Pages

Thursday, February 2, 2017

नई तालीम

महात्मा गांधींच्या शिक्षण विचारावर व त्या आधारे सुरू असलेल्या शाळेवर आज मी सकाळ च्या  सप्तरंग पुरवणीत लेख लिहिला आहे
नई तालीमः काळाच्या पुढचा शिक्षणविचार (हेरंब कुलकर्णी)

‘नई तालीम’ हा महात्मा गांधी यांचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता; पण सरकारनं हा विचार पाहिजे तितक्‍या प्रभावीपणे अमलात आणला नाही. ‘नई तालीम’ पद्धतीच्या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी-ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज ‘बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ’ आणि ‘कष्ट करणारा कमी दर्जाचा’ असं समीकरण आहे व त्याआधारे पगार दिला जातो. गांधीजींची शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवली गेली असती, तर हा प्रकार कमी झाला असता. आता तरी नव्या शैक्षणिक धोरणात ‘नई तालीम’ स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गांधीजींच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्‍टोबर) विशेष लेख...

‘मी जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी’ असं वर्णन महात्मा गांधी यांनी ‘नई तालीम’ या त्यांच्या शिक्षणपद्धतीचं केलं होतं. आजच्या (२ ऑक्‍टोबर) गांधी जयंतीनिमित्त या शिक्षणपद्धतीवर चर्चा व्हायला हवी. सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी ‘नई तालीम’ हे साधन आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. त्यांची ही शिक्षणपद्धती सरकारनं स्वीकारली नाही, हे दुर्दैव. स्वीकारली असती तर आज भारत हे आगळवेगळं राष्ट्र बनलं असतं. आज बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कौशल्याधारित शिक्षण मिळेनासं झालं आहे. गरिबांविषयीची कणव वेगानं हरवत चालली आहे. अशा वेळी गांधीजींच्या या शिक्षणपद्धतीची तीव्रतेनं आठवण येते.

वर्धा ः सेवाग्राम इथं पुन्हा सुरू झालेल्या ‘आनंदनिकेतन’ या ‘नई तालीम’ धर्तीवरच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाणारे विविध उपक्रम.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी तिथल्या आश्रमात असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचं चिंतन विकसित झालं. १९३७ मध्ये काँग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा इथंल्या शिक्षण संमेलनात गांधीजींनी पायाभूत शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रवींद्रनाथ टागोरांसोबत काम केलेल्या आर्यनायकम दांपत्यानं शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्ध्यात तसंच भारतात बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, काश्‍मीर अशा अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या. १९५६ मध्ये २९ राज्यांत ‘नई तालीम’ पद्धतीच्या ४८ हजार शाळा होत्या आणि त्यांत ५० लाख मुलं शिकत होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गांधीजींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता; परंतु हा शिक्षणविचार आधार मानून शासनानं शिक्षणरचना न केल्यानं या शाळा बंद पडत गेल्या व आज भारतात ‘नई तालीम’ पद्धतीच्या केवळ पाचशेच शाळा सुरू आहेत.

महात्मा गांधी ः ‘नई तालीम’ हा गांधीजींचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता.

गांधीजींनी ‘नई तालीम’ची प्रमुख चार तत्त्वं मांडली होती. १) प्राथमिक शिक्षण हे सात ते १४ या वयोगटाचं असेल २) शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातल्या लोकांच्या मुख्य व्यवसायातला असावा ३) सर्व विषयांचं शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिलं जावं ४) असं दिलं जाणारं शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावं; याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते; पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला होता. ‘जीवनाकडं बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ या दृष्टिकोनातून गांधीजी सफाईकडं पाहत असत. सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामं करणाऱ्यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता समान भाव निर्माण होईल, हे अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे आहारशास्त्रामुळंही ‘स्वयंपाक हे केवळ महिलांचं काम’ असं मुलांना वाटू नये, त्यातलं विज्ञान मुलांना नकळत कळावं, तसंच ‘नई तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण’ एवढाच संकुचित अर्थ नसावा, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जावं, असं गांधीजींना अपेक्षित होतं. वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यातली भूमिती, कापसाच्या निर्मितीमधलं विज्ञान, वस्त्रनिर्मितीमधल्या अर्थकारणातलं अर्थशास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणाऱ्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत, असं गांधीजींना अपेक्षित होतं. या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी असा भेदभाव नसलेला, बुद्धीचं काम व श्रमाचं काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधीजींची दृष्टी होती. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तव जगण्याशी संबंध जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात ः ‘भारतीय समाजातल्या दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न गांधीजी करत होते. शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही त्यांचा भर होता. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत, कला, सण-उत्सव यांचा समावेश असावा, असं ते म्हणत.’

