Pages

Monday, May 30, 2016

शिक्षण लेख

पालकनीतीमध्ये आलेला शिक्षणशास्त्रlचे अभ्यासक किशोर दरक यांचा हा लेख जरा वेळ काढून जरुर वाचाल.

 ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

 · भाषा शिक्षण
 · शिक्षण
 · शिक्षण - माध्यम

सांस्कृतिक भांडवल आणि पिअर बोर्द्यू
शिक्षण, संस्कृती आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या पुनर्निर्मितीचं भान निर्माण करणार्‍या पिअर बोर्द्यू आणि त्यांची सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना यांची चर्चा करणारा हा लेख.
"The point of my work is to show that culture and education aren’t simply hobbies or minor influences. They are hugely important in the affirmation of differences between groups and social classes and in the reproduction of those differences." - Pierre Bourdieu
“आठाठ वर्षं शाळेत जात असूनही काही मुलं शिकती होत नाहीत”, हा मुद्दा किती प्रमाणात सत्य आहे यावर मतभिन्नता आहे. मात्र हा मुद्दा पूर्णपणे असत्य आहे असं आज देशात कुणीही म्हणू शकत नाही. आर. टी. ई. कायदा लागू झाल्यापासून देशात अनेक राज्यांत गुणवत्ता विकासाचे जे विविध कार्यक्रम चालू आहेत ते सर्व कार्यक्रम सगळी मुलं शिकती करणं हे उद्दिष्ट (किमान कागदोपत्री तरी) समोर ठेवून चालतायत. मुलं शाळेत जातात, किमान एका शाळेत किंवा एका वर्गात तरी एकसमान शिक्षण मिळतं, एकसारख्या सोयी-सुविधा मिळतात तरी मुलं शिक्षणातून एकसारखी किमान गुणवत्ता प्राप्त करताना दिसत नाहीत. असं का होत असावं, याची अनेकविध मानसशास्त्रीय कारणं आहेतच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक कारणं देखील आहेत.
शाळांमधून मिळणारं शिक्षण कुणासाठी फायदेशीर ठरतं, तर कुणासाठी गैरसोयीचं. ते नेमकं कुणाच्या फायद्याचं असतं आणि कुणासाठी नुकसानकारक, त्यातून समाजात समता, सामाजिक न्याय अशी आधुनिक मूल्यं प्रस्थापित होतात की विषमता निर्माण होत राहते, शिक्षणाच्या प्रक्रियेतली सामाजिक जटिलता समजावून कशी घ्यायची, अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांची समाजशास्त्रीय उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या काही नावांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे पिएर बोर्द्यू (Pierre Bourdieu, 1930-2002). गेल्या शतकातील एक महत्त्वाचे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून बोर्द्यू ओळखले जातात. कला, संस्कृती, शिक्षण, भाषा, सार्वजनिक माध्यमं, सामाजिक संरचना, समाजातले सत्तासंबंध अशा अनेक विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून सामाजिक महत्त्वाच्या या विषयांच्या विश्लेषणासाठी नवे सिद्धांत जगापुढे मांडण्याचं महत्त्वाचं काम बोर्द्यू यांनी केलं.
1960 च्या दशकाच्या पूर्वार्धात फ्रान्सध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक वर्गांतील मुलांच्या संपादणुकीतील फरकाविषयी घमासान चर्चा सुरू होत्या. शिक्षणातील संपादणुकीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक-समाजशास्त्रीय साधनं अपुरी पडू लागली होती. बुध्यांकासारख्या (आय. क्यू.) बोधनक्षमतेवर (cognitive ability) आधारित पद्धतीची मर्यादा अधिकाधिक प्रमाणात लक्षात येऊ लागली होती. अशा वेळी बोर्द्यूंनी संख्याशास्त्रीय पृथक्करणाचा आधार घेऊन शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी समाजशास्त्रीय मांडणी केली.
