय मिळू लागले.
बरेचदा दोघांनाही कामासाठी जावं लागत ,कोणीतरी एकजण तिला सोबत घेवून जातो. त्यातूनही नकळत ती खूप शिकली. मान-सन्मान बघण ही एक बाजू झाली; कधीकधी घ्यावा लागणारा कमीपणा,अपमान तसेच त्या कामासाठी केले गेलेले कष्ट –सगळ तिला पाहता आलं. ह्याचा फायदा म्हणून आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालो.
आपल मूल आत्मविश्वासी असाव , ही प्रत्येक पालकाची इच्छा असते . पण हा आत्मविश्वास येतो कुठून? एखाद्या गोष्टीच संपूर्ण ज्ञान ‘आत्मविश्वास’ निर्माण करत. उथळपणाने ,नको ती स्पर्धा करत, मला कसं सगळ्यांच्या आधी उत्तर आलं –असल्या गोष्टीना जागाच शिल्लक ठेवली नाही.
आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतो ते पोटापाण्याच्या सोयीसाठी. त्याच काय? अशा शाळेत न गेलेल्या मुलीचं भवितव्य काय ? इथे सुद्धा आपण पालक मोठी चूक करतो,खरतर आपण मुलांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो,पाणी पिऊन तहान भागावण,त्यांच्या हातात आहे. आज आम्ही मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल नेहमी सांगत असतो. परंतु,तुला हेच करायचं आहे ,ह्यात प्रसिद्धी आहे, ह्यात पैसा आहे अश्या गोष्टी प्रकर्षाने टाळतो.
वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला उपलब्ध करून ठेवली आहेत,तिला हवं तर तिने वाचावीत. सुरुवातीला कंटाळा यायचा ;मग तिला त्यातली मज्जा दाखवून दिली.तू टीव्ही वर पाहतेस त्या कथा कोणाच्या तरी इम्याजीन करण्याचा पार्ट आहे,तेव्हा यामध्ये तुझ्या मेंदूला चालना मिळण्याच कामच राहत नाही.उलट पुस्तक वाचनात वर्णनानुसार आपला मेंदू आपण पाहिलेल्या आणि आपण इम्याजीन केलेली चित्र डोळ्यासमोर उभी करतो ; त्यातून चालना मिळत राहते, नवनवीन सुचत जात. हे मान्य आहे की व्हिडीओमुळे गोष्ट चटकन समजते, हाच त्यातील धोका पण आहे.
अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक असू नये यावर आमचा आजही कटाक्ष आहे.चांगली भाषा बोलता येण,काळाची गरज आहे.भाषा कोणतीही असो.शब्दांचे उच्चार ,पाठांतर ,जीभ आणि मेंदूवरील हे संस्करण अतिशय आवश्यक आहे.ही जबाबदारी मात्र माझ्या आईबाबांनी पार पडली.संस्कृत श्लोक असोत की ज्ञानेश्वर ,तुकाराम आपली ज्ञानाची परंपरा जपलीच पाहिजे. ह्यात धर्म किंवा जातीचा कोणताही संबंध नाही ,हे सुद्धा तिला नीट समजावून सांगितले.
होम स्कूलिंगचे फायदे आहेत यात शंकाच नाही;परंतु ह्यासाठी आईवडिलांना मात्र शब्दशःतारेवरची कसरत करावी लागते. एकतर होम स्कूलिंग म्हणजे चोवीस तासांची शाळाच बनून जाते,शिकत राहणे या अर्थाने.
ह्यात बरेचदा मूल सोशल होत नाहीत ,त्यांना मधली सुट्टी –डब्बा ,मित्र मैत्रिणी ह्यातील आनंद उपभोगता येत नाही –असं ब-याचजणांनी विचारलं. खरतरंआमच्या बाबतीत असा अजिबात घडलेलं नाही.उत्तम ज्ञान असल्याने ती आत्मविश्वासाने बोलते ,गल्लीभर तिचे मित्रमैत्रिणी आहे. आतापर्यंत जिथे जिथे राहिलो तेथील मित्र मैत्रिणींशी आजही ती संपर्कात आहे. माझ्या मते सोशल असण एक स्वभाव आहे. राहिला प्रश्न डब्बा आणि शाळेतल्या गमतीजमतींचा –ह्या पेक्षा तिचं ‘परिपूर्ण’ होण आम्हाला जास्त महत्त्वाच वाटल.
गेली ६/७ वर्ष तिला होम स्कूलिंग आहे.सध्या ती रूढार्थाने सातवीला आहे.पण गणितात आठवीला आणि भूगोलात सहावीला आहे.अभ्यास उमजून पुढे जायचं आहे,तेव्हा हे होणारच.
तिच्या भवितव्यात तिने जे काही व्हायचं आहे ,त्यातील सगळी स्किल्स तिच्याकडे असण;हा यामागील हेतू आहे.
गम्मत म्हणून एक उदाहरण देते,कराटे क्लासला ती जात होती,आणि ज्या दिवशी त्यांची परीक्षा होती त्या दिवशीच नेमकी आजारी पडली,अर्थात परीक्षा बुडली म्हणजे सर्टिफिकेट नाही .तेव्हा तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली- उद्या तुला कुणी त्रास दिला तर तू सर्टिफिकेट दाखवणार आहेस का स्किल्स ? बस्स, तेव्हापासून सर्टिफिकेटची क्रेझ आमच्यातून हद्दपार झाली.
अलीकडेच अशा पद्धतीने शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची अमेरिकन MIT मध्ये निवड झाली, त्या निमित्ताने आम्हालाही आपण योग्य दिशेने जातोय ह्याची जाणीव झाली.
अलीकडे CBSE/ICSE अशा बोर्डानी होम्स्कुलरसाठी थेट दहावीची सोय केली आहे.त्यामुळे बरेच अडथळे कमी झाले आहेत.
मुळात शिक्षणाचा उद्दात हेतू ,स्वतःला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हाव, त्यातून चांगल काही घडावं हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोहोचलो.समाजऋण अर्थात देशाची सेवा देशाचा विकास ही बीज रूजन अत्यंत आवश्यक आहे.’जरि उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भर विद्येचा’ याप्रमाणे वाटचाल झाली तर आणखी काय हव?
अर्ध्या तपाहून जास्त सुरु असलेली आमची शाळा ,मुलीसोबत आम्हालाही आनंद देत आहे.शालेय अभ्यासक्रमाला धरून सोबतीने गाणी,चित्र,खेळ, वाचन आणि तिला आवडणा-या गोष्टीवर वेळ खर्च होतो आहे. ह्यातच समाधान आहे.
तसं पाहिलं तर प्रत्येकच पालक होम स्कूलिंग करत असतो,८ तासांची शाळा झाली की १६ तास मूल घरच्यांसोबत असतं. होम स्कूलिंग हा काही फोर्मुला नाही,ती वैयक्तिकरित्या आपल्या सोयीने आणि विचाराने करण्याचा भाग आहे.अगदी शाळा सोडूनच हे सगळ करायला हवं,असं अजिबात नाही.मुलांना आपला वेळ देऊन त्यांना त्यांच्या कलाने वाढू द्याव ,ह्या प्रक्रियेत आपणही ‘मोठे’होत जातो.मुलांना काय दिल पाहिजे तर हा चिरंतन ठेवा ,आनंदी जगण्याचा वसा द्यायला हवा
एक संस्कृत सुभाषित आहे –
 विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

