Pages

Wednesday, June 1, 2016

मैत्र जीवांचे

॥ मैत्र जीवांचे…….. तसे पण ........॥
-:श्रीरंग चितळे

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की 'ह्यात जे जे कोण आहेत त्यांनी संपर्क करा'. एक महिन्यात सुमारे ३०-३५ मित्र-मैत्रिणी  ४० वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्स अपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किणकीणायला किंवा खणखणायला लागले. मग “हा कुठे आहे?” “ती कुठे असते?” अशी शोधाशोध पण होत राहिली. हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्ट फोनवर ‘भरायला’ लागला. नंतर त्यांचं एक गेट टुगेदरपण झालं. बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रुपात भेटल्यानी आणि आता पुढेही भेटत राहतील ह्या कल्पनेनी मुलं जास्त एक्सायटेड होती...

एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं "हल्ली मीना कुठे असते?" दुसऱ्या दिवशी रीस्पोंस आला "मीना तिच्या घरीच बेड रिडन आहे. पाच वर्षानपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे विकल होऊन पडलीय. तिला चालता पण येत नाही. नवरा आणि दोन मुलं हेच तिचं सर्व काही करत आहेत." ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा…..

मग चार-पाच मित्र मैत्रीणीत पर्सनल मेसेजेसची देवाण घेवाण झाली. ग्रुपवर मेसेज आला की "आपण मीनाला भेटायला जाऊया". सगळ्यांनी जाणं व्यवहार्य नव्हतं, म्हणून मग मीनाशी फोनवर आगाऊ वेळ ठरवून १०-१२ मित्र-मैत्रिणी तिच्या घरी गेले. तिच्या छोट्या घरात गेल्यावर आपली ही बाल मैत्रीण अशी अंथरुणाला खिळलेली पाहून बराच वेळ सगळे निशब्द होते.....पण हीच कोंडी फोडायची होती !! एकेकांनी तिच्याशी संवाद सुरु केला. तिची चौकशी केली....अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती.....तिचं चेहरा, तिचे डोळे....सगळंच बोलत होतं....मैत्रिणीनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला.....ते आनंदाश्रू होते? का तिला उठून बसता येत नाहीये ह्याचं दुख्ख होतं? हे काही कळत नव्हतं. सगळ्यांचेच डोळे भरून आले. ह्या मित्र-मैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असताना तिच्या नवऱ्यानी आणि मुलांनी खाण्या पिण्याची व्यवस्था केली. ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटणं आणि गहिवरून येणं हे एकदमचं झालं. "कोणी मदतीला नसताना कसं करत असतील हे सगळे इतकी वर्ष? आणि मीनाचं काय?" हे भाव सर्वजण लपवायचा प्रयत्न करत होते. मित्र- मैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले की ह्यातून तिला बाहेर पडायला हवं. त्यांपैकी कोणी न कोणीतरी तिला दर आठवड्यात येउन भेटून जातील, तिच्याशी बोलतील आणि तिला अंथरूणमुक्त व्हायला मदत करतील.

त्या दिवसानंतरची बदललेली मीना ही नवऱ्यानी आणि मुलांनी पाच वर्षांनंतर पहिल्यांदा पहिली होती. तिच्या मनानी आता उभारी घ्यायला सुरुवात केली. "आता ह्यातून बाहेर पडायला पाहिजे" असं तिला "आतून" वाटायला लागलं होतं. ह्यात तिला साथ द्यायला तिचं "मैत्र" होतं !! दिलेल्या शब्दाला जागून मित्र मैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला.

दोन महिने झालेत, ती आता घरातल्या घरत चालायला लागलीय. पंधरा दिवसांपूर्वी मीनानी आपणहून एका मैत्रिणीला फोन करून सांगितलंय की "तुझ्या नविन गाडीतून मला चक्कर मारून आण". मीनाच्या
बरोबर गाडीतून सोबतीला कोणी कोणी जायचं ह्यावरून ग्रुपवर प्रेमळ भांडणं सुरु झालीयत.
……………………..मैत्र जीवांचे, तसे पण !!

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...