Pages

Pages

Browser Websites

Website Search

Pages

Pages

NAS Question Paper

शिक्षण परिषद

सामान्य ज्ञान

Forts

गोष्टीचा पु्स्तके PDF DOWNLOAD

Cloud Print माहिती

पर्यटन

MSCE PUNE

DOWNLOAD

Physical Game

Video Download

Travel

Cricket Live Score

गाणी Hindi. Mp3. Download

Coronavirus Update

WHO

Travel

Pages

Flights booking

Travel

Education

International Airports Websites

PDF Download

प्रशासन

Online Banking websites

Magazine

Space

Political

Important web

Friday, July 8, 2016

झोपेचा तास

आजच्या (रविवार, २६ जून २०१६) ऍग्रोवनमध्ये आमच्या बहिरवाडी शाळेतील 'झोपेच्या तासा'विषयी आलेला माझा लेख...

  झोपेचा तास !

-लेखक भाऊसाहेब चासकर

यंदा पहिलीचा वर्ग मिळणार होता. निरागस, नितळ, निर्मळ मनाची लहान लहान मुलं म्हणजे साक्षात चैतन्यच वर्गात येणार होतं. पहिलीतल्या मुलांबरोबर राहता येणार आहे. खेळ, गाणी, गप्पागोष्टी, आणि भरपूर दंगामस्ती करता येणार आहेत. चिमुरड्यांसोबत राहून त्यांना समजून घेता येणार आहे, या कल्पनेनेच मी रोमांचित झालो होतो. कारण आजवरच्या नोकरीत पाचवी ते सातवीचे वर्ग मिळालेले होते, म्हणूनच खूप उत्सुकता लागून होती.

लहान मूल कसं शिकतं, मुलं कसा विचार करतात, घर परिसरातल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पार्श्वभूमीचा आणि तिथल्या एकूण वातावरणाचा मुलांच्या जडणघडणीवर, शैक्षणिक संपादणूकीवर कसा परिणाम होतो, लहान मुलांच्या भावविश्वात नेमके काय काय असते, अशा अनेक गोष्टी समजून घेण्याची, निरीक्षणाची संधी आता रोज आयतीच मिळणार होती. त्यासाठी काही संदर्भ मी शोधत होतोच. चर्चा करत होतो.

पहिलीचा वर्ग आल्यावर मुलं आणि मी मस्त हसत खेळत, गप्पागोष्टी करत मजेमजेने नव्या नव्या गोष्टी रोज शिकत होतो. मुलांशी छान दोस्ताना झाला होता. वर्गातलं वातावरण अत्यंत अनौपचारिक कसे राहील यावर माझा कटाक्ष असे. समजून घेणारं उबदार वातावरण आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानं मुलं मस्त खुलून बोलायला लागली होती. गप्पांच्या ओघात मुलं मनातलं बिनधास्तपणे सांगू लागली होती.

“तुमाला एक सांगायचंय. सांगू का?”

लाडात येऊन साई मला विचारत होता.

“सांग ना रे साई!” मी म्हणालो.

“पण रागावायचं नाही अं, तरच सांगंण. नायतर नाही सांगणार ...”

“अरे बाबा, अजिबात रागावणार नाही, तू सांग तर आधी...”

“दुपारचं जेवल्यावं लई कटाळा येतो. पार झोपच येती.” जरासं गुतत गुततच साईनं त्याचं मनोगत सांगितलं.

“हां सर खरंचये साई म्हणतोय ते. जेवल्यावं त लय कटाळा येतोय. तुमाला नाही माहिती!”

स्नेहलने साईच्या सुरात सूर मिसळला.

“जेवण झाल्यावर थोडंसं खेळायचं. मस्त उड्या मारायच्या. भिंतीवर लिहिलेले अक्षरं, शब्द वाचायचे आणि मग वर्गात येऊन बसायचं, चालेल ना?”

मी मुलांसमोर एक ‘प्रस्ताव’ ठेवला. तो बहुतेक मुलांना तो आवडलाही, त्यांना आनंद झाला. साई मात्र त्यावर खुश दिसत नव्हता. त्यालाजवळ घेत, विश्वासात घेऊन विचारल्यावर तो म्हणाला,

“सर, आपल्या शाळेत (त्याला बहुदा वर्गात म्हणायचं असावं.) भाषेचा, गणिताचा, खेळायचा तास असतो ना. तसा झोपेचा तास का बरं नसतो? दुपारी लय झोप येती तवा झोपायचा तास ठेवाया पायजेल...”

“हां, सर लय मज्जा येईल, झोपायचा तास ठेवल्यावं.” आणखी काही मुलांनी साईच्या ‘सूचने’ला ‘अनुमोदन’च दिले!