जान्हवीला घडवत असताना मी आणि ऋतुराज ही घडत गेलो,डोळ्यादेखत मूल वाढताना ,शिकताना पाहण-अनुपम्य सोहळाच तो !चला मुलांना घडवू या ,सोबतीने घडू या !!
 - नीलिमा देशपांडे

Tuesday, September 6, 2016

जपानमधील शिक्षण

माणसाला घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील नागरिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या त्या देशातील सरकार प्रयत्न करत असते. पण सध्या जपानमधल्या एका गावात जपान रेल्वे प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याचे जगभर कौतुक होत आहे. जपानमधल्या एका गावातील रेल्वे सेवा प्रवासी नसल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला होता. परंतु या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर शाळेत जाणारी एक मुलगी नियमितपणे करते हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. जर ही सेवा बंद झाली तर त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते त्यामुळे प्रवासी नसतानाही फक्त त्या मुलीसाठी जपान रेल्वेने सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन आहे. येथे प्रवासी नसल्याने या स्टेशनवरची रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय जपान रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण या स्टेशनवरून एक मुलगी रोज शाळेत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू ठेवली होती. या मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रेल्वेचे नुकसान होत असताना देखील हा निर्णय घेण्यात आला. काहीही झाले तरी या मुलीचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जपानमध्ये फक्त एका प्रवाशासाठी ही ट्रेन सुरू होती. याचवर्षी या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या गावातील रेल्वे सेवा आतापूर्णपणे बंद झाली आहे. जपान रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची वेळ या मुलीच्या शाळेच्या वेळेप्रमाणे ठरवली होती. ती सांगेल तेव्हा ही वेळ बदलण्यात यायची. जपानमधील शिक्षणाला प्राधान्य देण्याचा या निर्णयाची गोष्ट आज इंटरनेटवर फिरत आहे. या निर्णयातून खरेच शिकण्यासारखे आहे.

Monday, September 5, 2016

साने गुरुजींची शाळा

शिक्षक दिन विशेष


साने गुरुजी ६ वर्षे शिक्षक म्हणून अमळनेर ला होते..पण त्यांनी शिक्षक म्हणून कसे काम केले याविषयी फार माहिती नसते .शिक्षकदिनानिमित्त आज लोकमत च्या रविवार पुरवणीत मी साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कोणते उपक्रम केले ?ते कसे शिकवत ?यावर लेख लिहिलाय ((शेअर करून शिक्षकापर्यंत हे पोहोचवावे


साने गुरुजींची शाळा

- हेरंब कुलकर्णी

आज  शिक्षक दिन. शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून जे प्रयोग केले त्यांची चर्चा फारशी झाली नाही. गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा, शिक्षणविचारांचा, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे सारे मूलभूत प्रवृत्तीने शिक्षक व शैक्षणिक तत्त्वज्ञ होते.

साने गुरु जी अमळनेरला १९२४ ला शिक्षक झाले. त्यांचा स्वभाव संकोची होता. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणशास्त्राची पदवी नसताना कसे शिकवणार हा प्रश्न होता. सुरुवातीला ते पाचवीला इंग्रजी व संस्कृत आणि सहावीला मराठी शिकवत. पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरु जींच्या डोळ्यात पाणी येत असे.

त्यांचे शिकवणे मुले पुढेही विसरली नाहीत. कवी दत्त यांचा शिकविलेला पाळणा आणि शेक्सपिअरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे मुले एकमेकांना सांगत असत. गुरुजींनी कवी दत्त यांचा पाळणा शिकवताना दारिद्र्यामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा- आकांक्षाचे उद्ध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. गुरु जी म्हणाले की, ‘आई असणं ही मानवी जीवनातील अति महत्त्वाची घटना आहे. आईचे प्रेम तेच खरे प्रेम.’ गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले.

मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत. इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. ‘माझी जन्मभूमी’ ही कविता शिकवताना डोळे भरून आले. कवितेतील ‘नि:सत्त्व निर्धन तुला म्हणताती लोक’ ही ओळ त्यांनी म्हटली. डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले.

गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.

छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’

मुलांची त्यांना टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. मुलांच्या मदतीने गुरु जींनी बाग तयार केली. एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरु जींनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरु जी एकदा शिकवत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

गुरु जींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि त्यांनी वर्ग सोडून दिला. समानतेची शिकवण गुरु जी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. एकदा मुले आणि गुरु जी सहलीला गेली. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी गादीवर झोपणार नाही.’’

सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. वर्तमानपत्रात मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करून ठेवीत. महात्मा गांधींचा ‘यंग इंडिया’ तिथे येत असे. अमृतबझार पत्रिकाही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.

छात्रालय दैनिक अशी एक वेगळीच कल्पना गुरुजींना सुचली. ते रोज रात्री- पहाटे उठून दोन तास एकटेच ते संपूर्ण दैनिक लिहून काढत आणि सकाळी मुलांसाठी लावत. इतके टोकाचे कष्ट ते मुलांसाठी घेत होते. देश-विदेशातील विविध घटनांची नोंद असे. थोरांची चरित्रे, विज्ञानातील विविध प्रयोगांची माहिती, कधी आठवणी दिल्या जात. स्थानिक गावातील शाळेतील आणि छात्रालयात जे घडायचे तेसुद्धा या दैनिकात असायचे. एखाद्या विद्यार्थ्याने काही चांगले काम केले की त्याची माहिती असे आणि एखाद्याच्या वागण्यात काही उणेपणा असला तरी त्याचे नाव न घेता निनावी नोंद केलेली असे. यातून त्या मुलाला आपली चूक दुरुस्तीचा संदेश आपोआप मिळायचा.

या दैनिकात मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, स्फुट विचार असे खूप काही असे. जगातील विविध देशांचे स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ, इकबाल, व्हीटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत.

मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेऊन खेळत. विटीदांडूचाही खेळ खेळत. मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.

साने गुरु जींनी सुरुवातीला वाचनालय काढले. विद्यार्थ्यांना दरमहा दोन आणे वर्गणीत पुस्तके, मासिके वाचायला मिळत. गुरु जी मुलांनी गांधींचा ‘यंग इंडिया’ वाचावा म्हणून त्यावर लाल पेनने खुणा करून ठेवत. गुरुजी मुलांची खानेसुमारी करीत. त्यात लेखक, चित्रकार, खेळाडू असे मुलांचे वर्गीकरण करीत.

असाचा एक उपक्र म हा मुलांनी आपल्या गावांची वर्णने लिहायची. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा अशी विविध माहिती जमवायला सांगत.

१९४६ मध्ये ‘कुमारांपुढील कार्य’ या भाषणात ते म्हणतात की, ‘‘तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा.

एकेका तालुक्यात ४/४ कुमारांनी हिंडावे व ते गोळा करून त्याचे नीट संपादन करा. ते अमर कार्य होईल.’’

गुरु जींनी जरी शिक्षकी पेशा सोडला तरीसुद्धा त्यांना पुन्हा शिक्षक होण्याची ओढ होती. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर ते मित्राला म्हणाले की, ‘‘मला कुठे तरी ग्रामविभागात मुलांत राहावे, त्यांच्यासोबत खपावे, त्यांना चार अक्षरे शिकवावी असे वाटते.

परंतु देवाने येथे गुंतवून टाकले आहे.’’

साने गुरुजींचे

शिक्षणासंबंधी विचार..

मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट आणि शिक्षा, दंड यांनी मुलांचा खरा विकास होत नाही. खरा विकास हृदयात शिरल्याने व प्रत्यक्ष सेवेने होईल. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक लहानपणी मुलांना मिळायला हवेत. मुलांना कितीही देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. उलट त्यांना याच गोष्टींचा कंटाळा वाटू लागतो. मुलांच्या मनावर जर संस्कारच नाही तर एकदम तुमच्या गोष्टी त्यांना कशा आवडू लागतील? शिक्षकांनी प्रथम ५ ते ६ मिनिटे सामाजिक, राष्ट्रीय विषय मुलांशी बोलावे. सर्वच शिक्षक जर असे करू लागले तर मुलांची मने फुलतील...

(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com  phone 9270947971

------------------------------------------------
शिक्षक दिनानिमित्त गुरुजींचा हा प्रेरणादायी लेख आपल्या  शिक्षक मित्रांना पाठवा 

Sunday, August 7, 2016

मराठी व्याकरण. वर्णमाला

मराठी व्याकरण:
वर्णमाला

वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

      मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
         अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

    स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
              अ, इ, ऋ, उ


2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

    स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
                 अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ

2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
                  अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
               याचे 4 स्वर आहेत.
               ए - अ+इ/ई
               ऐ - आ+इ/ई
               ओ - अ+उ/ऊ
               औ - आ+उ/ऊ

2. स्वरादी :  ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
            स्वर + आदी - स्वरादी
            दोन स्वरादी - अं, अः
            स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  दोन नवे स्वरदी : ओ, औ
  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
          ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
          व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)

1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक वर्ण

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ
                  त, थ
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
                  उदा. ड, त्र, ण, न, म      

Friday, August 5, 2016

राष्ट्रीय प्रतिज्ञा

*राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?*

- राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते.

- पण आजवर ती कुणी लिहिली, तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील.

- परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते.

- अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही.

- मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.

- बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की, त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता.

- मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही.

- पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना, विद्वानांना, पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना, शिक्षणमंत्री, साहित्यिक, लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल!

- परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो!