एखाद्या क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक आणि मिळणार्या नफ्याचा वाटा हे एकमेकांशी समानुपाती असतात. ज्याचं भांडवल जास्त त्याचा/तिचा नफ्यातला वाटा जास्त, हा अर्थशास्त्रीय व्यवहारातला ढोबळ सिद्धांत. या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारासांस्कृतिक भांडवलाचा (cultural capital) सिद्धांत बोर्द्यूंनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार औपचारिक शिक्षणातली परिस्थिती समाजातल्या वर्चस्वधारी वर्गातली (dominant class) किंवा उच्च वर्गातील मुलांना समाजातील कनिष्ठ वर्गीय मुलांपेक्षा अधिक फायदा देणारी असते. उच्च वर्गीय मुलं शिक्षणप्रक्रियेत दाखल होतानाच त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा संबंध नसतो. अशा मुलांसाठी घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात सातत्य (continuity) असतं, साम्य असतं. या मुलांची भाषा, सामाजिक आंतरक्रियेची पद्धत, सौंदर्यदृष्टी असे सर्व सांस्कृतिक जडणघडणीचे घटक शाळेच्या संस्कृतीशी मिळतेजुळते असतात. शिक्षणाचा आशय (content) आणि वापरलं जाणारं अध्यापनशास्त्र (pedagogy) या दोन्ही गोष्टी समाजातील वर्चस्वधारी गटातल्या मुलांना परक्या वाटत नाहीत. या उलट कनिष्ठ वर्गीय किंवा कामगार वर्गीय मुलांना शाळेचं वातावरण परकं, विरोधी वाटू लागतं. त्यांच्यामध्ये उपरेपणाची भावना वाढीला लागते आणि ते शालेय प्रक्रियेपासून तुटत जातात, किंवा शालेय प्रक्रियेशी कधी जोडलेच जात नाहीत. त्यांच्या घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात खूप तफावत असते म्हणूनदेखील त्यांची शैक्षणिक संपादणूक कमी प्रतीची असते.
शाळेत येताना प्रत्येक मूल आपल्यासोबत जी संस्कृती - म्हणजे त्याची भाषा, बोलण्या-वागण्याच्या पद्धती, आवडी-नावडीच्या गोष्टी, खाण्या-पिण्याचे प्रकार, गाणी, गोष्टी - घेऊन येतं ते झालं त्याचं सांस्कृतिक भांडवल. शाळा मात्र या भांडवलाबाबत पक्षपाती धोरण अवलंबतात. म्हणजे उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाचा सन्मान राखत त्या मुलांना संस्कृतीसातत्याचा फायदा देतात. त्याचवेळी खालच्या सामाजिक स्तरातील मुलांच्या संस्कृतीला नाकारतात, त्यात सुधारणा सुचवतात किंवा तिचा तिरस्कार करतात. याचाच दुसरा अर्थ उच्चवर्गीयांचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारार्ह म्हणून त्यांना शिक्षणातून नफा मिळवून देणारं ठरतं. हानफा शैक्षणिक यशाच्या स्वरूपात असतो आणि भविष्यात त्याचं रूपांतर आर्थिक यशात होतं. याउलट, कनिष्ठ वर्गाची संस्कृतीच त्यांच्या यशात अडसर ठरते आहे, असं भासवलं जातं. शाळा उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाला महत्त्व देत असल्यामुळे उच्चवर्गीय मुलं पुढील आयुष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसतात. अशा प्रकारे विषमताधारित समाजात शिक्षणातून विषमतेचं पुनरुत्पादन होतं.
सांस्कृतिक भांडवलाची बोर्द्यूंची ही संकल्पना भारतासारख्या बहुविधतेच्या (plurality) देशांना अनेक अर्थांनी उपयुक्त आहे. ही संकल्पना आपण आपल्या शैक्षणिक संदर्भातली काही उदाहरणं घेऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील विषमता बहुआयामी आहे. जात, लिंग, धर्म या तीन आधारांवरची विषमता वर्गीय विषमतेपेक्षा जटिल असल्याचं अभ्यासक मानतात. शाळांचा विचार करता तिथं शिकवला जाणारा आशय सहसा उच्चजात, उच्चवर्ग धार्जिणा असतो.
