Pages

Thursday, July 7, 2016

ऐतिहासिक पंढरपूर


ऐतिहासिक पंढरपूर
पंढरपूर हे दक्षिण भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे देवस्थान वेरूळचे जगदविख्यात कैलास लेणे निर्माण होणेपूर्वीचे आहे, भागवत धर्माचे आद्यपीठ, संताचे माहेर व दक्षिण काशी असे संबोधले जाते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व स्कंदपुराणात वर्णन केले आहे. मान्यखेटचे राष्ट्रकूट यांचेपैकीच सोलापूरचे राष्ट्रकूट घराणे होते. त्यातील अविधेयक नामक राजाने आपल्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षी जयद्विढ्ढ नावाचा भार्गव गोत्रज ब्राम्हणास शंभु महादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असणारी आणेवारी, चाळ, कंदक, दुग्धपल्ली यासह पांडुरंगपल्ली (पंढरपूर) हे गांव दान दिले. पांडुरंगाचे देवालय पल्लीत होते. म्हणून तिचे नांव पांडुरंगपल्ली पडले आहे, असे हे पांडुरंगपल्ली गांव म्हणजे पंढरपूर होय.
इ.स.83 मध्ये या क्षेत्रास शालिवाहनाने पंढरपूर हे नांव दिल्याचा व इ. स. 516 च्या राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय राजाने दिलेल्या ताम्रपटातही त्याचा उल्लेख आहे. या पुरातन मंदिराचा शके 1225 च्या सुमारास चक्रवर्ती राजा रामचंद्र देवराय यांनी त्यांचे प्रधान हेमाद्री पडित यांचेकडून देवळाचा विस्तार केल्याचे दिसून येते. आदिलशाही राजवटीमध्ये सन 1659 मध्ये खासा अफजलखान शिवरायावर मोहिम काढून वाईकडे जात असताना त्यांने पंढरपूर क्षेत्रास उपसर्ग केल्याची नोंद आहे श्री क्षेत्र पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र पवित्र अशा चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. हिरे आणि माणिक यांनी जडवलेला लफ्फा हा हार दत्ताजी शिंदे, ग्वाल्हेरचे सरदार यांनी देवास दिलेला आहे. रत्ने, मोती, हिरे व सोन्याचे तारेने गुंफलेला शिरपेच हा अलंकार अहल्याबाई होळकर यांनी दिलेला आहे. अतिमौल्यवान रत्ने वापरून बनविलेला मोत्याचा कंठा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी अर्पण केलेला आहे. पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी वेळोवळी कामे करून दिलेली आहेत. रखुमाजी अनंत पिंगळे यांनी कृष्णाजी मुरार यांच्या हस्ते इ.स.1618 मध्ये महाद्वार बांधलेचा उल्लेख आहे. मुख्यमंदिराचा सोळखांबी मंडप दौंडकर यांनी बांधलेला असून या मंडपाच्या दक्षिणेकडील भाग मैनाबाई आनंदराव पवार यांनी बांधलेचा उल्लेख आहे. भोरच्या पंत सचिवांनी देवळाचे शिखर बांधलेचा उल्लेख आहे. पहिल्या बाजीरावापासून सर्वजण पंढरपूरच्या देवदर्शनास येत. पहिला बाजीराव पेशवा यांनी पंढरपूरला अनेकदा मुक्काम केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे.  दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी सुद्धा पंढरपूरला अनेकदा मुक्काम केलेचा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे. स्वातंत्र्यानंतर साने गुरूजींच्या पुढाकाराने श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर सर्वधर्म व सर्व जातीच्या लोकांना खुले करून देण्यात आले. सन 1973 मध्ये श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर शासनाने ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 चा कायदा केला. सन 1985 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन शासननियुक्त समितीकडून केले जात आहे. सन 2009 मध्ये पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पंढरपूर विकास प्राधिकरण स्थापन केलेले आहे.

पंढरपूर वारी


||वारी||

      वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.

      अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.

      वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.

      वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
मुख्य चार यात्रा(वार्‍या)
१) चैत्री यात्रा

     
चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.

२) आषाढी यात्रा

     
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

     
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्‍या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्‍यांना गोपालकाला वाटला जातो.

३) कार्तिकी यात्रा

     
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.

४) माघी यात्रा

     
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.

Saturday, June 4, 2016

मधमाशांची गोष्ट

मुल वाचन कसं शिकतं...?

वाचनाचे टप्पे :- एक आराखडा
जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर -
 वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
⚡पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
⚡दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
⚡चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.

⚡पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

मूल वाचन कसं शिकतं...?

मुल वाचन कसं शिकतं...?