- *आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली.*

- परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.

- त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली.

- शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

- केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी.

- या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.

- तसेच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला.

- पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.

- २६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.

- आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी.

- सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच.

- यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.

*ही माहिती मला आवडली ती सर्वांना कळावी म्हणून पाठवत आहे*

Tuesday, July 19, 2016

पायाभूत चाचणी मराठी प्रश्नपत्रिका

https://drive.google.com/drive/mobile/folders/0B1BKrwucMaz6bEstcVItcjFMdlk/0B1BKrwucMaz6NXBxaE5qQ2RBS0k/0B1BKrwucMaz6RElMWTYxZHRkT1E?tab=jo&sort=13&direction=a

Monday, July 11, 2016

पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …

गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq

भाषासाठी - https://goo.gl/SXaWms 

शिक्षण आणि करिअर

*आपली मुलं खरेच मनापासून शिकतातयेत की त्यांनी काहीतरी शिकलंच पाहिजे, असा *'बळस्कार' व्यवस्था त्यांच्यावर करतेय?*

शिक्षण क्षेत्रातील एका संवेदनशील कार्यकर्त्यांनं *तुम्ही आम्ही पालक* मासिकासाठी लिहिलेलं हे दीर्घ टिपण जरुर वाचाल.

*करिअर म्हंजी काय रं भाऊ?*

लेखक: *भाऊसाहेब चासकर*

तुम्ही शिकता कशासाठी? असा प्रश्न मी आजवर शेकडो युवक-युवतींना विचारलाय. शिकल्यावर नोकरी मिळते, पैसे मिळतात, चांगले करिअर होते. बहूतेक मुलांचे असेच उत्तर असते! तात्विक आणि सैद्धांतिक पातळीवर शिक्षणाची थिअरी मांडताना देशातील शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी काहीतरी वेगळीच मांडणी केलेली असते. तसले काही असले तरी आजचे पालक मुलांना शिकवताहेत किंवा मुलंही शिकताहेत, यामागची मूळ प्रेरणा शिकल्यावर नोकरी मिळते, दोन पैसे हातात येतात, पैसे आले की गरजा भागवता येतात, आयुष्य नीट जगता येते, पैशाशिवाय जगणे मुश्किल आहे. वगैरे... शिकण्यामागची अशी पक्की ठोकळेबाज धारणा बनली आहे. विशेषतः ज्या कुटुंबातील पहिली किंवा दुसरी पिढी शिकतेय, तिथे हे जास्त ठळकपणे दिसतेय. अर्थात हे वाटणे अजिबात चुकीचे नाही. शिक्षणातून अनेक कुटुंबांचा उत्कर्ष झालेला त्यांनी बघितलाय.

शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवणे वगैरे असा शिक्षणामागचा महनीय विचार बिचार सांगणारे यच्चयावत दस्ताऐवज असले तरीही ‘शिक्षण = नोकरी’ (करिअर) हे समीकरण कोणालाही नाकारता येणार नाही, हा सांगायचा मुद्दा आहे. किंबहूना तसे केल्यास ती आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखे होईल. करिअरच्या कमानीखालून आत शिरायला पदवीचे भेंडोळे मुलांना, पालकांना हातात लागतेय. या शिकण्याचा ज्ञान मिळवणे, बौद्धिकदृष्ट्या उन्नत होणे, काही विशेष गोष्टी अवगत होणे, जबाबदार नागरिक घडवणे याशी काडीमात्र संबंध उरलेला नाहीये, हे नक्की!

दुसरा मुद्दा म्हणजे बारावीनंतरच्या शिक्षणातील सगळे ‘यश’ आपल्याकडे संपूर्णपणे परीक्षेत मिळालेल्या गुणांशी जोडले गेलेले आहे. ‘गुण आणि गुणवत्तेचा फारसा संबंध नसतो’, अशी वाक्ये फार फार तर सुविचार म्हणून शाळेच्या भिंतीवर लिहायला भाषणात बोलायला ठीक! आज परीक्षेत मिळालेले मार्क्स हेच मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातले अत्यंत क्रूर वास्तव आहे. त्याचा आयुष्यावर भलाबुरा परिणाम होतो, हेच तंतोतंत खरे आहे.
तरुण मित्रांशी बोलताना नेहमी जाणवते की, बहूतेक मुलं जे शिकताहेत, ती स्वतःची आवड म्हणून नव्हे, तर व्यवस्थेने त्यांच्यावर केलेली ती एकप्रकारची बळजबरीच आहे! भारतीय शिक्षणात अत्यंत दुर्दैवाने मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विचार कुठेही होताना दिसत नाहीये. कलचाचण्या कशाशी खातात हे आपल्याकडे माहीत नाही. मोठ्या मोठ्या शाळांत साधी समुपदेशनाची सोय नाही. आज विविध शाखांमध्ये जी काही मुलं शिक्षण घेताहेत, त्यांचा एखादा सर्वे कोणीतरी करायलाच हवा म्हणजे आपल्याला समजेल की, किती मुलं आपल्या आवडीनिवडीनुसार शाखा निवडताहेत ते!

‘लाईफमध्ये तुम्ही शाळा-कॉलेजात जाऊन काहीतरी शिकायलाच पाहिजे, असं पॅरेंन्टसचं आणि मेन म्हणजे सिस्टीमचं जाम प्रेशर असतं. प्रेशरपेक्षाही ते कम्बल्शनच असतं म्हणा. अनेकदा काय शिकायचं याचाही चॉईस आम्हा मुलांना नसतोच. आमचे अनेक प्रोजेक्टस् म्हणजे निव्वळ डॉन्की वर्क असते! सो मग काय करणार?’ उच्च शिक्षण घेणारी नेहा सांगत होती.

