Pages

Sunday, March 26, 2017

मंगळवेढा

इतिहासाच्या हरवलेल्या पानांना शोधावं लागेल......!!
################
                           मंगळवेढा. दामाजींच्या नावाने ओळखलं जाणारं हे गाव. सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका. संतांची भूमी म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारं गाव. ‘ऊस डोंगा परी रस नहीं डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’...असं म्हणत एक मोठं तत्वज्ञान सांगणाऱ्या चोखोबाचं गाव मंगळवेढा. ‘धरिला पंढरीचा चोर’ असं ठणकाऊन सांगणारी कान्होपात्रा इथलीच. मुस्लीम असूनही कृष्णभक्ती करणारे लतीफबुआ; ही संत मंडळी म्हणजे मंगळवेढ्याचे भूषण.
                                आजवर मंगळवेढ्यासंबंधी माहित असलेली एवढीच माहिती. पण त्याच्याविषयीची बरीच विस्तृत माहिती माहितच होत नाही.मंगळवेढा नगरी म्हणजे चालुक्य राजघराण्याची राजधानी. बहामनी सत्तेपूर्व ‘मंगल’ नावाच्या राजाने ही राजधानी बनवली त्यावरून त्याला ‘मंगळवेढा’ हे नाव मिळाले असावे. तसेच प्राचीन शिलालेखात ‘मंगलवेष्टक आणि मंगळीवेडे’ असा नामोल्लेख आढळतो. चालुक्य,यादव,बहामनी, आदिलशाही, मुघल व शेवटी  सांगलीचे पटवर्धन अशी सत्तांतरे मंगळवेढ्याने पहिली आहेत.
                                यावरून हे सिद्ध होते की, मंगळवेढा हे अतिप्राचीन शहर आहे व त्याचा इतिहास ही तितकाच जुना आहे. हे सर्व नमूद करण्याचा हेतू हा की अनेकदा मंगळवेढा येथे जाणे होते. मागे सोलापूरच्या इतिहासाविषयी माहिती घेतानाही मंगळवेढ्याला येणे झालेले. हे सर्व पाहत असताना एका गोष्टीने सतत लक्ष वेधून घेतलेले. ती गोष्ट म्हणजे मल्लेवाडी या गावच्या शेजारी माण नदीच्या काठावरील ते दगडी शिळात बांधलेले शंकराचे मंदिर. ज्याला लोक खंडोबा मंदिर असंही म्हणतात. परंतु गाभाऱ्यातील खंडोबा देवाची मूर्ती ही प्राचीन वाटत नाही. उलट आतील अनोखा आकार असलेली पिंड ही मंदिरा इतकीच प्राचीन आहे. येथील पिंड ही आयताकार असून त्यावर दोन लिंग दर्शवले आहेत. अशा रचनांचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचे आहे. कारण नुकतेच कृष्ण तलावात आढळून आलेली पिंड ही ही एका वेगळ्या रचनेचा नमुना म्हणता येईल.
                                मल्लेवाडी हे माण नदीच्या काठी वसलेले एक छोटे गाव. पण पूर्वी या गावाला मोठी परंपरा असल्याचे काही पुरावे इतिहासात सापडतात. पूर्वीपासून या ठिकाणी व्यायामशाळा व तालीम अस्तित्वात होत्या. या गावात मल्ल मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने या गावाला मल्लेवाडी असे  म्हणत असत. अशी एक आख्यायिका ऐकायला मिळते.  मंगळवेढा हे नगर मुळात चालुक्यांची राजधानी.आठव्या –नवव्या शतकापासून मंगळवेढा नगराचा उल्लेख आढळतो. यावरून आपण समजू शकतो की हे नगर किती प्राचीन आहे. मल्लेवाडी हे महत्त्वाचे ठिकाण राहिलेले असणार आहे. कारण चालुक्य राजे गादीवर बसताना आपल्या नावासोबत “मल्ल’ हे बिरूद जोडत असत. उदा. जगदेकमल्ल, भुवनैकमल्ल इ. यावरून ,मल्लेवाडी हे ठिकाण महत्त्वाचे असले पाहिजे . त्यात ते माण नदीच्या अगदी काठावर वसले आहे.