वाचनाचे टप्पे :- एक आराखडा
जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर -
 वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
⚡पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
⚡दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
⚡चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.

⚡पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

व्यथा कलाकार शिक्षकाची

व्यथा कलाकार शिक्षकांची - भाग १..... राहुल भोसले....

 गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षात (२०१५/१६) स्नेहसंमेलने  आणि विद्यार्थी कलाविष्कार सोहळे विशेषत्वाने संपन्न होत आहेत. टीव्हीवरच्या गायन वादनाच्या "रिऍलिटी शो" कार्यक्रमांमुळे पालकांनाही आपली मुले एखाद्या कलेत पारंगत असावीत असे वाटू लागले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातही चित्र शिल्प, गायन वादन, नृत्य नाट्य कलांना स्थान देऊन शासकिय व्यवस्थेने कलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे..

 पण हे कला उपक्रम राबविण्यासाठी सर्वच शिक्षक बांधवांकडे कला असत नाही.
पण प्रत्येक शाळेत एक तरी  शिक्षक बांधव किंवा भगिनी असते; ज्यांना या कलांच्या संवर्धनाची जबाबदारी दिली जाते.  
"सांस्कृतिक विभागप्रमुख " ( अर्थात बिनपगारी फुल अधिकारी !! पगारचा अर्थ शिक्षकांचा पगार असा घेऊ नये...बिनपगारीचा अर्थ  पुढे येणार आहे....)

सांस्कृतिक विभागप्रमुख जबाबदारी स्वीकारणारा गुरुजी स्वत:च्या हौसेखातर हे लिगाड स्वीकारतो. त्याच्या मनात असतं," मी शाळा शिकलो तेव्हा एवढ्या सोईसुविधा नव्हत्या. पण आता माझ्या विद्यार्थ्यांना आपली कला व्यवस्थित दाखवता यावी अशी संधी निर्माण करायला काय हरकत आहे ??

नाचणाऱ्या पायांत बाई आपल्या भूतकाळात हरवलेले पदन्यास शोधतात.

गाणाऱ्या गळ्यांत गुरुजी कालपटात विरून गेलेले स्वर शोधतात.

 नाचणा-या इवल्या इवल्या पायांत बाई आपल्या नृत्याची अर्धवट राहिलेली बाराखडी पुन्हा नव्याने गिरवतात.

 नाटकांच्या संवादात गुरुजी  आपल्याच मूक भावनांना बोलके करतात.

 मुलांच्या घणाघाती वक्तृत्वातून आपलेच विचार व्यक्त होताना स्टेजच्या कोपऱ्यात उभे राहून छाती फुगवून टाळ्या वाजवतात.........

खरंतर आपल्या कलेचं तादात्मिकरण गुरूजी बाई अनुभवतात....

 हे सगळं करताना, सांस्कृतिक कार्यक्रम बसवताना बरीच उलाढाल करावी लागते. त्याचा हा शब्दप्रपंच.........

कधीतरी अचानक केंद्रातून निरोप येतो. तुमच्या शाळेत केंद्रसंमेलन घ्यायचे आहे. ते ही चार तारखेला.....

मुख्याध्यापक सगळी तयारी एक दोन तारखेला करतात. आणि मग कुणालातरी दोन तारखेच्या संध्याकाळी करंट येतो......

"अहो संमेलनासाठी स्वागत गीत,ईशस्तवन बसवले पाहिजे....मग सांगा की भोसले गुरूजींना..   "
भोसले गुरूजी म्हणतात, " अहो परवा संमेलन आणि एक दोन दिवसात कसं काय शक्य आहे......??

 मुख्याध्यापक, सहकारी म्हणतात," अहो बसवा की दोन गाणी..... कोण लक्ष देतंय त्या गाण्यांकडं... आपली पद्धत आहे म्हणून म्हणायची दोन गाणी.....""

खरंतर संमेलनाची सुरूवात चांगली व्हावी, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं अशा इतरही अनेक कारणांसाठी आपण ईशस्तवन, स्वागतगीत बसवतो..... पण वेळेअभावी या कार्यक्रमाला केवळ "करायचं असतंय म्हणून" अशा औपचारिक पातळीवर नेऊन ठेवलं जातं..

पण गुरूजी सगळं विसरून तयारीला लागतात. मुलांची निवड करतात, गाण्यांची योजना करतात. गावात फिरुन तबलजी नाहीतर ढोलकीवाल्याला बोलावून आणतात. त्याला पदरचा चहापाणी देतात...(बिनपगारी फुल अधिकारी).  स्वागतगीत, ईशस्तवन बसवतात.