मुलांना आवडेल तसे शिकवायचे. त्यात गरजेइतके पैसे मिळवून आनंदाने जीवन जगता येईल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या मुंबई येथील संस्थेची सद्यस्थिती कशी आहे, तिथले लोकं नेमके काय करत आहेत, याचा जरा कानोसा घेतला म्हणजे आपण आपल्या 'भविष्या'वर किती गांभीर्यपूर्वक काम करतोय हे समजेल.

करिअरच्या हजारो वाटा असतात. पण आम्ही मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांवरच अडून बसलेलो असतो. केवळ यात यशस्वी झालेल्यांवर आम्ही यशाची, गुणवत्तेची मोहर लावतो! मग यातले यशस्वी मुलं आयडॉल बनून राहतात. मग याचेच अनुकरण केले जाते. मागून येणारे पालक आणि शिक्षण व्यवस्था या दलदलीत विद्यार्थ्यांना ढकलत राहतात. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रांत गुणवत्तेवर एकूण संख्येपैकी किती टक्के मुलांना प्रवेश मिळणं शक्य आहे? अधिकारी होऊन होऊन किती होऊ शकतात? म्हणूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या याशी जोडून पाहिल्यावर लोकप्रिय कोर्सेसला मुकलेल्या मुलांना काय झेलावं लागत असेल याचा अंदाज बांधता येतो. मुलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आम्ही भरपूर मार खातो वगैरे आशा चर्चा होत राहतात. यासाठी वातावरण, सुविधा आणि आवश्यक पैसा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार करायला कोणाला सवड आहे कोणाकडे?

करिअरचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरायला तयार नाहीये. शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पिअर्सचे मोठे प्रेशर असते. अभ्यास केलाच पाहिजे, त्या कठोर शिस्तीतल्या परीक्षा दिल्याच पाहिजेत, चांगले मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजेत. मगच नोकरी मिळण्याची शक्यता असते. असे झाले तरच आयुष्याची इतिकर्तव्यता होते! यातून होतंय असं की, आपल्या देशातील आजचं तरुण मनं अभ्यासाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली दिसताहेत. मनातल्या मनात चरफडताहेत. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी त्यांची दारुण मनोवस्था आहे.

मुग्धा म्हणाली “बारावी सायन्सला फक्त केमिस्ट्रीचं पाचशे पेजेसचं पुस्तक आहे. हजारो वर्षांत फिजिक्समध्ये जे काही घडलेय, शोध लागलेत, ते आख्खं कंटेंट कंसेप्टसह आम्ही पोरांनी फक्त दोन वर्षांत कसे काय अभ्यासायचे? शिकवणारे शिक्षकही नीट समजून सांगण्याचे स्किल्स असलेले मिळतीलच असे नाही. अनेक प्राध्यापकांनाच कंसेप्टस क्लिअर आहेत का, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांना पोर्शन कंप्लिट करायचा असतो, बस्स. कधी लॅबमध्ये नीट प्रॅक्टिकल धड होत नाही. शिकवलेले मुलांना समजतेय की नाही? याचा विचार फारसा होत नाही. यात आम्हा मुलांच्या डोक्याचा पार भुगा होतो. पण आमची कोणाला काहीच पडलेली नाहीये. न्यूटन जन्माला आला नसता तर बरे झाले असते असे वाटते कधी कधी..!"

आपल्याकडे बारावीनंतरच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांवर मुलांचे ‘भविष्य’ ठरते. बारावीनंतरच्या JEE mains आणि advance याशिवाय अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची ‘नीट’ याशिवाय अन्य चांगल्या शैक्षणिक संस्था/महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा वेगळ्या. या निरनिराळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सध्याच्या शिक्षणाला समांतर अशी बाजारू शिक्षण व्यवस्था उभी राहिलीय. यात मुलांचे मानसिक, भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि पालकांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. काही लाख रुपये ओतले. मुलांना एकदा तिकडे घातले की, आपल्या मुलांचे करिअर बनून जाईल, अशी पालकांची अपेक्षा असते. यामुळे झालेय असे की, शहरांतील कनिष्ठ महाविद्यालये जवळजवळ ओस पडलेली दिसताहेत. या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेणारे गल्लाभरू कोचिंग क्लासेस सध्या जोरात सुरू आहेत. त्यातल्या काहींचा वर्षाचा टर्न ओव्हर पाचशे ते हजार कोटींच्या घरात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यापर्यंत यांची मजल गेली आहे! या इथल्या व्यवस्थेने मुलांना आणि पालकांनाही शब्दशः वेठीला धरले आहे.

“एखाद्या विषयात/शाखेत आवड असणं निराळं आणि त्या कोर्सला अॅडमिशन मिळवायला सीईटीसारखी अत्यंत टफ अशी एखादी इंट्रास एक्झाम क्रॅक करावी लागणं वेगळं. खरे तर ते एक टेक्निक असतं. काही मुलांना ते साधतं, स्मरणात ठेवून उत्तर लिहिता येते. काही मुलांची अक्षरशः वाट लागते. विषयातील आवड कोणच विचारत नाही. अशा वेळी खूप चिडचिड होते. त्रास होतो. पण आमचं ऐकतंय कोण." शुभम सांगत होता...

"मला चौथीपर्यंत शाळा शिकायला आवडायचं, पुढे शिकताना मी आनंदानं कधी शाळा/कॉलेजात गेली नाही!"
मनस्वीनी सांगते.

मुलांच्या मौनातला आकांत खरेच शिक्षक-पालकांना ऐकू येईनासा का झालाय ?  आपली कॉलेजेस, विद्यालयं भयालंय तर झालेली नाहीयेत ना? मुलांशी बोलताना प्रश्न पडतो आणि आता याचा गंभीर विचार करायची वेळ आता आलीये.