                             मल्लेवाडीच्या अन महादेवाच्या प्राचीन मंदिराच्या मध्ये आजचा मंगळवेढा-पंढरपूर रस्ता जातो. सदर मंदिराची बाहेरून रचना ही अत्यंत साधी परंतु वैशिष्ट्यपूर्ण आहे. [ह्या मंदिराबाबतही एक आख्यायिका प्रचलित आहे,की राक्षसांनी एका रात्रीत हे मंदिर बांधून काढले.]आपण जेव्हा मंदिराच्या आवारात प्रवेश करतो तेव्हा दगडी शिळा रचून केलेली तटबंदी दिसते. ती आता फक्त काही प्रमाणातच दिसते. तटबंदी पूर्णत्वाने अस्तित्वात नाही आहे. दोन दगडी गोलाकार खांब प्रवेशाजवळ उभे केले गेले आहेत. आपण आवारात प्रवेश करतो तेव्हा समोर काही शिळा रचलेल्या अवस्थेत दिसतात. तेच मंदिर. मंदिराचे बाह्यांग आता भग्न होण्याच्या मार्गावर आहे.
                            या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य असं की याचे शिखर [सपाट रचना असलेले] जमिनीवर आहे व मंदिर जमिनीच्या खाली. सदर मंदिराच्या बांधकामात कुठेही चुना किंवा तत्सम शिळाना जोड देणारा पदार्थ वापरला गेलेला नाही. त्यामुळे हा एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल. अखंड मोठ मोठ्या शिळा वापरून या मंदिराची बांधणी केली गेली आहे. [या शिळा मंगळवेढ्यातच असलेल्या मोठ्या दगडी खाणीतून उपलब्ध केल्या गेल्या असल्या पाहिजेत.कारण दूरवरून अशा शिळा मोठ्या प्रमाणत वाहून आणणे खर्चिक व वेळखाऊ ठरण्याची शक्यता जास्त असते.] मंदिराची रचना कोणत्या काळात केली गेली असेल याबाबत कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत. ते शोधता आले तर एक सांस्कृतिक वैभव असलेल्या मंदिराचा इतिहास सर्वापुढे मांडणे शक्य होईल.
                        काळ्या कातळाच्या शिळात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे व त्याच्या अगदी चिंचोळ्या प्रवेश दारातून सुर्योदयावेळी किरणं सरळ गाभाऱ्यात पोचतात. मंदिरासमोरील दीपमाळही दगडाची असून ती नंतर रचल्या सारखी वाटते. याचं कारण म्हणजे तेथीलच अनेक दगड वापरून त्यासाठी चौथरा रचला गेला आहे. त्यात काही कोरीव कामही आढळतं. ती दीपमाळही आता कलू लागली आहे. प्रवेश व्दाराजवळ दोन्ही बाजूना शिळेवर नाग  कोरलेले आहेत. पूर्वी काही ठिकाणांच्या रक्षणाची जबाबदारी नागदेवतांवर सोपवली जात असे अशा आख्यायिका ऐकायला मिळतात. त्याच हेतूने या नागाची शिल्पं तिथं ठेवली गेली असावीत असं वाटतं.
                      चिंचोळ्या प्रवेशदारातून आपण आत जातो तेव्हा कातळाचा सुखद गारवा जाणवायला लागतो. या मंदिराकडे पूर्वी कुणीच फिरकत नसे. लोक घाबरत तिकडे जायला. कारण या मंदिरापासून जवळच स्मशानभूमी आहे. मंदिरात खांबांची रचना कोरीव असली तरी एकूण काम ओबडधोबडच आहे. कदाचित हे मंदिर ज्या काळात निर्माण केलं गेलं त्यावेळी मंदिरांची रचना करताना कलात्मक वास्तुकलेचा वापर केला जात नसावा. या वास्तू शैलीवरूनही या मंदिराचा निर्मिती काळ शोधता येईल.
                   मंदिराचा मंडप काहीसा ऐसपैस आहे. गाभाऱ्याकडे तोंड करून उभा राहिल्यावर डाव्या बाजूला एका मोठ्या दगडात कोरलेली गणेश मूर्ती आहे. ती काहीशी विरघळल्यासारखी दिसते. गाभारा हा पूर्व-पश्चिम चिंचोळा व लांब असून मधेच असलेल्या खड्डयासारख्या भागत पिंड बसवलेली आढळते. व त्यापलीकडे उंचावरचा मोठा भाग पूर्णपणे रिकामा आहे. ती जागा रिकामी का ठेवली गेली ? पिंड अशी अधेमध्ये खड्ड्यात का ठेवली गेली ? की पिंडीच्या  मूळ स्थानात कुणी बदल केला ? असे काही प्रश्न सहजच पडून जातात. गाभाऱ्याच्या समोरील दोन खांबावर हाताचे पंजे कोरण्यात आले आहेत. ती आशीषासाठी कोरण्यात आले असावेत. छतावरील शिळा आता आपली जागा सोडू पाहत आहेत. काही वर्षात ते मंदिर प्रवेशासाठी सोयीचे राहणार नाही असे वाटते.
