Pages

Sunday, July 10, 2016

शाळा

शाळा...!!!!!

अमोल परब

आज सकाळी बाल्कनीमध्ये उभा होतो.सहज म्हणून समोरच्या देशपांडेंच्या घरात लक्ष्य गेल.आज त्याच्या घरात बरीच गडबड ऐकू येत होती. काय तर म्हणे छोट्या प्रथमेशचा आज शाळेचा पहिला दिवस होता. घरात त्याच्याच तयारीची लगबग चालु असताना प्रथमेश मात्र अगदी तयार होउन दारात उभा होता. त्या दोन -सव्वा दोन फ़ुटी देहाची भारी गंमत चाललेली दिसत होती. निळ्या रंगाची हाफ़ पॆंट, सफ़ेद रंगाचा शर्ट,शर्टाच्या खिशाला अडकवलेला गुलाबी रुमाल,कोरे करकरीत बूट,ह्या वयात पाठीमागे उगाचच अडकवलेले दफ़्तर, गळ्यात डौलात डोलणारी नाजूक वॊटरबॊटल, आणि ह्या सगळ्यांच्या सोबतीला आता ह्याने एव्हढा रेनकोट घातलाच आहे मग आपणही थोड तरी का होईना बरसलं पहिजे अश्या अर्विभावात आलेला पाउस.सगळं कसं मस्त जुळून आल्यासारखं वाटत होतं.
थोड्याच वेळात आजीचा हात पकडुन पाठीमागे उभ्या असलेल्या आईला जोर-जोरात टाटा करुन स्वारी अगदी खुशीत मोहिमेवर निघाली. ह्या इवल्याश्या प्रथमेशला शाळेत जाताना पाहुन मला ही माझा शाळेतला पहिला दिवस आठवला मी ही असाच खुश होतो. नवीन नवीन ड्रेस,छान छान बूट,पहिल्यांदाच मिळालेले दफ़्तर,सुंदरशी वॊटरबॆग आणि वर सगळ्यांनी आपलं केलेल कौतुक. फ़ार मस्त फ़िलींग होत ते.आईचा हात पकडून शाळॆत जाताना फ़ार मजा येत होती.पण माझा हा उत्साह शाळेच्या गेटवर आईने हात सोडल्या सोडल्या धारातीर्थी पडला.सभ्य भाषेत सागांयच तर "गळपटलान"......
मग काय विचारता ही रडारड नुसती......तिथे माझ्यासारखे बरेच समदुखी: होते.घरी मी मस्ती केली की बुआ येइल आणि त्याच्या घरी घेउन जाइल ही आजीची धमकी आता खरी वाटायला लागली....ही जागा एकदम वाईट आहे हे माझ एकमत झालं पण ते जास्त दिवस टिकलं नाही. ती जागा, तिथल्या बाई, त्यांनी शिकवलेली गाणी, सांगितलेल्या गोष्टींमध्ये मन रमायला लागलं, रोजच्याच सवयीच्या पण नवीन नवीन गोष्टी शिकताना मजा येउ लागली. ही जागा वाटली होती तितकी काही वाईट नाही अस मन हळुहळु मला समजावू लागलं.

माझ्या प्रथमदर्शी अंदाजानुसार शाळा वाटत होती तेव्हढी काही त्रासदायक नव्हती. हो...फ़क्त सकाळी लवकर उठायचा तेव्हढाच काय तो एक त्रास होता. शाळेत आम्हाला तसं काही विशेष काम नसायची. तशी नाही म्हणायला काही न टाळता येण्यासारखी काही कामे होतीच त्यातल एक महत्त्वाचे काम म्हणजे दररोज शाळेत येणे. शाळेत सर्वप्रथम व्हायची ती प्रार्थना त्यानंतर राष्ट्रगीत पुढे पुढे ही सकाळची प्रार्थना आणि राष्ट्रगीत हे दिवसाचे अविभाज्य घटक बनून गेले.नंतर थॊडावेळ आभ्यास चालायचा. तो आभ्यास म्हणजे तरी काय तर शिकता शिकता खेळणे आणि खेळता खेळता शिकणे. ह्यात सुरुवातीला शिकण्यापेक्षा खेळण्याचाच शेअर जास्त होता.
शाळेत शिकवणार्‍या बाई ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसुन आपलीच कुणीतरी मावशी ,आत्या किंवा काकी आहे फ़क्त सगळ्या मुलांनी तिला वेगवेगळ्या नावांनी हाक मारल्यावर तिने गोंधळून जाउ नये म्हणून तिला "बाई" अशी हाक मारायची हा (गैर) समज माझा बरीच वर्ष म्हणजे बाईंची मॆड्म होईपर्यंत कायम होता.
दिवसामागुन दिवस जात होते. मस्तीची जागा हळुहळु आभ्यासाने घ्यायला सुरु केली.
"अ" रे अननसातला........."आ" रे आगगाडीतला..........
सुरात म्हणताना आमची मुळाक्षरांची गाडी आता हळुहळु रुळावर येउ लागली होती. अंकलिपीच्या मदतीने छोटी छोटी वाक्य म्हणायला फ़ार मजा यायची
"अमर इकडे ये"
"कमल पाणी घे"
"वैभव वैरण घाल"
अशी वाक्य म्हणता म्हणता एकेदिवशी अतिशहाणपणाने "बाबा चपला आण" म्हटल्यावर मिळालेला धपाटा आज ही लक्ष्यात आहे. त्यावेळेस आपल नक्की काय चुकलं होत हे समजायचे ते वयच नव्हते. ती समज पुढे शाळेनेच दिली

