Pages

Sunday, September 18, 2016

द्वेष

द्वेष

‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे

डॉ. केतकी गद्रे | September 18, 2016 1:01 AM



‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे; किंबहुना अनिवार्यच! कल्पनाविलासात रमलो की आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते की, मानवी जीवन हे प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता या व अशा सकारात्मक भावनांनी भरलेलं असावं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास अधिक कचरतो, भितो. भीती हीसुद्धा एक ‘भावना’च आहे, परंतु अशीही एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात. ती म्हणजे ‘द्वेष’. फारसे न रुचणारे- नावडते-  न पटणारे- तिरस्कारास पात्र ठरणारे- दुस्वास  आणि अखेर द्वेष.. हे द्वेषापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता, त्यांना थारा न देता, द्वेषाची ही सौम्य रुपांकडे लक्ष न देता आपण द्वेषयात्रेस निघतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो, तेव्हा द्वेष सकारात्मक रूप धारण करतो. म्हणण्याचा अर्थ असा की, उदाहरणार्थ- ‘I hate a particular person, caste, religion’ (म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो) हे म्हणणे जसे तीक्ष्ण, घातक आणि ऐकण्यास,अनुभवण्यास नकोसे वाटणारेतसेच, ‘I hate unjust, abusive tendencies’ (अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविषयी मला द्वेष वाटतो) याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना इतरांप्रति किंवा स्वत:प्रति प्रदर्शित होऊ शकते. यात इतरांप्रति, स्वत:प्रति, एखाद्या गोष्टीप्रति, कल्पना -संकल्पनेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाविषयी एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली, टोकाची अप्रीती व घृणा असते. ‘द्वेष’ हा बऱ्याचदा ‘राग’, ‘हिंसा’, ‘तिटकारा’, ‘किळस’ अशा भावना- वर्तनांशी संबंधित असतो. ‘द्वेष’ ही भावना अनेकांमध्ये दीर्घकाळ रुजणारी असल्याकारणाने मानसोपचारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ती एका घटकेची भावनिक स्थिती नसून, ती एक प्रकारची वृत्ती आहे. ती एक प्रकारची मनोरचना आहे. कदाचित, साध्या ‘नावडी’पासून सुरू झालेल्या  द्वेषाच्या या प्रवासाला स्वैररीत्या वाढू दिल्याने, त्याला खतपाणी घातल्याने, वेळीच आळा न घातल्यान त्याचे रानटी रोपटे आपले भाव-वर्तनाचे विश्व व्यापून टाकत असावे. इतकंच नव्हे, तर मेंदूच्या चाचण्यांमधून नावडत्या व्यक्तींचे चेहरे पाहून होणारी मेंदूची हालचाल अभ्यासली गेली, तेव्हा मेंदूतील काही विशिष्ट स्थानं कार्यरत असल्याचे लक्षात आले. द्वेष हे ‘गुन्हा’ करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जातं. बऱ्याचदा ‘आपण’ आणि ‘ते’/ ‘इतर’ असे विभाजन झाले की एकमेकांविषयी असहिष्णुता निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणजे ‘आपण’, ‘आपल्यातील लोक’, ‘आपल्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन हे आपल्याला आपलेसे व श्रेष्ठ वाटतात. ज्या क्षणी ‘ते’, ‘त्यांचे’ लोक, ‘त्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन अशी विभागणी झाली की एक अदृश्य भिंत तयार होताना दिसते. विभाजन टिकवून ठेवणारी, भेदभावाचा पुरस्कार करणारी ही विशाल भिंत म्हणजेच आपण आपल्या मानलेल्या लोकांसारखा जो नाही, जो भिन्न आहे, तो द्वेषास पात्र  आहे असे मानणे. याचे मुख्य कारण म्हणजे, ही भिन्नता विविधतेच्या दुर्बिणीतून न पाहता उच्च-नीच या मापदंडातून पाहिली जाते. परिणामी विविधता स्वीकारण्यात आपण असमर्थ ठरतो, हे कटू सत्य आहे. म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तीबद्दल ‘ऐकिवातल्या’ मताप्रमाणे ग्रह करून घेणे, तो ग्रह ग्रा आहे हा ठाम विश्वास असणे; तसेच त्या ग्रहाला बळ देणारी बाजू उचलून धरणे आणि ग्रहाला छेद देणारी बाब दुर्लक्षित करणे- ही प्रक्रिया वारंवार करत राहणे. तसेच काही काळाने आपोआप (सवयीमुळे) घडणे आणि (नकारात्मक) ग्रह पक्का होत जाणे आणि कालांतराने अशीच वर्तनशैली बनणे ही विचारांची साखळी द्वेष वाटण्याच्या, वाटत राहण्याच्या संदर्भात आपला कार्यभाग जबाबदारीने सांभाळते. मग अशा व्यक्तीने केलेली वक्तव्ये, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मतं, धरलेले आग्रह हे किती तीव्र, नकारात्मक असतील, याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येईल. अशी  व्यक्ती जर ही मानसिकता समाजात रुजवू लागली तर  नातेसंबंध, त्यातील विश्वास, त्यातील सहिष्णुता, त्यातील स्वातंत्र्य यांची राखरांगोळी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे, दुफळी निर्माण करून वातावरण धगधगतं ठेवू पाहणारे, थोडक्यात द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. लोक त्यांच्या आहारीही जाताना दिसतात. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, कधी स्वेच्छेने, कधी समविचाराने, तर कधी अजाणतेपणाने, अविवेकामुळे तर कधी निव्वळ मूर्खपणामुळे द्वेष ही भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ही भावना मग मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