                      मंदिरात प्रवेशाजवळच छतावर दोन तीन आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यात एक घर, हत्ती व एक वनस्पती आहे. तिथेच एक मानवाकृती कोरलेली आहे.पण पाण्यामुळे त्यातील वरील भाग फुटून गेला आहे व फक्त पाय दिसत आहेत. या रचना नंतर काढल्या गेल्या असण्याची शक्यता जास्त आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर या मंदिराच्या रचयित्यांनी कोणत्या हेतूने हे मंदिर बांधले असेल? अनेक राजवटी येऊन गेल्या तेव्हा येथील रचनेत काही फरक पडला असेल का? तटबंदीच्या अवशेषातून तिच्या भक्कमतेची कल्पना येते. हे मंदिर शंकराचे असण्याची शक्यता जास्त आहे. कारण मंगळवेढ्यात शैव संप्रदाय अस्तित्वात होता.बिज्ज्वल हा इथला राजा शैव होता.
                       नुकत्याच कृष्ण तलावातील सापडलेली शिल्पांत व  या मंदिराच्या शिल्पांत  साधर्म्य दिसते.  खोदकाम पूर्ण होईपर्यंत ठामपणे सांगता येणार नाही. परंतु या प्राचीन मंदिराचा व कृष्ण तळ्यात सापडेल्या अवशेषात निश्चितच संबंध आहे. तिथेही छत जमिनीवर व मंदिर जमिनीखाली असण्याची शक्यता आहे. कृष्ण तलावाच्या अवतीभोवतीही काही तटबंदीच्या खुणा आढळतात.कधीकाळी मंगळवेढा हे किती संपन्न नगर होतं याची साक्ष इथलं हे शिल्प वैभव देतं. नव्याने सापडलेल्या शिल्पासंबंधीचे सत्य  खोदकामानंतर स्पष्ट होईल. परंतु इतिहासाची ही हरवलेली पाने मात्र शोधावी लागतील. मुळातच आपण इतिहास, पुरावे , साधनं याबाबत फार निराशावादी असतो. ती झटकून या सांस्कृतिक धरोहरीला जपलं पाहिजे तसेच त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधल्या पाहिजेत. याकामी मा. गोपाळराव देशमुख, मा. आप्पासाहेब पुजारी, मा. आनंद कुंभार यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. मा. गोपाळराव देशमुखांनी या अभ्यासातून ‘मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास’ हे पुस्तक सिद्ध केलं आहे. त्यातून जे राहून गेलं त्यावर आणखी काम व्हायला हवं असं वाटतं.
################
 # सदर लेखासाठी पुढील संदर्भ साधने वापरण्यात आली.
 १] माणदेश : स्वरूप आणि समस्या -डॉ.इंगोले कृष्णा.माणगंगा प्रकाशन,कमलापूर[सांगोला] [1988]
 २] सोलापूर जिल्ह्याचा इतिहास – देशमुख गोपाळराव. रेवू प्रकाशन ,पंढरपूर.[2009]
 ३] मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास – देशमुख गोपाळराव. कौशल्या प्रकाशन, सोलापूर .[2014]
 ४] मराठी विश्वकोष : खंड 12
#################
                                           फारूक एस. काझी [M.A. (इतिहास) B.Ed.]
                                                         नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर
                @  फोटोग्राफी: विश्वजित वाघमारे, नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर.


