Pages

Monday, September 5, 2016

साने गुरुजींची शाळा

शिक्षक दिन विशेष


साने गुरुजी ६ वर्षे शिक्षक म्हणून अमळनेर ला होते..पण त्यांनी शिक्षक म्हणून कसे काम केले याविषयी फार माहिती नसते .शिक्षकदिनानिमित्त आज लोकमत च्या रविवार पुरवणीत मी साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कोणते उपक्रम केले ?ते कसे शिकवत ?यावर लेख लिहिलाय ((शेअर करून शिक्षकापर्यंत हे पोहोचवावे


साने गुरुजींची शाळा

- हेरंब कुलकर्णी

आज  शिक्षक दिन. शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून जे प्रयोग केले त्यांची चर्चा फारशी झाली नाही. गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा, शिक्षणविचारांचा, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे सारे मूलभूत प्रवृत्तीने शिक्षक व शैक्षणिक तत्त्वज्ञ होते.

साने गुरु जी अमळनेरला १९२४ ला शिक्षक झाले. त्यांचा स्वभाव संकोची होता. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणशास्त्राची पदवी नसताना कसे शिकवणार हा प्रश्न होता. सुरुवातीला ते पाचवीला इंग्रजी व संस्कृत आणि सहावीला मराठी शिकवत. पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरु जींच्या डोळ्यात पाणी येत असे.

त्यांचे शिकवणे मुले पुढेही विसरली नाहीत. कवी दत्त यांचा शिकविलेला पाळणा आणि शेक्सपिअरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे मुले एकमेकांना सांगत असत. गुरुजींनी कवी दत्त यांचा पाळणा शिकवताना दारिद्र्यामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा- आकांक्षाचे उद्ध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. गुरु जी म्हणाले की, ‘आई असणं ही मानवी जीवनातील अति महत्त्वाची घटना आहे. आईचे प्रेम तेच खरे प्रेम.’ गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले.

मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत. इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. ‘माझी जन्मभूमी’ ही कविता शिकवताना डोळे भरून आले. कवितेतील ‘नि:सत्त्व निर्धन तुला म्हणताती लोक’ ही ओळ त्यांनी म्हटली. डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले.

गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.

छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’

मुलांची त्यांना टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. मुलांच्या मदतीने गुरु जींनी बाग तयार केली. एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरु जींनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरु जी एकदा शिकवत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

गुरु जींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि त्यांनी वर्ग सोडून दिला. समानतेची शिकवण गुरु जी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. एकदा मुले आणि गुरु जी सहलीला गेली. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी गादीवर झोपणार नाही.’’

सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. वर्तमानपत्रात मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करून ठेवीत. महात्मा गांधींचा ‘यंग इंडिया’ तिथे येत असे. अमृतबझार पत्रिकाही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.

छात्रालय दैनिक अशी एक वेगळीच कल्पना गुरुजींना सुचली. ते रोज रात्री- पहाटे उठून दोन तास एकटेच ते संपूर्ण दैनिक लिहून काढत आणि सकाळी मुलांसाठी लावत. इतके टोकाचे कष्ट ते मुलांसाठी घेत होते. देश-विदेशातील विविध घटनांची नोंद असे. थोरांची चरित्रे, विज्ञानातील विविध प्रयोगांची माहिती, कधी आठवणी दिल्या जात. स्थानिक गावातील शाळेतील आणि छात्रालयात जे घडायचे तेसुद्धा या दैनिकात असायचे. एखाद्या विद्यार्थ्याने काही चांगले काम केले की त्याची माहिती असे आणि एखाद्याच्या वागण्यात काही उणेपणा असला तरी त्याचे नाव न घेता निनावी नोंद केलेली असे. यातून त्या मुलाला आपली चूक दुरुस्तीचा संदेश आपोआप मिळायचा.

या दैनिकात मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, स्फुट विचार असे खूप काही असे. जगातील विविध देशांचे स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ, इकबाल, व्हीटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत.

मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेऊन खेळत. विटीदांडूचाही खेळ खेळत. मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.

साने गुरु जींनी सुरुवातीला वाचनालय काढले. विद्यार्थ्यांना दरमहा दोन आणे वर्गणीत पुस्तके, मासिके वाचायला मिळत. गुरु जी मुलांनी गांधींचा ‘यंग इंडिया’ वाचावा म्हणून त्यावर लाल पेनने खुणा करून ठेवत. गुरुजी मुलांची खानेसुमारी करीत. त्यात लेखक, चित्रकार, खेळाडू असे मुलांचे वर्गीकरण करीत.

असाचा एक उपक्र म हा मुलांनी आपल्या गावांची वर्णने लिहायची. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा अशी विविध माहिती जमवायला सांगत.

१९४६ मध्ये ‘कुमारांपुढील कार्य’ या भाषणात ते म्हणतात की, ‘‘तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा.

एकेका तालुक्यात ४/४ कुमारांनी हिंडावे व ते गोळा करून त्याचे नीट संपादन करा. ते अमर कार्य होईल.’’

गुरु जींनी जरी शिक्षकी पेशा सोडला तरीसुद्धा त्यांना पुन्हा शिक्षक होण्याची ओढ होती. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर ते मित्राला म्हणाले की, ‘‘मला कुठे तरी ग्रामविभागात मुलांत राहावे, त्यांच्यासोबत खपावे, त्यांना चार अक्षरे शिकवावी असे वाटते.

परंतु देवाने येथे गुंतवून टाकले आहे.’’

साने गुरुजींचे

शिक्षणासंबंधी विचार..

मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट आणि शिक्षा, दंड यांनी मुलांचा खरा विकास होत नाही. खरा विकास हृदयात शिरल्याने व प्रत्यक्ष सेवेने होईल. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक लहानपणी मुलांना मिळायला हवेत. मुलांना कितीही देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. उलट त्यांना याच गोष्टींचा कंटाळा वाटू लागतो. मुलांच्या मनावर जर संस्कारच नाही तर एकदम तुमच्या गोष्टी त्यांना कशा आवडू लागतील? शिक्षकांनी प्रथम ५ ते ६ मिनिटे सामाजिक, राष्ट्रीय विषय मुलांशी बोलावे. सर्वच शिक्षक जर असे करू लागले तर मुलांची मने फुलतील...

(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com  phone 9270947971

------------------------------------------------
शिक्षक दिनानिमित्त गुरुजींचा हा प्रेरणादायी लेख आपल्या  शिक्षक मित्रांना पाठवा 

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...