 संमेलन सुरु होते. कुंई कुंई करणारा माईक असला तरी गुरूजी मुलांना सांगतात, " म्हणा तुम्ही...चुकलं तर चुकू दे... सुरात, तालात म्हणा.""

मुलही अटोकाट प्रयत्न करुन एकदोन दिवसात बसवलेली गीतं सादर करतात......

प्रेक्षकांत बसलेले काही जाणकार (??) म्हणतात " ईशस्तवन जरा बरं झालं,, पण स्वागतगीत काही जमलं नाही..."".

आभाराच्यावेळी एखादं वाळलेलं , सुकलेलं गुलाबाचं फुल घेऊन गुरुजी समाधान मानतो. तबलजीच्या हातावर पदरचे ५०/१००टेकवतो..(बिनपगारी फुल अधिकारी)  आणि स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेतो...एक दिवसात गाणी बसवली...............

 जी गोष्ट केंद्रसंमेलनाची तशीच तऱ्हा कला (शिल्प) आणि कार्यानुभव उपक्रमांची...

गेल्या दोन वर्षात " ज्ञानरचनावाद" या संकल्पनेने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात चैतन्य आले आणि हातात कुंचले घेऊन गुरूजी स्वत:च चित्रकार झाले. गुरुजनांच्या चित्रप्रतिभेला नवे पंख फुटले आणि शाळांतल्या भिंती, फरशा गुरूजींच्या कलेने संपन्न होऊ लागल्या.

आधुनिक जगाशी नाळ जोडणारं ई लर्निंग साहित्य बनवतानाही हाच कला दृष्टीकोन गुरूजनांना बळ देतो...
व्हीडीओ निर्मिती असो फोटो व्हीडीओ किंवा अन्य काही असो..
प्रत्येक ठिकाणी कलात्मक मांडणी दिसतेच दिसते  ..

 निदान रचनावादाने तरी गुरूजींची स्वप्नं वास्तवाच्या रंगात रंगू लागली.  रंगसंगतीच्या बीजांना नवे धुमारे फुटू लागले. नवनवीन कल्पनेने तयार झालेले शैक्षणिक साहित्य मुलांना कामांत गुंतवू लागले. गुरूजनांच्या कलेला योग्य स्थान मिळू लागले.

पण सगळेच नसतात कलासक्त,
नसतात सगळे कलेचे भक्त .....

परिक्षा किंवा मूल्यमापन करायची वेळ जवळ आली की मग प्रत्येक वर्गशिक्षकाला आपल्या कलाकार मित्रांची आठवण होते.. "भोसले सर माझ्या वर्गात काहीतरी कागदकाम मातकाम करून घ्या. लगेच गुरुजींमधला शिल्पकार आकार घेतो. नॉर्वे पेपर, क्रेप पेपर,
 जिगझॅग कात्री,रद्दी पेपर
सगळ काही स्वखर्चाने आणतो. (बिनपगारी.........फुल अधिकारी )

मुलंही उत्साहाने डींक सांडतात, कागद फाडतात, खराब करतात. त्यांना समजावून घेत घेत गुरूजी मुलांत मूल होतात. पक्षी होऊन आकाशात भरारी घेतात.
 कंदील बनवून मुलांच्या भविष्याचे दिवे त्यात लावतात.कागदकाम लवकर आटपत नाही, गुरूजींना (बाईंना) दुपारच्या घंटेचाही आवाज येत नाही....

 एक ना अनेक वस्तू करताना रंगीबेरंगी कागदांच्या
 ढिगात गुरुजी स्वत:ला हरवून बसतात..

इकडे स्टाफरुममध्ये मात्र दुपारच्या सुट्टीतला चहा रंगतो..एखादा बांधव हळूच कुजबुजतो...
" काय भोसले गुरूजी लय काम करून दाखवाय लागल्यात.... सुट्टी झाली तरी पोरांना सोडायला तयार नाहीत...
.
.
.
.
.
.
तेवढंच जमतंय........ दुसरं काय येतंय. गाणं आणि कागदाशिवाय........!!!

तरी गुरुजी राबत राहतात.
 मुलांना कारक कौशल्यानी भरत राहतात....

मुलांतल्या उत्साहाला कृतीकडे आणतात..

बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आयुष्याला घड्या घालत राहतात.........अगदी अविरत......

 मातकामाचीही काय मज्जा असते.  मातीचा गोळा वर्गात आणून एखादं प्रात्यक्षिक गुरूजी स्वत:च दाखवतात..

कुणीतरी मुलांबाबतही म्हणतं "मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे...शिक्षक त्यांना घडवणारा कुंभार आहे...."

खरंतर मातकाम शिकवणारा गुरुजी मुलांना मातीचा गोळा कधीच मानत नाही. समोरचे बसलेले विद्यार्थी चैतन्याचे पुतळे, सृजनाचे उमाळे, नाविन्याचे नव्हाळे, संवेदनेचे जिव्हाळे आहेत हे सर्व माझ्या गुरू- बंधूला माहीत असतात... तो मुलांना सांगतो." समजलं का रे मुलांनो... उद्या येताना तुम्हाला आवडणारा पक्षी, प्राणी, मातीची वस्तू तयार करून आणा...

मुलंच ती.. त्यांची उर्मी उसळी घेते. दरी डोंगरातली, शेताबांधाची माती प्लॅस्टिकच्या साखरंच्या पिशवीतून पोरं गोळा करून आणतात. गुरूजींच्या सूचनेप्रमाणं मळतात. मोर, बैल, मोबाईल, बैलगाडी, मण्यांच्या माळा आकार घेताना कपडे खराब होतात. ...

आणि पोरांच्या आया बोलतात, " काय रं हे पोरांनो.हेच शिकिवत्यात व्हय रं शाळेत.. अभ्यास सोडून मातीत खेळायला...... कोण त्यो मास्तर तुमचा..... त्येला तुमची कापडं धुवायला बोलवा...  .

दुसऱ्या दिवशी काही मुलं मातीच्या वस्तू आणतात. काही मुलं गुरुजीपुढं रडतात..." मातीत खेळायलो म्हणून आईनं मारलं.....तुमाला बी काय पायजे ते बडबडली...... "

तरीही गुरूजी शांत राहतो.

ज्या मातीतून जन्म घेतला, त्याच मातीला नावं ठेवली जातात...

गुरुजी आतून तिळतिळ तुटतो मात्र मातीशी नाळ कधीच तुटणार नाही यासाठी पुन्हा मातीत हात घालतो....   मुलांल मूल होऊन चिखलांत खेळतो.....


मातीची सृजनशिलता मुलांपुढे मांडतो आणि मातीच्या गोळ्यातून नवनवीन आकृत्या बनवतो.

 हाच गुरूजी निरागस बालकांच्या मनावर  स्वप्नांची पेरणी करतो ती ही माती पुढे ठेवूनच.....

 वार्षिक स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे ही कलाकार गुरूजींच्या सगळ्या गुणांचा कस पाहणारी वार्षिक परिक्षाच असते...........

कुठला कलाप्रकार बसवावा यासाठी कलाकार गुरूजी रात्रंदिवस विचार करतो.. इथंही शाळेतल्या सांस्कृतिक विभागाचं खापर त्याच्या डोक्यावर फुटण्यासाठीच असतं.....

प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक त्या कलाकार गुरूजींना सांगतात, " माझ्या वर्गाचा कार्यक्रम एकदम झकास बसला पाहिजे बघा.. "

आपल्या स्वत:च्या वर्गात जास्त न रमता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांचे कार्यक्रम बसवत सगळ्या शाळेतून तारेवरची कसरत करतो....
कुणाच्या नृत्यातल्या स्टेप्स, त्याची ड्रेपरी,  कुणाच्या नाटकातले संवाद सांगायचे,
 ऐतिहासिक नाटकासाठी लागणाऱ्या ढाली तलवारी त्यानीच रात्र रात्र जागून तयार करायच्या,
कोळीगीताची वल्ही आपल्याच घरात बसून वल्हवायची,
 मुलामुलींच्या साड्या, कपड्यांची जोडणी त्यांनीच करायची,
प्रसंगी आपल्या बायकोची आवडती साडी शाळेतल्या कार्यक्रमासाठी एखाद्या  मुलीसाठी हळूच मागून न्यायची....

कार्यक्रमात उपयोगी पडेल अशी वस्तू घरात दिसली की नकळत उचलून न्यायचीच..

 एवढी सगळी उलाढाल केली तरी; एखादं गाणं प्रॅक्टिसला मागे पडलं किंवा ऐन कार्यक्रमात कुणाच्या ड्रेपरीचा घोळ झाला तरी सगळ्या स्टाफचं बोलून घ्यायचं, कलाकार गुरूजीनंच.....

काहीजण म्हणतात, " माझ्या वर्गाचं गाणं त्यांनी काही व्यवस्थित बसवलं नाही......."

कुणी म्हणतं," आपल्या वर्गाची तयारी तेवढी चांगली करून घेतली बघा......"

कुणी म्हणतं," गॅदरिंगच्या वेळी गावापुढं मिरवायला मिळतंय म्हणून पुढंपुढं नाचतोय........."

पण सगळे सकार नकार पचवून मुलांसाठी गुरूजी राबतो ........