वर्धा ः ‘आनंदनिकेतन’ या शाळेतली सूत कातणारी विद्यार्थिनी.

अनुभवातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगीण शिक्षण दिलं जातं, हे आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून सिद्ध होत आहे. हे संशोधन तेव्हा झालेलं नसतानाच्या काळात गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी ही मांडणी केली होती. हे त्यांचं द्रष्टेपणच होतं.

आजही शिक्षणाचं स्वरूप गरीब-श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारं, समान शिक्षण नाकारणारं, शिक्षणाचा व्यापार वाढवणारं असंच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तिकेंद्रितता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्‍न, श्रमाकडं व श्रमकर्त्याकडं बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता ‘नई तालीम शिक्षणपद्धती’ हेच त्यावरचं उत्तर वाटतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत सगळ्यांनीच फेरविचार करणं आवश्‍यक आहे.

या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे, ती या शिक्षणातून कमी झाली असती. नव्या शैक्षणिक धोरणात नई तालीम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

------------------------------------------------------------------
आनंदनिकेतन ः ‘नई तालीम’ची पुन्हा सुरवात
वर्धा इथल्या आश्रमात ‘नई तालीम’ची शाळा १९७० च्या दशकात जिथं बंद पडली होती, तिथंच ती २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या इथल्या संचालक आहेत. या शाळेची विद्यार्थिसंख्या २४० आहे. सर्व सामाजिक गटांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही, हे इथं कटाक्षानं पाहिलं जातं.

‘प्रीती’, ‘मुक्ती’ आणि ‘अभिव्यक्ती’ हा या विद्यालयातल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा आधार आहे. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रं यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह मुलं वस्त्रं विणतात. कला, संगीत यावर विशेष भर असतो. सामाजिक विषयांवर सतत बोललं जातं व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड करायला शिकवलं जातं. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिवाळी भाज्यांची लागवड व देखभाल करायलाही शिकवलं जातं. हे काम करत असताना जमिनीचं मोजमाप व परिमिती काढणं, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणं, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करत बागेची रचना करणे आदी गोष्टीही इथली मुलं शिकली आहेत. विविध ऋतूंमधलं किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतल्या पाण्याची पातळी यांचं मोजमाप, नोंदी ठेवणं, आलेख काढणे हेही इथं सहज शिकता येतं. गांडूळखत, कंपोस्टखत तयार करणं, द्रवरूप झटपट खत करणं, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणं, मित्रकीड, नुकसान करणारी कीड आदींची तोंडओळख, मधमाश्‍या व कीटकांचं निसर्गातलं महत्त्वाचं स्थान समजून घेणं, अहिंसक पद्धतीनं मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय, अळिंबीची शेती करण्याची पद्धत अशा बाबी इथली मुलं शिकतात. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलाला संधी मिळते; ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचं शास्त्र आदींचे धडे इथली मुलं शिकतात. यातून स्वावलंबन व लिंगसमभावाचं महत्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण तयार करणं शक्‍य होतं. आज शिक्षणशास्त्रात ‘ज्ञानरचनावाद’ या पद्धतीत शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानण्यात आलेली आहे. ‘नई तालीम’ ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्यं विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी-पालकांनी ही शाळा बघायला हवी.
------------------------------------------------------------------
अभय बंग ः ‘नई तालीम’ शाळेचे विद्यार्थी
डॉक्‍टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नई तालीम’चे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धत समजून घेतली. ते म्हणाले ः ‘‘शेतकरी-मजूर कसे जगतात, याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी ही पद्धत होती. दिवसभरात तीन तास उत्पादककाम करणं सक्तीचं होतं. सूतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालयसफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणं ही कामं प्रत्येक जण करत असे. आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलं मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन समजून देत. आकाशातले तारे दाखवले जात, तर कधी झाडावर चढून कवितेचं पुस्तक आम्ही वाचत असू. ‘कालच्या पेक्षा तू आज पुढं सरकलास का?’ असा महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन परीक्षेत होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव,’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसं कराल?’ असे प्रश्‍न विचारले जात... स्वयंपाकानंतर भांडी घासण्याचीही कामं करावी लागत असत.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्‍न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचं आकलन तपासत...
टॉलस्टॉयच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक अंध म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत, त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटतं, ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी. ‘नई तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण, शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही, तर शेतकऱ्यांचा सन्मान करायला शिकलो, त्यामुळं ती जीवनदृष्टी आहे.