“आपल्या वर्गातले काही लहान पोरं (ज्यांचं शाळेत नाव घातलेलं नाही, पण वर्गात येऊन बसतात अशी मुलं!) दुपारचं जेवल्यावं लगेच झोपात्यात. त्यांना तुमी खुशाल झोपून देत्या. मग आमाला बी झोप आल्याव तसं थोडा वेळ झोपून द्यायचं...”

वैष्णवी म्हणाली.

“हां सर आता नाही म्हणायचं नाही...”

सारी मुलं एका सुरात बोलली. आता मुलांचं बहुमत झालं होतं आणि मी अल्पमतात होतो! मला मुलांचं ऐकणं भाग होतं. मी होकार दिला. मुलांना कोण आनंद झाला. हेहेहेहेsss म्हणत वर्गात एकच दंगा सुरु केला. मुलांचे चेहरे मला अगदीच वाचता येत होते. आवडीची खेळणी विकत घेतल्यावर, नवीन ड्रेस किंवा आवडीची वस्तू/खाऊ मिळाल्यावर जेवढा आनंद होणार नाही, इतका आनंद मुलांना झाला होता! वर्ग डोक्यावर घेऊन त्यांनी तो व्यक्त केला. त्या क्षणी वर्गात जल्लोषपूर्ण वातावरणात जे काही सुरु होतं, तो प्रसंग इथं शब्दांत पकडणं केवळ अशक्य आहे. शिक्षक असल्यानेच अशा अनमोल आनंदक्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकदा माझ्या वाट्याला आल्याचं समाधान मी अनेकदा अनुभवलंय.

मुलांचं शिकणं शास्रीय पद्धतीनं समजून घ्यायला लागल्यापासून आम्ही शाळेतले कठोर शिस्तीचे वातावरण हद्दपार केलेय. मुलांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शाळेच्या दैनंदिन कामकाजात पडताना दिसते. एकूण शिक्षण प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

मुलांच्या मागणीनुसार पहिलीच्या वर्गात दुपारी झोपेचा तास सुरु झाला! जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं मुलं शांतपणे झोपी जातात. रिल्याक्स होतात. उठायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, पाणी पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वर्गात येऊन बसायचं.
विशेष म्हणजे आधी दुपारच्या वेळी मुलांचे चेहरे सुकायचे. मुलं आळसावलेले दिसत असत. आता शाळा सुटेपर्यंत मुलांचा मूड टिकून राहतो. अर्थात वेगवेगळे विषयदेखील आनंददायी पद्धतीने शिकवायचा प्रयत्न असतो, हेही त्याचं एक कारण असावं.

झोपेच्या तासाची अजून एक गंमत सांगायची राहिली. तास सुरु झाला तेव्हा आधी आधी फक्त मुलंच झोपायची. मी वर्गातच काहीतरी लेखी कामकाज करत बसायचो. कोणी डोळे मिटलेले नाहीत, कोण हसतंय, याचं निरीक्षण करत बसायचो.

‘तुमी पण झोपा आमच्याबरोबर...’ असं काही दिवसांनी मुलं म्हणू लागली. ‘आपण कसं काय झोपायचं बॉ? पालक-अधिकारी वर्गात आले तर काय उत्तर द्यायचं?’ असे अनेक विचार मनात आले. मुलांना माझ्या नजरेतून दिसणाऱ्या अडचणी सांगायच्या नव्हत्या. काही दिवस मी आढेवेडे घेतले. काही दिवसांनी माझी मानसिकता तयार झाली. धाडस वाढले. मग मी पण झोपेच्या तासाचा विद्यार्थी झालो! मुलांबरोबर मी झोपू लागलो. लक्षात असं आलं की, त्या घडीभाराच्या विश्रांतीनं आपण किंचित का होईना जास्त क्षमतेनं काम करायला ‘चार्ज’ होतो आहोत.

व्हॉटसअप्सच्या ग्रुप्समध्ये, फेसबुकवर आमचा झोपेचा तास फोटोसह शेअर केल्यावर त्याचं भरपूर कौतुक झालं. झोपेच्या तासाचे अनेक फायदे तिथल्या काही डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या मित्रांनी सांगितले. बौद्धिक काम करून येणारा थकवा किंवा कंटाळा घालविण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचं सांगितलं. वामकुक्षी घेतल्यानं कार्यक्षमता कशी वाढते? याबाबत काही संशोधनं झाल्याची माहितीही मिळाली.