“आठवीपासून JEEची तयारी करणारा एक मुलगा या सगळ्यातून जाताना अपयश पदरी पडल्याने खूपच डिप्रेशनमध्ये गेला. पुढची दोन वर्षे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता...” धनेश सांगत होता.

राज्यस्थानातील कोट्यामध्ये या प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना अभ्यासाचे दडपण आणि कथित अपयशाने पछाडले आहे. तिकडे आत्महत्या वाढत आहेत. २०१५मध्ये १९ तर २०१६ मध्ये चार महिन्यांत पाच विद्यार्थ्यांनी आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवलीये. या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रविकुमार सुरपूर या कोट्याच्या कलेक्टर महोदयांनी तिथं कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तब्बल दीड लाख पालकांना आणि क्लास चालकांना भावनिक आवाहन करणारे पत्र अलीकडेच लिहिलेय.

‘अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रं वगळून इतर क्षेत्रं निवडण्याचा सल्ला त्यांनी मुलांना-पालकांना दिला आहे. जीवन खूप सुंदर आहे, आयुष्यात परीक्षा हेच सर्वस्व नाही!’ असेही त्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला अशाप्रकारची दखल घ्यावी लागणं म्हणजे ही एका अर्थाने ‘शैक्षणिक आणीबाणी’ नाहीतर काय आहे? परीक्षेला बसलेल्यांपैकी किती टक्के मुलांना अशा परीक्षांतून प्रवेश मिळतो, याचा विचार ना पालक करतात. ना त्याचे इथल्या धुरिणांना किंवा व्यवस्थेला काही घेणे देणे आहे.

एक अभ्यास असं सांगतो की भारतातले सुमारे पाच लाख मुलं JEE मेन्स ही प्रवेश परीक्षा देतात. त्यातले दहा हजार मुलं निवडले जातात, तेव्हा चार लाख ९० हजार मुलं ऑलरेडी बाहेर फेकले गेलेले असतात. राज्यातल्या २६ हजार कनिष्ठ महाविद्यालयांतून शिकणारी मुलं संख्येने किती आहेत आणि त्यांच्यासाठी एमबीबीएसच्या राज्यात सर्व मिळून जागा आहेत त्या २५ हजार! या रॅट रेसमध्ये मुलं स्वतःही सहभागी होतात, पण जास्तकरुन पालक ढकलतात! उसाचं टिपरु चरकात घातल्यावर त्याचं जसं चिपाड होतं तसं मुलांचं होताना दिसतं, हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही का?

मुलं ज्या घरातली आहे, तेच लोकं बघून घेतील, असा आपला त्रयस्थ दृष्टीकोन असतो. मुलं म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या देशाचं भविष्य आहे, त्यांना चांगल्या प्रकारे वाढवणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, असं आपल्याकडे मानलंच जात नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा मुलांना काही विचित्र प्रकारच्या निर्णयांमुळे त्रासाला सामोरे जावे लागते तेव्हा, आपली सबंध व्यवस्था याबाबत फारशी संवेदनशील नसल्याचा अनुभव वारंवार येत राहतो. अनेकदा तर केंद्र आणि राज्य सरकारं एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. तेव्हा खूप चीड, अस्वस्थता येते, वाईट वाटते. ‘तरुण आपल्या देशाचे बलस्थान आहेत,’ अशा बाता आपले कारभारी भाषणांतून मारतात. कृतीचा दुष्काळ मुलांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरतो. हे तरुण मन जर असे पोखरले गेलेले असेल, तर त्यांनी भविष्यात देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?

जीवनात सहजासहजी कोणाला काहीही मिळत नाही, हे खरेच आहे. आयुष्य अनपेक्षित घटितांनी भरलेले आहे. आयुष्याला सामोरे जाण्याची, संघर्ष करायची मुलांची तयारी असली पाहिजे. यात अजिबात दुमत नाही. मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्याच पाहिजेत, मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजे. नोकरी, उद्योग, व्यवसाय काहीतरी करुन जगायपुरते पैसे कमावलेच पाहिजेत, हे खरेय. पण त्यासाठी असा जुगार का खेळायला लागावा? इतकी जबर किंमत का मोजायला लागावी? आपले आयुष्य डावाला लावायला लागणे, ही म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्थेला लांच्छन आणणारी शर्मनाक गोष्ट आहे.

ज्या मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते, त्या ‘हुशार’ मुलांनाही परीक्षा नावाच्या कठोर व्यवस्थेची इतकी भीती का वाटावी? कारण अनिश्चितता आणि असुरक्षितता हीच जणू आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेने मुलांसाठी दिलेली ‘देण’ आहे. त्या भोवऱ्यात मुलं गोलगोल फिरत राहतात. अनेक मुलांच्या नाकातोंडात पाणी शिरून ते गटांगळ्या खात राहतात. आम्ही काठावर बसून ‘मला काय त्याचे’, म्हणत शांतपणे बघत असतो.