सगळ्यांचे विखार ऐकूनही जीवनगाणे  गुरूजी बनवतो,

 आमच्याइकडे काही कलाकार गुरूजी लोकांनी प्रत्येक वर्षी गरजेला पडणारे कपडे, साहित्य खरेदी करून, शिलाई करून घेऊन ठेवलं आहे..

पण त्यांना या साहित्याचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा जास्त उपयोग इतर फुकटे लोक करून घेतात. ("फुकटे" हा शब्द अगदी अनुभवाने व जाणीवपूर्वक वापरला आहे. कृपया कुणी राग मानू नये.) कारण कार्यक्रमासाठी घेऊन जाताना दहा नेहरू शर्ट आणि बारा विजारी नेल्या तरी काही फुकटे लोक जमा करताना दहाला दहा ड्रेस जमा करतात आणि विचारलं तर म्हणतात,"अहो आम्ही बरोबर दहाला दहा ड्रेस नेले होते.( नेणाऱ्यांकडून दोन विजारी हरवलेल्या असतात..)

तरीही हरवलेल्या गोष्टींची खंत न करता गुरूजी मनाचं व मागणाऱ्या मित्राचं समाधान करतो, " बरं जाऊ दे गेले तर कपडे....एखाद्या लहान मुलानं हरवले असतील, कपडे काय पुन्हा घेता येतील पण..मैत्री आण् कलेचा आनंद पुन्हा नाही मिळत..........."

 या आणि अशा अनेक अनुभवानं संपन्न होत कलाकार गुरूजींची कलासाधना सुरूच राहते... याबदल्यात मिळतं काय .....?

" ............गुरूजी व्हय..त्येला गाण्याशिवाय काय येतंय....??  इति पालक मंडळी..

"काय गुरूजी आज वाजाप बंद हाय वाटतं...   ??  इति शा.व्य.समिती सदस्य.....

( २०११ साली आमच्याकडे एक सूर एक ताल कार्यक्रमात १००० विद्यार्थ्यांनी एका वेळी १० गिते म्हटली होती... या कार्यक्रमाच्या प्रॅक्टीससाठी दोन गुरूजी स्वत:च्या गाडीवर हार्मोनियम तबला घेऊन मुलांना शिकवण्यासाठी अनेक शाळांत फिरत होते...आमचेच सहकारी त्यांना म्हणत होते....

" काय गुरूजी आज कुठल्या शाळेत तमाशा.........????

 आमच्याकडे स्पर्धात्मक तयारीसाठी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेला खूप महत्त्व आहे..हे महत्त्व दिलंही पाहिजे.. पण म्हणून एखाद्या कलेसाठी प्रामाणिक पणे राबणाऱ्या गुरूजीला मात्र हीन समजले जाते...हे मात्र थोडे चुकीचे वाटते...

खरंतर स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांना विश्रांती म्हणून विविध छंद, कला, कागदकाम, अवांतर वाचन, संगीत, नृत्य यांचा उपयोग नक्कीत होतो.

इथं कला मुरलेल्या लोणच्यासारखी आनंद देते.  नवीन अभ्यासाला आणि क्लिष्ट संकल्पना समजून घ्यायला मनाला उभारी देते....

नवीन भाषेत स्पर्धा परिक्षा अभ्यासतंत्रातलं टॉनिकच नाही का एखादी कला..?

." यांच्या गाण्यावाजवण्यानं शाळेचं वाटोळ झालं. !"

असं आमचेच काही बांधव आणि पालक तर म्हणतात. पण.....

 तेव्हाही आपलं काम करत गुरूजी अध्यापन आणि कलेची सांगड घालत राहतो..
 जगण्यासाठी कला की कलेसाठी जगणं या वादात न पडता दैनंदिन जीवन जगताना थोडा विरंगुळा, थोडी मस्ती, थोडा विसावा, थोडा आनंद म्हणत कलेची जोपासना करत राहतो....

 दैनंदिन जगण्यासाठी लागणारं व्यावहारिक ज्ञान तो मुलांना देतच असतो, पण ज्या गाण्याची सुरूवात गर्भातल्या हृदयाच्या पहिल्या तालापासून होते आणि हा लयबद्धताल बंद झाल्यावरच जीवनगाणे थांबते त्या कलेचंही देणं तो जगतो...केवळ कलेसाठी.....

ही व्यथा कुणा एकाची नाही...

तमाम महाराष्ट्रात इतर सर्व विषयांसह कला कार्यानुभव उपक्रम राबवणाऱ्या शिक्षक बंधुभगिनींची आहे.  

