Pages

Saturday, June 4, 2016

P.hd धारक प्राध्यापक मजुराची कैफियत

पीएचडीधारक प्राध्यापक मजूराची कैफियत!

शिक्षकांच्या सावकारकीबाबत एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी इथं फेसबूक वॉलवर शेअर केलेला टिपणवजा मजकूर आज अॅग्रोवन दैनिकाने भवताल सदरात प्रसिद्ध केला. लेखक म्हणून अॅग्रोवनने तिकडे माझा मोबाईल नंबर दिला आहे. मजकूर वाचून नेहमीप्रमाणे वाचकांचे फोन आले. लिहिणारा माणूस म्हणून वाचकांकडून आलेला फीडबॅक मला सतत समृद्ध करत आलाय. आज असे काही फोन येत होते. दिवसभर गाडी चालवून लांबवरचा प्रवास करून सायंकाळी घरी आलो. जराशी पाठ टेकवली, इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. थकलेलो असल्याने खरे म्हणजे त्या क्षणी फोन घ्यायची पण इच्छा नव्हती. फोन घेतला. मराठवाड्यातून एक शिक्षक बोलू लागले...
“सर नमस्कार, मी अमूकतमूक... आताच तुमचा लेख वाचला. आवडला, म्हणून फोन लावला. तुम्ही नेमकं लिहिलं आहे. सध्या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर प्रतिमाभंजन सुरू आहे. एकजात सारेच शिक्षक वाईट आहेत, असे समाज आणि माध्यमातून बोलले जात आहे. ज्याचा फार त्रास होतो.”
मी आपलं त्यांच्या हो ला होकार दिला. ते पुढे बोलतच राहिले.
“मी बारा वर्षांपासून इकडे ज्युनिअर कॉलेजात शिकवतोय. माझ्या परीने चांगले शिकवत आहे. आमचे विद्यार्थी घडले. चांगल्या नोकऱ्यांना लागले. त्यांची लग्नकार्ये झाली. त्यांना मुलंबाळं झाली. त्यांचे प्रपंच उभे राहिले. आम्ही मात्र आजही विनावेतन काम करत आहोत. मायबाप सरकारला दयेचा पाझर फुटेल. आज अनुदान मिळेल, उद्या अनुदान मिळेल, या आशेवर आम्ही एकेक दिवस मोजत आहोत. मी एम्. ए. एम्. एड., एम्. फील. केलेय. दोन वर्षांपूर्वी पीएच.डी. पण मिळाली.”
“अच्छा, तुम्ही डॉक्टरेट आहात. व्वा सर! इतक्या प्रतिकूलतेत तुम्ही शिकत राहिलात. सलाम सर तुम्हाला...” मी कौतुकानं म्हणालो.
“पण इतकं शिकून तरी काय करायचं? ही शुद्ध फसवणूक आहे सर. आम्ही आज जगायला मोताद आलोय सर. आजपर्यंत संस्थेने पगार म्हणून रोख एक रुपया पण दिला नाय सर. बाजारात कोथिंबीरीची जुडी घ्यायला गेलं तरी पाच रुपये रोख द्यावे लागतात. रविवारी, सुटीच्या दिवशी, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी आणि माझी बायको मोलमजुरी करतो. त्यातून कसाबसा घरखर्च भागवतो. आम्ही ज्या मुलांना शिकवतो त्यांच्याच शेतात कामाला जातोय. मला कामाची अजिबात लाज वाटत नाही सर. आता सवय झालीय. पण वाट तरी किती बघायची? यंदा तर मराठवाड्यात दुष्काळ आहे. काम पण नाहीये. उमर कलली सर आता आमची. काहीजण तर रिटायर व्हायची वेळ आली. पुढं पोराचं शिक्षण आहे. आजउद्या लेकीबाळी लग्नाला येतील. या सगळ्याला कसं सामोरं जायचं सांगा सर? आम्ही दारिद्र्यरेषेखालचे जगत आहोत. शिक्षक संघटना काहीच करत नाहीत. यावर तुम्ही आवाज उठवार. तुम्ही लेख लिहा, टीव्हीवर बोला. पण कायतरी करा सर...”
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असताना त्यांच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यांनी ‘साप्ताहिक साधना’मध्ये या विषयावर लिहायला सांगितले. ‘राज्यातले ३२ हजार शिक्षक जगताहेत वेठबिगारासारखं जिणं’ असा लेख मी लिहिला होता. डॉ. दाभोलकर यांनी तो लेख आणि त्यासोबत त्यांनी लिहिलेलं एक पत्र असं तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना पाठवलं होतं. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विनानुदानित शाळांना अनुदान द्यायचं कबूल केलं होतं. पुढे काहीच झालं नाही. मानसिक आधारासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी हे त्यांना सांगितलं... मध्येच मी थांबलो. पण पुढे काय बोलावं तेच मला सुचेना. उगीच अपराध्यासारखं वाटलं. दारिद्र्याच्या गर्तेत कोसळलेले शेतकरी, कष्टकरी यांची व्यथा वेदना पाहून मन कळवळतेच. पण पीएचडी मिळालेल्या एका प्राध्यापक मजूराची ही कैफियत ऐकून सुन्न झालो. एकूण शिक्षणाचाच हा पराभव आहे असे मला वाटले...

भाऊसाहेब चासकर
यांच्या फेसबूक वॉलवरुन.

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...