Pages

Saturday, June 4, 2016

मूल वाचन कसं शिकतं...?

मुल वाचन कसं शिकतं...?

वाचनाचे टप्पे :- एक आराखडा
जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर -
 वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
⚡पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
⚡दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
⚡चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.

⚡पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...