Pages

Monday, November 21, 2016

गणिताच्या वर्गात खडू - फळ्याला सुट्टी

गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

प्रतिनिधी, पुणे | November 20, 2016 2:07 AM

 गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

शिक्षण विभागाकडून शाळांना आदेश; मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

राज्यातील शाळांमध्ये आता गणिताच्या वर्गात खडू-फळ्यावरील आकडेमोडीला सुट्टी मिळणार आहे. गणित हा विषय सर्वाधिक विद्यार्थ्यांना कठीण वाटत असल्यामुळे तो मणी, नोटा, वेगवेगळे आकार अशा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकवण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

आतापर्यंत हात कसे धुवावेत, शाळा स्वच्छ कशी ठेवावी अशा बाबींचे शासन आदेश काढल्यानंतर आता वर्गात गणित कसे शिकवावे याचाही आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. गणित शिकवण्याची जुनी पद्धत न वापरता नवे शैक्षणिक साहित्य वापरून गणित शिकवण्यात यावे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांची गणित आणि भाषा विषयातील प्रगती समाधानकारक नाही. गणित या विषयाची भीती वाटत असल्यामुळे मुले या विषयामध्ये मागे असल्याचे शासकीय पाहणीतून समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर गणित हा विषय वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातूनच शिकवण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. रंगित मणी, मण्यांच्या माळा, शंभर एकक ठोकळे, दहा दशक दांडे, पाच शतक पाटय़ा आणि हजाराचा ठोकळा, नाणी आणि नोटा, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे, मॅचिंग सेट्स, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जिओ बोर्ड, मीटर टेप, केसांना लावण्याच्या पिना, दोरी आणि पाटय़ा असे साहित्य प्रत्येक शाळेने गोळा करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात हे साहित्य शाळांनी उपलब्ध करायचे आहे. हे साहित्य कसे वापरायचे याचेही प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे.

गणित साहित्य संचही सीएसआरमधून?

एकीकडे शिक्षण विभागाच्या विविध योजना अमलात आणताना त्यासाठीचा खर्च सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करू इच्छिणाऱ्या कंपन्या (सीएसआर), लोकसहभाग, पालक यांच्या माध्यमातून उभा करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना देण्यात येतात. गणित संचाच्या शैक्षणिक साहित्याचा खर्चही सीएसआर किंवा लोकसहभागातून उभा करण्याची विभागाची सूचना आहे. खर्चाची रक्कम उभी न राहिल्यास त्याचा खर्च स्थानिक प्रशासनाने करायचा आहे. सहा विद्यार्थ्यांच्या गटासाठी असणाऱ्या एका संचाची किंमत ही ४ ते ५ हजार रुपये आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...