‘नई तालीम’चं आकर्षण वाढत आहे ः बरंठ
‘‘देशभरात वेगवेगळ्या राज्यांत आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा ‘नई तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणं, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे,’’ असं ‘नई तालीम’ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘नई तालीम’कडं आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून, सर्वोदयी समाजरचनानिर्मितीचं साधन म्हणून पाहतो बघतो.’’ http:/www.naitalimsamiti.org/ ही समितीची वेबसाइट असून, http://www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या शिक्षणविचारावर प्रभावीपणे काम करत आहे

हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१)

Thursday, December 8, 2016

पाण्यात विरघळणारे प्लॅस्टिक

भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

या पिशव्या इको फ्रेंडली आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | December 7, 2016 3:38 PM


प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पण भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने चक्क पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही.



अश्वथ हेगडे हा उद्योजक मुळचा मंगलोरचा पण सध्या कतारमध्ये राहतो. त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेटेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. ३ रुपयांच्या आसपास त्या पिशव्या बाजारात उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.



या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळतील असा दावा हेगडे यांनी केला आहे. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्या तरी त्यांना अपाय होणार नाही असेही हेगडेंनी सांगितले आहे. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, हेगडे यांना भारत प्लास्टिकमुक्त बनवायचा आहे.

     

Monday, November 21, 2016

गणिताच्या वर्गात खडू - फळ्याला सुट्टी

गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

प्रतिनिधी, पुणे | November 20, 2016 2:07 AM

 गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

शिक्षण विभागाकडून शाळांना आदेश; मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

राज्यातील शाळांमध्ये आता गणिताच्या वर्गात खडू-फळ्यावरील आकडेमोडीला सुट्टी मिळणार आहे. गणित हा विषय सर्वाधिक विद्यार्थ्यांना कठीण वाटत असल्यामुळे तो मणी, नोटा, वेगवेगळे आकार अशा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकवण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

आतापर्यंत हात कसे धुवावेत, शाळा स्वच्छ कशी ठेवावी अशा बाबींचे शासन आदेश काढल्यानंतर आता वर्गात गणित कसे शिकवावे याचाही आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. गणित शिकवण्याची जुनी पद्धत न वापरता नवे शैक्षणिक साहित्य वापरून गणित शिकवण्यात यावे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांची गणित आणि भाषा विषयातील प्रगती समाधानकारक नाही. गणित या विषयाची भीती वाटत असल्यामुळे मुले या विषयामध्ये मागे असल्याचे शासकीय पाहणीतून समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर गणित हा विषय वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातूनच शिकवण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. रंगित मणी, मण्यांच्या माळा, शंभर एकक ठोकळे, दहा दशक दांडे, पाच शतक पाटय़ा आणि हजाराचा ठोकळा, नाणी आणि नोटा, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे, मॅचिंग सेट्स, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जिओ बोर्ड, मीटर टेप, केसांना लावण्याच्या पिना, दोरी आणि पाटय़ा असे साहित्य प्रत्येक शाळेने गोळा करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात हे साहित्य शाळांनी उपलब्ध करायचे आहे. हे साहित्य कसे वापरायचे याचेही प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे.

गणित साहित्य संचही सीएसआरमधून?

एकीकडे शिक्षण विभागाच्या विविध योजना अमलात आणताना त्यासाठीचा खर्च सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करू इच्छिणाऱ्या कंपन्या (सीएसआर), लोकसहभाग, पालक यांच्या माध्यमातून उभा करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना देण्यात येतात. गणित संचाच्या शैक्षणिक साहित्याचा खर्चही सीएसआर किंवा लोकसहभागातून उभा करण्याची विभागाची सूचना आहे. खर्चाची रक्कम उभी न राहिल्यास त्याचा खर्च स्थानिक प्रशासनाने करायचा आहे. सहा विद्यार्थ्यांच्या गटासाठी असणाऱ्या एका संचाची किंमत ही ४ ते ५ हजार रुपये आहे.

