Pages

Saturday, June 4, 2016

मुलांचे शिकणे

मुलांचे शिकणे समजून घेऊ या!

चिमणा आणि चिमणी वर्गाच्या खिडकीत येऊन बसले. इकडे तिकडे भिरभिर पाहू लागले. वर्गभर फिरून आणि एकमेकांशी विचारविनिमय करून वर्गाच्या भिंतिवरील एका फोटोमागची जागा त्यांनी निश्चित केली. हे जोडपं खिडकीत येऊन बसल्यापासूनच मुलांचं लक्ष या चिमणाचिमणीवर होतं. त्यांचा प्रणय पाहून मुले मला सांगत , " मँडम, त्याई दोघं प्रेम करताहेत. हो न मँडमजी?"  "

मुले आणि मी इतर अभ्यासासोबत या चिमणा चिमणीचाही अभ्यास करु लागलो. काही दिवसांनी त्यांचं घरटं तयार होऊ लागलं. मुलंही त्या घरट्यात गुंतत होती. वर्गात , वर्गाच्या आसपास मुद्दाम तणीस, कापूस, गवत वगैरे टाकून ठेवू लागली.

मुले म्हणायची,  " त्याइनी बिचारे किती दूर दूर जाऊन काडीकचरा, गवत बीन घेऊन येतंत. त्यांना आपन थोडी मदत करु. मंग त्याइचं घरटं लवकर बनीन. चिमणी  आंडी देईन. मंग आंडे फुटून पिले निंगतीन...." मुले एक्साईट होऊन विचार करत होति. दरम्यान वर्गातील दुसऱ्या फोटोमागे दुसऱ्या जोडप्याचेही घरटे तयार होत होते. वर्गात दोन दोन घरटी ! मुले  खूपच उत्तेजित होती. चिमणा चिमणीसाठी वर्गात आणि शाळा परिसरात मुले दाणा पाणी ठेवू लागली . चिमण्या दाणे खाताना , पाणी पितांना  दिसल्या की मुलं खूश होत.

आमचे आणि चिमणाचिमणीचे मजेत चालले होते. एक दिवस शाळेत गेलो नि वर्गसफाई चालू असतांना मुलांना कोपऱ्यात घरट्यातून खाली पडलेलं पिलू दिसलं.  मुलांचा जीव कळवळला. पिलास पंख फुटले होते पण चालता किंवा उडता येत नव्हते. ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करे आणि कोलमडून पडे. मुले म्हणू लागली , "  मँडम, हे पिलू घाबरल्यावानी दिसते. हो न ? त्याच्या आईबाबापासून ते दूर झालं म्हनून त्याची हालत अशी झाली. याला याच्या आईबाची आठवण येत असीन अन् आईबाबा याले शोधत असतीन आपलं पिलू कोटी गेलं म्हनून "

मुलांनी त्याला तांदळाची कणी चारायला घेतली. पिलाने पटकन चोच उघडली. मुले पिलाच्या तोंडात दाणे टाकू लागले पिलू पटपट खाऊ लागले. पोट भरल्यावर पिलाने चोच उघडणे बंद केले नि शांत बसून गेलं. मुले पिलू परत घरट्यात ठेवू म्हणाली. पण माणसाचा हात लागलेलं पिलू चिमण्या स्वीकारत नाहीत असे ऐकले असल्यामुळे आणि त्याचा अनुभव आला असल्यामुळे पिलू घरट्यात ठेवायचे नाही असे ठरवले. वर्गात एक चिमणीचे जूने घरटे संग्रहीत होते त्यात मुलांनी त्या पिलास ठेवले. शाळा सुटल्यावर मुले त्यास घरी घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत आली तेव्हा त्या पिलासह आली. आता मुलांनी त्या पिलासाठी खोक्याचे घर बनविले होते. त्या घरात ते घरटे व त्यात ते पिलू होते. या अभ्यासाच्या जोडीला मुले भाषा गणिताचाही अभ्यास करीत होतीच. तसं पाहिलं तर या पिलाला वाढविण्यातही मुलांची भाषा आणि गणित समृद्धी होत होतीच. परिसर अभ्यास हा मूळ विषय होताच. मात्र मुले थोडीच जाणून होती , आपण या सगळ्यातून परिसर अभ्यास, विज्ञान शिकत आहोत म्हणून आणि यासोबतच आपला भाषिक आणि गणितीय अभ्यास होतोय म्हणून . मात्र शिक्षक म्हणून मला ही जाणीव होती. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग यांचं शैक्षणिक मूल्य मला ध्यानात घ्यावच लागतं नाहीतर नुसते पाठ वाचून दाखविण्याचा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे मुलांकडून सोडवून घेण्याचा आणि परीक्षेत पुस्तकातीलच प्रश्न विचारण्याचा निरर्थक, निःसत्व प्रयोग मी करत बसेन. म्हणून मी मुलांना पुस्तकं ' शिकवण्याचा ' प्रयत्न करीत नाही. त्यामुळे 'कोर्स कम्प्लीट ' व्हायचा आहे असं दडपण , टेन्शन मला येत नाही.  मी आणि मुले मजेत असतो.

