Pages

Monday, August 7, 2017

गाढवावरचं पुस्तकालय

आज रोज युध्दाची भाषा बोलली जाते. सत्तासंघर्ष अटळ असला तरी या संघर्षाचे बळी ठरतात ती लहान मुलं. जपानमधील वेदनादायी कथा याचं मूर्तीमंत उदाहरण.
हे जरी खरं असलं तरी मुलांसाठी सतत कष्टणारे लोकही या विश्वात आहेत. त्यांना कुणी हिरो समजत नाही.कारण ती लहानासाठी काम करतात. अशाच एका लुइसची कथा. पुस्तकं वाटून त्यानं मुलांना आनंद तर दिलाच सोबत स्वप्नंही दिली.
दि. ०५/०८/२०१७ रविवारी #नवा_काळ मधून प्रकाशित झालेली ही कथा.
शुक्रिया -अरविंद गुप्ता सर
Vaibhav Chalke भाई
...................................................
           #गाढवावरचं_पुस्तकालय.
                                       
  लेखक : जेनिट विंटर                                            हिंदी अनुवाद : अरविंद गुप्ता                                                                  मराठी अनुवाद : फारूक एस.काझी
 farukskazi82@gmail.com
9921380966
.............................................
कोलंबियाच्या दाट जंगलात एक माणूस राहायचा.
लुईस त्याचं नाव.
त्याला पुस्तकं फार आवडायची.

एक पुस्तक वाचून झालं की तो नवीन पुस्तक घेऊन यायचा.
हळूहळू त्याचं घर पुस्तकाने भरून गेलं.
त्याची बायको डायना त्याच्यावर खूप चिढायची.

ती नेहमी चिढून त्याला एकच प्रश्न विचारायची.
“कशाला आणता ही पुस्तकं ? एवढ्या पुस्तकांचं काय करायचं? भाताबरोबर खायचंय का त्यांना ?”
यावर लुईस शांत राहायचा. काहीच बोलायचा नाही.

लुईसला मोठा प्रश्न पडला होता. पुस्तकांचं काय करायचं?
विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली.
“मी ही पुस्तकं डोंगरा पलीकडच्या लोकांसाठी घेऊन जाईन. ज्यांच्याजवळ पुस्तकं नाहीत त्यांना देईन.
दोन गाढवं विकत घेईन. एकावर पुस्तकं ठेवीन आणि दुसऱ्यावर मी बसेन.”

लुईसने दोन धष्टपुष्ट गाढवं विकत घेतली.
त्यांची नावं होती ......अल्फा आणि बीटा.

गाढवाच्या पाठीवर पुस्तके ठेवण्यासाठी त्याने एक क्रेट बनवलं.
आणि त्यावर एक बोर्ड लावला.
‘गाढवावरचं पुस्तकालय’.
डायनाने क्रेटमध्ये पुस्तकं भरली.

दर आठवड्याला लुईस ,अल्फा आणि बीटाला घेऊन दूरवरच्या डोंगर –दऱ्यांतील गावांचा दौरा करायचा.
लोकांना , मुलांना वाचायला पुस्तकं द्यायचा.

या आठवड्यात तो इल-टोरोमेंटो या गावी जाणार होता.
प्रवासात उन्हाचा तडाखा वाढल्यावर तिघांनी ओढ्याकाठी बैठक मारली.
आराम केला. ओढ्याचं पाणी प्याले. फ्रेश होऊन जायला निघाले.
पण बीटा काही केल्या पुढे जायला तयार होईना.
बीटाच्या पाठीवर पुस्तकं होती.
तो नाही आला तर मुलांना काय वाटणार ?
‘बीटा ,हे बघ मुलं आपली वाट पाहत असतील. तू नाही आलास तर त्यांना पुस्तकं कशी देणार?”
असं म्हणताच बीटा ओढा पार करून लुईसबरोबर चालायला लागला.

डोंगरावर चढताच पुढचा रस्ता एकदम निर्जन होता.
आसपास कुणीच नव्हतं. अंधार पडू लागला होता.
पाखरांचा आवाज फक्त ऐकू येत होता.
इतक्यात त्या गुडुप्प अंधारातून एक डाकू समोर येऊन उभा राहिला.
लुईस घाबरून विनंती करू लागला.
‘कृपा करा. आम्हाला जाऊ दया.मुलं आमची वाट बघत असतील.”
लुईसजवळ पुस्तकं पाहून डाकू चिढला.
त्याने एक पुस्तक  काढून घेतलं आणि दरडावून सांगितलं.
“लक्षात ठेव पुढच्या वेळी मला चांदी पाहिजे.”

डाकू जाताच ते चालतं बोलतं पुस्तकालय पुढं सरकलं.
डोंगर पार करत चालू लागलं.
शेवटी लुईसला घरं दिसली.
इल-टोरमेंटो ची मुलं लुईसकडे धावतच आली.
पुस्तकं देण्याआधी लुईस नेहमी  एक गोष्ट सांगायचा.
“आज मी तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय.” असं म्हणून त्याने पुस्तकांच्या गठ्ठ्यामागून मुखवट्यांचं एक बंडल बाहेर काढलं.  ते मुखवटे लहान प्राण्यांचे होते.
मुलांना त्याने ते वाटले. मुलं खुश झाली.
“आता तुम्ही आपापले मुखवटे घाला. मी तुम्हाला प्राण्यांची एक गोष्ट सांगणार आहे.”

लुईसने मुलांना गोष्ट सांगितली.
गोष्ट संपताच मुलांनी आपल्या आवडीचं पुस्तकं निवडून घेतली.
लुईसचा निरोप घेऊन मुलं घराकडे निघून गेली.
जाताना पुस्तक त्यांनी आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं.
लुईस,अल्फा आणि बीटा डोंगर दऱ्या पार करत घरी परत आले.
घरी परतताना त्यांना सर्व जंगल,टेकड्या पार कराव्या लागल्या.

घरी परतताच लुईसने आपल्या भुकेल्या गाढवांना चारा टाकला. डायनाने आपल्या उपाशी नवऱ्याला खाऊ घातलं.
थकलेला असतानाही लुईस लवकर न झोपता एक पुस्तक घेऊन वाचत बसला. रात्री उशिरापर्यंत तो  वाचत बसलेला असतो.
आणि नेमकं त्याचवेळी दूरच्या एका डोंगरावरील घरातही मेणबत्त्या अन कंदिलं जळत होती.
तिथंही मुलं पुस्तकालयातून घेतलेली पुस्तकं वाचत बसली होती.अगदी अर्धी रात्र उलटून गेली तरी.
...................................................
(लुईस सोरयीआना याची ही खरी खुरी कथा. कोलम्बियामधील ला- ग्लोरिया इथला राहणारा. त्याने या पुस्तकालयाची सुरवात ७० पुस्तकांनी केली. आता त्याच्याजवळ ४८०० पुस्तके आहेत.)

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...