इतिहासाच्या हरवलेल्या पानांना शोधावं लागेल......!!
################
मंगळवेढा. दामाजींच्या नावाने ओळखलं जाणारं हे गाव. सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका. संतांची भूमी म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारं गाव. ‘ऊस डोंगा परी रस नहीं डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’...असं म्हणत एक मोठं तत्वज्ञान सांगणाऱ्या चोखोबाचं गाव मंगळवेढा. ‘धरिला पंढरीचा चोर’ असं ठणकाऊन सांगणारी कान्होपात्रा इथलीच. मुस्लीम असूनही कृष्णभक्ती करणारे लतीफबुआ; ही संत मंडळी म्हणजे मंगळवेढ्याचे भूषण.
आजवर मंगळवेढ्यासंबंधी माहित असलेली एवढीच माहिती. पण त्याच्याविषयीची बरीच विस्तृत माहिती माहितच होत नाही.मंगळवेढा नगरी म्हणजे चालुक्य राजघराण्याची राजधानी. बहामनी सत्तेपूर्व ‘मंगल’ नावाच्या राजाने ही राजधानी बनवली त्यावरून त्याला ‘मंगळवेढा’ हे नाव मिळाले असावे. तसेच प्राचीन शिलालेखात ‘मंगलवेष्टक आणि मंगळीवेडे’ असा नामोल्लेख आढळतो. चालुक्य,यादव,बहामनी, आदिलशाही, मुघल व शेवटी सांगलीचे पटवर्धन अशी सत्तांतरे मंगळवेढ्याने पहिली आहेत.
यावरून हे सिद्ध होते की, मंगळवेढा हे अतिप्राचीन शहर आहे व त्याचा इतिहास ही तितकाच जुना आहे. हे सर्व नमूद करण्याचा हेतू हा की अनेकदा मंगळवेढा येथे जाणे होते. मागे सोलापूरच्या इतिहासाविषयी माहिती घेतानाही मंगळवेढ्याला येणे झालेले. हे सर्व पाहत असताना एका गोष्टीने सतत लक्ष वेधून घेतलेले. ती गोष्ट म्हणजे मल्लेवाडी या गावच्या शेजारी माण नदीच्या काठावरील ते दगडी शिळात बांधलेले शंकराचे मंदिर. ज्याला लोक खंडोबा मंदिर असंही म्हणतात. परंतु गाभाऱ्यातील खंडोबा देवाची मूर्ती ही प्राचीन वाटत नाही. उलट आतील अनोखा आकार असलेली पिंड ही मंदिरा इतकीच प्राचीन आहे. येथील पिंड ही आयताकार असून त्यावर दोन लिंग दर्शवले आहेत. अशा रचनांचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचे आहे. कारण नुकतेच कृष्ण तलावात आढळून आलेली पिंड ही ही एका वेगळ्या रचनेचा नमुना म्हणता येईल.
मल्लेवाडी हे माण नदीच्या काठी वसलेले एक छोटे गाव. पण पूर्वी या गावाला मोठी परंपरा असल्याचे काही पुरावे इतिहासात सापडतात. पूर्वीपासून या ठिकाणी व्यायामशाळा व तालीम अस्तित्वात होत्या. या गावात मल्ल मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने या गावाला मल्लेवाडी असे म्हणत असत. अशी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मंगळवेढा हे नगर मुळात चालुक्यांची राजधानी.आठव्या –नवव्या शतकापासून मंगळवेढा नगराचा उल्लेख आढळतो. यावरून आपण समजू शकतो की हे नगर किती प्राचीन आहे. मल्लेवाडी हे महत्त्वाचे ठिकाण राहिलेले असणार आहे. कारण चालुक्य राजे गादीवर बसताना आपल्या नावासोबत “मल्ल’ हे बिरूद जोडत असत. उदा. जगदेकमल्ल, भुवनैकमल्ल इ. यावरून ,मल्लेवाडी हे ठिकाण महत्त्वाचे असले पाहिजे . त्यात ते माण नदीच्या अगदी काठावर वसले आहे.