धर्मग्रंथांनी द्वेष या भावनेला तुच्छ मानलं आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘धर्म’ जाणणाऱ्या, जोपासणाऱ्या तथाकथित व्यक्तींना या बोधाचा नेमका विसर पडताना दिसला की नवल वाटतं. परंतु हेही खरं की, आपल्या मनाशी ठरवून जोपासलेला सहेतुक द्वेष, कोणाच्यातरी चिथावणीमुळे उत्पन्न झालेली द्वेषाची भावना याला आळा घालणे, हे स्वाभाविक उत्पन्न होणाऱ्या द्वेषाच्या भावनेपेक्षा कठीण आहे. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं हे गाढ झोपलेल्यापेक्षा कठीण, तसंच द्वेष या भावनेविषयी आहे. कोणाचाही द्वेष करू नका, हा विचार स्तुत्य आहे, परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे तितकेच कठीण आहे. हे ध्येय गाठणे मोठय़ा धैर्याचे काम आहे. परंतु हे ध्येय  जो गाठतो तो आपले जीवन प्रफुल्लित करण्याची क्षमता स्वत:मध्ये बाळगतो. हे ध्येय गाठण्याची प्रक्रिया वरकरणी कॉमन सेन्सची गोष्ट वाटेल. आहेसुद्धा.  पण ती, ते ध्येय गाठण्याचे टप्पे व्यक्तिमत्त्वावर आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत.

सुरुवात द्वेष-केंद्र ओळखण्यापासून करू या. म्हणजे आपली ही भावना कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, काय घडले वा न घडल्यामुळे उत्पन्न होते, याचा अंदाज घेऊ या. यांचे वर्गीकरण करू या. म्हणजे आधी चर्चिल्याप्रमाणे भावनिक तीव्रता लक्षात ठेवून मग वर्गीकरण करू या. उदा. एखादी गोष्ट मला रुचत नाही की आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो.. म्हणजे दुस्वास की द्वेष वाटतो याची वर्गवारी केल्यास (विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे, प्रगल्भतेने केल्यास) द्वेषाची केंद्रे लक्षात येतील. हे वर्गीकरण महत्त्वाचं, कारण त्या तीव्रतेच्या अमलाप्रमाणेच त्याची उपचारपद्धती ठरते. यानंतर द्वेषाची भावना निर्माण होण्यामागचे नेमके कारण शोधावे. हे कारण काही ऐकिवातल्या तर काही प्रत्यक्षातल्या अनुभवांत दडलेले आहे का ते पाहावे. द्वेषभावना अभंग राखल्याने, मला स्वत:ला, आजूबाजूच्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला काय प्रकारच्या आव्हानांना, परिणामांना तोंड द्यावे लागत आहे? ही भावना जोपासून माझा (वरकरणी) फायदा झाला असला, तरी मी त्याला खऱ्याअर्थी फायदा म्हणू शकेन का? लाभ घेण्याच्या अट्टहासात एकीकडे काय गमावलं याचाही आलेख मांडलेला बरा. हा पारदर्शक आलेखच पुढे निर्माण होणाऱ्या (संभाव्य) द्वेषाच्या भावनेला उत्तेजन देण्यापूर्वी आपल्यापुढे, फी िर्रॠल्लं’ च्या  रूपात उभा राहील. या प्रक्रियेत, या प्रक्रियेवर अविश्वास असणाऱ्या व्यक्ती आपले पाय खेचतील, आपल्या पूर्वीच्या वचनांचा.. तथाकथित सिद्धान्तांचा, समूह-निष्ठेचा वगैरे दाखला देतील. याने आपण विचलित होऊ शकू. परंतु हे कायम लक्षात ठेवा की, आपल्या मानसिकतेचे नियंत्रण हे (जवळजवळ) नेहमी / बऱ्याचदा आपल्या अखत्यारीत असू  शकते आणि इतरांचा त्यावर प्रभाव व्हावा की न व्हावा, झालाच तर कितपत व्हावा, हे ठरवणे हेही बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. परंतु आपण वाहवत जातो आणि आपल्या मनाला अंकित ठेवण्याचा हा मोठा अधिकार गमावून बसतो. हे कटाक्षाने टाळू या. या बाबीची सतत उजळणी केल्यास, ही बाब जास्त स्मरणात राहील आणि प्रत्यक्ष वर्तनात उतरेल.

द्वेषाने द्वेषच मिळतो, द्वेष वाढतो, वाढतच जातो, या वणव्याला वेळीच आळा घातला नाही, तर ही आग, आपल्या विचार – आचार – भावनांच्या डोलाऱ्याला राखेचं स्वरूप देण्यास वेळ लागणार नाही. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द – विचार – वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या, प्रगल्भ आचार आणि सूक्ष्म दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वत:ला कोणत्या साच्यात घालायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे, नाही का? द्वेषभावना जोपासून स्वत:पासून, इतरांपासून दूर जायचे की सशक्त आणि स्वीकाराची मानसिकता बहरवण्याच्या प्रयत्नात राहावं हे वेळीच ठरवू. आपण स्वत:ला समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणवत असू, तर तो घटक सहिष्णु आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे- नीतिमत्तेच्या मापदंडांनी आणि सांविधानिकदृष्टय़ासुद्धा! त्यामुळे या सार्थ अपेक्षेस पोषक आणि साजेशा भावनांचा गुच्छ उराशी-दाराशी बाळगलेला बरा!

डॉ. केतकी गद्रे –

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...