एव्हाना आमचं आयुष्यातलं पहिलं वहिलं प्रमोशन झालं होतं. म्हणजे आम्हाला शिशु-वर्गातून पहिलीला बढती मिळाली होती. पण एक गोची झाली होती. ती म्हणजे,आजवर एकाच पुस्तकात सख्या भावंडासारखे गुण्यागोविंदाने रहाणारे सारे विषय, एखाद्या हिंदी चित्रपटाच्या स्टोरीसारखं अचानक प्रत्येकाने आपापला वेगळा संसार थाटावा तसे आपापली सेपरेट पुस्तक घेउन आले होते. मी तर जाम बावचळून गेलो होतो. पण आम्हाला शिकवणार्‍या शिक्षकानां मात्र ह्या गोष्टीचं कसलचं टेन्शन नव्हतं. खरंतर त्यांना हे सगळे विषय एकसाथ एकत्र कसे काय येतात हाच त्यावेळी माझ्यासाठी एक आभ्यासाचा विषय होता. पण तरीही एकूण हा सारा प्रकार सुखावणारा होता. आम्हाला मात्र अचानक एकदम मोठं झाल्याचा फ़िल येउ लागला. पण या नविन फ़िलींगसोबत एका नवीन संकटाचीही वर्दी मिळाली आणि हे संकट तात्पुरतं नसून,आता ह्या शाळेत असे पर्यंत आपल्याला ह्या संकटाशी सामना करावा लागणार आहे हे ही कळून चुकलं. मोठी माणसं ह्याला "परिक्षा" म्हणायचे.
शाळेतली परिक्षा आणि नाक्यावरची रिक्षा ह्याचा काहीतरी संबध नक्की असावा असं मला नेहमीच वाटायचं. निदान परिक्षेला जाताना तरी नेहमी रिक्षाने जायलाच पहिजे अशी त्यावेळी माझी ठाम समजूत होती. पण माझ्या आणि त्या रिक्षावाल्याच्या दुर्दैवाने मी अनेकदा समजावून माझ्या आईची तशी काही समजूत झाली नाही तेव्हाच मला कळले की ही काही माझ्या इतकी समजूतदार नाही....असो......

