Pages

Saturday, June 4, 2016

भिंतीचा वापर

भिंतींचा वापर...

***********************
मूळ लेख : कृष्णकुमार
मराठी अनुवाद : फारूक एस.काझी.
साभार : दीवार का इस्तमाल  और अन्य लेख, एकलव्य प्रकाशन, भोपाल.
प्रकाशन :2008
***********************

          बिनभिंतींच्या शाळांचा विषय थोडा बाजूला ठेवला तर ब-यांच अंशी आपल्याला असं म्हंमता येईल की बहुंशी शाळा या भिंतींचा वापर मुलांचं रक्षण करण्यासाठी व जगापासून दूर एक वेगळंच वातावरण तयार करण्यासाठी करतात.मुलांचं रक्षण यात ऊन,वारा आणि पाऊस यांच्यापासून रक्षण ह्याबाबत काहीच दुमत असण्याचं कारण नाहीये. पण शंका तेव्हा  येते जेव्हा भिंतीचा आधार घेऊन शाळा मुलांना सामाजिक वास्तवापासून दूर न्यायचा प्रयत्न करतात. शाळाव्यवस्थेच्या दृष्टीने हे मुलांचं एक प्रकारे रक्षणच असतं. आपल्याकडे एक जुनी धारणा आहे की मुलांचं व्यक्तिमत्व वास्तवाची दाहकता सहन करूच शकत नाही. या धारणांचा वापर करून असं गृहित धरलं जातं की सामाजिक वास्तवापासून मुलांचं संरक्षण करणं हा शाळाचां जणू हक्कच आहे. या हक्कापाठोपाठ एक कर्तव्यही जन्म घेतं की मुलांसाठी समाजापासून दूर चार भिंतीत एक वेगळं विश्व निर्माण करावं.
         काही दिवसांपूर्वी भारतभर यात्रा करताना माझं लक्ष शाळांच्या भिंतींवरील सुविचारांवर गेलं. या शाळेत वेळेचा उपयोग अत्यंत विचित्र स्वरूपात होतो,तिथं लिहिलं होतं की "वेळ हीच शिस्त" ! संस्थेच्या आपसातील कलहामुळे व व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे सतत भांडणे ,वाद सुरू असतात .प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर लिहिलेलं होतं "क्रोध जिंकाल तर जग जिंकाल". अशीच काही वाक्ये होती जी शाळेतील वस्तुस्थितीच्या अगदी विपरित होती. या सुविचारांचा वापर करून मुलांच्या अवतीभोवती नैतिक वातावरण विणण्याचा प्रयत्न सुरू होता. हे वातावरण अशी नैतिकता शिकवण्याचा अट्टहास करत होतं ,जिचा आधार  ना  शाळेत पहायला मिळत होती ;ना शाळेबाहेर. यामुळे अशा सुविचारांचा हेतूच असफल झालेला दिसत होता. हे रोज रोज पाहून मुलांनाही सवयीनं माहित झालं असेल की भाषेचा उपयोग कोणत्याही निरर्थक कारणासाठी  होऊ शकतो. याअनुषंगाने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की , शाळेतील भिंती अभ्यसक्रमाबाबत नकारात्मक भूमिका पार पाडत आहेत. कारण भारतीय अभ्यसक्रम हा "भाषेच्या अर्थपूर्ण वापर करता येणे " असं भाषेचं उद्दिष्टं मांडतो. आणि शाळा स्वत: च भाषेचा कसा निरर्थक वापर करते हेच जणू मुलांना शिकवत असते.
       पाश्चात्य देशात भिंतींचा वापर मुलांच्या कृतीशीलतेशी जोडला गेलाय. वर्गात मुलं जी काही चित्रं काढतात, कथा-कविता-पत्र लिहितात त्यांना तात्काळ  भिंतीवरती डकवलं जातं. वर्गातील चारी भिंती अशा मुलांच्या विविध कृतींनी भरलेल्या  असतात.  जेव्हा मूल एखादी नवीन गोष्ट तयार करतं ,तेव्हा जूनी कृती काढून घेतली जाते. मूल जेव्हा आपली कृती पाहतं तेव्हा आपण शाळेचा एक भाग असल्याचा व शाळेत आपलं काहीतरी अस्तित्व आहे यााबाबत त्याला विश्वास वाटायला लागतो. म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाची दखल घेतली गेल्याचा आनंद होतो. हा विश्वास, आनंद केवळ  रजिस्टरला नोंदवलेल्या नावाने मिळत नाही. प्रत्येक मुलाची कृती भिंतीवर लावलेली असल्याने स्पर्धेचा प्रश्नच येत नाही. पाश्चात्य देशात 'व्यक्तीं'ना फार महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शाळाही मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात,मला वाटतं हे फार अनमोल उद्दिष्ट आहे.
       याचा अर्थ असा नव्हे की पाश्चिमात्य शाळा भारतीय शाळांहून अधिक सामाजिक वास्तवाशी जास्त जोडला गेलाय. वस्तुस्थिती ही आहे की दोन्ही प्रकारच्या शाळा समाजिक वस्तुस्थितीशी असलेली फारकत; वेगवेगळ्या पध्दतीने लपवत असतात. भारतीय शाळा आपल्या भिंती सुविचारांनी रंगवून मुलांना खोट्या नैतिकतेचे धडे देत असतात. पाश्चिमात्य शाळा मुलांच्या विविध कृती भिंतींवर डकवून ,मुलांच्या सामाजिकीकरणाची बाबदारी टाळून मोकळ्या होतात. (तुमचं काम लावलं आता आमची जबाबदारी संपली.इथं मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडतच नाही)
         इथं महत्त्व आहे याचं की या चार भिंतींच्या आत बसलेल्या मुलांना शाळा काय देते? भिंतीवर काय होतंय याचं एका मर्यादेपर्यंत महत्त्व जरूर आहे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे ते हे की नेमकं वर्गांच्या आत काय घडतं आहे ?

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...