घामाला मोल मिळवून देणाऱ्या श्रमप्रतिष्ठा मूल्य राबवणाऱ्या व रुजवणाऱ्या गुरूजींची आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडणाऱ्या कलारसिक गुरूजींची आहे...

रचनावादाची पेरणी स्वत:च्या कलेतून करणाऱ्या कलासक्त कलंदरांची....

आधुनिक जगाशी जोडणाऱ्या, नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये कलात्मक दृष्टीकोन वापरणाऱ्या अवलियांची....

 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जगापुढे आणू पाहणाऱ्या सूज्ञ कला समिक्षकाची आहे....

अजून बरंच काही भळभळणारं बोलायचं राहिलंय...
पण बेसूर व्यथा आणि बेताल कथा जास्त उगाळणं बरं नाही.....

तरी....
बोलू नंतर कधीतरी.  

राहुल मारूती भोसले..
जोगेवाडी, ता.राधानगरी
जि.कोल्हापूर

मो.नं.९०११२५५७२१
वॉटसप ९५५२२८३३२६

मार्क म्हणजे गुणवत्ता नाही

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख:

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?"
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.

हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.

जरा विरोधाभास पाहूया...

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
 हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.

काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.

'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..

हा आत्मविश्वास मुलांना द्या!

आवडली तर नक्की शेयर करा...!

तुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...

भिंतीचा वापर

भिंतींचा वापर...

***********************
मूळ लेख : कृष्णकुमार
मराठी अनुवाद : फारूक एस.काझी.
साभार : दीवार का इस्तमाल  और अन्य लेख, एकलव्य प्रकाशन, भोपाल.
प्रकाशन :2008
***********************

          बिनभिंतींच्या शाळांचा विषय थोडा बाजूला ठेवला तर ब-यांच अंशी आपल्याला असं म्हंमता येईल की बहुंशी शाळा या भिंतींचा वापर मुलांचं रक्षण करण्यासाठी व जगापासून दूर एक वेगळंच वातावरण तयार करण्यासाठी करतात.मुलांचं रक्षण यात ऊन,वारा आणि पाऊस यांच्यापासून रक्षण ह्याबाबत काहीच दुमत असण्याचं कारण नाहीये. पण शंका तेव्हा  येते जेव्हा भिंतीचा आधार घेऊन शाळा मुलांना सामाजिक वास्तवापासून दूर न्यायचा प्रयत्न करतात. शाळाव्यवस्थेच्या दृष्टीने हे मुलांचं एक प्रकारे रक्षणच असतं. आपल्याकडे एक जुनी धारणा आहे की मुलांचं व्यक्तिमत्व वास्तवाची दाहकता सहन करूच शकत नाही. या धारणांचा वापर करून असं गृहित धरलं जातं की सामाजिक वास्तवापासून मुलांचं संरक्षण करणं हा शाळाचां जणू हक्कच आहे. या हक्कापाठोपाठ एक कर्तव्यही जन्म घेतं की मुलांसाठी समाजापासून दूर चार भिंतीत एक वेगळं विश्व निर्माण करावं.
         काही दिवसांपूर्वी भारतभर यात्रा करताना माझं लक्ष शाळांच्या भिंतींवरील सुविचारांवर गेलं. या शाळेत वेळेचा उपयोग अत्यंत विचित्र स्वरूपात होतो,तिथं लिहिलं होतं की "वेळ हीच शिस्त" ! संस्थेच्या आपसातील कलहामुळे व व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे सतत भांडणे ,वाद सुरू असतात .प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर लिहिलेलं होतं "क्रोध जिंकाल तर जग जिंकाल". अशीच काही वाक्ये होती जी शाळेतील वस्तुस्थितीच्या अगदी विपरित होती. या सुविचारांचा वापर करून मुलांच्या अवतीभोवती नैतिक वातावरण विणण्याचा प्रयत्न सुरू होता. हे वातावरण अशी नैतिकता शिकवण्याचा अट्टहास करत होतं ,जिचा आधार  ना  शाळेत पहायला मिळत होती ;ना शाळेबाहेर. यामुळे अशा सुविचारांचा हेतूच असफल झालेला दिसत होता. हे रोज रोज पाहून मुलांनाही सवयीनं माहित झालं असेल की भाषेचा उपयोग कोणत्याही निरर्थक कारणासाठी  होऊ शकतो. याअनुषंगाने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की , शाळेतील भिंती अभ्यसक्रमाबाबत नकारात्मक भूमिका पार पाडत आहेत. कारण भारतीय अभ्यसक्रम हा "भाषेच्या अर्थपूर्ण वापर करता येणे " असं भाषेचं उद्दिष्टं मांडतो. आणि शाळा स्वत: च भाषेचा कसा निरर्थक वापर करते हेच जणू मुलांना शिकवत असते.
       पाश्चात्य देशात भिंतींचा वापर मुलांच्या कृतीशीलतेशी जोडला गेलाय. वर्गात मुलं जी काही चित्रं काढतात, कथा-कविता-पत्र लिहितात त्यांना तात्काळ  भिंतीवरती डकवलं जातं. वर्गातील चारी भिंती अशा मुलांच्या विविध कृतींनी भरलेल्या  असतात.  जेव्हा मूल एखादी नवीन गोष्ट तयार करतं ,तेव्हा जूनी कृती काढून घेतली जाते. मूल जेव्हा आपली कृती पाहतं तेव्हा आपण शाळेचा एक भाग असल्याचा व शाळेत आपलं काहीतरी अस्तित्व आहे यााबाबत त्याला विश्वास वाटायला लागतो. म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाची दखल घेतली गेल्याचा आनंद होतो. हा विश्वास, आनंद केवळ  रजिस्टरला नोंदवलेल्या नावाने मिळत नाही. प्रत्येक मुलाची कृती भिंतीवर लावलेली असल्याने स्पर्धेचा प्रश्नच येत नाही. पाश्चात्य देशात 'व्यक्तीं'ना फार महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शाळाही मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात,मला वाटतं हे फार अनमोल उद्दिष्ट आहे.
       याचा अर्थ असा नव्हे की पाश्चिमात्य शाळा भारतीय शाळांहून अधिक सामाजिक वास्तवाशी जास्त जोडला गेलाय. वस्तुस्थिती ही आहे की दोन्ही प्रकारच्या शाळा समाजिक वस्तुस्थितीशी असलेली फारकत; वेगवेगळ्या पध्दतीने लपवत असतात. भारतीय शाळा आपल्या भिंती सुविचारांनी रंगवून मुलांना खोट्या नैतिकतेचे धडे देत असतात. पाश्चिमात्य शाळा मुलांच्या विविध कृती भिंतींवर डकवून ,मुलांच्या सामाजिकीकरणाची बाबदारी टाळून मोकळ्या होतात. (तुमचं काम लावलं आता आमची जबाबदारी संपली.इथं मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडतच नाही)
         इथं महत्त्व आहे याचं की या चार भिंतींच्या आत बसलेल्या मुलांना शाळा काय देते? भिंतीवर काय होतंय याचं एका मर्यादेपर्यंत महत्त्व जरूर आहे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे ते हे की नेमकं वर्गांच्या आत काय घडतं आहे ?