हंपी

जायचं, पण कुठं? : हंपी

हंपीतील हे स्तंभ प्रगत स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानले जातात.

सोनाली चितळे | Updated: March 22, 2017 4:35 AM

मंदिरे व वास्तुशिल्पे हंपी परिसरात असून विदेशी पर्यटकांत हंपी प्रसिद्ध आहे.

कर्नाटकात १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेले हंपी जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावून आहे. अतिप्राचीन ऐतिहासिक अशी अनेक वास्तुशिल्पे आणि मंदिरे असलेला हंपी परिसर गुगलवर सगळ्यात जास्त सर्च केले गेलेले शहर आहे. हंपीने अतिशय प्रगत आंतरराष्ट्रीय व्यापारात अग्रेसर असा सुवर्णकाळ पाहिला असून पूर्वी इथे अनेक लोकांना कायमस्थित होण्यास नेहमीच उद्युक्त करत असे. येथील विजय विठ्ठल किंवा विठ्ठल मंदिर व परिसर उत्तम पुरातन स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. १५व्या शतकात बांधलेले हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित केले असून एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहे. हंपी परिसरात अनेक मंडप असून त्यावर बाहेरील बाजूवर आंतरराष्ट्रीय व्यापारसदृश भित्तिचित्रे आहेत, ज्यात इंग्लिश, पोर्तुगीज, चिनी, अरब लोकांशी व्यापार दर्शवतो. भारतातील ह्या प्रदेशातील सुबत्ता व संपन्नता जगभर आकर्षणाचे केंद्र होते. येथे अनेकविध सभामंडप आहेत. नृत्य मंडपातील दगडी खांब जाणीवपूर्वक विभिन्न घनतेचे निर्माण केले गेले ज्यामुळे प्रत्येक खांबातून वेगळा नाद उत्पन्न होईल. हंपीतील हे स्तंभ प्रगत स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानले जातात. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कुतुहलापोटी येथील दोन स्तंभ फोडून नाद कसा निर्माण होतो ते शोधून काढण्याचा निर्थक प्रयत्न केला, ते भंगलेले स्तंभ अजूनही तिथे आहेत. सद्य:स्थितीत नादमय स्तंभास हात लावण्यास मनाई आहे. मध्यभागी असलेला महाकाय दगडी रथ त्याची भव्यता आणि त्यावरील बारीक कोरीवकामासाठी बघणे गरजेचे. विष्णूचे वाहन म्हणून भव्य गरुड पक्षी ह्य रथावर आरूढ आहे. भारतात असे तीन रथ प्रसिद्ध आहेत. पहिला कोणार्कचा, दुसरा महाबलीपुरमचा तर तिसरा गरुडाचे शिल्प असलेला हंपी येथील. प्रदूषण टाळण्यासाठी हंपी परिसरात बॅटरीवर चालणारी गोल्फची छोटी गाडी तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाते. हंपी परिसरात हजार राम नावाचे राममंदिर आहे. विविध सभामंडप, मंदिरे व वास्तुशिल्पे हंपी परिसरात असून विदेशी पर्यटकांत हंपी प्रसिद्ध आहे.
सोनाली चितळे

Monday, February 13, 2017

सृजनरंग

#सृजनरंग

लोकसत्ता
11 फेब 2017
- आभा भागवत

स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. ते समजून घेणं गरजेचं आहे.

बालचित्रकलेतील टप्पे हे सर्वाना माहीत असणं आणि पालक व शिक्षकांनी मुलाचं निरीक्षण करताना ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं. एकाच वर्गातील दोन समवयस्क मुलं वेगवेगळी चित्रं का काढतात हे समजून घेण्यात याचा उपयोग होतो. एखादं मूल त्या टप्प्याच्या ढोबळ आराखडय़ापेक्षा खूपच निराळं काही करत असेल तर ते लक्षात येणं आणि त्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळणं हेही यातून घडू शकतं किंवा आपलं मूल कसं सर्वसामान्य आहे हेही समजू शकतं. ‘तारे जमीं पर’मधल्या ईशानच्या पात्राप्रमाणे एखादा जन्मजात चित्रकार असेल तर ते वेळीच लक्षात आलेलं केव्हाही चांगलंच ना? बालकाची नैसर्गिक वाढ – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बोधनिक तसंच सांस्कृतिक पाश्र्वभूमी आणि मिळणारं शिक्षण अथवा प्रशिक्षण या सर्वाचा बालचित्रकलेवर मोठा प्रभाव असतो.