न्यूनगंड

न्यूनगंड मार्गदर्शन

एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!

हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!

💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,

💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

भित्तीचित्र

कॅन्व्हास पेंटिंग ते भित्तीचित्र
- आभा भागवत
"कला संस्कृती" - दिवाळी २०१६

कॉलेजमध्ये असताना एक खूप मोठं चित्र तयार होताना बघितलं होतं. साधारण ८ X २५ फुटी असेल. तेव्हापासूनच मोठ्ठ्या चित्राचे अंदाज केवढे वेगळे असतात याची कल्पनाही आली आणि ओढही निर्माण झाली. मोठा कॅन्व्हास आणि भरपूर रंग हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतंच. बरेचदा वेळेचं आणि आर्थिक गणित न जमल्यामुळे लहान कॅन्व्हासवर समाधान मानावं लागायचं. छोट्या कागदावर चित्र काढायची मजा वेगळी आणि मोठ्या आकारात विचार करण्याची मजा वेगळी. मोठ्या अवकाशाची अवाढव्यता, मोकळीक हवीहवीशी वाटू लागली. संपूर्ण शरीर जणू त्या द्विमितीय प्रचंड पृष्ठभागाचा अंदाज घेत चित्र काढत असतं, नव्हे नाचतच असतं. कोणे एके काळी शिकलेलं संगीत आणि नृत्यही त्यात डोकावत असावं बहुदा! त्या भव्य आकारापुढे आपण इतके लहान असतो की त्यात माझं 'मी' पण गळून जातं. जादू व्हावी अशी मी स्वतःला विसरून त्या चित्रात विरघळून जाते. चित्र म्हणजेच मी आणि मी म्हणजेच चित्र होते. सगळा दिवस संपतो तरी चित्रातून मी बाहेरच येत नाही इतकी एकरूपता अनुभवाला येते. साऱ्या जगाचा विसर पडतो आणि ध्यान लागावं तशी तल्लीनता जाणवते.

वेगळा असा स्टुडिओ नसल्यामुळे छोट्या चित्रांबरोबर मोठाल्ले कॅन्व्हासेसही घरीच रंगवले. भिंतीवरचं चित्र असेल तेव्हा मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळं सामान नेऊनच चित्र काढायचं असतं. ही मोठी चित्र तयार होताना बघताना घरी मुलांनाही राहववायचं नाही. त्यांनाही मोठ्ठ्या आकारावर चित्र काढावीशी वाटू लागली. मुलांना माझ्या चित्रात शिरकाव नाही हे समजल्यावर घरातल्या भिंतींनाच त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. घराच्या भिंती पार छतापर्यंत मुलांनी रंगवल्या. हळू हळू लक्षात आलं की सगळीच मुलं अशी मोठ्ठी चित्र काढायला फार उत्सुक असतात. माझ्या मुलांच्या मित्रमैत्रिणींनाही आमच्याकडच्या भिंती बघून चित्र स्फुरू लागली. हे मित्र-मंडळींशी बोलत असताना एक दोघांनी त्यांच्या घराच्या भिंती खुल्या करून दिल्या. मुलांनी मोकळेपणानी तरीही माझ्या मार्गदर्शनाखाली चित्र काढावी अशी कल्पना पुढे आली. यातून, प्रत्येक मुलाची वेगळी क्षमता चाचपडत, तिला भिंतीवर मोकळी वाट करून देत मोठं भित्तीचित्र काढण्यासाठी खास शैली निर्माण करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या चित्रांमुळे 'मुलांनी भिंतींवर केलेली चित्र' ही अतिशय अभिनव संकल्पना फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पोहोचली. कॅनडा, यू. एस. ए. आणि सिंगापोर मधील काही गटांनी स्फूर्ती घेऊन मुलांसाठी भित्तीचित्र कार्यशाळा योजण्याची कल्पना उचलून धरली.