शैक्षणिक आभ्यासासोबत आमची सामाजीक आणि सांस्कृतीक जडणघडणही फ़ार जोमाने होत होती. १५ ऒगस्ट, २६ जानेवारी ह्यादिवशी होणारे ध्वजवंदन, परेड, मुख्याध्यापक सरांच भाषण, देशभक्तीपर गीते, आमच्यापैकीच कुणीतरी गांधी, कुणी पंडितजी तर कुणी सरोजीनी नायडू बनलेले असायचे. ह्या सगळ्या गोष्टीनी सारं वातावरण कसं भारावलेले असायाचे. आषाढी एकादशीला न चुकता पालखी निघायची. मिरवणुकीच्या लेझिम पथकापुढे झेंडे नाचावायला आमच्यात फ़ार चढाओढ लागायची. कृष्ण-जन्माष्टमी, सरस्वती पुजन हे सण आमच्या शाळेत साजरे व्हायचे. रक्षाबंधनला मैत्रीणीकडुन तेही स्व:ताहून बांधुन घेतलेल्या राख्यांनी भरलेला हात मिरवताना आज आठवला की खुप हसु येतं. डिसेंबर महिना उजाडला की सगळ्या शाळेला वेध लागायचे ते सहलीचे.
आजही आठवत की मला सहलीच्या आदल्या रा्त्री कधीही झोप लागयची नाही. कारण सहलीच्या दिवशी हमखास न चुकता मला शाळेत पोहचायला अंमळसा उशीर झालाय आणि सहलीची बस मला एकट्याला टाकून निघून गेली आहे अशी काही बाही तेव्हा स्वप्न पडायची. एकतर सहलीची तयारी मध्यरात्रीपर्यंत चाललेली असायची त्यात परत पहाटे पहाटे पडललेली स्वप्ने खरी होतात असं कुणीतरी सांगितलेले लक्ष्यात असायचे.....उगाच आपल्याला ते दळभर्दी स्वप्नं नेमक तेव्हाच पडलं तर काय घ्या......त्यापेक्षा न झोपणं हा ह्या प्रोब्लेमवरचा तत्कालीन एकमेव उतारा होता....
सहलीची ठिकाणंही ठरलेली होती......एक तर राणीची बाग , नाहीतर छोटा काश्मीर अगदीच लांब जायचं तर म्हातारीचा बूट......त्या म्हातारीच्या बूटाला पाहून एव्हढा मोठा बूट घालणारी ती म्हातारी नक्की रहाते तरी कुठे हे माझ आजतागायत न सुटलेलं कोडं आहे.वर्षाच्या शेवटच्या सत्रांत येणारे स्नेह-संमेल्लन म्हटलं की आमच्या दृष्टीने एक पर्वणीच असायची. शाळेतले शिक्षक आमचा नाच तसेच आमची गाणी पोवाडे बसवायचे फ़ार फ़ार मज्जा यायची. आजवर आम्हाला आपल्या छडीच्या तालावर नाचवणारे आमचे शिक्षक चित्रपट संगीतावर आमचा नाच बसवताना पहाताना आम्हाला नवल वाटायचं. एकदम M.P.D. चीच केस वाटायची. स्नेह-संमेल्लनाच्या दिवशी आपला कार्यक्रम स्टेजवर चालु असताना नजर मात्र प्रेक्षकांमध्ये आपल्याकडचं कुणी आलयं का? ह्याचा शोध घेत असायची आणि शोधता शोधता आपल्याला हवं ते माणूस गवसलं की आपल्या नजरेतलं उत्साह त्यांच्या नजरेतल्या कौतुकाला भेटुन यायचा. सरते शेवटी यायची ती परिक्षा....आता तिची पुर्वीसारखी एव्हढी भिती नाही वाटायची.आपण बरं आणी आपला आभ्यास बरा हा आजोबांनी सांगितलेला मंत्र लक्ष्यात ठेवला की ती ही फ़ार कटकट करायची नाही. थोडक्यात काय..तर अगदी मस्त चाललं होतं आमचं!!!!!

पहिली ते चौथी हा प्रवास तसा निवांत होता. पण एखाद्याची शाळा घेणं म्हणजे नेमकं काय हे मात्र पाचवीला कळलं माणुस जन्माला आल्यावर त्याच्या पाचवीला एव्हढ का महत्त्व देतात हे एकदातरी पाचवीला गेल्याशिवाय नाही कळणार. तसं बघायला गेलं तर फ़ारसं काही बदललं नव्हतं..पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र बदलली होती. आजवर सगळ्या विषयांसाठी एकच शिक्षक अशी साधी सोप्पी सवय होती. पण इथे तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक होते. आता तर माझ्यासोबत विषयांचीही काही खैर नव्हती.
भाषा, गणित, विज्ञान, इतिहास आणि भुगोल ह्या पांडवामध्ये आता "इंग्रजी" नावाच्या अजुन एका भांवडाची भर पडली होती. हा नक्कीच कर्ण असावा. कारण सगळे पांडव जरी एकापेक्षा एक भारी असले तरी ह्याचा दरारा जबरदस्त होता. "शिकणारा एक और शिकवणारे सहा......बहुत नाइंसाफ़ी है रे" अश्या असामाईक समीकरणाचा प्रश्न गब्बरला बहुदा सर्वप्रथम पाचवीलाच पडला असणार...............
इंग्रजी या विषयाचे सगळंच काही तर्हेवाईक होतं. आपलं मराठीत बरं असतं कुठलही अक्षराला वयाची मर्यादा नाही पण इथे लहान असतानाचा "a" वेगळा आणि तोच "A" जेव्हा मोठा होतो तेव्हा वेगळा. बरं पुन्हा सगळं इथवरच थांबलं असतं तोवर ठिक होत. पुन्हा त्यात कर्सु रायटिंग हा एक अजब प्रकार होता. बहुतेक ज्यांना डॊक्टर किंवा मेडिकलवाला व्हायचं आहे अश्या मुलांचा इन्टरेस्ट लक्ष्यात घेउनच ह्याचा शोध लावण्यात आला असावा ह्यावर माझं लवकरच शिक्का मोर्तब झालं. तसं नाही म्हणायला मी ही ह्याच्या वाटेला कधीतरी जाउन आलो होतो. अगदी उलट्या हाताने देखिल लिहुन पाहिलं तरी आमचा कर्सु काही सरळ येईना. तेव्हा कळलं की ही अगदी माझ्या हाताबाहेरची केस होती. प्रत्येक विषय आता स्वत:चा मोठेपणा पुढे पुढे करु पहात असताना मी मात्र वर्गात एक एक बेंच मागे सरकत होतो.........
अरे हो बेंचवरुन आठवलं.. शाळेत सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला गॆल्मर असेल तर ते म्हणजे शेवट्च्या बेंचला...ह्या बेंचची गोष्टच वेगळी होती. तशी वर्गातली पुढची बाके ह्याच्या वाटेला सहसा कधी जात नसत.
पुढची बाके आभ्यासात हुशार, तर ही दुनियादारीत.
पुढची बाके एक्कलकोंडी, तर ही सदा गर्दीचा सेंटरपोंईट,
पुढची बाके टिचररुममध्ये फ़ेमस, तर हा टिचररुमचा चर्चेचा विषय.
पुढच्या बाकांवर शिक्षकांचे विषेश लक्ष्य, तर ह्याच्यावर बारीक नजर
पुढची बाके आपल्या अक्कल हुशारीने ह्याच्यांकडे जाणूनबुजून जरी दुर्लक्ष्य करत असले तरी त्या बिचार्‍यानां माहित नव्हते की त्यांची हुशारीचे कौतुक ह्यांच्या शर्यतीत भाग न घेण्याच्या आळशीपणावर अवलबूंन होते. पण हे सारे बेंच कसेही असले तरी त्यावेळी ते त्यावर बसणार्याची प्राईव्हेट प्रोर्प्रर्टी होते. बरं ही एव्हढी प्रोर्प्रर्टी त्यावेळी नुसती त्यावर करकटकने आपलं नाव कोरुन आपल्या नावावर करता येत होती. वर बसायच्या जागेवर मधोमध आपल दफ़्तर टाकलं कि झाली आपली टेरीटरी मार्क्ड. खरचं किती सोप्प होतं आयुष्य तेव्हा...........

जस जस शाळेचे वय वाढु लागलं तसं तसं
भाषेतल्या गोष्टी अजून मोठ्या होत गेल्या. गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली. विज्ञान स्वत:सोबत माझ्यावरही वेगवेगळे प्रयोग करत होता. इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली
होती, भुगोल स्व:ताचा देश सोडुन एखाद्या N.R.I सारखा इतर देशांचे गोडवे गाण्यात धन्यता मानु लागला होता. नागरीकशास्त्राने आपल्याला आपल्या आकारमानामुळे कुणीच भाव देत नसल्याचे लक्ष्यात येताच त्यानेही आता अर्थशास्त्राला सोबतीला घेउन आम्हाला जेरीला आणण्याचा जणू विडा उचलला होता. पण आम्हीही आमच्या कुवतीनुसार ह्या सगळ्या स्वार्‍यानां मोठ्या हिमतीने तोंड देत होतो. ज्यांची हिंमत तुटायची असे आमच्यातले काही शूरवीर मग गनिमी काव्याचा वापर करायचे...
आता हा गनिमी कावा म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळ सांगयाला नको.............
सातवीनंतर शाळा थोडी बिनदास्त बनू लागली. आतापर्यंत अगदी आखीव रेखीव असणार्‍या केसांच्या परंपरेत हळुच एक कोंबडा किंवा एक बट भुरभुरु लागली. शर्टाची कॊलर पुढनं खाली आणी मागनं उभी राहु लागली. बोलण्यात इतरांना ऐकायला जड जातील असे शब्द येऊ लागले. आजवर एकटे एकटे फ़िरायचो आता फ़िरताना खांद्यावर एक हात कायम असायला लागला. गप्पांचे विषय बदलले. जे इतर कुठे बोलता यायचे नाही ते गुपीत सांगायला एक विश्वासाचा कान मिळाला. राडा झाल्यावर आपल्या बाजुने घुमणारा आवाज मिळाला.शाळेत आजवर ओळखी तर होत्या,पण आता एक सोबतीही मिळाला. आजवर सगळी नाती समजली पण दोस्तीची खरी ओळख ही शाळेनेच करुन दिली. खरी मैत्री म्हणजे काय हे शाळेशिवाय नाही कळणार. मैत्री नंतरही भरपूर झाल्या. काहीशी आवडी जुळल्या तर कुणाशी व्यवहार, पण बिनमतलबी मैत्री ही फ़क्त शाळेतच झाली. बाकिच्या ठिकाणी फ़क्त मेंदुच जुळला मन फ़ार क्वचित जुळली.....काय पटतयं ना...!!!

बघता बघता शाळा मॆच्युअर्ड होउ लागली. आजवर अंगात असलेल्या सुप्तगुणांना शाळेने व्यासपीठ दिला. मला आजही आठवतयं पहिल्यांदाच भाषणासाठी व्यासपीठावर उभं रहाताना समोरचा श्रोतावर्ग पाहुन हातापायाला कापरं भरलं होतं. तेव्हा कोपर्‍यात उभे असलेल्या मराठीच्या सरांकडे नजर जाताच त्यांनी डोळ्यांनी "मी आहे इथे तु घाबरु नकोस" असा विश्वास दिला. मी अख्खच्या अख्ख भाषण त्यांना पाहुन ठोकलं. बक्षिस मिळालं नाही ह्याची काडिमात्रही खंत नाही, पण त्यानी मला मी बोलु शकतो हा जो विश्वास दिला तो आज प्रत्येक ठिकाणी कामी येतो. आम्हाला शिकवणार्‍या शिक्षकांची शिकवतानाची धडपड पाहुन आम्हालाही शिकण्याचा हुरुप येत होता. शाळेतली टिचररुम ही बाजारात मिळणार्‍या कुठल्याही गाईड किंवा अपेक्षितपेक्षा जास्त परिणामकारक वाटु लागली.
शाळेतल्या शेवटच्या वर्षाला शिक्षकदिनानिमित्त आम्हाला एकदा एका दिवसासाठी शाळा चालवायला दिली होती. सुरुवातीला उत्साहाने उचलेली हि जबाबदारी उत्तरोत्तर डोईजड वाटु लागली तेव्हा जाणवलं की आजवर शिक्षकांनी आम्हाला किती नाजुकपणे सांभाळल होतं..फार काळजीपूर्वक घडवलं होतं.......मातृदेवो भव: पितृदेवो भव: बरोबर गुरुदेवो भव: का म्हणायचं हे त्यावेळेस उमगलं. घराबाहेर आमचे पालकांच्या भुमिकेत असलेले हे शिक्षक वेळेला आमच्या त्या अडनड्या वयात आमच्या समजुतदार मित्रांची भुमिकाही चोख पार पाडत असत. आजवर शिक्षकांच्या बाबतीतली असलेल्या भितीची जागा आता त्यांच्याविषयीच्या आदरांने घेतली होती. सुरुवातीपासुन आभ्यासाप्रती असलेल्या नाइलाजाची जागा आता आवड घेउ लागली. भाषा, गणित, विज्ञान आणि इतर सारे विषय आता आपले संवगडी वाटु लागले होते. तर परिक्षा एक खोडकर मैत्रीण...दहावी नावाच्या शेवटच्या वर्षाचा घरच्यांनी दाखवलेला बागुलबुआही आम्हाला कधी घाबरवू शकला नाही कारण शाळेतल्या शिक्षकरुपी देवापुढे त्यांची मजल नाही ह्याची आम्हाला खात्री होती...