बालचित्रकलेतील तिसरा टप्पा ‘नियोजित चित्र’ या नावाने ओळखला जातो. यामध्ये मूल स्वयं ऊर्मीने काही प्रतीकं चित्रित करू लागतं. ही प्रतीकं म्हणजे मुलाच्या मनात, डोक्यात जे विचार चालू आहेत त्यांचं दृश्य प्रदर्शनच असतं. तुम्ही पाहिलं असेल की सातव्या वर्षांच्या आसपास अनेक मुलं एकाच प्रकारची असंख्य चित्रं पुन:पुन्हा अथकपणे काढतात. बुजगावणं वाटावं असे हातपाय, ताठ असणाऱ्या असंख्य मानवाकृती किंवा मोटारी आवडत असतील तर मोटारीच, विमानं आवडत असतील तर विमानंच, असं नियोजन चित्रात दिसतं. मुलांची निरीक्षणशक्ती या वयात वाढलेली असते, त्यांना प्रश्न पडत असतात, उत्तरं सापडत असतात. हा सर्व सृजनाचा खेळ त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत असतो. माहितीमध्ये एक महत्त्वाची भर पडलेली असते ती म्हणजे आपण आईच्या पोटात होतो. आणि आजूबाजूच्या अनेक गर्भवती आया आणि प्राणी यांचं निरीक्षण मूल करू लागतं. आपल्या डोळ्याला दिसत नाहीत अशा कित्येक गोष्टी या जगात आहेत याची जाण हळूहळू याच वयात येऊ लागते. आणि त्याची विलक्षण चित्र अभिव्यक्ती म्हणून मूल एक्स-रे चित्र काढू लागतं. मोठय़ा माशाने खाल्लेले छोटे मासे, मोठय़ा प्राण्याच्या पोटात छोटा प्राणी, प्राणी आणि आत सांगाडा, झाडाच्या खोडामध्ये किडय़ांचं घर, मातीच्या खाली लपलेली झाडाची मुळं, मुंग्यांच्या वारुळाच्या आतली रचना असे मजेदार विषय मुलं हाताळू लागतात.

अजून एक निरीक्षण असं आहे, की स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. एका मुलाला समुद्राच्या तळाशी काय असतं याची खूप उत्सुकता असे. काही पुस्तकांतून, गोष्टींतून, फिल्म्समधून त्याने ते समजून घेतलं होतं. आणि जवळजवळ तीन र्वष तो फक्त समुद्राखालचे वेगवेगळे मासे काढत होता. मित्रांसोबतही याच गप्पा होत आणि असं लक्षात आलं की त्याच्या मित्रांचा पाच- सहा जणांचा गट चित्रात फक्त मासेच काढत असतो आणि माशांची माहिती गोळा करकरून एकमेकांना सांगत असतो. ही नुसती उत्सुकता किंवा आकर्षण नव्हतं. रागावणाऱ्या मोठय़ा माणसांची भीती, अंधाराची भीती, खोल पाण्याची भीती आणि न समजणारी असंख्य प्रकारची भीती यांवर वर्चस्व मिळवायचा तो चिमुकला प्रयत्न होता. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. या स्वयंउपचाराच्या चित्रपद्धतीत ‘हे काय तेच तेच चित्र काढतोयस’ असं म्हणून आपण त्या मुलाने शोधलेल्या थेरपीला नाकारत असतो. त्यामुळे त्या मुलाला हवी तशी चित्रं काढू देण्याचं स्वातंत्र्य मिळालं तरच आपोआप ते मूल स्वत:ची काळजी स्वत: कशी घ्यायची हे शोधून काढतं आणि स्वतंत्र झाल्यामुळे अर्थातच समाधानी होतं.