प्रसिद्ध विचारवंत कांचा आयलया यांनी ‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू’ या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. ब्राम्हणी हिंदू धर्माची चिकित्सा करणार्या या पुस्तकात स्वतःच्या शाळेचा अनुभव सांगताना ते म्हणतात, ... पाठ्यपुस्तकांमधून ज्या कथा सांगितल्या जात असत त्या आम्ही कधीही ऐकलेल्या नव्हत्या. राम आणि कृष्ण यांच्या कथा, रामायण आणि महाभारत ही काव्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वारंवार समोर येत राहिली..... ब्राम्हण आणि वैश्य वगैरे मुलांसाठी या कथा अगदी परिचित, त्यांच्या देवांच्या होत्या..... ही नावं आमच्यासाठी किती परकी होती ते मला अजूनही ठळकपणे आठवतं. कालिदास हे नाव आमच्यासाठी शेक्सपिअर इतकंच परकं होतं. फरक इतकाच की एक नाव तेलगु पाठ्यपुस्तकात असे तर एक इंग्रजी पाठ्यपुस्तकात..... आजतागायत मला कधीही कोणत्याही पाठ्यपुस्तकात एकाही पाठात पोचम्मा, पोतराजु, कट्टमैसम्मा, काटम्माराजु, बिरप्पा अशी आमच्या देवांची नावं आढळली नाहीत.... त्यांच्याविषयी कथाच उपलब्ध नाहीत असं नाही पण पाठ्यपुस्तक लेखकांना ती नावं पुस्तकांत देण्याच्या लायकीची वाटत नाहीत. (संदर्भ: कांचा आयलया, व्हाय आय एम नॉट अ हिंदू, पान 13, साम्या प्रकाशन, कलकत्ता, 1996) शिक्षणाच्या आशयामध्ये अशा प्रकारे उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाचंच प्रतिबिंब पडत राहतं. साहजिकच कनिष्ठ जात किंवा कनिष्ठ वर्गीय मुलं शाळेच्या पहिल्या दिवसापासून मागे पडू लागतात.
सांस्कृतिक भांडवलाची कल्पना केवळ शिक्षणाच्या आशयाचं नियंत्रण करते असं नाही तर शिक्षणाचा एकूण व्यवहार नियंत्रित करते. उदाहरणार्थ, परीक्षा हा शिक्षणाचा गाभा समजला जातो. परीक्षा घ्यायची पद्धत बदलली की शिक्षणाचा सगळा व्यवहार बदलतो कारण अधिकाधिक गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षण, असं आपण मानतो. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत ज्या सार्वत्रिक परीक्षा घेण्यात आल्यात त्यांच्या स्वरूपामुळे पहिल्यांदा पाठांतरावरचा भर कमी झालेला दिसतोय. अर्थात यातून संपादणूक पातळी वाढायला हवी असेल तर अजून बरीच मजल मारायची आहे. पण दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा मुख्यत: पाठांतर या एकमेव कौशल्यावर आधारित असते. भारतीय संदर्भात अशा प्रकारच्या परीक्षादेखील उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाला स्वीकारार्ह मानणार्या आहेत. पुढील उदाहरण हा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत करेल.
अभिजन महाराष्ट्र आजही ज्या एकमेव आईच्या स्मरणरंजनात गुंगतो त्याश्यामची आई या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. आपल्या बालपणाची आठवण सांगतांना पुस्तकाचे लेखक म्हणतात - आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत...... रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे....... वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. .... आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. (संदर्भ: पां.स.साने, श्यामची आई, रात्र सातवी - पत्रावळी,http://saneguruji.net/या संकेतस्थळावर उपलब्ध) स्वतः जातीभेद न मानणारे साने गुरुजीदेखील उच्चजातीतील जन्मामुळे मिळणार्या सांस्कृतिक सवयीजन्य फायद्याचे धनी होते. भारतात कोट्यावधी घरांमध्ये पाठांतराला प्रोत्साहन तर सोडा, पाठांतराचा विचारही नसतो आणि जगण्याच्या संघर्षात तशी उसंतही नसते. अशा घरांतली मुलंदेखील केवळ अफाटपाठांतराधारीत परीक्षा देतात तेव्हा पुढं कोण जाणार हे परीक्षेआधीच ठरलेलं असतं.
सांस्कृतिक सवयी या सांस्कृतिक भांडवालाचा अविभाज्य भाग असतात. देवा-धर्माच्या नावाने लागलेली अर्थ न समजता पाठांतर करण्याची सवय सांस्कृतिक भांडवल बनून अभिजन मुलांचा शैक्षणिक नफा वाढवत राहते. अर्थात् हे योगायोगाने घडत नाही. समाजातले अभिजन घटक आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक भांडवलाला अधिकाधिक स्वीकारार्ह बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लागणारं आर्थिक भांडवलही त्यांच्याकडे असतं, अशा आशयाची मांडणी आपल्या फॉर्मस् ऑफ कपिटल या निबंधात बोर्द्यूंनी केली आहे. अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाला केवळ त्यांचीच मान्यता असते असं नाही तर सांस्कृतिक प्रतीकांवरील (cultural symbols) प्रभुत्त्वामुळे हा वर्ग आपल्या सांस्कृतिक भांडवलाचं श्रेष्ठत्व राज्यकर्त्यांच्या गळी उतरवतो. थोडं दूरचं उदाहरण घेऊन या प्रक्रियेकडे पाहूयात.