अशी प्रशस्ती मिळाल्यावर मग आमचाही आत्मविश्वास दुणावला. जगभरातल्या काही शाळांमध्ये झोपेचा तास सुरु असल्याचंही समजलं.पाठोपाठ भारतात आसाममध्ये एका शाळेत दुपारी मुलं झोपल्याचा फोटो बातमी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली. काही देशांत ऑफिसातच अँटी चेंबरमध्ये विश्रांती घेता येते.
कॉर्पोरेट जगतातली 'पॉवर नॅप' नावाची संकल्पना समजली. 'पॉवर नॅप' म्हणजे कामातून थकवा आल्यावर दुपारच्या वेळला डुलकी घेणे! ही सारी माहिती माझ्यासाठी अगदीच नवीन होती. 'गुगल' करुन झोपेविषयी आणखीन अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली. माझ्या परीने ती मुलांना सांगितली. आपला हा वेडेपणा नसून, आपण योग्य वाटेवर आहोत, याचीही खात्री पटली.
शिक्षक म्हणून मुलांच्या मनात आलेला विचार ऐकून घेतला. तशी कृती केली. तो इतका सर्व व्यापक असू शकतो, याची प्रचीती या निमित्तानं आली. मुलांना भरपूर सांगायचं असतं. घरी-दारी मुलांचं ऐकून घेणारे कमी आणि त्यांना ऐकवणारे लोकं जास्त झालेत, त्यामुळे मुलांच्या कल्पना शक्तीला आम्ही बांध घालून त्यांचं सृजनशील मन संकुचित केल्यासारखं वाटतं. आधी घरी आणि पुढं शाळेत हा मोकळेपणा नसल्यानं तो जगण्याचा स्थायी भाव बनत नाहीये. म्हणून शिक्षणात मुलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब उमटायला पाहिजे. माणूस म्हणून घडण्यासाठी ते फार आवश्यक आहे, असे वाटते.

पाचवी सहावीत असताना आमचे गणिताचे शिक्षक दुपारच्या सत्रात त्यांच्या तासाला डुलक्या घेणाऱ्या मुलांवर डाफरायचे, खवचटसारखं बोलायचे. तेव्हा मुलांचं ते डुलक्या घेणं चूक आहे, असं वाटे. भर वर्गात सरांदेखत डुलक्या घेणारी म्हणजेच झोपणारीमुलं अपराधीच आहेत, असंवाटायचं. आता शिक्षक म्हणून टेबलच्या या बाजूला उभं राहून बघताना या गोष्टींची गरज लक्षात येतेय. शिक्षक शिक्षकांना विश्रामीकेत शिक्षक विश्रांती घेऊ शकतात, तर मग मुलांसाठी अशी सोय शाळेत का नाही/नसावी? असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने विचारला तर माझ्याकडं कुठं शिक्षक म्हणून काही उत्तर आहे? शाळा जर का मुलांकरिता असतील तर तिकडे मुलांच्या मनोभूमिकेतून शिक्षणाचा एकूण पट मांडला जायला हवा असंही मला वाटतं.

मुलांना समजून घेतल्याशिवाय, विश्वास दिल्याशिवाय मुलं आपल्यासाठी त्यांच्या मनाची कवाडं कदापि उघडणार नाहीत, याची खात्री पटलीय.म्हणूनच विद्यार्थी असताना जे आपल्याला मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, त्या गोष्टी मुलांना द्यायचा माझा सतत प्रयत्न राहिला आहे.

लहान मुलांचं विश्व निराळंच असतं. उनाड वाऱ्यासारखं अवखळपणे खेळणं, हसणं-खिदळणं मुलांना आवडतं. अनेकदा हे स्वातंत्र्य शाळा आणि शिक्षक मुलांना नाकारतात. मग विद्यालयं आनंदालयं नाहीतर भयालयं वाटत राहतात. शाळेच्या वेळापत्रकात परिपाठापासून परीक्षेपर्यंत अनेक गोष्टींविषयी मुलांना काहीतरी म्हणायचं असतं. ते सांगण्यासाठी मुलांना मोकळा अवकाश दिला की मुलं मुक्तपणे व्यक्त होऊ लागतात. मुलांना शिकवण्यापेक्षा ती शिकती कशी होतील, हे बघताना मुलांना जीव लावणं आणि त्यांना उबदार शैक्षणिक पर्यावरण आवश्यक असतं.

भाऊसाहेब चासकर,

मोबाईल- 9422855151.
bhauchaskar@gmail.com

(लेखक नगर जिल्हा परिषदेच्या बहिरवाडी शाळेत सहायक शिक्षक असून, Active Teachers Forumचे संयोजक आहेत.)

1 comment:

  1. खरच आहे, मुलांना काय शिकायचंय हे त्यांनाच ठरवू दिले तर अजून चांगल्या तर्हेने त्यांचे व्यक्तिमत्व फुलेल. शिक्षक हा मदतनीस म्हणून असावा. भारंभार विषय व एवढा मोठा अभ्यासक्रम ह्या पेक्षा आवडीचा अभ्यास क्रम घ्यायची मुभा शाळेतच असावी त्यामुळे शिक्षणाची गोडी वाढेल व आवडत्या विषयातील पारंगत्व लवकर मिळेल. डिग्री लवकर मिळेल व लवकर कमवायला लागून आपल्या पायावर उभा राहील.

    ReplyDelete