चिमणा चिमणी जेंव्हा खिडकीत येऊन बसले होते तेव्हाच त्यांनी चिमणा कोणता आणि चिमणी कोणती हे ओळखले होते. सोबतच ' नर - मादी ' ही ओळखही त्यांनी करून घेतली. आता जेव्हा  घरट्यातून पडलेले पिलू मुलांनी उचलले तेंव्हाही त्यांनी ते बेबी चिमणा आहे , की बेबी चिमणी आहे हे ओळखले. हे पिलू बाळ  चिमणी आहे असे मुलांनी मला सांगितले . चिमणा आणि चिमणीत काय फरक असतो , तो कसा ओळखायचा हे ही मला सांगितले . माझे कर्तव्य एवढेच , की मुलांच्या आनंदात सहभागी होणे, मुलांचे आदराने ऐकणे प्रसंगानुसार उत्सुकता वाढविण्यासाठी किंवा शमविण्यासाठी माझ्याजवळ असलेली माहिती पुरविणे किंवा तसली पुस्तके उपलब्ध करून देणे. मुले अधिकची माहिती मिळविण्यासाठी ही  पुस्तके वाचतात. कधी नवीन माहिती मिळाली म्हणून खूश होतात तर कधी पूर्वानुभवाशी सांगड घातली गेली म्हणून खूश होतात पुस्तक वाचताना. त्यांच्या वर्गाचे पाठ्यपुस्तकही ते एक संदर्भ साहित्य म्हणूनच वापरतात.

मुले पिलाची रोज काळजी घेत होती. दाणापाणी तर करत होतीच शिवाय ते कुणाची शिकार बनू नये याचीही काळजी वाहत होती .

पाचव्या दिवशी मुलांनी पिलाचे बारसे केले एक एक रुपया काढून. पिलाचे नाव ठेवले ' चिकू' आणि पूर्ण शाळेला बिस्कुटे वाटली.

नुकताच ' जागतिक चिमणी दिन ' साजरा झाला. आम्ही तो साजरा नाही केला . कारण आमचा रोजच असतो 'चिमणी दिन ' पर्यायाने 'पर्यावरण दिन'

असले दिन साजरे करुन मुलांमध्ये , मोठ्या माणसांमध्ये कितपत जाणीव विकसीत होते हे मला ठाऊक नाही. मात्र मला हे खात्रीने ठाऊक आहे , की निसर्गाशी , मुलांच्या भावनांशी संलग्न राहून शिकल्याने पर्यावरणाची समृद्ध जाणीव , प्रेम मनात फुलून येते. म्हणून मी मुलांना घेऊन भटकत असते , कधी ओढ्यावर , कधी शेतात तर कधी मुंग्यांची वारुळ शोधीत.

नाहीतर परिसर अभ्यासचा तास घेतांना किंवा  मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चिमणीचा   एदा पाठ किंवा कविता शिकवताना खिडकीच्या गजावर बसलेल्या चिमणीकडे पाहणाऱ्या मुलांवर खेकसून नंतर  'जागतिक चिमणीदिन ' किंवा पावसाच्या टपो- या थेंबात चिंब भिजण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना वर्गात बसवून 'जागतिक जलदिन '   साजरा करण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही शिकतोच निसर्गाच्या संगतीने.

चिमणीचं पिलू मोठं होतंय माणसांच्या पिलासोबत.

             वैशाली गेडाम
               8408907701

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...