सगळं कसं अगदी व्यवस्थीत चालु असताना नेमका तो दिवस आला.....
"सॆंड-ऒफ़"
इतके दिवस ह्या दिवसाच आकर्षण होते......आणि आज तो नेमका उजाडला..........
त्यादिवशी कुणालाही गणवेषाची बंधन नव्हतं प्रत्येकजण आपल्याला आवडेल अश्या पेहरावात आले होते. मुलं शर्ट किंवा त्यावेळची अल्टीमेट फ़ॆशन म्हणजे टी-शर्ट. त्यावेळी त्याखाली घालण्यासाठी जीन्सशिवाय कुणालाच काही पर्याय नव्हता. मुली मात्र पंजाबी सूट आणि साड्यांमध्ये आल्या होत्या.इतके दिवस अजिबात लक्ष्यात न आलेली गोष्ट म्हणजे खरंच आजवर आमच्या आजुबाजूला वावरणार्‍या ज्यांना आम्ही साळकाया- म्हाळकाया म्हणून चिडवायचो. त्या आज खंरच मोठ्या झाल्या होत्या. मुख्याध्यापकांचे भाषण झाले, नंतर शिक्षकांचेही मनोबल वाढवणारे चार शब्द सांगुन झाले, आपण आणि आपली शाळा ह्याच्यावर पुढल्या बाकांचे धडाधड एक दोन निबंधही बोलुन झाले. नंतर एक छोटीशी पार्टी.....मग बराचसा धांगडधिंगा करण्यात वेळेचे भानच राहिलं नाही. वेळ संपल्याची जाणिव झाली ती मुलींच्या रडण्याने.दोन मुंग्यानी कसं एकामेकांनच्या समोर आल्यावर मुमु..मु.....मु.....केलेच पाहिजे तश्या आविर्भावत कुठल्याही दोन मुली समोरासमोर आल्यावर रडत होत्या. इतक्यावेळच्या जुही चावला आणि करिष्मा कपूर अचानक आशा काळे व अलका कुबल वाटु लागल्या. आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. थोडावेळ टाईम-पास करुन आम्हीही शेवटची चार डोकी पांगायला लागलो.....शाळेच्या गेटवर येउन. "चल बाय उद्या भेटु........." बोलल्यावर लगेच्च बोलण्यातली चुक उमगली.

उद्या भेटु??????

पण कुठे, कधी, कशाला, कुणाला........सणकन डोक्यात घंटा वाजली.......अरेच्च्या शाळा तर सुटली.
आता सकाळची प्रार्थना नाही......राष्ट्रगीत, प्रतिज्ञा नाही.......
वर्गातला आपला बेंच नाही......ऒफ़ पिरीयडचा दंगा नाही......
किती गोंधळ घालता म्हणून शिक्षंकांचा ओरडा नाही......
वर्गाबाहेर शिक्षा म्हणून ओणवं उभ रहाताना एकामेंकाना धक्के मारणं नाही
राष्ट्रदिनाला कडक गणवेषात मारली जाणारी परेड नाही............
मधल्या सुट्टीत एकाच वडापावची तिघांमध्ये वाटणी नाही....
भैय्याला मस्कामारुन नंतर नंतर फ़ुकटची हुल देउन फ़क्त शाळेबाहेरच मिळणारी एक्स्ट्रा मसाला मारलेली काकडी किंवा पेरुची फ़ोड नाही............
पी.टी ची कवायत, वार्षीक स्नेह- संम्मेलन ,त्या गृहपाठाच्या वह्या, त्या परिक्षा नाहीत
मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांची शाबासकी किंवा मित्रांचे कौतुक नाही......
आणि सगळ्यांत महत्त्वाचं.........
"आजचा दिवस भरला आता उद्या या......... आज शाळा सुटली........" अस सांगणारी घंटा नाही....

लगेच मागे वळुन पाहीलं आणि नेमका शाळेत येतानाचा पहिला दिवस आठवला. गेटवर मी अगदी तसाच उभा होतो रडवेल्या चेहर्याने मागे वळुन पहाणारा.....फ़क्त आता दिशा बदलली होती. पहिल्या दिवशी शाळेत येताना आई जशी धुसर होत गेलेली, तशी आज शाळाही हळुहळु डोळ्यात धुसर होत होती. हे दोन्ही दिवस आजही माझ्यासाठी अगदी तस्सेच होते फ़क्त त्यादिवशी आईने हात सोडला तेव्हा मी तिथे एकटा होतो पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्यासोबत
माझा आत्मविश्वास होता,
डोळ्यात उद्याची स्वप्ने होती,
कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती
आणी मनांत कधीही न पुसल्या जाणार्या आठवणी होत्या...............

आज ही शाळेच्या गेटवरुन शाळेकडे पहाताना पापण्यांच्या कडा नकळत ओलावतात. तिला पहाताना उर भरुन येतो. तेव्हा मन पुन्हा तिला साकडं घालतं की
"मला पुन्हा तुझ्या सावलीत घे.....परत एकदा शाळेत घे.......मला परत एकदा शाळेत घे............"

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...