मी एकटीने एक भित्तीचित्र करायचं ठरवलं तर आठ - दहा दिवस तर काही वेळा महिना महिना एकाच चित्राचं काम चालतं. त्यात कसबही अर्थात जास्त चांगलं उतरतं. ते चित्र संपूर्ण माझं असतं. त्या चित्राचं आर्थिक मूल्यही त्यामुळे वाढतं. चित्र ही श्रीमंतांची मक्तेदारी त्यामुळेच वाटते. ज्याच्या खिशाला असं महागातलं चित्र परवडतं तोच चित्र विकत घेऊ शकतो अथवा चित्रकाराला कमिशन्ड वर्कची ऑर्डर देऊ शकतो. मग ज्यांना एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही, त्यांना मोठ्या चित्राचा आनंदच मिळू नये का? का चित्रकारानी स्वतःचं मूल्य कमी करून कमी पैशात काम करायचं? याचा सुवर्णमध्य हळू हळू सापडत गेला, तो भित्तीचित्र या माध्यमातून. एक तर यासाठी भिंत हाच पृष्ठभाग वापरायचा असल्यामुळे कॅन्व्हास, कागद यांवर खर्च करण्याचा प्रश्नच मिटला. भिंतीवरचे रंग तुलनेनी स्वस्त असल्यामुळे साधनांचा खर्चही कमी झाला. आणि कमीत कमी एक लिटरचा रंग विकत घेतल्यामुळे भरपूर रंग अनुभवायची संधी, अर्थात मोकळेपणाने हव्या तेवढ्या रंगात खेळण्याची मुभा मिळाली. छोटे, अपुरे, महागडे रंग काटकसरीने वापरण्यातलं दडपण नाहीसं झालं. 'फ्रीडम' अनुभवण्याचा जणू नवा रस्ताच सापडला म्हणूया ना! मुक्त होण्याची ज्याला ओढ असते तो माणूस स्वतःच्या कामात मुक्ती शोधतोच, तसंच काहीसं घडू लागलं.

ही भित्तीचित्र मी एकटीने न करता त्यात सर्वांचा सहभाग असावा याची इतरही कारणं आहेत. सामान्य माणसाला जर सौंदर्य म्हणजे काय याची व्याख्याच करता आली नाही, सुंदर काय असतं याचा अनुभवच आला नाही, तर त्या माणसाचं स्वतःचं काय राहिलं? भित्तीचित्र करताना अनुभवाला येणारा सौंदर्यानुभव हा सहभागी व्यक्तींना अंतर्मुख करतो; इतकंच नव्हे तर सौंदर्य शोधायची, जाणायची गोडी निर्माण करतो. त्यामुळे या कामाला एक नवीन उंची प्राप्त होते. केवळ मी, माझी चित्रकला, माझा कॉपीराईट, माझी सही, माझा मोठेपणा अशा संकुचित दृष्टिकोनाच्या खूप पलीकडे हा अनुभव घेऊन जातो. सहभाग घेणाऱ्यांना थोडंसं चित्रकाम करूनही 'हे चित्र त्यांचं स्वतःचं आहे, तसंच सर्वांचं आहे' अशी जवळीकीची, आपुलकीची, मालकीची भावना चित्राबद्दल वाटते. त्यामुळे त्या चित्राशी, भिंतीशी आणि त्या ठिकाणाशी सर्व सहभागी एका सुंदर जाणिवेने बांधले जातात. जेवढी मोकळीक मी स्वतः अनुभवते, तेवढीच सर्व सहभागी चित्रकारांनाही अनुभवता आली पाहिजे हे सूत्रच ठरवून घेतलं आहे. प्रत्येकाची चित्रातील तयारी, चित्र काढण्याचा आत्मविश्वास, क्षमता, चित्र आवडण्याचा परीघ हा वेगळा असतो. या सर्व वैविध्यपूर्ण बंधनांना संपूर्णपणे स्वीकारूनच समूहचित्र करणं शक्य आहे. त्यासाठी स्वतःच्या स्वीकारकक्षा मला सतत रुंदावत न्याव्या लागतात. समूहगान आणि समूहनृत्य जसं सर्वसामायी आहे, तसंच हे समूहचित्र आहे. एकत्र येऊन निर्मिती करण्यातली ऊर्जा अवर्णनीय आनंद तयार करते. मी जरी त्याची दिशा ठरवत असले तरी सर्वांच्या अभिव्यक्तीला, कौशल्याला न्याय देणं देखिल सातत्यानं त्यात करावं लागतं.

ज्यांना कागदावर चित्र काढायला फार मजा येत नाही त्यांनाही भित्तीचित्रात आनंद मिळू शकतो, हे पाहून मलाही आश्चर्य वाटतं. म्हणजे चित्रकला ही फक्त चित्रकाराचीही मक्तेदारी राहिलीच नाही. सर्वांनी मिळून केलेली ती एक सामायिक कलाकृती बनते. It's a form of Public Art. याला कदाचित कम्युनिस्ट गंध येऊ शकेल, पण हा त्याहून खूप वेगळा विचार आहे. यात सर्वांच्या क्षमतांचं सपाटीकरण नाहीये, उलट सर्वाना जे येतं त्याची भर घालणं आहे. त्याचं कौतुक करणं आहे; मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आहे; चित्रातून कलोपचाराचे फायदे मिळवणं आहे; चित्रात स्वतःला झोकून देणं आहे; स्वतःला हरवणं आहे; मुलांची ऊर्जा सकारात्मकरित्या उपयोगात आणणं आहे. मुलं यातून आयुष्यभरासाठी प्रेरणा घेतील. हा अनुभव इतका वेगळा आणि समृद्ध करणारा असतो की त्याचे चांगले परिणाम चिरकाल दिसतील. खरं तर मोठ्या माणसांनाही अशा समूहचित्रातून खूप आनंद आणि समाधान मिळतं.

लहान मुलांच्या क्षमतांना समाजाने कायमच दुय्यम लेखलं आहे हेही यातून प्रकर्षानं जाणवू लागलं. बालचित्रकलेच्या अभ्यासातून मुलांमधील विविध वयोगटातील चित्र क्षमता ही केवढी विलक्षण देणगी आहे हे समजत होतं. त्याचा अनुभव भित्तिचित्रांतून येऊ लागला. एका चित्रामध्ये सात वर्षाच्या वीस मुलांचा सहभाग होता आणि चित्रातील झाडाला प्रत्येकाने तीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढली. मुलांना अजून जागा दिली असती तर प्रत्येकाने शंभर वेगवेगळे प्रकार नक्की काढले असते. नंतर जेव्हा मुलं दमली आणि पालक फुलं काढू लागले तेव्हा पालकांनी नवीन काही करण्याऐवजी मुलांच्या फुलांची नक्कल केली. नवनिर्मितीसाठी उत्सुक असलेल्या प्रौढांनी हे लक्षात घेण्याजोगं आहे की मुलं हा सृजनशीलतेचा उगम आहे. त्यांना फक्त मोकळी वाट मिळायचा अवकाश आणि ती खळाळून वाहू लागतात.

कर्नाटकातल्या काही दुर्गम भागांत छोट्या गावांमध्ये शेतकरी मुलांबरोबर अशी भित्तीचित्र काढण्याची सुंदर संधी नुकतीच मिळाली. शहरी मुलं एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात. त्यांचं विश्व हे एका आखून दिलेल्या सीमेच्या आतपर्यंत मर्यादित असतं. मी स्वतः शहरी असल्याने गावातली मुलं किती हुशार असतात आणि त्यांचे अंदाज कसे वेगळे असतात याची मला पुरेशी ओळख असण्याचं काहीच कारण नव्हतं. या मुलांना चित्रात सामावून घेणं हे मोठंच आव्हान होतं. कानडी भाषा मला येत नाही आणि त्यांना मराठी येत नाही. मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये संभाषण करताना, चित्र ही एक स्वतंत्र मजबूत भाषा आहे याची प्रचीति आली. रेषा रंगांच्या माध्यमातून त्या मुलांच्या जवळ पोहोचायला फक्त काही मिनिटं लागली. भिंतीवरच्याच चित्राने भाषेची भिंत फोडणारं असं हे विलक्षण माध्यम आहे.

मुलांना वाचनालयात यावंसं वाटावं आणि स्वतः केलेल्या भित्तीचित्रामुळे वाचनालयाविषयी आपुलकी वाटावी हा या चित्रांचा हेतू होता. पहिल्याच चित्राच्या वेळी एक पाच वर्षाची चिंगुली शेमडी पोर आपल्या एक वर्षाच्या भावाला कडेवर घेऊन पुन्हा पुन्हा चित्र बघायला येत होती. धाकट्या भावंडाला सांभाळायची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिला चित्र आणि वाचनालय या दोन्ही गोष्टी फक्त काही अंतरावरून बघायला मिळाल्या. ही मुलगी म्हणजे अनेक भारतीय मुलींच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. त्या मुलीनी माझ्या मनात घर केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या चित्रात ती मुलगी भिंतीवर चितारायची ठरवली. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात पांढऱ्या फुलांच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलेली तीन भावंडं आणि दूरवर उभी, बाळ कडेवर घेतलेली एक छोटी पोर हे चित्र थेट तिथल्या गावातल्या मुलांच्या, गावकऱ्यांच्या हृदयाला भिडलं. नंतर कळलं की ते चित्र बघायला रोज थोडे थोडे गावकरी येऊन जातात. चित्रकाराच्या आयुष्यात याहून आनंदाची गोष्ट ती काय?

चित्रांमध्ये जी जी पुस्तकं आम्ही दाखवली, त्या पुस्तकांची नावं कानडी मध्येच लिहायची होती. मग त्याच मुलांना सांगितलं की तुमच्या मनातलं एखादं पुस्तक, जे अजून कोणीच तयार केलं नसेल अशी नावं लिहा. आणि यातून मुलांच्या मनात खोलवर घर केलेल्या पुस्तक कल्पना बाहेर येऊ लागल्या. सुट्टी मजेची, भिंतीवरची पाल, सगळ्या शाळेत मीच हुशार, पुस्तकातला किडा, टकलू, बदक, विविध मासे आणि अशी खूप मोठी यादी होईल अशी नावं मुलांनी शोधली आणि लिहिली. कल्पनेतल्या पुस्तकाला लेखक म्हणून स्वतःची नावंही घातली. भित्तीचित्रांमुळे मुलांची वाचनालयाशी अशी दोस्ती होईल याची मलाही आधी कल्पना नव्हती.

भिंतीवरच्या चित्रांमधल्या मुलांचे त्वचेचे रंग काळे सावळे दाखवले. एक दोन मुलं खूपच जास्त काळी दाखवली, कारण तेवढी काळी भारतीय मुलं असतात. पुस्तकांमधल्या चित्रांमध्ये कधीच एवढी काळी सावळी मुलं दाखवली जात नाहीत. त्यामुळे सहभागींपैकी काही जण म्हणत होते की रंग बदलू, गोरा करू. पण आपली मुलं अशीच असतात हे त्यांना थोड्यावेळाने पटलं. गावातील मुली जशी परकर पोलकी घालतात तशीच काही चित्रांमध्ये दाखवली, काही मुलांना चक्क समोर बसवून त्यांचं स्केच भिंतीवर उतरवलं. मुलं इतकी खूष झाली. जाता जाता मला पुन्हा येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देऊन ठेवलं. अशी ही भित्तीचित्रांनी माणसं जोडण्याची वेगळीच ताकद हळू हळू समोर येऊ लागली आहे. सहभागींना नाविन्यपूर्ण अनुभव देता देता माझा प्रवासही समृद्ध होतो आहे.

चित्र कसं असावं याचे सर्व नियम मुलं तोडू शकतात. नियम तोडण्यामुळे, प्रयोग करण्यामुळे कधीही न सुचलेल्या असंख्य गोष्टी मुलं शोधून काढतात. स्वतःच प्रश्न निर्माण करतात आणि उत्तरही स्वतःच शोधतात. भिंतीवरची भव्य जागा कशी वापरायची याचे नवे अंदाज तयार होतात. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या काळात जगणाऱ्या आपल्या पिढीमध्ये अनेक स्तरांवर अनेक प्रकारची प्रतिभा अस्तित्वात असते, तिला वाट सापडवून देण्यासाठी मार्ग शोधायची गरज आहे. भिंतीवरच्या चित्रांसारखं मुक्त करणारं माध्यम इतकं सहजी उपलब्ध आहे, की त्याचा आस्वाद आणि अनुभव शक्य तेवढ्या सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं.

दलाईलामा यांचं एक अतिशय आशयघन वाक्य कायम आठवत राहतं - The planet does not need more successful people. The planet desperately needs more peacemakers, healers, restorers, storytellers and lovers of all kinds. असे शांतीदूत निर्माण करण्याची ताकद समूह भित्तीचित्रात आहे. याचं महत्व कोणाला न पटलं तरच नवल!
- आभा भागवत
-----------------

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...