बरं आपल्याकडे JEE, NEET यासारख्या प्रवेश परीक्षा द्यायला केवळ दोन संधी दिलेल्या आहेत. त्यात दुसरी संधी घेतली की आधीचे मिळालेले मार्क्स पुसून जातात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत SAT, ACT यांसारख्या प्रवेश परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना सहा वेळा संधी दिली जातेच. शिवाय आधीच्या दिलेल्या परीक्षेतले तुलनेनं जे जास्त मार्क्स मिळालेत ते तिकडे ग्राह्य धरले जातात. गणित आणि भाषेची मुलभूत क्षमता तपासण्यासाठी आधी युरोपियन देशांत घेतली जाणारी PISA ही परीक्षा आता जगभरातल्या बऱ्याच देशांत घेतली जाते. जगभर नावाजलेल्या या परीक्षेत फिनलंड हा लहान देश जगभरात आघाडीवर आहे. या परीक्षेची तयारी करून घेताना फिनलंडमध्ये मुलांमागे ‘स्ट्रॉँग सपोर्ट सिस्टीम’ उभी केली जाते. आपल्याकडे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे अवघड नाहीये. पण गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची! मुलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या संवेदनशील मनाला आणि मेंदूला जपण्याचीही...

‘दुःख परीक्षा असण्याचं नाहीये. परीक्षा जरूर असाव्यात. वैताग त्यात नावीन्य नसल्याचा आहे. इतक्या मास स्केलवर मुलांचे मूल्यमापन करायला असे काहीतरी टूल लागणारच. आक्षेप त्याच्या स्वरूपावर आहेत. आपला अभ्यासक्रमही application based असायला हवा. रिसर्चसाठी पोषक वातावरणाची गरज आहे. थिअरीसोबतच प्रॅक्टीकल्सचं, प्रोजेक्ट्सचं महत्त्व वाढायला हवं. पण हा फक्त चर्चेचा विषय म्हणून काही काळ टिकतो, पुढे काय होतं आपल्याला माहितीच आहे!’ मुंबई विद्यापीठात शिकणारी अश्विनी सांगत होती...

अमुक इतके मार्क्स मिळाले म्हणजे अमुक कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल? कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं म्हणजे छानपैकी करिअर होईल? याविषयी मुलं आणि पालक यांच्यात प्रचंड संभ्रम आहे. या संभ्रमाची कडू गोड फळे (इच्छा असो अगर नसो!) मुलांना चाखावीच लागतात. बरं एक गंमत म्हणजे इतके सारे शिकायचेय ते तरी कशासाठी? तर दूर देशात किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय  कंपनीत मोठे पॅकेज देणारी नोकरी मिळावी यासाठी! जे शिकल्यावर नोकरी मिळते तितकेच शिकायचे असते! (कारण हा देश/समाज नोकरदारांचा आहे, हे ब्रिटिशांनी आधीच आपल्या समाजमनावर पक्के बिंबवलेय.) पैसा मोठा झालाय. आपण त्या दुष्टचक्रात फसलोत. फार मार्क्स नसले तरी तुम्ही आयुष्यात छान काही करु शकता, थोडे कमी पैसे मिळाले तरी मस्त आनंदात जगू शकता, हा विश्वास आपण मुलांना द्यायला हवा. पुढच्या काळात ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांचे नव्हे तर ज्यांचे आरोग्य चांगले असेल ते 'श्रीमंत' असतील, हे पण मनावर ठसवावे लागेल. मुख्य म्हणजे पालकांनी हे ठरवायला हवे की, आपल्याला कोणासोबत जगायचेय? मुलांनी आधी कमावलेल्या गुणांबरोबर आणि नंतर कमावलेल्या पैशांबरोबर की मुलांसोबत?

शेवटी असे आहे की, आपली मुलं शिकत असताना ‘मार्क्स मशीन्स’ आणि कमावती होतात तेव्हा ‘मनी मशीन्स’ नसतात.... एकदा पैसे आले की, मग पुढे तेच पाश्चिमात्यांचे आंधळे अनुकरण सुरू होते. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, ते चंगळवादी पर्यटन, त्या लखलखीत्या चंदेरी दुनियेत जगणं. पुढे जाऊन आयुष्याच्या एका टप्प्यावर यातला फोलपणा लक्षात येतो. ताणतणाव, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात. तेव्हा बराच उशीर झालेला असतो, तेव्हा पश्चाताप करणं, दु:खी होणं, माघारी फिरणं...  (म्हणजे याला अपवाद असू शकतील.) मग स्वभाविकच करिअर म्हणजे काय, असा प्रश्न पडतोच. तिकडे दूर अमेरिकेत आर्थिक मंदी येते त्यांचे परिणाम इथल्या मुलांच्या करिअरवर आणि एकूण अर्थकारणावर होत राहतात.

वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा आवडीच्या क्षेत्रात काम करते. तेव्हा ती आपल्यातले जे बेस्ट आहे ते त्यात ओतत असते. पण आपल्याकडे असे आहे की अनेकांचा आवडीचा विषय एक असतो आणि उत्पन्नाचा विषय भलताच! यातून एकूण समाजातल्या बौद्धिक वैभवालाच ग्लानी येण्याची शक्यता असते. यामुळं आपल्या ज्ञान परंपरेचेही मोठे नुकसान झालेय. मान्य आहे की, ज्ञान मिळवण्यासाठी शिकणे, ही वंचित घटकांतील अनेक कुटुंबांतल्या मुलांसाठी 'चंगळ' असू शकेल! जागतिकीकरणासोबत आलेल्या बाजारव्यवस्थेचे आपत्य असलेला हा करिअरवाद सगळीकडे बोकाळलाय. बाजार माणसाला माणूस म्हणून ओळखतच नाही. वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ म्हणून ओळखतो. त्याचे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक परिणामही झाले आहेत.

आपली प्राचीन कोणती ती 'ज्ञान परंपरा' वैभवशाली होती, असे खुपदा सांगितले जाते, हे म्हणणे ठीक. पण हा इतिहास ती किती दिवस उगाळत बसायचा? वर्तमानात तुम्ही काय करत आहात, त्यातून नवा इतिहास रचला जातो, याचे भान ठेवायला नको? आणि आपले वर्तमान अस्वस्थ करणारे आहे, हे निश्चित.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये बहूतेक भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ काम करतात, त्यांना अमुक इतके पॅकेज मिळते वगैरे वगैरे... या गोष्टींचा वृथा अभिमान काय बाळगायचा? कारण त्यांच्या शिक्षणावर इथल्या सरकारने, समाजाने खर्च केलाय. ते तिकडच्या देशात जाऊन कुठल्यातरी कंपनीचा नफा वाढवायला हातभार लावत आहेत! त्यांचे ज्ञान, कौशल्य या देशाला विकासाकडे नेण्यासाठी उपयोगी पडायला हवे. मात्र तसे होत नाहीये.

मुलभूत विज्ञान संशोधनात तर आनंदी आनंद आहे. सरकार याविषयी गंभीर कधी होणार, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. नोबेल पारितोषिके मिळालेल्या शास्रज्ञांमध्ये किती भारतीय संशोधकांची नावं आहेत? जागतिक कीर्तीचे कलावंत, ऑलिंपिकमध्ये पदके जिंकलेले खेळाडू, लेखक-साहित्यिक, उद्योग-व्यापारात नाव कमावलेले लोकं किती आहेत? याचे कारण आमच्याकडे गुणवत्ता असलेली मुलं अल्पसंतुष्ट किंवा स्वार्थी तरी आहेत. नाहीतर त्यांची बौद्धिक झेपच तितकीशी मोठी नाही! म्हणूनच आपल्याकडे ज्याला गुणवत्ता म्हणतात त्याचाच नीट विचार व्हायला हवा. कोणी याला मोघम विधानही म्हणेल. पण जे चित्र दिसते, त्याचे विश्लेषण करू जाता हेच वास्तव समोर उभे ठाकते. याविषयी कधी तरी बोलायला हवे. कारण शोधांनी, संशोधनाने जग बदलते. याकडे डोळेझाक करता कामा नये. ती आपणच आपली केलेली फसवणूक होईल.

करिअर म्हणजे काय तर आधी म्हटल्याप्रमाणे दूर शहरात किंवा परदेशात जाऊन नोकरी करणे आणि पैसे कमावणे, अशी आपली ठाम समजूत आहे. आजही हा देश खेड्यांचा आहे, याचे भानच उरलेले नसल्याने शहरांकडे बेकारांचे लोंढेच्या लोंढे जाताना दिसत आहेत. तिकडं नीट काम मिळत नसल्यानं शहरांवरील भार आणि बकालीकरण वाढत आहे. नागरी सोयी-सुविधांवर भलता ताण येत आहे. या तरुणांच्या हाताला हाताला काम मिळाले असते तर स्थलांतर रोखणे शक्य होऊ शकतं. याशिवाय ग्रामीण विकासाला हातभार लागेल. शेतीतील अन्न धान्य आणि इतर जीवनावश्यक उत्पादनं सर्वांना हवी असतात. ती उत्पादित कोणी करायची? आज शेती करायला तरुण धजावत नाहीत. कारण हातानं काम करणारे लोकं आम्ही हलकट लेखतो. डोक्यानं काम करणारे लोकं सर्वच अर्थानं श्रेष्ठ असल्याचं आपली व्यवस्था मनावर बिंबवत राहाते. आपल्या मूल्य व्यवस्थेच्या मोजपट्ट्याही तसंच अधोरेखित करत असतात. प्रतिष्ठा कोणाला, कशाला द्यायची याचा विचार करताना आपल्या एकूण मूल्यव्यवस्थेला देखील काही प्रश्न विचारावे लागतील.

वास्तविक आपल्या गावाची गरज ओळखून अनेक सेवा, उद्योगांच्या वाढीला, विस्ताराला आज मोठा वाव आहे. बँकांचे कर्ज उपलब्ध आहेत. पण अशा गोष्टी करायला आम्ही मुलांचं मानस घडवलं कुठंय? एकीकडे उद्योगांना, सेवा क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीये आणि दुसरीकडे तरुणांच्या हाताला काम नाहीये, अशा विचित्र कोंडीत आपण सापडलो आहोत. यासाठी करिअरच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे लागेल. करिअर या कंसेप्टकडे व्यापक अर्थाने बघायला मुलांना शिकवावं लागेल.

आज समाजाला उपयोगी पडेल, असे संशोधन करणे किंवा तत्सम काहीतरी सामाजिक स्वरूपाचं काम करणे या गोष्टीला कथित यशस्वी करिअरमध्ये जागाच नाहीये. करिअरीस्टीक मुलं परीक्षार्थी बनून जगतात. अभ्यास एके अभ्यास करताना झापडबंद नजरेने आयुष्याकडे, समाजाकडे बघत असतात. अशा अनेक मुलांचं एकूण व्यक्तिमत्त्व सुमार दर्जाचे असल्याचे दिसते.

शेवटी असे आहे की, भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांतून वैयक्तिक कुटुंबाचा उत्कर्ष जरूर होऊ शकेल. पण ज्या देशाने/समाजाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला असतो त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी गोष्टी करायचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवाये. आज तो होताना दिसत नाहीये, याचा खेद वाटतो. नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थशास्रज्ञ अमर्त्य सेन म्हणतात की, ‘आपल्याकडील ज्ञान, कौशल्य आपल्या अवतीभोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी, उत्थापनासाठी उपयोगी पडत नसेल तर ते कुचकामी ठरेल.”

*भाऊसाहेब चासकर,*
९४२२८५५१५१.
bhauchaskar@gmail.com
(लेखक जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रातील  कार्यकर्ते आहेत.)

Sunday, July 10, 2016

RTE - 2009 ची कलमे

RTE ची कलमे

✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक,
कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.


Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...