मल्लेवाडीच्या अन महादेवाच्या प्राचीन मंदिराच्या मध्ये आजचा मंगळवेढा-पंढरपूर रस्ता जातो. सदर मंदिराची बाहेरून रचना ही अत्यंत साधी परंतु वैशिष्ट्यपूर्ण आहे. [ह्या मंदिराबाबतही एक आख्यायिका प्रचलित आहे,की राक्षसांनी एका रात्रीत हे मंदिर बांधून काढले.]आपण जेव्हा मंदिराच्या आवारात प्रवेश करतो तेव्हा दगडी शिळा रचून केलेली तटबंदी दिसते. ती आता फक्त काही प्रमाणातच दिसते. तटबंदी पूर्णत्वाने अस्तित्वात नाही आहे. दोन दगडी गोलाकार खांब प्रवेशाजवळ उभे केले गेले आहेत. आपण आवारात प्रवेश करतो तेव्हा समोर काही शिळा रचलेल्या अवस्थेत दिसतात. तेच मंदिर. मंदिराचे बाह्यांग आता भग्न होण्याच्या मार्गावर आहे.
या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य असं की याचे शिखर [सपाट रचना असलेले] जमिनीवर आहे व मंदिर जमिनीच्या खाली. सदर मंदिराच्या बांधकामात कुठेही चुना किंवा तत्सम शिळाना जोड देणारा पदार्थ वापरला गेलेला नाही. त्यामुळे हा एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल. अखंड मोठ मोठ्या शिळा वापरून या मंदिराची बांधणी केली गेली आहे. [या शिळा मंगळवेढ्यातच असलेल्या मोठ्या दगडी खाणीतून उपलब्ध केल्या गेल्या असल्या पाहिजेत.कारण दूरवरून अशा शिळा मोठ्या प्रमाणत वाहून आणणे खर्चिक व वेळखाऊ ठरण्याची शक्यता जास्त असते.] मंदिराची रचना कोणत्या काळात केली गेली असेल याबाबत कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत. ते शोधता आले तर एक सांस्कृतिक वैभव असलेल्या मंदिराचा इतिहास सर्वापुढे मांडणे शक्य होईल.
काळ्या कातळाच्या शिळात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे व त्याच्या अगदी चिंचोळ्या प्रवेश दारातून सुर्योदयावेळी किरणं सरळ गाभाऱ्यात पोचतात. मंदिरासमोरील दीपमाळही दगडाची असून ती नंतर रचल्या सारखी वाटते. याचं कारण म्हणजे तेथीलच अनेक दगड वापरून त्यासाठी चौथरा रचला गेला आहे. त्यात काही कोरीव कामही आढळतं. ती दीपमाळही आता कलू लागली आहे. प्रवेश व्दाराजवळ दोन्ही बाजूना शिळेवर नाग कोरलेले आहेत. पूर्वी काही ठिकाणांच्या रक्षणाची जबाबदारी नागदेवतांवर सोपवली जात असे अशा आख्यायिका ऐकायला मिळतात. त्याच हेतूने या नागाची शिल्पं तिथं ठेवली गेली असावीत असं वाटतं.
चिंचोळ्या प्रवेशदारातून आपण आत जातो तेव्हा कातळाचा सुखद गारवा जाणवायला लागतो. या मंदिराकडे पूर्वी कुणीच फिरकत नसे. लोक घाबरत तिकडे जायला. कारण या मंदिरापासून जवळच स्मशानभूमी आहे. मंदिरात खांबांची रचना कोरीव असली तरी एकूण काम ओबडधोबडच आहे. कदाचित हे मंदिर ज्या काळात निर्माण केलं गेलं त्यावेळी मंदिरांची रचना करताना कलात्मक वास्तुकलेचा वापर केला जात नसावा. या वास्तू शैलीवरूनही या मंदिराचा निर्मिती काळ शोधता येईल.