सिंधुदूर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते.

आजही तेथे लोक वस्ती करुन राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करुन टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स.१६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज १८१२ पर्यंत फडकत होता. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

-श्री. प्रमोद मांडे



माझी शाळा कंची?

माझी शाळा कंची ?
---------------------------------------------
लोकमतच्या संपादकीय पानावरील "जन मन" या सदरातील माझा लेख
दिनांक २६ मे १४
http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=767847

*माझी शाळा कंची?*

- अमर हबीब

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठी बोलतो. आम्हाला मुलगी झाली. शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘उर्दूच्या शाळेत घाला.’ मी म्हणालो, ‘तिच्या आईची भाषा मराठी असल्याने मराठीच बरे पडेल.’ आम्ही आमच्या मुलीला प्रवेश घ्यायला शाळेत नेले. मुख्याध्यापकांच्या खोलीत सरस्वतीची प्रतिमा दिसली. मी विचारले, ‘ही प्रतिमा कशासाठी?’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘आम्ही दररोज सरस्वती वंदना घेतो. त्या वेळेस या प्रतिमेची पूजा केली जाते.’ मला माझी मुलगी अशा शाळेत घालायची होती, जेथे कोणत्याच धर्माचे संस्कार केले जाणार नाहीत.

मी उठलो. दुसर्‍या शाळेत गेलो. तेथेही तेच. मुख्याध्यापक म्हणाले, ‘आमच्या शाळेत खूप चांगले संस्कार केले जातात. मुलांकडून ‘मनाचे ोक’ पाठ करून घेतले जातात.’ आणखी एका शाळेत गेलो तेव्हा पाहिले की, मुलं चक्क रामरक्षा म्हणत आहेत. मला हवी असलेली शाळा कोठेच सापडेना. शेवटी माझा नाइलाज झाला. अखेर घरापासून जवळ असलेल्या मराठी शाळेत तिचे नाव घातले. एके दिवशी तिने मला तोंडपाठ केलेला गायत्री मंत्र म्हणून दाखविला. तेव्हा माझ्या मनात चर्र झाले. हे लोक लहान लेकरांना माणसासारखे का जगू  देत नसतील? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करीत राहिला.

दरम्यान खूप मोठा काळ गेला. माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची बायको उर्दू भाषक. मी माझ्या मुलाला सांगितले की, ‘आपण आपल्या घरात मराठी बोलतो; कारण आपल्या घरातील आई मराठी आहे. आता तुझ्या घरात उर्दू भाषा बोलली गेली पाहिजे. कारण तुझ्या घरातील आई उर्दू भाषा बोलणारी आहे. जसा मी मराठी शिकलो तसे तुला उर्दू शिकावे लागेल.’ माझ्या मुलाला माझे म्हणणे पटले. त्यांना मुलगा झाला. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा शोधू लागलो. मुलीच्या वेळेसचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तरी मला वाटले की, मोठा काळ लोटून गेला आहे, परिस्थिती बदलली असेल. त्या काळात कॉम्प्युटर नव्हता, टीव्हीचा एवढा प्रचार झालेला नव्हता, मोबाईलचा पत्ताच नव्हता. आमच्या गावात इंटरनेट आलेले नव्हते. आता जग आधुनिक झालेले आहे. माझ्या मुलीला मिळाली नसली तरी नातवाला ‘माणसांची शाळा’ नक्की मिळेल.

उर्दू माध्यमातून इंग्रजी शिकविणार्‍या शाळेत गेलो. त्यांच्या फलकावरच ‘इस्लामी शाळा’ असे लिहिलेले. दुसर्‍या शाळेचा प्रॉस्पेक्टस पाहिला. त्यात धार्मिक शिक्षणाची खास सोय असल्याचे आवर्जून नमूद केलेले होते. तिसर्‍या एका शाळेत पोचलो तर तेथील मॅडम बुरखा घालून रिक्षातून उतरताना दिसल्या. म्हटलं आपल्याला हवी असलेली ‘माणसांची शाळा’ या माध्यमात देखील मिळणार नाही. ज्या अगतिकतेने मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले होते, सुमारे २५-३0 वर्षांनंतर नेमक्या त्याच अगतिकतेने मला माझ्या नातवाला उर्दू माध्यमाच्या शाळेत दाखल करावे लागले.

एके दिवशी माझा मित्र त्याच्या शाळेत गेला. संस्थाचालकाने म्हणे माझ्या नातवाला बोलवून घेतले. उणे-पुरे चार वर्षांचा नातू. गोड आणि चुणचुणीत आहे. येताच त्याने सगळ्यांना सलाम केला. संस्थाचालक म्हणाला, ‘कलमा याद है?’ ‘जी हां’ म्हणून लगेच त्याने अख्खा कलमा तोंडपाठ म्हणून दाखविला. माझा मित्र त्याचे कौतुक करून हे सांगत होता. पण माझ्या मनात पुन्हा तसेच चर्र झाले. जसे मुलीकडून गायत्री मंत्र ऐकताना काही वर्षांपूर्वी झाले होते. हे लोक लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला पुन्हा अस्वस्थ करू लागला.

मी वेगवेगळ्या धर्ममार्तंडांना विचारले, ‘लहान मूल वारले तर ते स्वर्गात जाते की नरकात?’ सगळ्या धर्माच्या मार्तंडांनीे एका सुरात सांगितले की, ‘ते थेट स्वर्गात जाते; कारण ते निरागस असते.’ मी म्हणालो, ‘असे असेल तर लहान मुलांच्या शाळांत धार्मिक संस्कार का केले जातात?’ शाळेतील धर्मसंस्कार ही बालकांची गरज नसून ती वडीलधार्‍यांची गरज आहे. थोरांच्या गरजेसाठी मुलांवर ओझे लादले जाते.

बागेत उमललेली सुंदर फुले आपल्या टेबलावरील फ्लॉवरपॉटमधे शोभून दिसेल, म्हणून निर्दयीपणे खुडली जातात. प्रत्येक धर्माच्या टेबलांवर अशा निर्जीव फुलांची सजावट मांडली जाते. या फुलांचा वास येत राहावा म्हणून हे लोक त्यावर आपल्या संस्कारांच्या अत्तराच्या बाटल्या ओतीत राहतात. मुलांचे भावविश्‍व कलुषित करणारे धार्मिक संस्कार लहान मुलांच्या शाळांमधून कधी हद्दपार होतील कोणास ठाऊक?

निदा फाजली म्हणतात,
हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में
इन्सान परेशां है, यहां भी और वहां भी..

मला अजूनही ‘माणसांची शाळा’ सापडली नाही.

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते  जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

👍 नियम १० – सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल ........

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...