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही. तरीही पाठवायचंच असेल तर ज्या क्लासेसमध्ये चित्रं काढायची मोकळीक दिली जाते तिथेच मुलांना पाठवावं. जिथे असं असं चित्र काढ, आकारात नीट रंग भर असा आग्रह धरला जातो त्या चित्रकलावर्गात मुलाचं भरपूर नुकसान होतं. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता यातून मारली जाऊ शकते. मूल कोमेजू लागतं आणि अकाली चित्र काढेनासं देखील होऊ शकतं. शाळांनी देखील ही गरज लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

यापुढचा चौथा टप्पा आहे तो ‘बदलाचा काळ’. दहा ते बारा र्वष वयोगटातील मुलं, मोठय़ांनी काढलेल्या चित्रांच्या प्रभावाखाली असतात आणि मोठय़ांसारखी चित्रं काढायचा प्रयत्न करतात. तरीही नियोजित चित्रटप्प्यातील काही प्रतीकांचा मोह मुलाला आवरत नाही. त्यामुळे एखाद्या फ्रेम केलेल्या सूर्यास्ताच्या निसर्गचित्राची नक्कल करता करता अगदी निरागस, बालिश अशी मानवाकृती मुलांच्या चित्रात डोकावते. चित्रात जवळच्या वस्तू मोठय़ा तर लांबच्या लहान दिसू लागतात. क्षितिजरेषेचा अंतर्भाव होतो आणि तिसरी मिती दिसू लागते, अर्थात चित्र फक्त लांबी आणि रुंदीत द्विमितीय चपटं न वाटता खोली म्हणजेच डेप्थमुळे त्रिमितीय वाटू लागतं. वस्तू या शेजारी शेजारी मांडून ठेवलेल्या न वाटता काही मागे, काही पुढे, एकमेकांमागे झाकल्यामुळे काही भाग दिसतो असे सूक्ष्म बारकावे टिपून मुलं चित्रात उतरवतात. ज्या उत्स्फूर्ततेने, न बिचकता मूल यापूर्वी चित्र काढत असे ती कमी होऊ लागते. चित्र काढायचं तंत्र ज्यांना जमत नाही ती मुलं नाराज होऊन चित्र काढेनाशी होऊ लागतात. सुचतं खूप पण ते चित्रात उतरवता येत नाही, अशी या टप्प्यात अनेक मुलं असतात.

याच काळात मुलांचा चित्रातला रस टिकून राहावा यासाठी इतर विषयांशी सांगड घालून कलाकृती करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. ज्या मुलांना गोडी असते आणि चित्रकलेचं अंग असतं त्यांना नक्कल करण्यापासून परावृत्त करावं लागतं आणि जास्तीत जास्त ओरिजिनल, स्वत:ची चित्र काढायचा आग्रह धरावा लागतो. पण अनेक ठिकाणी तसं घडताना दिसत नाही. जे चांगलं जमतंय तेच ते काढायला प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे मूल बंदिस्त विचार करू लागतं. स्वत:च्या चित्र काढण्याच्या कक्षा अरुंद करून ठेवतं. या टप्प्यातील मुलांना विशिष्ट चित्रपद्धतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक माध्यमं देणं – जसं कोलाज, दोरा कागदाला शिवून चित्र, नैसर्गिक रंग तयार करून चित्र, मातीने चित्र, मोठे चित्रकार समजून घेऊन विविध शैलींचा अभ्यास करणं इत्यादी तसंच विज्ञान व कलेची सांगड घालणं – जसं रंग कसे तयार होतात, कागद कसे तयार होतात, कला अभ्यासण्यासाठी विज्ञानही कसं महत्त्वाचं आहे आणि कलाकुसरीचा चित्रात वापर करणं – जसं रांगोळीचे प्रकार, अलंकारणाचे विविध प्रकार इत्यादीमधून या विचारकक्षा रुंदावू शकतात.