1953-54 पासून देशात आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. या शाळांचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व मद्यपान इत्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण, शिस्त व वैयक्तिक आरोग्य यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे असं आहे. (संदर्भ: आश्रमशाळा संहिता, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, पान एक, 2006). आदिवासी मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वीकारार्ह असं काहीही शासनाला दिसत नाही! त्यापासून मुलांना दूर काढून योग्य शिक्षण देणं हा वांशिक शुद्धीकरणाचा (ethnic sanitisation) एक प्रकार आहे. अशी आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळांनी आधीच अभिजनवर्गाचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारलेलं असतं. इतकंच नव्हे तर आदिवासी मुलांचं सांस्कृतिक भांडवल केवळ दुरुस्तीयोग्य मानून किंवा त्याला पूर्णपणे नाकारून या मुलांच्या दाखल होण्याआधीच शाळा त्यांच्या अपयशाची सोय करून ठेवतात. अर्थात् शाळा आदिवासी मुलांसाठी असल्या तरी त्यांची रचना, आखणी, उभारणी आणि कार्य हे सगळं अभिजनांचं वर्चस्व असलेल्या विचारसरणीतून घडत असतं. आदिवासींच्या सांस्कृतिक भांडवलाला संपूर्ण नकार देऊन एका बाजूला प्रतीकात्मक हिंसा (symbolic violence)केली जाते आणि दुसर्या बाजूला अभिजनांच्या संस्कृतीजन्य ज्ञानाला वैध ज्ञानाचा दर्जा देऊन तेच एकमेव प्राप्य (desirable goal) बनवलं जातं. आर्थिक आणि सांस्कृतिक भांडवलाच्या पाठबळामुळं उच्चजात-वर्गीयांच्या किंवा अभिजनांच्या चवीच योग्य आहेत असं बहुजानांसकट सगळा समाज मानू लागतो. आपल्या .... जजमेंट ऑफ टेस्टया ग्रंथात बोर्द्यूंनी त्याचं गंभीर विश्लेषण केलंय.
आपले कपडे, घरांचे रंग, जेवणाच्या चवी, बोलण्याच्या लकबी, कलेची जाणीव, मनोरंजनाचे प्रकार, शिक्षणाचा अर्थ इत्यादी सर्वांमध्ये अभिजनांचं अनुकरण करणं म्हणजे उर्ध्वगमनशील (upwardly mobile) होणं, अशा विचाराला समाजात मान्यता मिळत जाते. जे जे अभिजनांचं ते ते उत्तम आणि दर्जेदार, अशी जाणीव समाजातल्या विविध घटकांमध्ये निर्माण होते. कनिष्ठ जात किंवा वर्गातले लोक देखील अभिजनमान्य तेच योग्य असं अगदी नैसर्गिक सूत्र असल्यासारखं मान्य करू लागतात. अर्थात या सर्व सवयी दर वेळी शाळेतून किंवा औपचारिकरीत्या शिकवल्या जातात असं नाही. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते. या प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त अशी हॅबिटससारखी संबोध चौकट (conceptual framework) देखील बोर्द्यूंनी मांडली.