मंदिराचा मंडप काहीसा ऐसपैस आहे. गाभाऱ्याकडे तोंड करून उभा राहिल्यावर डाव्या बाजूला एका मोठ्या दगडात कोरलेली गणेश मूर्ती आहे. ती काहीशी विरघळल्यासारखी दिसते. गाभारा हा पूर्व-पश्चिम चिंचोळा व लांब असून मधेच असलेल्या खड्डयासारख्या भागत पिंड बसवलेली आढळते. व त्यापलीकडे उंचावरचा मोठा भाग पूर्णपणे रिकामा आहे. ती जागा रिकामी का ठेवली गेली ? पिंड अशी अधेमध्ये खड्ड्यात का ठेवली गेली ? की पिंडीच्या मूळ स्थानात कुणी बदल केला ? असे काही प्रश्न सहजच पडून जातात. गाभाऱ्याच्या समोरील दोन खांबावर हाताचे पंजे कोरण्यात आले आहेत. ती आशीषासाठी कोरण्यात आले असावेत. छतावरील शिळा आता आपली जागा सोडू पाहत आहेत. काही वर्षात ते मंदिर प्रवेशासाठी सोयीचे राहणार नाही असे वाटते.
मंदिरात प्रवेशाजवळच छतावर दोन तीन आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यात एक घर, हत्ती व एक वनस्पती आहे. तिथेच एक मानवाकृती कोरलेली आहे.पण पाण्यामुळे त्यातील वरील भाग फुटून गेला आहे व फक्त पाय दिसत आहेत. या रचना नंतर काढल्या गेल्या असण्याची शक्यता जास्त आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर या मंदिराच्या रचयित्यांनी कोणत्या हेतूने हे मंदिर बांधले असेल? अनेक राजवटी येऊन गेल्या तेव्हा येथील रचनेत काही फरक पडला असेल का? तटबंदीच्या अवशेषातून तिच्या भक्कमतेची कल्पना येते. हे मंदिर शंकराचे असण्याची शक्यता जास्त आहे. कारण मंगळवेढ्यात शैव संप्रदाय अस्तित्वात होता.बिज्ज्वल हा इथला राजा शैव होता.
नुकत्याच कृष्ण तलावातील सापडलेली शिल्पांत व या मंदिराच्या शिल्पांत साधर्म्य दिसते. खोदकाम पूर्ण होईपर्यंत ठामपणे सांगता येणार नाही. परंतु या प्राचीन मंदिराचा व कृष्ण तळ्यात सापडेल्या अवशेषात निश्चितच संबंध आहे. तिथेही छत जमिनीवर व मंदिर जमिनीखाली असण्याची शक्यता आहे. कृष्ण तलावाच्या अवतीभोवतीही काही तटबंदीच्या खुणा आढळतात.कधीकाळी मंगळवेढा हे किती संपन्न नगर होतं याची साक्ष इथलं हे शिल्प वैभव देतं. नव्याने सापडलेल्या शिल्पासंबंधीचे सत्य खोदकामानंतर स्पष्ट होईल. परंतु इतिहासाची ही हरवलेली पाने मात्र शोधावी लागतील. मुळातच आपण इतिहास, पुरावे , साधनं याबाबत फार निराशावादी असतो. ती झटकून या सांस्कृतिक धरोहरीला जपलं पाहिजे तसेच त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधल्या पाहिजेत. याकामी मा. गोपाळराव देशमुख, मा. आप्पासाहेब पुजारी, मा. आनंद कुंभार यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. मा. गोपाळराव देशमुखांनी या अभ्यासातून ‘मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास’ हे पुस्तक सिद्ध केलं आहे. त्यातून जे राहून गेलं त्यावर आणखी काम व्हायला हवं असं वाटतं.
################
# सदर लेखासाठी पुढील संदर्भ साधने वापरण्यात आली.
१] माणदेश : स्वरूप आणि समस्या -डॉ.इंगोले कृष्णा.माणगंगा प्रकाशन,कमलापूर[सांगोला] [1988]
२] सोलापूर जिल्ह्याचा इतिहास – देशमुख गोपाळराव. रेवू प्रकाशन ,पंढरपूर.[2009]
३] मंगळवेढा ब्रह्मपुरीचा इतिहास – देशमुख गोपाळराव. कौशल्या प्रकाशन, सोलापूर .[2014]
४] मराठी विश्वकोष : खंड 12
#################
फारूक एस. काझी [M.A. (इतिहास) B.Ed.]
नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर
@ फोटोग्राफी: विश्वजित वाघमारे, नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर.