Pages

Monday, September 26, 2016

मुलांना काही सांगायचंय

मुलांना काही सांगायचंय...

वैशाली गेडाम

```Maharashtra Times | Sep 25, 2016, 03.00 AM IST```

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत सरकारने प्रसिद्ध केलेल्या टिपणावर सर्व संबंधित घटकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या मुलांसाठी हा सारा खटाटोप आहे, त्यांना काय वाटते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मुदलीयार आयोग १९५२-५३, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८, (कोठारी आयोग) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ यामधून आपण मुलांच्या यशस्वी शिक्षणाची व भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघितली आहेत. कोठारी आयोगाच्या अहवालातील 'भारताचे भवितव्य वर्गाखोल्यांतून घडत आहे' हे वाक्य अंगावर रोमांच आणणारे आहे. खरेच कोणत्याही देशाचे भवितव्य त्या देशाचे शिक्षण कसे आहे, मुले शाळेत काय शिकत आहेत यावर अवलंबून असते. काळानुरूप शैक्षणिक धोरणांचा पुनर्विचार होणे आणि त्यात योग्य ते बदल व नवीन संकल्पनांचा, घटकांचा, विषयांचा समावेश होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण साकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
मुलांबाबत धोरणे आखताना मुलांना नेमके काय हवेय, मुले काय विचार करतात, याचा कधी विचार केला गेलाय का, असा प्रश्न पडतो. मुलांबाबतचे सर्वच निर्णय मोठी माणसे घेऊन मोकळी होतात. आपण जोपर्यंत मुलांना पूर्णपणे समजून घेत नाही, तोपर्यंत मुलांच्या हिताचे निर्णय आपल्या हातून होणे शक्य नाही. प्रत्येक वेळी मुलांच्या मताचा आदर करून, स्वातंत्र्य देऊन व सोयीसुविधा देऊन शिकण्याची संधी दिल्याने मुले किती प्रतिभावान, कल्पक, आत्मविश्वासाने परिपूर्ण होतात, ते मी गेल्या १९ वर्षांत शिक्षिका म्हणून अनुभवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्यांच्या मतांचे, कल्पनांचे, इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे या हेतूने मी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कल्पना माझ्या शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दिली. त्यावर चर्चा केली. मुलांना काही प्रश्न विचारून त्यावर त्यांची मते, विचार मांडायला सांगितले. मुलांनी मांडलेली मते, विचार आपल्याला विचार करायला भाग पडणारी आहेत.
मी मुलांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६ च्या प्रस्तावित आराखड्यामधील प्रकरण ४ मधील मुद्द्यांना अनुसरून पुढील प्रश्न विचारले : शाळा कशी हवी? शिक्षक कसे हवेत? अभ्यास कसा हवा? पाठ्यपुस्तके कशी हवीत? तुम्हाला कोणते विषय महत्त्वाचे वाटतात? शिक्षण कोणत्या भाषेत हवे? मुलांना नापास करावे काय? नापासाबाबत तुमचे मत काय? परीक्षेबाबत तुमचे मत काय?

*यावर मुलांनी मांडलेली मते, विचार असे :*
आम्हाला मुळीच न मारणारे, मुळीच न रागावणारे, आमच्यावर प्रेम करणारे, आमच्यावर विश्वास ठेवणारे, चांगले वागणारे व आम्हाला समजून घेणारे शिक्षक पाहिजेत. शिक्षकांनी रागावल्यावर मुलांची शिकण्याची इच्छा कमी होते. शिक्षा न करण्याचा कायदा झाला, तरी आम्हाला शिक्षा होते. मुलांच्या डोक्यात चांगला विचार यावा म्हणून त्यांना घरी किंवा शाळेत त्रास देऊ नये. घरी आई-बाबा रागावल्यास शाळेत गेल्यावर मुलाचे शिक्षणाकडे मुळीच लक्ष लागत नाही आणि डोक्यात घरचाच विचार सुरू राहतो. त्यामुळे आई-वडिलांना समजावून सांगावे. आई-वडिलांना समजावून सांगण्याचं काम शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आहे आणि शिक्षकांना समजावून सांगण्याचे काम सरकारचे आहे. शाळेत आम्हाला दुपारी दोन वाजता पोषण आहार मिळतो. मात्र, त्यापूर्वी १२ वाजता आम्हाला भूक लागलेली असते. त्यामुळे आम्हाला दोन वेळ खायला पाहिजे. आम्हाला दररोज एक फळ खायला मिळावे असे वाटते.

मुलांचे आणखी काही मुद्दे असे : शाळा मजबूत बांधलेल्या असल्या पाहिजेत. आमची शाळा पावसाळ्यात गळते. शिक्षक गावात राहिले पाहिजेत. शाळेत वाचनालय पाहिजे आणि ते पूर्ण दिवसभर सुरू पाहिजे. म्हणजे जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेथे जाता आले पाहिजे. शाळेचे गेट सदैव उघडे पाहिजे. वाटेल तेव्हा शाळेत जाता आले पाहिजे. आम्हाला परिपाठ बिलकुल आवडत नाही. कोणतीच आणि एकच एक प्रतिज्ञा व प्रार्थना आमच्याकडून रोजच्या रोज म्हणवून घेतल्या जाऊ नयेत. आम्हाला खेळायला खूप म्हणजे खूपच आवडते. आमच्या शाळेला आणि आमच्या गावात सुद्धा आम्हाला खेळायला क्रीडांगण नाही. प्रत्येक शाळेत क्रीडांगण असलेच पाहिजे. खेळाचे साहित्य आणि खेळ शिकविणारे शिक्षक असले पाहिजेत. खेळाला खूप महत्त्व दिले पाहिजे. दिवसभर शाळेतच, एकाच वर्गात बसून शिकवू नये. आम्हाला कोंडल्यासारखे वाटते. आठव्या वर्गापासून शाळेत एक, दोन तरी शिक्षिका असल्याच पाहिजेत. काही शिक्षकांची नजर चांगली नसते. ते मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहतात. मुलींना ते कळते. मुलींना हे आवडत नाही. त्यामुळे काही मुली जीव देतात. काही मुलींवर बलात्कार होतात. असे होऊ नये. मुलामुलीत भेदभाव करू नये.
शालेय शिक्षणाच्या फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना मुलांनी दिलेला प्रतिसाद असा होता : शिक्षक खूप हुशार पाहिजेत. आम्हाला विषय समजेपर्यंत त्यांनी तो समजावून दिला पाहिजे. चौथ्या वर्गापासून खूप अभ्यास असतो. तो आम्हाला समजत नाही. लक्षात राहत नाही. गणिताचा अभ्यास खूपच जास्त असतो. जगातले कोणतेही गणित आम्हाला शिकवा; पण एका वर्षात खूप सारे आमच्या डोक्यात भरण्याचा प्रयत्न करू नका.
इंग्रजी भाषा सोपीकडून कठीणकडे शिकवली पाहिजे. इतकी पुस्तके पाठविण्याची काय गरज आहे? भाषा आम्ही परिसरातून व वाचनालयातील पुस्तकातून शिकू शकतो. पुस्तक पाहूनच वाचायची इच्छा होत नाही; कारण पुस्तकात बारीक अक्षरे असतात. दिवसातून दोनच विषय शिकवावेत; पण समजण्यालायक शिकवावे. परीक्षेत पुस्तकातील माहिती विचारू नये.
शिक्षण हक्क कायद्याद्वारे सध्या आठवीपर्यंत नापास केले जात नाही. त्यात आता बदल करण्यात येणार आहे. त्याबाबत मुले म्हणतात : नापास करू नये. आम्हाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून मुले नापास होतात. काही मुले नापास झाल्यावर शाळा सोडून देतात. एकदा नापास झाल्यावर पुढे शिकण्याची इच्छा जागृत होत नाही. काही मुले आत्महत्या करतात. मुलींचे लग्न लवकर केले जाते. नापास मुलांना घरकामाला जुंपले जाते. आई-वडील मारतात, शिव्या देतात. नापास झाल्यावर काही तरी करण्याची इच्छा मरून जाते.
परीक्षेबाबत मुले काय म्हणतात, याचाही वेध घेतला. परीक्षा म्हणजे काय हेच समजले नाही, तर परीक्षा कठीण आहे की सोपी आहे हे आम्हाला कसे कळणार? आणि परीक्षा म्हणजे काय हेच माहीत नसले, तर आम्ही परीक्षा कशी देणार? आपण शिकतो तीच परीक्षा असते. परीक्षा कधीच संपत नाही, अशा प्रकारचे मत विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत मांडले.
याखेरीज मुलांनी मांडलेले इतर मुद्दे : शाळेला शेती पाहिजे. भाजीपाला, फळे यांचे उत्पादन आम्ही शाळेत करू शकलो पाहिजे. गावातील समस्या सोडविण्यात शाळेने पुढाकार घेतला पाहिजे. त्यात मुलांचा सहभाग असला पाहिजे व हे शिक्षणातूनच शिकविले पाहिजे. आम्हाला पुस्तके सुटसुटीत आणि लवकर समजतील अशी व आकर्षक पाहिजेत. वर्षभर एका विषयाचे एकच पुस्तक नकाे. एका विषयासाठी वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळाली पाहिजेत. आम्हाला सहलीला जावे वाटते; पण आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आम्ही सहलीला जाऊ शकत नाही. इतिहास विषय आम्हाला इतक्या लवकर शिकवू नये असे आम्हाला वाटते. गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय महत्त्वाचे आहेत. खेळ, नृत्य, गायन, चित्र, शिल्प, अभिनय वगैरे विषय तर शिकविण्यातच येत नाहीत. आम्हाला हे विषय शिकायला खूपच आवडतात. आणि हे विषय पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष शिकवावेत. हे विषय शिकविण्यासाठी खास शिक्षक असावेत. आठव्या वर्गापासून शरीराबद्दल माहिती असावी.
आपल्याच भाषेतून शिकवले पाहिजे. कारण आपल्या भाषेतून आपल्याला छान समजते. आमच्या गावातील काही छोटी छोटी मुले अंगणवाडीत जाण्याऐवजी इंग्रजी शाळेसाठी बाहेरगावी जाणेयेणे करतात. ते त्यांना लांब होते. असे होऊ नये. मुलांना त्रास होतो, हे मुद्देही मुलांनी आवर्जून मांडले. कितीही चांगले धोरण आखले, तरी मुले म्हणतात त्या मूलभूत गोष्टींचा विचार न केल्यास ते यशस्वी होणार नाही, हे यावरून स्पष्ट होते.

(ले‌खिका चंद्रपूर जिल्ह्यातील मसाळा (तुकूम) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षिका आहेत.)

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...