सांस्कृतिक भांडवलाला गृहीत धरण्याची सवय तर जगभर इतकी मुरलेली आहे की शाळांच्या बाबतीत कोणताही वेगळा विचार अगदी गुलबकावलीच्या फुलासारखा वाटू लागतो. गेल्या वर्षी काही संशोधनाच्या निमित्ताने मी उत्तरेतील एक राज्य, दक्षिणेतील एक राज्य आणि महाराष्ट्रातील काही शाळांना भेटी दिल्या. मुख्यत: सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या आणि अधिकार्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलांच्या असमाधानकारक संपादणुकीचं कारण सांगताना जवळजवळ सगळे शिक्षक आणि अधिकारी ही मुलं गरीब घरांतली आहेत. त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात. काही मुलं हलक्या जातींची आहेत. या मुलांच्या घरचं वातावरण शिक्षणाला पोषक नाहीय. कसं या मुलांना यश मिळणार? अशा आशयाचं बोलत होती. मुलांच्या शैक्षणिक अपयशाचा विचार करताना कुणीही शिक्षक, अधिकारी किंवा इतर प्रौढ शाळेत काही कमतरता असून ती दूर करायला हवी, असा विचारही करताना सहसा दिसत नाहीत. मुलांच्या घरचं वातावरण त्यांच्या शिक्षणाला पोषक नाही कारण ते शाळेसारखं नाही, असं सर्रास सांगितलं जातं. शाळेतलं वातावरण शिक्षणाला पोषक नाही कारण ते घरच्यासारखं नाही असा विचार, अगदी काल्पनिक प्रयोग म्हणूनही कुणी करत नाही. कारण शाळेचं वातावरण हे अभिजनांच्या किंवा भारतात बोलायचं झालं तर उच्चजातींच्या सांस्कृतिक भांडवलाला साजेसं असणार किंवा असायलाच हवं, असं आपण गृहीत धरलेलं आहे.
अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाच्या अशा धाकाचं आणि त्यातून होणार्या विषमतांच्या पुनर्निर्मितीचं सखोल विश्लेषण बोर्द्यूंनी केलं. अर्थात् आधी उल्लेख केल्याप्रमाणे ते केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हे तर तत्त्ववेत्ते, संस्कृतीचे उत्तम अभ्यासक होते. सत्तर वर्षांच्या अत्यंत उत्पादक आयुष्यात अभिजनांची कलेची चव, भाषेतील प्रतीकात्मकता, सौंदर्यदृष्टीवर आधारित सामाजिक स्तरीकरण, समाजातील संरचना आणि सत्तासंबंध, माध्यमं आणि सांस्कृतिक उत्पादनं अशा विविध विषयांचा सखोल आणि मूलभूत अभ्यास त्यांनी केला. तीसहून अधिक ग्रंथ लिहिले - Distinction: - Social Critique of the Judgment of Taste (1984), The Logic of Practice (1990), Homo academicus (1990), Language and Symbolic Power (1991), The Love of art: European art Museums and Their Public (1991), State Nobility: Elite Schools in the Field of Power (1998), On Television (1999) हे त्यातील काही प्रमुख ग्रंथ. (वरील यादीतील पुस्तकांचे साल हे त्यांच्या इंग्रजीतील प्रकाशनांचे आहेत. त्यांनी त्यांचं लेखन त्यांच्या शिक्षणाच्या भाषेतून म्हणजे फ्रेंच भाषेतून केलं होतं.)
भारतामध्ये गेलं दशकभर सरकारी शाळांतील म्हणजे गरीब, दलित, बहुजन, अल्पसंख्य वर्गातील मुलांच्या शैक्षणिक संपादणुकीचा प्रश्न मोठ्ठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. मुलांच्या घरचं अशैक्षणिक वातावरण जबाबदार असल्याचं सांगून शिक्षक आणि व्यवस्था या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायात. दुसर्या बाजूला केवळ आकडेवारीचा विचार न करणारे काही संवेदनशील अभ्यासक performance of government school children is same (or comparable) as that of private school children, when family background is controlled अशी मांडणी करतात. विश्लेषणाचे मार्ग भिन्न असले तरी शिक्षक आणि अभ्यासक हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे बहुजन मुलांच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांतून फारशी किंमत दिली जात नसल्याचंच सांगत असतात.
मुलांचं शाळेतलं शिक्षण आणि संपादणूक पातळी केवळ शाळेतल्या प्रक्रियांवर अवलंबून नसतात तर या प्रक्रिया मुलांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल किती संवेदनशील आहेत, यावर देखील अवलंबून असतात. सांस्कृतिक भांडवलाचा विचार मांडून, त्याचा संपादणुकीशी संबंध दाखवून पिएर बोर्द्यूंनी जगाला चाळीसेक वर्षांपूर्वीच सावध केलंय. अशा जायंटच्या खांद्यावर उभं राहून आपल्या शैक्षणिक समस्येच्या मुळाला हात घालायचा की अल्पजीवी, अल्पकालीन, अल्पखर्चाच्या उपाययोजना करून अल्पसमाधानालाच उत्तुंग यश मानायचं, हे भारतासारख्या देशांनी ठरवायची वेळ उलटत चालली आहे.
******
लेखक परिचय: किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे.
Email :kishore_darak@yahoo.com

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...