चित्रांची गोडी टिकून राहिलेल्या मुलांचा बालचित्रकलेतील पाचवा टप्पा असतो ‘वास्तववादी’ चित्रांचा. साधारण तेरा ते सोळा वयोगटातील या मुलांच्या हातात चित्रं चांगली काढण्याचं कसब आलेलं असतं. तंत्र शिकून, सराव करून चित्रकलेतील मूलतत्त्व अभ्यासून या वयातील मुलं चांगली चित्र काढू शकतात. हात स्थिर होणं, साधनांशिवाय उत्तम आकार, रेषा, बिंदू परिणामकारक काढू शकणं, रंगांची समज येणं, काय सुंदर आहे याबद्दल मतं व्यक्त करता येणं, रचनामूल्य समजणं, प्रमाणबद्ध आकृती काढता येणं म्हणजेच सौंदर्यदृष्टी तयार होणं अशी अनेकांगानी चित्रकलेतील समज मुलं दाखवू लागतात. म्हणूनच या सुमारास चित्रकलेच्या परीक्षा मुलांनी द्याव्यात. रंगसंगती, रंगछटा, रेखाकृती, छाया-प्रकाशाचा अभ्यास अशा चित्रकलेतील मूलतत्त्वांवर या टप्प्यात प्रभुत्व मिळवता येते. ज्या मुलांच्या हातात कसब कमी आहे पण चित्रकलेची गोडी आहे त्यांनी चित्रं काढण्यापासून परावृत्त न होता नेटाने जी चित्रं आवडतात ती काढत राहिली पाहिजेत. कारण चित्रकला हे एक सहजसुंदर अभिव्यक्तीचं, आनंद अनुभवण्याचं माध्यम आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना चित्र काढण्याचा आनंद लोप पावू नये म्हणून आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
- आभा भागवत

Wednesday, February 8, 2017

तीन लाडू

#तीन #लाडू
..............................
सचिन सरांनी अलफाजला तीन राजगिरा लाडू दिले.
त्यापैकी अलफाजने एकच खाल्ला व दोन ठेवून दिले.
सरांनी विचारलं, " खाऊन टाक. दोन लाडू कशाला ठेवले?"
अलफाज आधी थोडा लाजत लाजत हसला.
मग बोलू लागला
"एक लाडू अर्धा मम्मीला अन अर्धा अब्बूंना देणार. आनी एक आपुट गजलूला देणार. म्हणून नाही खाल्ले मी."
...............
वर्गात घडलेला प्रसंग सचिन सर मला सांगत होते.
खरंतर एक अब्बू म्हणून माझा आनंद मला मांडताही येणार नाही. लेकरू एवढं प्रेम करत असेल तर अजून अम्मी अब्बूला काय हवं असतं?
............................
घरी आल्यावर मी हा प्रसंग समूला, अम्मींना सांगितला.
अम्मी म्हणजे अलफाजच्या अम्माजी कितीतरी वेळ अलफाज कडे पाहत होत्या.
अलफाज ने अर्धा अर्धा लाडू आम्हा दोघांना दिला अन आपुट गज़लला. ती ही हरकून जाऊन लाडू खाऊ लागली. बदल्यात अलफाजला एकच गोष्ट हवी होती, गज़लची गोड गोड शेंबूडभरली पापी.
......................
या क्षणांना चिमटीत पकडायचा प्रयत्न करतोय खरा...पण शब्दांनाही मर्यादा असतातच.
 अम्माजी -अब्बाजीच्या मांडीवर बसून तो जगण्याची रीत शिकतो आहे. एक माणूस बनून जगाची वाट चालतो आहे. अलफाजच्या आसपासचे लोक त्याला समृध्द करत आहेत.आणि या समृध्दीत आम्ही दोघंही (मी आणि समू) न्हावून निघत आहोत. चिंब होत आहोत.
अलफाजने दिलेल्या लाडूचा गोडवा अजूनही जीभेवर रेंगाळतो आहे. त्याला दुआंखेरीज आम्ही काय देणार?
..............................
#जाता #जाता...

तुम्ही रागवाल तर मुलं भ्यायला शिकतील
तुम्ही चिडाल तर मुलं चिडायला शिकतील
तुम्ही काळजी घ्या तर मुलं काळजी घ्यायला शिकतील
तुम्ही प्रेम द्याल तर मुलं प्रेम द्यायला शिकतील.
मुलं आरसा असतात, अस्सल प्रतिबिंब दाखवतात....
..................................
#फारूक #एस. #काझी
नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...